श्री नवनाथ भक्तीसार
अध्याय -११
जालंदरनाथांचा
॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: || श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
मच्छिंद्रनाथ गोरक्षाला घेऊन बद्रिकाश्रमी आले. तेथे शिवालयात जाऊन त्यांनी शंकरांची प्रार्थना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी गोरक्षाला जवळ घेतले व मच्छिंद्राला म्हणाले, "हा हरिनारायण, कनकगिरी येथे याला सर्व मंत्रविद्या दिलीस तेव्हाच, मी या देहात याला पाहिले. मी याच्यावर प्रसन्न आहे. गोरक्षाने विद्याभ्यास केला आहे खरे, पण मनोजय केल्याशिवाय, तपश्चर्या केल्याशिवाय ती विद्या कल्याणकारक होणार नाही. अभ्यासाला तपाची जोड हवीच. तू आता याला येथेच ठेव. त्याला येथे राहून कठोर तप करू दे." गोरक्षाला तिथेच तप करण्यासाठी ठेवून मच्छिंद्रनाथ तीर्थाटनास निघाला. योग्य दिवस व वेळ पाहून मग भगवान शंकराने गोरक्षाला योगसाधनेस बसविले. मच्छिंद्रनाथ अनेक तीर्थे पहात पहात बारा वर्षे फिरला. शेवटी तो रामेश्वरास गेला. तेथे त्याने समुद्रस्नान केले व मारुतीचे पुन्हा दर्शन घेतले व नमस्कार केला.
मच्छिंद्रनाथांना पहाताच मारुतीला आनंद झाला व तो मच्छिंद्रनाथांना म्हणाला, "मागे आपण भेटलो होतो त्याला चोवीस वर्षे झाली. आठवते का तुला ? तू मला एक वचन दिले होतेस, "स्त्री राज्यात जाईन" असे सांगितले होतेस. आता तुझी काही अडचण चालणार नाही. बारा नी बारा चोवीस वर्षे तुझ्या तीर्थयात्रा पुष्कळ झाल्या. आता मैनाकिनीच्या राज्यात जा आणि मला तिच्या वचनातून मुक्त कर!"
मच्छिंद्रनाथाने यावेळी मात्र हनुमंताचे म्हणणे मान्य केले. तो रामेश्वर येथे तीन रात्री राहिला. मग मारूती व मच्छिंद्र असे दोघेजण निघाले व वंगदेशाच्या पलीकडे स्त्रीराज्यात गेले. तेथे मैनाकिनी नावाची राणी मोठी वैभवसंपन्न असून तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियाच करीत असत. ती राणी सर्व कलांमध्ये निपुण होती. ते दोघे राजधानीत शिरले, तेव्हा मारुतीला पाहून सर्व स्त्रियांना फार आनंद झाला. त्यांनी दोघांना राणीकडे नेले. तिने त्यांचे स्वागत केले. दोघांना फार सुंदर सिंहासने बसण्यास दिली. मग विचारपूस केली. "बरोबर कोण प्रतापी योगीराज आले आहेत?" मारुती म्हणाला, "तुला मी वचन दिले होते मच्छिंद्रनाथ नावाचा जोगी येथे येईल, तेव्हा तो तुझी मनोकामना पूर्ण करील. तो हा मच्छिंद्रनाथ !" मैनाकिनीला फारच आनंद झाला. मारुतीला तीने वचनातून मुक्त केले. मग दोघे तीन दिवस तेथे राहिले. मच्छिंद्राला तेथे राहण्यास सांगून मारुती पुन्हा रामेश्वरास निघून गेला. मैनाकिनीच्या सहवासात मच्छिंद्रनाथ सर्व प्रकारचे विषयोपभोग भोगीत पुष्कळ दिवस राहिला. सर्व वैभवे त्याच्या पायांशी लोळत होती.
रत्नखचित सुवर्णाचे व मौक्तिकाचे अलंकार, सर्व कामे करण्यासाठी अप्सरांपेक्षा सुंदर अशा दासी आणि शृंगाराची सर्व साधने उपलब्ध होती. मच्छिंद्रनाथ तेथेच रहात असता, मैनाकिनी त्याच्यापासून गरोदर राहिली आणि योग्यकाळ लोटल्यावर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव मीननाथ असे ठेवले. मच्छिंद्रनाथ व मैनाकिनी संसारात रमली होती. मीननाथाच्या रुपाने भविष्याप्रमाणे घडून आले होते, मीननाथाच्या रुपात उपरिचर वसूच अंशावतार घेऊन आला होता. त्या मुलाचे कोडकौतुक करण्यात तीन वर्षे केव्हाच लोटली. मच्छिंद्रनाथ मारुतीच्या सांगण्यावरून स्त्रीराज्यात गेला आणि मोहाने तो तेथेच राहिला.
