Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय :- ९ (मराठी भाषांतर )

 श्री नवनाथ भक्तिसार
अध्याय :- ९  (मराठी भाषांतर )





                          ॥ श्री स्वामी समर्थ ॥

                  प्रवासात मच्छिंद्रनाथ पुन: चंद्रगिरी गावात आला. तेव्हा त्याला बारा वर्षापूर्वीची घटना आठवली. अंगणातून त्याने अलख निरंजन म्हणून भिक्षा वाढा हो, अशी हाक दिली. आतून एक स्त्री बाहेर आली. मच्छिंद्रनाथाने तिला तिचे नाव, पतीचे नाव, इत्यादी विचारले. तिने जेव्हा सर्वोदय पाल या गौड ब्राह्मणाची पत्नी सरस्वती असे आपले नाव सांगितले, तेव्हा त्याने तिला विचारले, “माई, मुलगा कोठे आहे?” सरस्वती म्हणाली, “स्वामी महाराज, का उगाच दु:खावर डागण्या देता? अजून पुत्रमुख पाहणे माझ्या भाग्यात नाही.'' मच्छिंद्र म्हणाला, “पुत्र नाही असे कसे म्हणतेस ? मी बारा वर्षापूर्वीच भस्म मंत्रून दिले होते, भक्षण केलेस का ते ?'' सरस्वती म्हणाली, “माझा फार मोठा घात झाला. आपण भस्म दिलेत, पण मी शेजारणींच्या बोलण्यामुळे ते भस्म न खाता बाहेर अंगणात गाईच्या शेणाची रक्षा व केर टाकण्याच्या जागेवर टाकले. महाराज, मला क्षमा करा.'' असे बोलून तिने नाथांसमोर दंडवत घातले मच्छिंद्रनाथाने तिची ही अवस्था पाहिली. तो म्हणाला, “माई ऊठ ते भस्म तू कोठे टाकलेस? मला ती जागा दाखव." त्याचे हे शब्द ऐकताच सरस्वतीच्या जिवात जीव आला. “स्वामी, मला ती जागा आठवते. चला मी आपल्याला दाखवते.'' तिने बाहेर दूर असलेला एक मोठा ढीग दाखविला. तेथे कचऱ्यांची रासच झाली होती. मच्छिंद्रनाथ तिकडे पहातच उभा राहिला. “ हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतूनच होणार आहे” -असे द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितल्याचे त्याला आठवले. मग त्याने हाक दिली, “अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलाबित आहे. बारा वर्षे तू या गोवरात राखेखाली राहिलास. तूच गोरक्षनाथ आहेस बाहेर ये.” आणि काय आश्‍चर्य ! त्या राशीतून खोलवरून कुठूनतरी आवाज आला, “गुरूमहाराज, मी इथे आहे, तुम्ही मला बाहेर काढा.” त्या आवाजामुळे ती बाई चकित झाली त्यांनीही मच्छिंद्रनाथाला तो राखेचा भला मोठा ढीग उपसून काढण्यास मदत केली. मुद्रा, सौंदर्य व मस्तकावरील कुरळ्या केसांचा जटाभार, हे पाहून सर्वजन आश्‍चर्यचकित झाले. सरस्वतीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. आपले नशीबच फुटके, म्हणून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असून आपण करंटेपणाने तों घालविला, याचे तिला फारच वाईट वाटून ती रडू लागली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, ''आता रडून काय उपयोग? हा तुझा मुलगा नव्हेच. इथे आता थांबू नको. नाहीतर उगाच शापवाणी मात्र माझ्या तोंडून बाहेर पडेल." ती बिचारी रडतरडत घरात गेली. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला प्रणवाची योगदिक्षा दिली व त्याला बरोबर घेऊन तो गाव सोडून गेला. अशा रीतीने गोरक्षनाथांचा अवतार झाला. भिक्षा मागत व तीर्थयात्रा करीत हे देशभर फिरू लागले. जाता जाता कनकगिरी नावाचे एक गांव लागले. मच्छिंद्रनाथ वस्तीपासून दूर बसला. त्याला फार भुक लागली होती. गोरक्षनाथाला त्याने भिक्षा मागण्यास पाठविले.

