Subscribe Us

श्री शिवलीलामृत अध्याय नववा || Shivlilamrut Adhyay 9 || शिवलीलामृत अध्याय ९ || कृष्णरेखा krushnarekha

 श्रीशिवलीलामृत कथासार

 अध्याय:-९ 

 वामदेवाची कथा 

         जे शिवनामाचा सतत घोष करतात त्यांना कळीकाळदेखील कधी स्पर्शसुद्धा करू शकत नाही. ह्या पावन अशा शिवनामाची ज्याला आसक्ती लागलेली आहे त्याला पुनः पुन्हा जन्ममरण नाही. विषयसुखात ज्याप्रमाणे माणूस रममाण होतो त्याप्रमाणे जर तो मनापासून शिवनामस्मरणात दंग झाला तर त्याचा जन्ममरणाचा फेरा कायमचा चुकेल. आयुष्यात सतत नुसते धन आणि पैसा मिळवण्याऐवजी शिवचरणाचे ध्यान केले तर त्याच्यावर संकटे येणारच नाहीत. शिवाचे ध्यान करणारे पुरुष खरोखरीच धन्य होत. त्यासंबंधी आता व्यासमुनी एक कथा सांगत आहेत, ती लक्षपूर्वक ऐका.


                    फार वर्षांपूर्वी एका वनात वामदेव नावाचा महाज्ञानी पुरुष रहात होता. दिशा म्हणजे त्याचे वस्त्र होते. आपल्या सर्व अंगाला भस्म फासून, नेहमी कडकडीत उपवास करून दिगंबर स्थितीत तो एकटाच इकडे तिकडे त्या रानात फिरत असे. हे सारे विश्व शिवमय आहे अशी त्याच्या मनाची पक्की श्रद्धा होती. त्यामुळे त्याला कशाचासुद्धा खेद नव्हता, कसलीसुद्धा खंत नव्हती. हा वामदेव नेहमी मौन पाळत असे. त्याला कुठलाच विकार नव्हता. फक्त शंकराचे स्मरण आणि ज्ञानचर्चा या व्यतिरिक्त तो नेहमीच अबोल रहात असे. सर्व लोकांवर उपकार करण्यासाठी प्रत्यक्ष शंकरांनी जणू ते रूप धारण केले आहे असे वाटत होते. तो नेहमी आत्मस्वरूपात दंग असे. नेहमी समाधिस्थ स्थितीत आहे असेच पहाणारांपैकी कोणालाही वाटत असे. त्याने आपल्या तपाने तेजाचा दाहकपणा पूर्णपणे जाळून टाकला होता. पृथ्वीचा कठीणपणा त्याने कमी केला होता.. पाण्याचा ओलावा काढून घेऊन त्याने पाणी अगदी स्वच्छ केले होते. सर्व ब्रह्मांड जाळून त्याचे भस्म आपल्या सर्वांगाला फासले होते. जगात त्याला सर्वत्र फक्त शंकराचे रूपच दिसत असे.


               एकदा काय झाले ! त्या अरण्यात एक महाभयंकर ब्रह्मराक्षस आपली चांगली हातभर जीभ तोंडाबाहेर काढून, लाल लाल डोळे इकडे तिकडे फिरवीत येणाऱ्या सर्व प्राण्यांना खाऊन टाकीत येत असताना रस्त्यात त्याला वामदेव दिसला. ब्रह्मराक्षस त्याच्या अंगावर एकदम धावून गेला. आपल्या दोन्ही हातांनी वामदेवाच्या गळ्याला त्याने घट्ट मिठी मारली. त्यावेळी वामदेवाने अंगाला लावलेले पवित्र भस्म थोडेसे त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले; त्याबरोबर परिसाच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने व्हावे तसे त्याचे पाहिले भाव एकदम पालटले, त्याची दुष्ट वृत्ती एकदम पार नाहीशी झाली आणि तो वामदेवाच्या चरणांवर पडला. 


                      खरे तर वामदेवाला ह्याचे भानही नव्हते. तो आपल्या स्मरणपूजनात अगदी दंग होता. त्याला सुखदुःख काहीच जाणवत नव्हते, शरीर दुःखी आहे का शरीराला कोणता रोग लागला आहे, हे शरीर कोणत्या देशात भ्रमण करीत आहे, ह्याची त्याला अजिबात काळजी नव्हती.


