Subscribe Us

श्री शिवलीलामृत अध्याय दहावा || Shivlilamrut Adhyay 10 || शिवलीलामृत अध्याय १० || कृष्णरेखा krushnarekha

         श्रीशिवलीलामृत कथासार

 अध्याय:-१० 

  शारदेची कथा 


        हे शंकरा, नीळकंठा, कर्पुरगौरा, नवव्या अध्यायाच्या शेवटी तू शबराला उद्धारलेस, आता पुढील कथा सांगतो, ती ऐका.

            फार फार वर्षांपूर्वी देवरथ नावाचा एक ब्राह्मण आनर्त देशात रहात होता. तो अतिशय विद्वान होता. त्याला शारदा नावाची एक अतिशय लावण्यवती अशी कन्या होती. ती उपवर झाल्यावर बाराव्या वर्षी देवरथाने तिचा विवाह केला. वरही शारदेला साजेसा, गुणसंपन्न, वेदसंपन्न, तरुण आणि भरपूर श्रीमंत असा होता. राजसभेत त्याला खूप मोठा मान होता. लग्न झाल्यावर काही दिवस तो आपल्या सासुरवाडीला होता. असाच एक दिवस संध्याकाळी नित्याप्रमाणे स्नानसंध्या करण्यासाठी तो नगराजवळील नदीवर गेला. परत येताना पुष्कळच अंधार झाला. अंधारातून येता येता रस्त्यातच त्याच्या पायाला एक विषारी साप चावला आणि शारदेचा पती तत्क्षणी रस्त्यातच मरण पावला. कोणीतरी ही बातमी गावात येऊन सांगितली. शारदा आपल्या मात्यापित्यासह धावतच पतीला पहाण्यासाठी निघाली. तेथे गेल्यावर पती गतप्राण झालेला पाहून तिने अपार शोक आरंभला, 'मी आता माझे मनोगत कुणाला बरे सांगू ? माझे सार जीवनच पार जळून गेले! माझे भांडार लुटले गेले, ' असे ती शोक करताना म्हणत होती.

           तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यांतूनही दुःखाश्रू वाहू लागले; पण दैवगतीपुढे कोण काय करणार ? जावयाचे सर्व उत्तरकार्य करून देवरथ ब्राह्मण शारदेसह आपल्या घरी परत आला. असे बरेच दिवस उलटून गेले. एके दिवशी काय झाले; घरातील सर्व मंडळी कामानिमित्ताने बाहेर गेली होती आणि विधवा शारदा एकटीच घरी बसलेली होती. त्यावेळी नैध्रुव नावाचे एक क्यो वृद्ध तपस्वी ऋषी शारदेचे घरी आले. नैध्रुव ऋषी दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आत आणले आणि शारदेने दिलेल्या आसनावर त्यांना बसवले. ऋषींचा यथायोग्य आदरसत्कार करून शारदेने त्यांना नमस्कार केला. तेव्हा 'तुझे सौभाग्य सतत वाढो आणि अतिशय विद्वान असा पुत्र तुला होवो, असा आशीर्वाद त्या वयोवृद्ध अंध तपस्व्याने शारदेला दिला. तो आशीर्वाद ऐकून शारदा खिन्नपणे हसली आणि लगेचच तिचे डोळे पाण्याने भरून आले. 

     


            नंतर ती त्या ऋषींना म्हणाली, तर विधवा आहे. आपण दिलेला आशीर्वाद मुळीच खरा होणार नाही. महाराज, मी त्याबरोबर नैध्रुव ऋषी तिला पुन्हा म्हणाले, “माझ्या तोंडून ज्या शब्दांचा एकदा उच्चार झाला ते शब्द खरे व्हायलाच हवेत. माझे आतापर्यंतचे तपःसामर्थ्य फार मोठे आहे. मी माझे उच्चारलेले शब्द खरे करून दाखवीन. असे बोलणे चालू असतानाच शारदेचे आई, वडील, भाऊ हे बाहेर गेलेले सर्व घरी परत आले. त्यांना सर्व हकीकत कळली. असे अघटित कसे काय घडेल ? शारदेच्या वडिलांनीही आपल्या मनातील शंका प्रदर्शित केली. 

