Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय :- ३ (मराठी भाषांतर )


श्री नवनाथ भक्तिसार

अध्याय :- ३ (मराठी भाषांतर )

(मच्छिंद्र नाथ व मारुती युद्ध)



॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ||श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

               मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या तीरातीराने तीर्थे पाहात रामेश्वरास गेला. त्याने रामाचा सेतू पाहिला. तो समुद्रस्नान करीत असता त्याला तिथे एक वानर दिसला. आकाशात ढग जमू लागले होते. पाऊस पडू लागला होता. लगेच तो वानर एक दरड उकरून घर बांधून घरात राहण्यासाठी दगड रचू लागला. खरे तर तो वानर म्हणजे स्वत: हनुमंत होता. पण त्याने लहान रुप घेतले होते. त्याचे खरे स्वरूप न कळता'मच्छिंद्राने त्याला चेष्टेने म्हटले, "वा! वा!! हा वरून पाऊस पडतोय आणि तू आत्ता घर बांधणार? अरे, तहान लागली की विहीर खणतात का?" मारूती म्हणाला, "साधुमहाराज, तुमच्याइतके ज्ञान कुठले आम्हांला? तुम्ही मोठे चतुर आहात. तुमचे नाव तरी काय?" मच्छिंद्र म्हणाला, "मला जती (यती) म्हणतात. माझं नाव मच्छिंद्र आहे." मारूती म्हणाला, "जती? जती म्हणजे काय?", मच्छिंद्र म्हणाला "अरे माझ्या अंगी योगशक्ती आहे, म्हणून मला जती म्हणतात."वानररुपी मारूती म्हणाला, "अरे वा! हा कोण दुसरा जती? हनुमंत हा एकच खरा 'यती' अशी ख्याती आजपर्यंत ऐकली. हनुमताजवळच मी राहत असे, म्हणून मला त्याच्या शक्तिचा हजारावा हिस्सा तरी प्राप्त झाला आहे. तुमची शक्ती केवढी आहे ती दाखवा मच्छिंद्राने ते आव्हान स्वीकारले.

           हनुमंत लगेच पर्वतापलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण करून एक पर्वत उचलून मच्छिंद्रनाथावर फेकला. मारूतीचे खरे रुप माहित नसलेला मच्छिंद्र तो कोसळणारा पर्वत पाहून समजून चुकला की हा वानर म्हणजे प्रत्यक्ष मारूतीच. त्याने लगेच भस्माची चिमुट हातात धरली व 'स्थिर हो, स्थिर हो' असा आदेश त्या पर्वताला दिला. तेव्हा तो पर्वत अधांतरीच तरंगत राहिला. तिकडे मारूती डोंगरांमागून डोंगर फेकू लागला व ते सर्व अधांतरीच तरंगू लागले. तेव्हा हा योगी आटोपत नाही म्हणून क्रोधाने मारूती हातात 
डोंगर धरून उड्डाण करून आला पण मच्छिंद्रनाथाने समुद्रातलेच पाणी घेऊन वाताकर्षण अस्त्र मंत्रुन त्याच्या दिशेने ते पाणी फेकले. तेव्हा डोंगरासकट,उंच हात धरलेला मारूती एकदम स्थिर झाला. त्याला हालताच येईना. त्याचे प्राणच कासावीस झाले. त्याची ही अवस्था पाहून मारूतीचा पिता वायुदेव मच्छिंद्राला शरण आला.
 आपल्या पुत्रावर दया करून त्याची सुटका करावी, अशी वायुदेवाने मच्छिंद्राची प्रार्थना केली, तेव्हा दया येऊन मच्छिंद्राने मारूतीला सोडले. मग वायु व मारूती त्याच्यासमोर आले. वायू मारूतीला म्हणाला, "मुला या सिद्धाने आपल्याला बांधून टाकले, कारण त्याच्याजवळ गुरुभक्तिचे अमोघ सामर्थ्य आहे. ईश्वर, गुरू व मंत्र यांची वाणी अमोघ असते. गुरुभक्ती व ईश्वरभक्ती मनुष्याला कोणत्याही संकटातून पार पाडते. चल आपण त्याच्याशी सख्य करू." असे म्हणत त्याने व मारूतीनेही मच्छिंद्राला नमस्कार केला. मच्छिंद्राने म्हटले, “मला तुम्ही सहाय्य करावे." ते दोघेही सहाय्य करण्यास कबूल झाले. मग मच्छिंद्राने मारूतीला विचारले, "मी आता पुढे तीर्थयात्रेला जात आहे; पण एक शंका मनात आली ती विचारतो. मार्तंड पर्वतावर तू मला शाबरी विद्येतही मदत केलीस, असे असता इथे माझ्या विरुद्ध युद्ध का केलेस?"  
                  