                 वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाला मात्र लगेचच दिव्यरूप प्राप्त झाले आणि आपल्या पूर्व हजार जन्मांचे त्याला ज्ञान झाले. चंद्राच्या स्पर्शाने ज्याप्रमाणे चंद्रकांत मणी द्रवावा किंवा मानस सरोवरातील पाणी पिताच कावळ्याला हंसाचे रूप यावे अथवा सूर्याचा उदय होताच अंधार संपूर्णपणे नष्ट व्हावा त्याचप्रमाणे वामदेवाचा शरीरस्पर्श होताच ब्रह्मराक्षसाचे असलेले रूप पालटले. वामदेवाला नमस्कार करून तो म्हणाला, 'गुरुराज, आपल्या कृपेने मला माझ्या हजार पूर्व जन्मांचे ज्ञान झाले आहे; पण फक्त गेल्या पंचवीस जन्मांत मी किती पापे केली आहेत ते मी आता आपल्याला सांगतो.


                   पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो. त्या जन्मात मी अतिशय निर्दय आणि दुराचारी होतो. सर्व प्रजेला मी सारखा त्रास देत असे. मला माझ्या मनाला आवडेल तसे मी वागत असे. त्या जन्मात वेदशास्त्र, पुराणे मी कधी ऐकली नाहीत. अगदी स्वप्नातही धर्माचा विचार केला नाही. ब्रह्महत्येसारखी अनेक मोठमोठी पापे केली. रोज नवीन नवीन स्त्री पकडून आणून मी तिचा तिच्या इच्छेविरुद्द उपभोग घेत असे. एकदा एका स्त्रीचा भोग घेतला, की पुन्हा कधी मी तिचे तोंडही पहात नसे. त्या सर्वांना माझ्या कैदेत डांबून ठेवीत असे. त्या बिचाऱ्या आयुष्यभर तुरुंगात रडत, ओरडत, अगदी तळमळून मला शाप देत आक्रोश करीत असत. माझ्या राज्यातील माझा नागरिक असलेला ब्रह्मवृंद माझे राज्य सोडून पळून गेला. त्या जन्मात एकूण तीनशे ब्राह्मण स्त्रिया, चारशे क्षत्रिय स्त्रिया आणि हजार वैश्य स्त्रियांचा मी उपभोग घेतला.


               शूद्रांच्या हजार स्त्रिया त्याचबरोबर चारशे चांडाळ स्त्रिया, सहस्र मांग कन्या, तसेच पाचशे चांभार कन्या, चारशे परीट कन्या मी उपभोगल्या होत्या. माझ्या जीवनात वेश्या किती येऊन गेल्या त्याचा मी हिशेब ठेवला नाही.


                           पण त्या जन्मात इतक्या स्त्रिया भोगूनही माझे मन तृप्त झाले नव्हते. मी रात्रंदिवस खूप मद्य प्राशन करीत असे. वाटेल ते खात असे. सरते शेवटी मी आजारी पडलो. त्यावेळी मला क्षयरोग झाला आणि त्याच रोगामत मी मरण पावलो. 'त्यावेळी यमदूतांनी मला पकडून नरकात ढकलून दिले. यमपुरीचे दारुणं दुःख कसे असते ते मी सोसले आहे. तेथे दया हा शब्द कोणाकडे नव्हता. तांब्याच्या तापलेल्या जमिनीवरून यमदूतांनी चालवत चालवत तेथून मला नेले. लोखंडाचा खांब लाल होईपर्यंत तापवून त्या खांबाला मला आलिंगन द्यायला लावले. तापलेल्या आणि उकळत असलेल्या तेलात मला टाकले. माझ्या तोंडात विष्ठा आणि मूत्र बळेबळे कोंबले. खारट आणि कडू रस जबरदस्तीने प्यायला लावले. मला जमिनीवर पालथे पाडून, तीक्ष्ण चोचीच्या पक्ष्यांकडून माझे डोळे फोडविले. मला कुंभीपात्रात घालून रटारटा शिजविले. माझ्या दोन्ही कानांत तापलेल्या सळ्या खुपसल्या.