             तेव्हा ते वृद्ध नैध्रुव तपस्वी त्यांना म्हणाले, “ऋषींचा आशीर्वाद हा मनापासून दिलेला असतो म्हणून तो पवित्र असतो. तो क्षणांत एखाद्या काला राजा बनवतो किंवा शाप देऊन एखाद्याच्या सर्व कुळाचा संहार करू शकतो. पूर्वी एका ब्राह्मणाच्या शापानेच सर्व यादवकूळ नष्ट झाले होते. तसेच, नहुष राजा सर्प झाला होता. त्याचप्रमाणे शुक्राची सारी संपत्ती कोपलेल्या ब्राह्मणीने शापवाणीने सागरात बुडवली होती. अगदी देवाधिदेव ब्रह्मा, विष्णु, महेश यांनासुद्धा ब्राह्मणाच्या शापाचे नेहमी भय वाटत असे. फार फार पूर्वी परीक्षिती राजा शापामुळे भस्म झाला होता. कोपिष्ट जमदग्नी ऋषींनी आपल्या चार पुत्रांचे आपली आज्ञा न ऐकल्याच्या अपराधावरून जाळून भस्म केले होते. विप्रशापामुळेच पांडुराजाला आपल्या सुंदर स्त्रियांचा उपभोग घेता येत नव्हता. नारदाच्या शापाने प्रत्यक्ष कुबेरपुत्रसुद्धा बनले होते. आठ हजार प्रचंड स्वरूपात असलेल्या सागरांना आग लागली होती.      



          कृष्णासहित श्रेष्ठ अशा सर्व यादवकुळाचा एका ब्राह्मणाच्या शापानेच नाश झाला होता. नृगराजसुद्धा अशा शापाने यःकश्चित सरडा बनला होता. अत्रिनंदनाला अनिवार्य असा क्षयरोग लागला. सूर्याच्या पुत्राचा दासीपुत्र झाला; हे सर्व ऋषींच्या आणि ब्राह्मणांच्या शापामुळेच झाले. हे ब्राह्मण मनात आणले तर पाषाणाचा देव करू शकतात किंवा रंकाचा राव करू शकतात. मंत्राक्षता टाकून कोरड्या लाकडाला नवीन पालवी फोडण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेले असते. हे ब्रह्मांडसुद्धा मोडून पुन्हा नव्याने घडवण्याचे सामर्थ्य तपस्वी ब्राह्मणांत खरोखरीच असते. तेव्हा माझे शब्द असे फुकट जाणार नाहीत. ते खरेच होणार. तेव्हा आता मी सांगतो तसे करा. " मग ऋषींनी आपला मुक्काम शारदेच्या घरीच कित्येक दिवस ठेवला. शारदेला उमामहेश्वराचे व्रत करण्यास सांगून त्या व्रताचे सर्व विधि विशद करून सांगितले. षडाक्षरमंत्र तिला दिला. आणि विधियुक्त त्या मंत्राचा जप रोजच्या रोज करण्याची आज्ञा दिली.

              नंतर शारदेच्या अंगणात एक मठ बांधून नैध्रुव ऋषी तेथे राहू लागले. एके दिवशी शारदेने ऋषींनी विचारले, "हे ऋषीश्वर, आपण हे सर्व सांगितले; पण हे व्रत कधी आरंभ करू, किती दिवस करू व कसे करू ?" त्यांनी सांगितले, "हे शारदे, मी सांगितलेल्या व्रताचा आरंभ चैत्रमास किंवा मार्गशीर्ष मासात शुद्ध पक्षात करावा. सोमवार, अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी मुहूर्त पाहून उमामहेश्वराची पूजा करावी, असे संबंध वर्षभर व्रत आचरावे.



                गुरुवचनाप्रमाणे शारदेने उमामहेश्वराची विधिवत, यथासांग स्थापना केली. आपल्या घराजवळच चार खांब रोवून शिवमंदिर तयार केले. त्याच्यावर पांढरे छत बांधले. चारी खांबांना फळाफुलांनी उत्तम प्रकारे सजवले. मंदिराच्या आणि घराच्या समोर रांगोळ्या घातल्या. पांढऱ्या रंगाची उत्तम अशी सुवासिक फुले आणली. तांदळावर घटाची स्थापना केली. उमामहेश्वराच्या सोन्याच्या मूर्ती तयार केल्या आणि त्या मंदिरात त्यांची प्रतिष्ठापना केली. मग अतिशय नम्र भक्तिभावाने षोडशोपचारे त्यांची पूजा सुरू केली. ब्राह्मण सवाष्ण बोलावून त्यांना उत्तम भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट केले. कोठेही चालू असलेले । पुराण-कीर्तन शारदा मोठ्या आवडीने ऐकत असे. ती सदा सर्वकाळ शिवनामाचा जप करत जागरण करीत असे. आपल्या गुरुवर तिचा अढळ विश्वास होता.