हस्तिनापुरातील जनमेजयाच्या वंशातील सातवा पुरुष बृहद्रवा हा राज्य करीत होता. कलियुगाला प्रारंभ होऊन दोन हजारांपेक्षा जास्त वर्षे लोटली होती. बृहद्रवा राजाने देशोदेशीचे अनेक ब्राह्मण बोलावून सोमयागाला आरंभ केला. बृहद्रव्याने केलेल्या यज्ञात एक वर्षपर्यंत अग्नी आहुती ग्रहण करुन तुष्ट झाला असतांना, नवनारायणांपैकी अंतरिक्ष ऋषीने त्या अग्नीत बालकरूप घेऊन प्रवेश केला आणि अग्नीने यज्ञ कुंडातून बालक बाहेर टाकला. यज्ञकुंडातून रक्षा बाहेर काढतांना तो ब्राह्मणांच्या हाती आला. ब्राह्मणांनी त्या राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगितली व राजाजवळ त्या बाळाला दिले. ते सुंदर रुपडे पाहत राजा मोहून गेला. त्याने लगबगीने आपली सुलोचना नावाची पत्नी होती तिच्याजवळ जाऊन तो बालक दाखविला व तिला म्हटले, "तुझा मीनकेत हा पुत्र आहेच. त्याचा हा धाकटा भाऊ. अग्नीने प्रसाद म्हणून दिला आहे." तिला पुत्रस्पर्श होताच वात्सल्य उदरी भरून वाहू लागले.
सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. राजा व राणी यांनी त्याला मोठ्या समारंभाने पाळण्यात घालून जाळात जन्म झाला म्हणून 'जालंदर' असे सार्थ नाव ठेवले. राज्यात सर्वत्र हत्तीवरून साखर वाटण्यात आली. मीनकेत व जालंदर सर्वांचे जीव की प्राण झाले होते. जालंदर हळूहळू लहानाचा मोठा झाला. त्याचे उपनयनही राजाने मोठ्या थाटाने केले. मग तो जरा मोठा झाल्यावर बृहद्रवा त्याच्या विवाहाचे बेत करू लागला. पण विवाहाच्या विचाराने जालंदराच्या मनात खळबळ उडून तो गुपचूप राजधानीतून बाहेर पडला. राजाने जालंदराचा पुष्कळ शोध घेतला पण त्याचा पत्ता लागेना. राजा निराश झाला. तेव्हा मंत्री त्याची समजूत काढू लागले. "महाराज ! जालंदर हा अग्निकुंडात जन्मलेला दैवी पुत्र. तो काही तुमचा मुलगा नव्हे. तो अयोनि संभव आहे. त्याला मरण नाही. त्याला कसलेही भय नाही. आपण व्यर्थ शोक करू नये. तो आपल्याला केव्हा तरी निःसंशय भेटेल." असे विचार ऐकून राजा कसेतरी मन आवरून राजकार्यात लक्ष घालू लागला.
तिकडे एका घनदाट वृक्षांनी छाया केलेल्या मोठ्या दरीत जालंदर थकून निजलेला असतांना त्या अरण्यात वणवा पेटला. झाडे होरपळू लागली. पक्षी धुरकटलेल्या आकाशातून दूरदूर उडून जाऊ लागले. पशू सैरावैरा धावू लागले. त्यातले कित्येक अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. चारही दिशांना लाल लाल जिव्हांनी झाडाझुडपांचा घास घेत अग्नी निद्रित जालंदराजवळ येऊन पोहोचला. त्याला आपल्या ज्वालामय नेत्रांनी पाहताच, " हा आपलाच पुत्र असून बृहद्रवा राजाला यज्ञाने दिला होता, हे त्याला लक्षात आले. हळूच त्याने त्याला जागृत केले व विचारले, “तू येथे कसा आलास?” जालंदराने विचारले, “मी येथे कसा आलो ते मग सांगेन, तुम्ही कोण ते प्रथम मला सांगा ?” तेव्हा अग्नी त्याला म्हणाला, “मी तुझा माता व पिता 'अग्नी!" जालंदर संभ्रमात पडला. तेव्हा अग्नीने त्याला पुर्वीची कथा सांगितली.
फलश्रुती:- अग्निपीडा दूर होईल, गृहदोष संपतील, संततीची प्राप्ती होईल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.