Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय :- २ (मराठी भाषांतर )


श्री नवनाथ भक्तिसार 

  अध्याय :- २ (मराठी भाषांतर )  

( मच्छिंद्रनाथांची तप्श्चर्या व दत्तदर्शन ) 
 

          ॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ||श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

                   श्री शंकर आणि श्री दत्तात्रेय मंदराचलाची शोभा, तसेच बदरिका वनाचे सौंदर्य बघत चालले होते. दाट अरण्यात त्यांना सतरा-अठरा वर्षांचा मच्छिंद्र ध्यानस्थ दिसला. त्याची अस्थिपंजर अवस्था पाहन दुरूनच भगवान शंकर दत्तात्रेयांना म्हणाले, "हा तरुण अगदी क्षीण झालेला दिसतो. मी येथेच थांबतो व तुम्ही त्याच्या तपाचा हेत विचारा." श्री दत्तात्रेय त्या मोठ्या वक्षाकडे हळहळ गेले. त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता. मच्छिंद्राजवळ जाऊन त्यांनी विचारले."तपस्वी तरुणा, एवढे घोर तप कशासाठी करतोस?" त्यांचे शब्द कानी पडताच मच्छिंद्राने कष्टाने डोळ्याच्या पापण्या उघडल्या. 


                  श्री दत्तात्रेयांचे दर्शन होताच मच्छिंद्राने बसल्याबसल्या मानेनेच त्यांना अभिवादन केले आणि म्हटले, "गुरूदेव ! येथे बारावर्षात एकही माणूस दिसला नाही, आपण दिसलात, ही अंबाभवानीची कृपाच म्हणायची. आता आपला कृपाप्रसाद देऊनच जावे!".
                 श्री गुरुदत्त म्हणाले "मी अत्रिसुत दत्त होय. तू हे क्षीण करणारे घोर तप का करीत आहेस?" मच्छिंद्र म्हणाला, “गुरूदेव ! तुम्ही मला धन्य केलेत ! माझे तप फळाला आले." असे म्हणून त्याने भगवान दत्तांच्या चरणी स्वत:ला झोकून दिले. “बाळा!" असे म्हणून त्यांनी त्याला  उचलून आपल्या दिव्य बाहूंनी आलिंगन दिले. तेव्हा भक्तिभावनेने भरून तो म्हणाला, " हे देवा, मी ईश्वरप्राप्तीसाठी तप करीत आहे. तुम्ही ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे एकवटलेले सर्वसाक्षी सर्वज्ञ देव! माझी बारा वर्षे उपेक्षा का केलीत? माझा एवढा काय अपराध झाला?" श्री दत्तात्रेयाने मच्छिंद्राचे अश्रू पुसले. त्याचे सांत्वन केले. त्याला आपल्या इच्छेने सुदृढ केले. मच्छिंद्र पुन: दत्तांच्या पाया पडला. दत्तात्रेयाने त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवला व त्याला उपदेश केला. त्यामुळे मच्छिंद्राची भेदबुद्धी नाहीशी झाली, माया नष्ट झाली, सर्वत्र मला एकच परम चैतन्य दिसत आहे, काय बोलू? वर्णन अशक्य आहे. दत्तात्रेय म्हणाले, “या स्थितीचा तुला नित्य अनुभव मिळेल. चल भानावर ये! तुला भेटायला भगवान शंकर आले आहेत. चल!!" ते ऐकून मच्छिंद्र चकित झाला. त्याला घेऊन श्री दत्तगुरू श्रीशंकरांजवळ आले. श्री शंकरांनी मच्छिंद्राला मत्स्यीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रेयाला सांगितले, “याला सर्व सिद्धींचे सामर्थ्य द्यावे!" श्रीदत्तात्रेयांनी त्यावेळी मच्छिंद्रावर अनग्रह करून त्याला देवतांचे वरदान प्राप्त करून दिले व पंचमहाभूतांवर अधिकार दिला. 'नाथ' हे नाम, मच्छिंद्र हे स्वतःचे नाम, संप्रदायाची शृंगी आदि लक्षणे, कान विंधण्याचे संस्कार, परंपरा चालविण्याचे, शक्ती संक्रमित करण्याचे, दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व सहा महिन्यांनी ते दोघे तेथून निघून गेले. मच्छिंद्रही तेथून दक्षिणेकडे निघाला. 


                  पुढे तो फिरता फिरता सप्तश्रृंगी येथे आला. तेथे अंबेचे जागृत देवस्थान आहे. तेथे अंबेचे स्तवन करू लागला पण स्तवन करता करता त्याच्या मनात आले की, संकटांनी ग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र काव्यरुपाने रचून ठेवावे. तो आपल्याशीच विचार करीत होता. “कवन करण्यासाठी दैवते अनुकूल कशी होतील?" अंबेने आपणाला दर्शन द्यावे, म्हणून मच्छिंद्राने सात दिवसांचे अनुष्ठान मांडले. ते संपूर्ण झाले, तेव्हा देवीने मच्छिंद्राला दर्शन दिले. देवी म्हणाली, "बाळा, तुला जे हवे आहे ती शाबरी विद्या होय. तुजवर दत्तांनी कृपा केली आहे. त्यामुळे मी सांगते ते साधन तू करशील, तर सर्व सिद्धी तुला प्रत्यक्ष हस्तगत होतील. तू मजबरोबर चल!" । 