             "कोटी सूर्यासारखा संपूर्णपणे प्रखर, तेजस्वी असलेला, कर्पूरगौर, शुभ्र वस्त्रे धारण केलेला आणि उत्तमोत्तम असे दागिने ल्यालेला, आपल्या जटाभारात प्रत्यक्ष पावन अशी गंगा धारण केलेला, सर्पांचे अलंकार गळ्यात घातलेला, चंद्राची कोर सतत आपल्या कपाळावर मिरवत असलेला, सर्वांगाला भस्म चर्चिल्यामुळे संपूर्णपणे पांढरा शुभ्र दिसत असलेला, दोन तेजस्वी नेत्र असलेला, पाचूपेक्षाही तेजस्वी असा निळा कंठ असलेला, हातात अनेकानेक आयुधे घेतलेला, त्रिशूळ, कपाळ आणि डमरू हातात घेतलेला, पाशुपत अस्त्र हातात धरलेला, शुभ अशा सिंहासनावर शुभ्र कातडे आपल्या अंगाभोवती गुंडाळून, नाना तेजस्वी रत्नांनी झळकत असलेला सांबसदाशिव शारदा सारखी आपल्या नजरेसमोर आणीत होती. ती मनातून शंकराचे चिंतन करीत होती. तिच्या नजरेसमोर बर्फाच्छादित, शुभ्र असा कैलास पर्वत, त्यावर कोठल्याही खांबाच्या आधाराशिवाय घातलेला दिव्य मंडप, ऐरावताहूनसुद्धा मोठा आणि अगदी पांढराशुभ्र असणारा नंदी, तसेच शेष आणि तक्षक नाग, कानात रत्नखचित कुंडले घातलेला. भवानीचा प्रिय पती अगदी साकार होऊन उभा राहिला होता.



           आपल्या महान तपस्वी अशा गुरुकृपेने शारदेने भवानीचे ध्यान डोळ्यांसमोर उभे केले होते. अतिशय सुंदर दिसणारी, तारुण्याने अगदी मुसमुसलेली, नानाविध सुवासिक आणि नानाविध रंगांच्या फुलांच्या माळा घातलेली, भुजंगासारखे अतिशय लांब आणि काळेभोर केस असलेली, सुडौल तेजस्वी बांधा असलेली, बघणाऱ्याचे डोळे दिपून जावेत अशी तेजस्वी दिसणारी पार्वती शारदेच्या मनःचक्षूंपुढे दिसत होती.

           आजपर्यंत आम्ही ज्या ज्या सुंदर स्त्रियांचे वर्णन केले होते त्या स्त्रिया पार्वतीच्या केवळ पायाच्या नखाचीही सर येईल अशा सौंदर्यवती नव्हत्या. पार्वतीच्या अंगाचा असलेला सुवास ब्रह्मांड फोडून वर येत होता. जिथे जिथे तिची पावले पडत तेथे सुंदर लाल रंगांची कमळे उगवत होती. तिच्या दातांचे तेज पाहून रत्नेसुद्धा खड्यासारखी तुच्छ बनत होती. या ब्रह्मांडाला तिच्यासारखे सुंदर स्वरूप दुसरे कशाचेही दिसत नव्हते. सूर्यचंद्राचे सारेसारे तेज ओतून त्यापासून त्याने तिला बनवले आहे असे पहाणाऱ्याला वाटत होते. तिचे दोन्ही ओठ लाल बुंद दिसत होते. नेत्रांचे तेज त्या पाणीदार मोत्यांवर पडले, की मोती अगदी लाल गुंजेसारखे दिसू लागत आणि जगन्माता पार्वतीने हास्य केले, की ते पुन्हा पांढरेशुभ्र दिसत होते. शुभ्र हंस एकाजवळ एक असे ओळीने बसावेत तसे पार्वतीमातेचे दात अतिशय सुंदर दिसत होते. दात पांढरे शुभ्र होते; परंतु तिच्या अधरांचा लाल रंग त्याच्यावर पडला, की ते क्षणभर अगदी डाळिंबाच्या लाल लाल दाण्यसारखे शोभून दिसत होते. गळ्यांतील मोत्यांचे हार इंद्रनीळ मण्यासारखे प्रचंड तेजस्वी होते. 