 

                 गोरक्षनाथ एका ब्राह्मणाच्या घरी गेला. तिथे पितृश्राध्द झाले होते. अंगणात जाऊन गोरक्षाने “जय अलख निरंजन अशी हाक देऊन  भिक्षा मागितली. घरातल्या बाईने त्याला सर्व प्रकारचे अन्न भिक्षा म्हणून घातले. षडूरसांनी युक्त अशी अन्नाची भरपूर भिक्षा मिळाली, ती पुरेशी वाटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे परत गेला.दोघांनी ते अन्न संपवले.मच्छिंद्रनाथ गोरक्षाच्या तोंडाकडे पाहू लागला.गोराक्षाने लगेच म्हटले, “गुरूजी, काय मनात आहे ते स्पष्ट सांगा.'' मच्छिंद्रनाथ म्हणाला, “बाळा, मनात येते, वडे किती चांगले झाले आहेत. आणखी असते तर बरे झाले असते.'' गोरक्ष म्हणाला, ''एवढेच ना ? मी आणखी मागून आणतो.'' लगेच तो पुन्हा झोळी घेऊन तडक गावात गेला व त्याच घरी अंगणात  गेला व पुन्हा भिक्षा मागू लागला. गोरक्ष म्हणाला, “ माई, माझ्या गुरूजींना वडे एवढे आवडलेत की त्यांना आणखी खावेसे वाटले. कृपा करून मला आणखी वडे द्या." ती स्त्री म्हणाली, ''एकदा अगदी भरपूर भिक्षा घातली, ती आतिथ्याची, आता आणखी पाहिजे असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल. एबढी गुरूभक्ती आहे म्हणतोस तर गुरूसाठी, मी मागेन ते दे, मग देईन वडे.” गोरक्षनाथ म्हणाला, “काय हबे ते मागा माई. गुरूंसाठी मी काहीही देण्यास तयार आहे.' त्याची परीक्षा पहावी म्हणून त्या बाई म्हणाल्या, “तुझा एक डोळा काढून दे.”

 

           गोरक्षाने तिचे शब्द कानी पडताच आपल्या एका डोळ्यात बाजुने बोटे खुपसून जोराने डोळा उपटून काढला. रक्त भळाभळा वाहू लागले. तरी सर्व वेदना सहन करीत तो म्हणाला, “माई, हा घ्या माझा डोळा. आता बडे द्या." त्याचे हे घोर कृत्य पाहून ती स्त्री फारच भयभीत झाली. रडत रडत त्या स्त्रीने आणखी वडे आणून त्याच्या झोळीत टाकले. ती म्हणाली, “तुझा डोळा मला नको. तू मजवर कोप करू नकोस. डोळा पण घेऊंन जा. हे बडे पण घेऊन जा.” गोरक्ष तत्काळ धावतं धावत मच्छिंद्रनाथाजवळ आला व ब म्हणाला, “गुरूमहाराज, हे घ्या बडे.'' मच्छिंद्रनाथ पाहातच राहिला. गोरक्षाने एक डोळा झाकलेला होता. मच्छिंद्र म्हणाला, ''एक डोळा का झाकला आहेस ?'' गोरक्ष म्हणाला, ''काही नाही, काही काळजी करू नका. मी वडे पुन्हा आणले आहेत ते कृपा करून खा.” तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, “तुझा डोळा दाखव. नाहीतर मी बडे खाणारच नाही. गोरक्षाने हात काढला व पट्टी सोडली. आत रक्ताळलेली नुसती खोबण होती. ''हाय रे बाळा !' असे म्हणत मच्छिंद्रनाथाने शिष्याला पोटाशी धरले. गोरक्षाने घडलेली सारी हकीकत सांगितली. आपल्या शिष्याची अलौकिक गुरूभक्ती पाहून मच्छिंद्रनाथ गहिवरले. त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून तो डोळा पुन: जशाच्या तसा चांगला केला. त्यानंतर मच्यछिंद्राने गोरक्षनाथाला, दत्तात्रेयांनी दिलेली सर्वयोगविद्या एका महिन्यात शिकविली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या