Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय :- १ (मराठी भाषांतर ) || navnath bhakisar adhyay 1

श्री नवनाथ भक्तिसार 

 अध्याय :- १ (मराठी भाषांतर )

( संबधबाधा नाहीशी होऊ शकते )

          ॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ||श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.



              फार पूर्वीची म्हणजे कृष्णावताराच्या वेळची गोष्ट आहे. द्वापारयुग संपत  आले होते. कलियुग सुरू व्हावयाचे होते. श्री विष्णू भगवानांचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते. भक्तश्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसला होता. यदुसभेत त्यावेळी  नव-नारायण आले. कवी, हरी, अंतरीक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, दुमिल, चमस व करभाजन अशी त्यांची नावे, नारायणाचे कार्य करणारे म्हणून त्यांनाही 'नारायण' म्हणतात.
                वनारायण आल्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आसन दिले. त्यांची पूजा केली. श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते. कुशल प्रश्न झाले; मग त्या ऋषींनी बोलावण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले. त्यावेळी कोणी कोठे कोठे अवतार घ्यावा, यासंबंधी त्यांनी विचारणा केली. श्रीकृष्ण म्हणाले, 'कवी' ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे, 'हरी' ऋषीने त्याचा शिष्य गोरक्ष व्हावे. 'पिप्पलायन' हा चर्पटीनाथ, 'आविर्होत्र' हा वटसिद्ध नागनाथ, 'दुमिल' हा भर्तरीनाथ व 'करभाजन' हा गहिनीनाथ होईल." श्रीकृष्ण पुढे म्हणाले, 'इतरांसह मी ही ज्ञानदेव म्हणून अवतार घेऊन येईन. भगवान शंकर हे 'निवृत्तीनाथ', भगवान ब्रह्म हे 'सोपान' व योगमाया ही 'मुक्ताबाई' व उद्धव हे 'नामदेव', कुब्जा ही 'जनाबाई', हनुमंत हे 'रामदास', वाल्मिकी हे 'तुलसीदास', जांबुवंत हे 'नरहरी', शुकदेव हे कबीर', बलराम हे पुंडलिक' असे अवतार घेऊ. आपण सारे कलियुगात नवा संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू." त्यांचे बोलणे ऐकून नव ऋषींना आनंद झाला. ते तेथून निघून मंदराचलावर गेले शुकमुनी तेथे ध्यानस्थ होते. या ऋषींनीही त्यांच्या जवळच्या निबिड गुहामध्ये जाऊन योगसमाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतिक्षा करू लागले. 'कवी' ध्यान करीत होते. यमुना नदीत ज्या मत्स्यीने ब्रह्मतेज गिळले होते, ती त्यांना दिसली. त्या तेजात त्यांनी जीवरुपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला. पुढे काय झाले? कैलासावर भगवान शंकर पार्वती बसलेली असतांना पार्वती  शंकरांना म्हणाली, "तुम्ही ध्यान करता, साधना करता, ती मला सांगा, मला दीक्षा द्या!"
                        तेव्हा भगवान शंकर तिला म्हणाले, "मी दीक्षा देतो, पण निवांत व एकान्ताची जागा हवी." तेव्हा नंदीवर आरुढ होऊन ते दांपत्य त्रैलोक्यात हिंडले त्यांनी यमुनातीर पसंत केला. तेथे नंदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला; बीजमंत्र सांगितला. मग तिला विचारले, "प्रिये, मी सांगितले ते कळाले का?" पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून 'हो कळाले!' असा उद्गार आला. शंकरांनी पाहिले पाण्यात एक मोठी मत्स्यी आहे. तिचा गर्भ, 'कवी' नारायणाने व्यापला आहे. शंकर त्याला म्हणाले, "कवी, तू ऐकलेस, वा! अनुभवही घेतलास?" पुन: गर्भ बोलला, “होय ! सर्वत्र अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे." तेव्हा भगवान शंकर म्हणाले, “मत्स्येंद्रा ! धन्य आहेस. आता तुला पुढे पुनः श्री दत्तांकडून उपदेश देववीन."              
                        पार्वतीसह भगवान शंकर तेथून निघून गेले. मत्स्यीने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला. तेथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्यांना ते अंडे दिसले. भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते फोडले, त्याच्या आत मनुष्यबालक दिसला. तो मोठमोठ्याने रडू लागला. म्हणून भ्याले व पळून गेले. तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचात पडून वारंवार रडू लागला. तेवढ्यात तेथे 'कामिक' नावाचा मासे पकडणारा कोळी आला. त्याने ते रडणे ऐकले. तो जवळ आला, अंड्यात एक बालक रडत होता. त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले. त्याचे रडणे कसे थांबवावे, याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला, तोच त्याला आकाशवाणी ऐकू आली, " कामिका ! हा कविनारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला घरी ने, वाढव आणि याचे नाव 'मच्छिंद्र' ठेव. कोळ्याला फार आनंद झाला. त्या मुलाला घेऊन तो लगबगीने धा घरी गेला. त्याने त्याची बायको 'शारद्वता' जवळ तो बालक दिला. तो बालक कसा सापडला, ते त्याने सांगितले. तिलाही फार आनंद झाला. तिने व कामिक कोळ्याने आपण निपुत्रिक आहोत म्हणून देवाला दया येऊन त्याने आपल्याला हा पुत्र दिला आहे. असे समजून प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरविले. आश्चर्य असे की, त्याला पोटाशी धरताच शारद्वतेला पान्हा फूटला. त्यांनी त्या मुलाचे नाव मच्छिंद्र ठेवले. फार लाडाने त्याला वाढविले. पाच वर्षांचा झाल्यावर मच्छिंद्र बापासह नदीतीरावर जाण्यास निघाला. कामिक व मच्छिंद्र यमुनेवर गेले. एकदा जाळे टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळूत टाकले, मुलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन: नदीत जाळे टाकण्यास गेला. तेव्हा मच्छिंद्राला ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्यांची प्राणांतिक स्थिती बघवेना. त्याला वाटले, हे मासे पाण्यात सोडावे म्हणजे जगतील. मच्छिंद्राने मासे पाण्यात सोडले, थोड्या वेळाने कामिक परत आला. "मासे कमी कसे?" असे त्याने विचारताच मुलगा म्हणाला, "मी ते पुन: नदीत सोडले. उगीच तडफडत होते." कोळी संतापला. तो म्हणाला "पोरा! भीक मागायची आहे का? मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय?". त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला. मारामुळे कळवळला! कोळ्याची पाठ फिरली, तेव्हा मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला, 'भीक? होय, मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी! आता येथे रहायचे नाही." मच्छिंद्र तीरापासून दूर गेला आणि उत्तरेची दिशा धरून खूप जोराने पळत सुटला. कामिकापासून तो जास्तीत जास्त दूर जात होता. दमला की तो विश्रांती घेई व पुन: धावू लागे. असे धावता धावता तो बद्रिकांवनाला गेला. तेथे आता निराहार राहन तप करायचे असे त्याने ठरविले. तो तप करू लागला.

अध्याय फलश्रुती :-  समंघबाधा नाहीशी होऊ शकते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या