       कमंडलूसारखे मोठे घाटदार आणि तेजस्वी, सुडौल आणि भरदार असे स्तनयुगल मोठे सुंदर आणि आकर्षक दिसत होते. गजानन आणि कार्तिकस्वामी यांना दोघांनाही त्या स्तनांतले अवीट गोडीचे अमृत प्राशन करायला मिळाले होते. जणू काही प्रलयकाळातील वीज गाळून तिचे वस्त्र देवीसाठी नेसण्यास बनवले आहे असे वाटत होते. पांढरे शुभ्र मोती लावलेली चोळी, अतिशय चमचम करीत होती: तिच्या दोन्ही हातात अलंकार झळकत होते. अशा तऱ्हेने अनेक वेष धारण करणारी, आपल्या भक्तांवर कृपा करणारी, या जगताची आदिमाता, आदिपुरुषाचे ज्ञान, ब्रह्मांडाचे जडण-घडण करणारी अशी ती पार्वतीमाता फारच सुंदर आणि शोभून दिसत होती.

           कृत्तिका नक्षत्राप्रमाणे अत्यंत तेजस्वी असे अलंकार तिने आपल्या कानात घातले होते. अरुणोदय आणि संध्यासमयीची आकाशात पसरणारी लाली कमी दिसावी इतके सुंदर कुंकू तिने आपल्या कपाळावर रेखले होते. विश्वप्रलयाच्या वेळी सगुण रूप टाकून प्रत्यक्षात भगवान शंकर निर्गुण बनले तरीसुद्धा पार्वतीचे सौभाग्य फार फार मोठे होते. तिने दोन वेळा शंकराशी विवाह केला होता. विडा खाऊन लालचुटुक शोभणाऱ्या, सुंदर दिसणाऱ्या तिच्या वदनचंद्राचे वर्णन करताना कवी पार थकले होते. प्रयागतीर्थात ज्याप्रमाणे नद्यांचा त्रिवेणी संगम झाला आहे त्याचप्रमाणे तीन पेडांची अंबेची वेणी शोभत होती. मोगऱ्याच्या कळ्यांचे शुभ्र हार गुंफून त्याच्यात लाल रंगांची फुले गुंफली होती. त्यात पद्मजनंदिनी गुप्त रूपाने रहात होती. 