                     तेथील जाचांचे मी आणखी काय काय वर्णन करू ? 'तेथे रक्तकुंड आणि रेतकुंडात मला कित्येक दिवस बुडवून ठेवले. माझ्या अंगाचे मांस तोडले. माझ्या शरीरावर झालेल्या जखमांवर मिठाचे पाणी टाकले, माझ्या तोंडातील जीभ, नाक आणि कानसुद्धा तीक्ष्ण शस्त्राने कापून टाकले. माझे हातपाय तोडले, पोट चिरले. तसेच, माझ्या डोळ्यात तापलेली शस्त्रे खुपसली, शिश्न कापले, गुदद्वारात तप्त असे रस ओतले. पाठीकडे वाकवून माझ्या पायाला माझी मान बांधली. सर्वांगाला सुया टोचल्या. दगडाने वृषणाचे पीठ केले. हात आणि पाय एकत्र करून बेड्या घातल्या. ज्याचा कधी कुणाला पार लागणार नाही अशा महाभयंकर नरकात बुडवले. माझ्या तोंडातील दात पाडले, मानेला फास घातला, आपलीच विष्ठा आणि मूत्र मला खायला लावले. माझ्या सर्वांगाचे तुकडे तुकडे केले. कुत्र्याकडून शरीर टराटरा फाडवले, लाललाल तापलेल्या लोखंडाने डाग, उखळात घालून तापलेल्या मुसळाने त्यांनी मला कांडले, नाकावाटे जहर आत सोडले, असंख्य जहरी विंचवांनी भरलेल्या खोल विहिरीत फेकून दिले, तेथे भयंकर विषारी असलेले असंख्य नाग चावले, अग्नीने शरीर संपूर्ण भाजवले, पायात जड जड दगड बांधून डोंगरावरून खाली लोटून दिले. 


                 माझ्या पोटातली आतडी काढून मलाच खायला लावली. वर टांगून ठेवले. धुण्यासारखे धरून दगडावर आपटले, अणकुचीदार अशा खिळ्यांवर उभे केले. इंगळ्यांचे अंथरुण करून त्यावर मला झोपायला लावले. दगडाने डोके फोडले, लोखंडाचे चणे गरम करून खावयास दिले. ओठ फाडून तापलेल्या मोठमोठ्या सळ्या नाकात कोंबल्या, मानेला मोठमोठे दगड बांधून उफराटे टांगले आणि वाघसिंहांकडून शरीराचे तुकडे केले. हत्तीच्या पावलाखाली टाकून त्याच्याकहून चिरडले, तापलेले कढत कढत पाणी प्यायला लावले. माझी अष्टांगे कापून वेगवेगळी केली. अवतीभवती भयानक भुते लिंग कापून खा खा म्हणत असत, माझे सगळे सांधे खटाखटा मोडून टाकले. भूमीत शरीर पुरून त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. टोकदार सुळावर पालथे ठेवून वरून मुसळांनी कुटले. मग पुन्हा पायाला दगड बांधून नरकात फेकून दिले. काचा, शिसे यांचा अत्यंत तप्त रस करून प्यायला लावला. अशा अत्यंत भयानक अशा नरकयातना मी तीन हजार वर्षे भोगल्या. या यातना भोगताना दर वेळी शरीर नष्ट होते; पण प्राण तर जात नाही. त्यामुळे ज्या सर्व यातना सोसाव्या लागतात, त्या समजतात.