                   देवीने मच्छिंद्राला मार्तड पर्वतावर नेले. 'नाग-अश्वत्थ' म्हणून तेथे एक वृक्ष होता. तो त्याला दाखविला. बीजमंत्रांनी हवन करूनच मच्छिंद्राला तो दृष्य झाला. पहातो त्या वृक्षावर बावन्न वीर , बारा मातृका, सूर्यादी सर्व देवता व शस्त्रास्त्र-देवता फांद्या फांद्यांवर विराजमान झालेल्या, पण त्या सर्व मूक! देवी म्हणाली, "या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्यामंत्र देतील, पण तू एक काम कर, येथून ब्रह्मगिरीला जा, तेथे अंजनपर्वत आहे. तेथून एक नदी दक्षिणेस वाहते. तेथे नदीच्या पात्रात हत्तीच्या पावलांएवढी कुंडे आहेत. पांढरीच्या वेली हातात घे. एकेका कुंडात वेल टाक. परत येतांना त्या वेली पाहा. ज्या कुंडात वेल सजीव राहिलेली असेल, ते कुंड स्नानासाठी योग्य समज, तेथे स्नान कर. त्या कुंडातील पाणी काचपात्रात बंद करून घे. मग येथे ये! पण एक सांगते, त्या कुंडात स्नान केलेस की, तुला मूर्छा येईल. त्यावेळी आदित्याची बारा नामे सतत जपत राहा. त्याने तुला काही त्रास होणार नाही. तू शुद्धीवर येशील. येथे या वृक्षावर तू ते पाणी सिंचन कर. एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल. एका वेळी एकच देवता प्रसन्न झाली, तरी न कंटाळता वारंवार अशा खेपा घाल व सर्व देवता वश करून घे." असे बोलून देवी स्वस्थानी निघून गेली. 
                  च्छिंद्र पांढरीच्या वेली घेऊन निघाला. देवीने जसे सांगितले, तसेच त्याने केले. एका कुंडातील वेल मात्र जिवंत राहिली. मग त्याने त्यात स्नान केले, लगेच त्याला मूर्छा आली, पण सूक्ष्म शरीराने सुद्धा तो सूर्यनाम जप करीत राहिला, तेव्हा सूर्य त्याच्या समोर आला. मच्छिंद्राला सावध करून त्याची इच्छा विचारली. सूर्याने त्याला "तू यशस्वी होशील" असा आशीर्वाद दिला. त्या कुंडाचे नाव आदित्य कुंड! मग त्यातील पाणी घेऊन मच्छिंद्र मार्तड पर्वतावर गेला व तेथील त्या दिव्य वृक्षावर ते पाणी त्याने शिंपडले. 



                 त्याबरोबर तेथील सूर्यदेवता प्रकट होऊन बोलू लागली. त्याला वरदान देऊन सूर्यदेवता म्हणाली, “निमंत्रण करताच मी येईन." मच्छिंद्र अशा रीतीने सात महिने त्या शंभर कुंडांची प्रदक्षिणा करत राहिला व सर्व देवतांनी त्याला विद्या दिली. त्यानुसार त्याने शाबरी विद्या म्हणून मोठा काव्यरुप ग्रंथ रचला. त्याची इच्छा पूर्ण झाली. मग तेथून मच्छिंद्रनाथ वंगदेशाकडे तीर्थयात्रा करीत करीत निघाला. मच्छिंद्रनाथ वंग देशात फिरत होता. वाटेत एका गावातील घरासमोर उभे राहून त्यांनी 'अलख निरंजन' अशी गर्जना करून भिक्षा मागितली. त्या घराची मालकीण सरस्वती भिक्षा वाढायला आली, पण तिचा चेहरा दुःखी दिसला. मच्छिंद्रनाथांनी विचारले, “माई, आपण दुःखी का?" सरस्वती म्हणाली, "महाराज सर्व काही आहे पण पुत्र संतान नाही." मच्छिंद्रनाथ म्हणाले, "माई, त्यावर एक उपाय आहे. हे भस्म अंगारा घ्या आणि देवाची प्रार्थना करून हे आपण 
खाऊन त्यावर पाणी प्या. हरी नावाचे स्वर्गीय ऋषी तुमच्या पोटी येतील. बारा वर्षांनी मी येईन. तुमच्या मुलाला घेऊन जाईन आणि त्याला दिव्य ज्ञान देईन." मच्छिंद्रनाथ निघून गेले. सरस्वतीबाईंना आनंद झाला. त्यांनी आपल्या शेजारणीला तो वृत्तांत सांगितला. शेजारीण बाई म्हणाली, "अहो, अंगारा खावून कुठे मुले होतात? हे जादू टोणा करणारे लोक लबाड असतात. त्यांच्या नादी लागू नका." ते ऐकून सरस्वती घाबरली. तिने तो अंगारा अंगणात गाईचे शेण, राख, कचरा टाकण्याच्या जागी टाकून दिला. थोड्याच दिवसात ती ते सारे विसरून गेली. 

अध्याय फलश्रुती:- धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या