         मूद, राखडी वगैरे अलंकार म्हणजे प्रयागतीर्थात तळपणारे जलचर शोभून दिसत होते. मोठेमोठे प्रचंड उसळणारे सागर म्हणजे केसांच्या टोकाला बांधलेले डौलदार गोंडे होते. ब्रह्मांडांनी गुंफलेली मोहनमाळ तिने आपल्या गळ्यात घातलेली होती. जीव आणि शिव हे दोन पक्षी म्हणजे तिचे तेजस्वी असे स्तनयुगुल होते, ती अखंड सौभाग्यवती असल्याने तिने आपल्या हातात वज्रचुडा घातलेला होता. तिने तिच्या दहा बोटात दहा बहुमूल्य अशा अंगठ्या घातलेल्या होत्या. त्या दहा अंगठ्या म्हणजे पार्वतीचा "भाऊ विष्णु याचे जणूकाही दहा अवतारच होते. तिच्या पायातले पैंजण छुमछुम वाजू लागताच शंकर आपली समाधी विसरत होते. एकनिष्ठ भक्त तिच्या पायात जोडवी होऊन राहिले होते. अशा सुंदर स्वरूपाचे ध्यान शारदा नित्यनेमाने करीत होती. अशाच तऱ्हेने एक वर्ष संपले. शारदा नित्यनेमाने यथासांग आपल्या व्रताचे पालन करीत होतीच. एक वर्षानंतर नैध्रुवाने शारदेकडून व्रताने उद्यापन करवून घेतले. अकराशे ब्राह्मणांची दांपत्ये जेवायला बोलावली. त्यांना भरपूर दक्षिणा, किमती बहुमूल्य वस्त्रे, उंची सोन्याचांदीचे अलंकार देऊन संतुष्ट केले. त्या दिवशी रात्र झाली. गुरूजवळ बसून शारदा उमामहेश्वराचे चिंतन करीत होती. मध्यरात्र झाली आणि तेवढ्यात सगळीकडे एकदम भरपूर प्रकाश पडला. नैध्रुव ऋषींच्या आंधळ्या नेत्रांनाही तो प्रकाश चांगलाच दिसला. त्यांनासुद्धा परत दृष्टी आली. नैध्रुव ऋषी आणि शारदा दोघांनी देवीचे पाय धरले. तेथे प्रगटलेली भवानी आता फक्त त्या दोघांनाच दिसत होती. इतर लोकांना मात्र तेथे काहीही दिसत नव्हते. शारदा उभी राहून देवीची मनोभावे प्रार्थना करीत होती, “हे जगदंबे, भवानी माते, माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला ब्रह्मानंदपदाचा लाभ करून देणाऱ्या अंबे, देवाधिदेव गणपतीच्या माते, वेदपुराणातही सर्वत्र तुझी थोरवी गायलेली आहे. तुझी जर कृपा झाली तर जन्मांध असलेल्या व्यक्तीला डोळे येतात, पांगळे असलेले वाऱ्यासारखे अतिशय वेगाने धावू लागतात, मुके पोपटासारखे बोलू लागतात, मूर्ख असलेले पंडित बनतात, पाण्याच्या गारांचे चिंतामणी बनतात, वाळूची बहुमूल्य अशी रत्ने होतात, संसारातील सर्व प्रकारच्या भयाचा नाश करणाऱ्या, आपल्या भक्तांचे पालन करणाऱ्या, सर्व वेदांना मातृस्थानी असणाऱ्या हे भवानी माते, ब्रह्मा आणि इतर सर्व देवही तुझे ध्यान नेहमी करीत असतात.

            हे साऱ्या जगताच्या त्रिदोष आणि त्रिताप हरण करणाऱ्या माझ्या अंबे, जे कोणी तुझे त्रिकाळ ध्यान करतात ते सर्व जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात. शिवशंकराच्या प्रियतमे, सर्व ऐश्वर्य देऊन कल्याण करणाऱ्या अंबे, तू सर्व ठिकाणी, सर्व दिशांमध्ये भरून उरलेली आहेस.



         शारदेचे मनापासून केलेले कळकळीचे स्तवन ऐकून प्रसन्न झालेली अंबा शारदेला म्हणाली, "मी प्रसन्न आहे. तुला हवा असेल तो वर माग. मग नैध्रुव ऋषींनी देवीला शारदेच्या आयुष्यात घडलेली व अशा स्थितीतही त्यांनी शारदेला दिलेल्या आशीर्वादाची सर्व हकीकत सांगितली आणि विनवले, "देवी, माझ्या मुखातून शारदेसाठी जो आशीर्वाद निघाला तो आता तू सत्य कर.

        तेव्हा देवी म्हणाली, आता आपल्यासमोर असलेली या जन्मीची ही शारदा ही मागच्या जन्मी द्रवीड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती. हिचे नाव होते भामिनी. हिला एक सवत होती. आपले सर्व प्रकारचे कौशल्य खर्चून भामिनीने आपल्या पतीला सदैव स्वतःजवळच गुंतवून ठेवले होते. त्यामुळे हिची सवत मनाने पतीपासून दूर गेली आणि वाईट मार्गाला लागली.

        भामिनीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाचे मन भामिनीवर बसले होते. संधी साधून एकदा त्या जाराने हिचा हात धरला; पण भामिनीला त्याच्या या वागण्याचा राग आला. त्याचा हात झिडकारून ती रागावून त्याला बरेच अपशब्द बोलली. त्यावेळी जार आपल्या घरी गेला; पण भामिनीच्या सहवासाचा सारखा ध्यास त्याला लागला होता. तिच्याकरिता झुरुन झुरुन शेवटी एक दिवस तो मरण पावला. पतीचे आपल्याकडे लक्ष नाही याचा राग येऊन भामिनीच्या सवतीने तिला 'विधवा हो' असा शाप दिला. शाप देऊन सवतही मरून गेली. शेवटी तिच्या आयुष्याची दोरी तुटल्यानंतर एक दिवस भामिनीला मृत्यू आला आणि त्यानंतर शारदा म्हणून तिने या घरी जन्म घेतला. पूर्वीच्या जारानेसुद्धा ब्राह्मण जन्म घेऊन शारदेशी लग्न केले आणि मागच्या जन्मात त्याच्या मनात राहिलेला सूड घेऊन तोही मरण पावला.