                    मग यमदूतांनी मला व्याघ्रजन्मात ढकलून दिले, त्यानंतरच्या जन्मात मी अजगर झालो, त्यानंतर पुढच्या वेळी मी लांडग्याचा जन्म घेतला. चौथा डुकराचा जन्म घेतला, नंतर सरपटणाऱ्या वर्गातील सरडा बनलो. सहाव्या जन्मात कुत्रा, नंतर सातव्या जन्मात कोल्हा झालो आणि दुसऱ्या प्राण्यांच्या उष्ट्या शिकारीवर जगलो. पुढच्या आठव्यात गैंडा झालो, नववा जन्म रानामधील झाडावरच्या माकडाचा घेतला, दहावा जन्म अतिशय कष्ट करणाऱ्या गाढवाचा घेतला. मग मुंगूस झालो. तेराव्या जन्मी मी पक्षी कुळातील बगळा झालो, चौदाव्या जन्मी उकिरड्यावरचा कोंबडा झालो. नंतर पापी गिधाडांच्या जन्मात गेलो आणि मृत जनावरांची सडलेली शरीरे खाल्ली. त्यानंतर मांजराचा जन्म आला, त्यानंतर डबक्यातील बेडूक बनलो, अठरावे जन्मी कासव झालो. नंतर पाण्यामधला मासा बनलो. माशानंतर मला उंदराचा जन्म आला. नंतर मी निशाचर अशा घुबडाचा जन्म घेतला. बाविसावा वनद्विराजाचा जन्म घेतला. नंतर उष्ट्रजन्म घेतला. नंतर पापी निषादाचा जन्म घेतला. या जन्मातही मी खूप प्राण्यांची हत्या केली आणि त्यानंतर मला हा भयंकर राक्षसाचा जन्म प्राप्त झाला. स्वामी महाराज, केवळ आपल्या कृपेने मला ज्ञान झाले आहे. मी आता पावन झालो आहे. गंगेच्या पवित्र जलाच्या स्नानाने पाप नाहीसे होते, दत्ताच्या दर्शनाने सारा भवताप नाहीसा होतो, जसे कल्पवृक्षाच्या केवळ दर्शनाने जन्मभराचे दैन्य नाहीसे होते तसे, तुमच्या दर्शनाने माझे मागचे सर्व पाप नष्ट झाले आहे.


              राक्षसाचे भाषण ऐकून वामदेव म्हणाला, फार पूर्वी एक ब्राह्मण होता. एका शूद्र स्त्रीवर त्याचे अतिशय प्रेम होते. शूद्र स्त्रीच्या पतीने एकदा या दोघांना एकत्र पाहिले आणि त्याचा राग एकदम उफाळून आला. त्याने ब्राह्मणाला मारून गावाबाहेर नेऊन टाकले. त्याचा अंत्यसंस्कारही तेथे कोणी केला नाही. यमदूतसुद्धा त्याला मारत मारत घेऊन गेले. त्याला त्यांनी तेथे खूप त्रास दिला. ब्राह्मणाचे प्रेत तसेच गावाबाहेर पडलेले होते. तेवढ्यात काय झाले, शिवालयासमोरील भस्मात लोळून एक कुत्रे वेशीबाहेर पळत पळत आले आणि ह्या ब्राह्मणाच्या प्रेतावर जाऊन पडले. शिवाच्या भस्माचे काही कण कुत्र्याच्या अंगाला चिकटलेले होते. ते शिवाचे भस्म अंगाला लागताच ब्राह्मणाने पूर्वी केलेले सगळे पाप नष्ट झाले. यमदूतांनी त्याला नरकातून ओढून बाहेर काढले. शंकराने आपले विमान पाठवून त्या ब्राह्मणाला आपल्या कैलासपर्वतावर आणले व आपल्याजवळ स्थान दिले. असे हे शिवभस्म अतिशय पवित्र आहे. " राक्षस हात जोडून म्हणाला, महाराज, कृपा करून ह्या भस्माचा आणखी महिमा आपण सांगावा. भस्म चांगले कोणते ?  ते कसे लावावे ? हे कृपा करून मला नीट समजावून सांगावे. " तेव्हा वामदेव पुढे सांगू लागला, एकदा अतिशय उत्तुंग " अशा मंदारगिरी पर्वतावर शंकर सर्व देवांसह बसले होते. 


           यक्ष, किन्नर, गंधर्व, देव, उपदेव, पिशाच्चे सर्वजण तेथे महेशाभोवताली कोंडाळे करून बसली होती. मरुद्गण, पितृगण, अकरा रुद्र, अष्ट वसु, अष्ट भैरव, अष्ट दिक्पाल, अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी, साठ हजार वालखिल्य ब्रह्मपुत्र, पाताळनाग, पृथ्वीवरचे महान पावन राजे सर्वजण शंकराला वेढून त्याच्या सभोवती बसले होते. नंदिकेश्वर सर्वांत पुढे बसले होते. तेवढ्यात त्या ठिकाणी सनत्कुमार आले आणि शंकराला नम्रपणे नमस्कार करून त्यांनी आपणास भस्म धारण करण्याचा विधी सांगावा अशी विनंती केली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, "गाईच्या शेण्या चांगल्या जाळून त्याची राख करावी. त्या राखेत माती मात्र अजिबातच येऊ देऊ नये. नंतर ती विभूती शिवगायत्री मंत्राने मंत्रावी. आधी अंगठ्याने वर लावावी. मग मस्तकाभोवती लावावी. विभूती लावताना तर्जनीचे बोट लावू नये आणि करंगळीही त्याच्यापासून वेगळी ठेवावी. नंतर तर्जनी न लावता तीन बोटांनी आपल्या सर्वांगाला विभूती लावावी. या भूषणामुळे आपण केलेली मोठमोठी पापे जळून पार भस्म होतात.  