                   'मारूती हसून म्हणाला, “मच्छिंद्रनाथा, मी तुझी बलपरीक्षा पाहिली. कितीतरी वर्षे माझ्या मनावर एक मोठे ओझे आहे ते दूर करशील का ?'' मच्छिंद्राने ते मान्य केले.तेव्हा मारूती म्हणाला, पूर्वी काय झाले, रावणवध झाला, राक्षसांचा नाश झाला. रामप्रभू व सीतामाई विमानात बसून अयोध्येत गेली. मी ही त्यांच्यासह गेलो. माझ्या सेवेने सीतामाई मजवर प्रसन्न होती. तिने मनाशी असे ठरविले की, मारूतीला मोठे घर बांधून 'द्यावे व त्याचे लग्न करून द्यावे. तिचा बेत काही मला माहीत नव्हता. ती मला म्हणाली,"आधी हो म्हण, मग सांगेन!" मी "हो" म्हटले. मग सीतामाई म्हणाली, "बघ, हो वचन दिले आहेस, श्रेष्ठ लोक वचनभंग करीत नाहीत. आता वचनाप्रमाणे वागले पाहिजे." मी पुन्हा होकार दिला. तेव्हा तिने सांगितले, "तू गृहस्थाश्रम स्वीकारावास, पत्नीबरोबर सुखाने संसार करावा, असे मला वाटते." तिचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. मी रामप्रभुंजवळ माझे गा-हाणे सांगितले, ते म्हणाले " हनुमंता, तू चिंता करू नको, प्रत्येक युगाच्या चौकडीत आपल्याला जन्म घेऊन ठरवलेले कार्य करायचे असते. आता पर्यंत ९८ राम झाले,९८ मारूती झाले मी ९९ वा राम व तू ९९ वा मारूती. रावण सुद्धा ९९ वा. त्याचे राज्य संपले. राक्षसांचा नाश झाला, याला तू ही कारण झाला आहेस. राक्षसस्त्रियांनी आता कोठे जावे? तू आता त्यांच्या राज्यात जा! विवाह कर!!" मी म्हणालो, "प्रभु, मी ब्रह्मचारी. माझ्यापासून त्यांना काय प्राप्त होणार ? मला स्त्रीसंगाचे पाप करायला का लावता!" श्रीराम म्हणाले, “मारूती, तुझी शक्ती ऊर्ध्व आहे. तुझ्या नुसत्या भुभुःकाराने सुद्धा स्त्रियांच्या ठिकाणी गर्भ धारणा होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल. तसे झाले तर, तुझे ब्रह्मचर्य ढळणार नाही. तुला दोषही लागणार नाही.' रामप्रभूनी अशा रितीने जरी सांगितले, तरी माझे मन तयार होईना. पण राम व सीता यांनी मला स्त्रीराज्यात जायला लावले.
                        
                        तो देश पर्वतांनी वेढलेला होता. तिथे सर्व स्त्रियाच होत्या. मेनका नावाची तिथे राणी होती. मी तिथे गेलो. तेथील स्त्रियांना पुरुष कसा तो माहीत नव्हता. माझ्या भुभुःकाराने मेनकेस व इतर स्त्रियांनाही गर्भ राहीले, पण पुरुषसंतती मात्र न होता कन्या प्राप्त झाल्या. मेनकेने मात्र माझ्याजवळ प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला पण जन्मापासून अचल अभेद्य सुवर्णकौपीन धारण केलेला मी, तिची इच्छा पूर्ण करणे मला अशक्य होते. तेव्हा तिला मी म्हटले उपरिचर वसूचा पुत्र म्हणून कविनारायण ऋषीच पुढे अवतार घेणार आहेत. मच्छिंद्रनाथ म्हणून ते अत्यंत समर्थ योगी होतील. ते येथे येतील. तेच तुझी इच्छा पूर्ण करतील, मी तिला जे वचन दिले, ते तू पूर्ण कर!" मच्छिंद्र म्हणाला, "मारूती मला भलत्याच संकटात पाडू नकोस. ब्रह्मदेव, नारद, इंद्र, रावण, शंकर, विश्वामित्र यांची स्त्रिया अभिलाषेमुळे काय गत झाली ती मला माहित आहे. तेव्हा मला हे भलतेच काम करायला लावू नकोस." मारूती म्हणाला, " ते काही नाही, मच्छिंद्रा, तुला हे काम करून माझी वचनातून सुटका 
करावीच लागेल. तुझ्यापासून तिला मीननाथ नावाचा मुलगा होणार आहे व तो उपरिचर वसूंचाच अवतार असेल." मच्छिंद्राने मारूतीशी पुष्कळ वाद केला. शेवटी त्याच्याकडून मारूतीने मान्य करून घेतलेच, "मात्र आधी मी सर्व तीर्थयात्रा करून येतो व मगच तुझे कार्य करण्यासाठी स्त्रीराज्यात जातो." अशी सोडवणूक मच्छिंद्राने करून घेतली आणि तो तीर्थयात्रा करण्यासाठी प्रवास करू लागला. 

अध्याय फलश्रुती:- शत्रूंचा नाश, मुष्टीयुद्ध, विद्येची प्राप्ती, घरात मारुती चे वास्तव्य.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या