           हिचा पूर्वजन्मीचा भ्रतार आताच्या या जन्मात द्रवीड देशात आहे. येथून तो देश खूप दूर आहे. हिचा ध्यास घेऊन तोही तेथे सारखा तळमळतो आहे. तो शारदेला स्वप्नात येऊन भोग देईल आणि त्यापासून शारदेला गर्भ राहील. काही दिवसांनी शारदेला एक रूपवान व गुणवान असा पुत्र होईल. मोठा झाल्यावर शारदानंदन नावाने तो विश्वविख्यात होईल. स्वप्नात रतिक्रीडा करूनसुद्धा शारदेला व त्या द्रवीड देशातील ब्राह्मणाला जागृतीत केलेल्या रतिक्रीडेपेक्षा जास्त सुख होईल." असे बोलून अंबा गुप्त झाली. आणि खरोखरच काही दिवसांनी शारदेला तशी स्वप्ने पडू लागली. या स्वप्नातच ती त्या ब्राह्मणाशी रतिक्रीडा करू लागली व त्यातूनच तिला दिवस राहिले. तिचे शेजारीपाजारी तिची खूप निंदा करू लागले. नातेवाईक येऊन तिला सारखे टोचून बोलू लागले. सर्वजण उपरोधाने हसून तिची टिंगल करू लागले. कुणी म्हणाले, नाक, कान कापून तिला हाकलून द्या. म्हणे अंबा भेटली... स्वतः जारकर्म करायचे आणि देवीला त्याच्यात कशाला ओढायचे ? तेवढ्यात आकाशवाणी झाली  " लोक हो, कुणीही शारदेला नावे ठेवू नका. माझ्या कृपेने ती गर्भवती झाली आहे. ती खरोखरीच पापिणी नाही.

          अशी ती आकाशवाणी ऐकूनही दुष्टांची तोंडे कधीच बंद झाली नाहीत; पण गर्दीतला एक धर्मशील वृद्ध म्हणाला, "अरे, असे उगाच या पोरीला तुम्ही छळू नका. ईश्वरी माया अगम्य आहे. खांबाशिवाय आकाश तोलून धरणारी, पाण्यात पृथ्वीला वर उचलून धरणारी ईश्वरी शक्ती आहे ती. काय हवे ते करू शकेल. आकाशातील चंद्र, तारका यांना कोणाचा आधार आहे ? परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे. आईच्या गर्भात असणारा इवलासा जीव कसा वाढतो हे कुणी सांगा बरे !

            फार फार पूर्वी यूपकेत नावाचा राजा होऊन गेला. एक दिवस त्याचे पाण्यात वीर्यस्खलन झाले. ते पाणी एका वेश्येने सेवन केले. पाण्यातील यूपकेतचे वीर्य तिच्या पोटात गेल्याने तिला दिवस गेले आणि मग तिला सुंदर पुत्र झाला. विभांडकाचे रेत असेच पाण्यात पडले असताना त्या ठिकाणी येऊन एका हरिणीने ते पाणी प्राशन केले आणि दशरथ राजाच्या यज्ञांत श्रेष्ठत्व पावलेले ऋषी श्रृंगी तिच्या उदरातून जन्माला आले. सत्यवतीला मत्स्य राजपुत्र झाला. महिषासुर राक्षस एका म्हशीच्या पोटी जन्माला आला, हे आपणास माहीतच आहे. कित्येक ऋषींच्या केवळ बोलण्याने गर्भ राहिले. रोहिणीच्या पोटी रेवतीरमण कसा जन्मला जरा आठवा! सांबाचे पोटी मुसळ कसे जन्मले ? कुंतीच्या पोटी पांडव कसे उत्पन्न झाले ? हा सगळा मागील इतिहास लक्षात घ्या! देवीची करणी अगाध आहे. पण त्या सत्त्वशील अशा वृद्धाच्या बोलण्यावर त्या दुर्जनांचा विश्वास बसला नाही. ते तिची निंदा करीतच होते. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली, "हे मूर्खानो, शारदेचा आता राहिलेला गर्भ सत्य आहे, जो कुणी तो पापाचा आहे असे म्हणेल त्याच्या जिभेतून असंख्य किडे बाहेर पडतील.