            अशा तऱ्हेने मद्यपान, ब्रह्महत्या, अभक्ष्य भक्षण वगैरे पापेसुद्धा शंकराचे पवित्र असे शास्त्रशुद्ध भस्म लावले असता तत्क्षणीच नष्ट होतात. शंकरांनी सनत्कुमारास सांगितलेला हा भस्ममहिमा वामदेवाने परत ब्रह्मराक्षसाला सांगितला. त्यामुळे तो ब्रह्मराक्षस नंतर दिव्य स्वरूप होऊन शंकराचे रूपात मिसळून गेला. सत्संगतीचा महिमा असा फार मोठा आहे. मंत्र, तीर्थ, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी आणि औषधी यावर प्रथम आपला विश्वास पाहिजे. जसा ज्याचा भाव असेल तसा त्याला त्या त्या गोष्टींचा गुण येत असतो.


              फार वर्षांपूर्वी पांचाळ देशात सिंहकेत नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करीत होता. एकदा फार मोठे सैन्य घेऊन तो शिकारीला गेला होता. तो रानावनात शिकारीसाठी हिंडत होता. त्याच्याबरोबर अनेक भिल्लही होते. अशा तऱ्हेने हिंडत असताना वाटेत एक पडके शिवमंदिर लागले. एक भिल्ल त्या मंदिरात शिरला. मंदिराची फार पडझड झाली होती. तेथील शिवलिंगही वेडेवाकडे पडले होते. भिल्लाने आपल्या सिंहकेत राजाला ते शिवलिंग दाखवले. राजा म्हणाला, "लिंग तर फारच चांगले आहे; पण डामडौल करून त्याची पूजा करण्यापेक्षा अतिशय मनोभावे भक्तीने त्याची पूजा करायला हवी. लोकांमध्ये आपणास भाव खाता यावा म्हणून देवांच्या प्रतिमा जागोजाग मांडून ठेवायच्या म्हणजे भक्तीचा शुद्ध धंदा आहे. ज्याप्रमाणे ब्राह्मणाचा पवित्र वेष घेऊन यात्रेत वाईट कर्मे करीत हिंडायचे त्याप्रमाणेच मनात भाव नसताना, ईश्वरपूजा करणे म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे. 'महाराज, मी खरोखर माझ्या मनापासून या लिंगाची शिवपूजा करीन; पण मला त्यासाठी अगोदर पूजाविधी कसा करावा ते समजावून सांगा." भिल्ल नम्रपणे म्हणाला. 'शबरा, मग ऐक तर. पूजेचे तसे अनेक प्रकार आहेत; असे कर. रोज नवीन चिताभस्म आणून या मंदिरातील पण लिंगाची पूजा कर. चिताभस्म स्वतः लावल्याशिवाय नैवेद्य दाखवू नको. " राजाने त्याला सांगितले.


             राजाचे वचन प्रमाण मानून शबराने ते लिंग तेथून उचलून घरी आणले. आपल्या पत्नीला त्याने रानात घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते सर्व वृत्त ऐकून तिलाही फार आनंद झाला. मग एका सुमुहूर्तावर त्या दोघांनी रानातील पडक्या मंदिरातून आणलेल्या त्या लिंगाची स्थापना केली. रोज नवीन चिताभस्म आणून दोघेही मनोभावे त्या लिंगाची पूजा करीत असत. पूजा झाल्यावर शबराची पत्नी शंकरासाठी नैवेद्य आणीत असे. मग दोघे प्रार्थना करीत असत. असे काही दिवस गेले. एकदा शंकरांनी ठरवले, आपण शबराची परीक्षा पहायची. एक दिवस भिल्लाला काही केल्या कुठेही नवीन चिताभस्म मिळाले नाही. तो आजुबाजूला व संपूर्ण रानात खूप हिंडला; पण काही उपयोग झाला नाही. घरी परत येऊन त्याने पत्नीला तसे सांगितले. तीही मोठ्या काळजीत पडली.