          हे सर्व खोटे आहे. केवळ कपटनाटक रचले गेले आहे.  ती आकाशवाणी ऐकल्यानंतर एक दुर्जन तरीही असे उद्गारला; पण त्याचे उच्चारलेले शब्द संपताच एकदम त्याची जीभ चिरली गेली आणि त्यातून असंख्य किडे खाली पडू लागले. तिथे जमलेल्या सर्वांनी हे पाहिले, त्याबरोबर सर्वांची खात्री पटली आणि ते चूपचाप शारदेला शरण गेले. त्यांनी तिची क्षमा मागितली. दिवस भरताच शारदेला एक अतिशय सुंदर पुत्र झाला. तो दिसामासाला चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला. शारदेचा पुत्र म्हणून त्याला सर्वजण शारदानंदन' म्हणत असत. योग्य वेळी त्याची मुंज झाली आणि त्याने वेदाभ्यास सुरू केला. चारी वेद त्याने आत्मसात केले. शास्त्रे, पुराणे यांत तो निष्णात झाला. सर्व विद्या उत्तम प्रकारे पूर्ण झाली. तो एक महान पंडित श्रेष्ठ बनला. पुढे अतिशय महान पूजा करून त्याने शंकराला प्रसन्न केले.

              एकदा शिवरात्रीच्या दिवशी शारदा आपल्या पुत्रासह गोकर्ण क्षेत्राला गेली होती. द्रवीड देशीचा ब्राह्मण-शारदेचा मागील जन्मातील पती आणि स्वप्नात आता ज्यापासून गर्भ राहून शारदानंदन झाला होता तो यात्रेसाठी तिथे आला होता. दोघांनी एकमेकांना ओळखले. दोघांना अतिशय वाईट वाटले. देवीने सांगितल्याप्रमाणे मग आपल्या उमामहेश्वर व्रताचे अर्धे पुण्य शारदेने आपल्या पतीला दिले. आपला पुत्र तिने त्याच्या पायावर घातला. त्याच्याजवळ चार महिने आनंदाने राहिली; पण त्याच्यापासून वैषयिक सुख मात्र घेतले नाही. शारदा पतीबरोबर त्याच्या देशात गेलीत पण तेथेही ती अत्यंत व्रतस्थ राहिली. पुढे शारदानंद विद्यागुणांनी फार मोठा झाला. आपली आई म्हणजे साक्षात देवी भवानी आहे व पिता प्रत्यक्ष शंकर आहे, असे मानून तो दोघांची नित्यनेमाने पूजा करीत असे.



            खरोखरीच जो माता-पित्यांची कधीच सेवा करीत नाही त्याची विद्या, तप, भाग्य सर्व काही व्यर्थ आहे. आपल्या बायकोच्या माहेरचे नातेवाईक आपल्या घरात घेऊन जो आपणास जन्म देणाऱ्या आई-वडिलांना त्रास देतो, नेहमी नेहमी कटू शब्द बोलतो, त्यांना खायला अन्न देत नाही तो कितीही विद्वान असला तरी अपवित्र आहे. हे लक्षात ठेवावे. त्याचा आपणास विटाळसुद्धा होऊ देऊ नये. चुकून कधी त्याचा आपल्याला स्पर्श झालाच तर तत्क्षणीच सचैल स्नालन करावे. तो महादुष्ट मेल्यानंतर नरकात जातो, हे निश्चित समजावे. काही दिवसांनी शारदेचा तो द्रविड देशीचा ब्राह्मण पती मरण पावला. आपल्या पुण्याने तो शिवपदाला जाऊन पोहोचला. त्याचवेळी शारदेने शंकराचे स्मरण केले आणि आपल्या पतीबरोबर सहगमन केले. तीही पतीपाठोपाठ शिवपदास पोहोचली.

          "शिवलीलामृत' म्हणजे एक दिव्य असे रसायन आहे. ज्या कोणी सज्जन व्यक्ती आहेत त्यांनाच हे अमृत आवडेल. श्रीधर कवी श्रोत्यांना हात जोडून विनवतात, की सर्वांनी हे अमृत अतिशय आनंदाने प्राशन करावे. 

अध्याय दहावा समाप्त !


मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या