           आता आपली नित्यनेमाची पूजा कशी होणार ? चिताभस्म लावल्याशिवाय आपण शिवलिंगाला नैवेद्य कसा दाखवणार ? शिवाचे व्रत आचरणे म्हणजे खरोखर फार कठीण असते. शबरी म्हणाली, "हे पाहा, आता मी माझे स्वतःच भस्म करते. ते तुम्ही ह्या शंकराला लावा व आपली रोजची पूजा  पुरी करा. तिने म्हटल्याप्रमाणे शुद्ध होऊन स्वयंपाकघरात बसून तिने स्वत:ला जाळून आपल्या शरीराचे भस्म करून घेतले. शबराने ते भस्म शंकराला लावले व नेहमीसारखी शिवलिंगाची यथासांग पूजा केली; पण आता नैवेद्य आणायला तेथे दुसरे कोणी नव्हतेच. शंकराची एकार्ती झाल्यानंतर लगेच शिवलिंगाला नैवेद्य दाखवावा लागे. विलंब झाला तर भगवान शंकर आपणावर अतिशय रागावणार, कोपणार! शंकर तसे सर्व अन्याय सहन करतो; पण नैवेद्याला उशीर झालेला त्याला अजिबात चालत नाही.


         शबर शिवपूजनात मनापासून अगदी दंग होता. आपल्या पत्नीने जाळून स्वतःचे भस्म करून घेतले आहे हे तो अजिबात विसरून गेला आणि एकार्ती होताच त्याने नेहमीप्रमाणे पत्नीला 'नैवेद्य घेऊन ये' म्हणून हाक मारली. त्याबरोबर रंभेपेक्षा अतिशयच दिव्यरूप पावलेली शबरी नैवेद्य घेऊन शबराच्या मागे येऊन उभी राहिली. दोघांनी शंकराचे मनापासून स्मरण केले.


         शिवलिंगाची पूजा संपल्यावर शबराने आपल्या दिव्यरूपधारिणी, नानाविध अशा अलंकारांनी नटलेल्या स्त्रीकडे नीट निरखून पाहिले आणि त्याला लगेच शंकराची अगाध लीला कळली. त्याबरोबर तोही शिवरूपात विलीन झाला. दोघांना नेण्यासाठी आकाशातून भगवान शंकराचे दिव्य विमान खाली आले. मंगल वाद्ये वाजत होती. स्वर्गीय पुष्पांचा सुगंध सवत्र दरवळत होता.


          सिंहकेत राजा आपल्या मनातल्या मनात खूप आश्चर्य करीत होता. त्याने विनोदाने त्या भिल्लाला पूजेचा प्रकार म्हार चिताभस्म लाव असे सांगितले होते. भिल्लाने मात्र ते मानून भक्तिभावनेने त्याने सांगितलेल्या गोष्टींचे तंतोतंत पालन केले. त्याला शबर आणि शबरीच्या एकनिष्ठेचे कौतुक करे खरी भक्ती केल्याशिवाय कोणालाही शिवशंकर प्रसन्न हो शक्यच नाही. शबर शयरीच्या भक्तीप्रमाणे जर आपण नवनी केली तर देव आपल्या जवळच आहे, यामधूनच सिंहकेत राजालाही शिवभजन करण्याचा छंद जडला. तो 'शिव नेहमी ऐकू लागला. शिवराज, प्रदोष, सोमवार ही नियमितपणाने करू लागला. सत्पात्री दान करू लागला आणि शेवटी तोही स्वतः शिवपदास पोहोचला.


        शिवभजनाचा, शिवपूजेचा महिमा खरोखरच अत्यंत अगम्य असा आहे. श्रीधर कवींची काव्यवेल आता पूर्णपणाने बहरली आहे. शिवलीलामृत मंडपावर चढली आहे. तिची दाट छाया खाली सर्वत्र पडली आहे. शिवभक्तांनी या छायेत येऊन दोन घटका अत्यंत निश्चिंतपणे बसावे. प्रेमरूपी द्राक्षफळे मनापासून खावीत आणि तल्लीन होऊन आनंद लुटावा.


   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या