Subscribe Us

श्री शिवलीलामृत - अध्याय पंधरावा || Shivlilamrut Adhyay 15 || शिवलीलामृत अध्याय १५ || कृष्णरेखा krushnarekha

            ॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥

 अध्याय पंधरावा 

 शंकराचार्यांची कथा





            हे शंकरा, सर्व विश्वसूत्र नेहमी तुझ्या हातातच आहे आणि तुला हवे तसे आपल्या हातांनी ते तू हलवतो आहेस. तुझ्या इच्छेशिवाय या जगात काहीच घडू शकणार नाही. अगदी एखाद्या झाडाचे पानही हलणार नाही. जे तुला नम्रपणाने मनापासून शरण येतात त्यांना तू संसारसागरातून सुखरूपपणे बाहेर काढून स्वपदापाशी घेऊन जातोस. तुझा महिमा फार फार अगाध आहे.



              आतापर्यंत व्यासांनी स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडात जे सांगितले आहे ते चौदा अध्यायात संपूर्णपणाने वर्णन केले; पण तरीही माझ्या मनाची तृप्ती अजून झाली नाही म्हणून आणखी एक कथा तुम्हांला सांगतो. आपल्याला जर शंकर प्रसन्न झाले तर त्रिभुवनही आपल्या हातात येईल. शंकरासारखा वरदाता संपूर्ण त्रिभुवनामध्ये दुसरा कुणीच नाही. हे शंकरा, तुझे उदारपण पाहून ब्रह्माविष्णूही लाजतात. अत्यंत भोळेपणाने व उदारपणाने रावणाला प्रत्यक्ष स्वतःची पत्नी पार्वती आणि आत्मलिंग त देऊन टाकलेस. भयानक असे राक्षस त्रिपुर, तारक आणि भस्मासुर यांनाही प्रसन्न होऊन तू वर दिलेस. तू भोळा शंकर आहेस. कपट मनात ठेवूनही तुझी भक्ती कोणी केली तरी तू लोकांना वरदान देऊन संतुष्ट करतोस. असे तुझे अत्यंत कृपाळू, कनवाळू मन आहे. तू भक्तांचा उद्धार करतोस. नकळत जरी कुणी तुझे स्मरण केले तरी तू त्यांचे रक्षण करतोस. आता आणखी एक कथा सांगतो, ती ऐका.



             या कलियुगात लोक फार नास्तिक बनले होते. श्रुती, स्मृती, पुराणे यांना कोणी विचारत नव्हते. कुणीसुद्धा आपापली नेमून दिलेली कामे मनापासून करीत नव्हते.

           जैनमताचा सर्व भूमीवर प्रभाव पडलेला होता. चारी वर्ण जैनमताला भुलले होते म्हणून भगवान शंकरांनी जैनमताच्या प्रभावाचे खंडन करण्यासाठी शंकर या नावाने या पृथ्वीवर अवतार घेतला. आणि खरे म्हणजे तेच शंकराचे अद्भुत चरित्र असे पृथ्वीवरील सर्व लोकांना सांगावे, पटवून द्यावे, दाखवून द्यावे, अशी भवानीपतीने माझ्या मनात तीव्र अशी प्रेरणा उत्पन्न केली. आणि म्हणूनच मी सद्गुरुचे चरित्र सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका.




             कल्पारंभी परब्रह्मांच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने ही सध्याची अससेली सृष्टी निर्माण केली. याच सृष्टीच्या कल्याणासाठी आणि मार्गदर्शनासाठी मग त्यानेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेदसुद्धा निर्माण केले. वेदांचा असलेला अर्थ सर्वांना चटकन लक्षात येणार नाही हे भगवंतांनी त्यांच्या मनातून | जाणले, आणि महान बुद्धिवान, विद्वान आणि तपस्वी, सदाचरणी   अशा ऋषींच्याकडून शास्त्रे निर्माण केली. स्मृती आणि पुराणे यांच्यामुळे लोकांना वेदांचा खराखुरा अर्थ हळूहळू समजू लागला. पुढे या पृथ्वीवर कलियुग आले. पृथ्वीवरील सारे मानव अत्यंत अल्पायुषी, मंदबुद्धी, विचारहीन, तपस्याहीन, आळशी असे बनले. वेदांचा अभ्यास कुणी करेनासा झाला. त्यामुळे सगळीकडे फार अज्ञानच अज्ञान पसरले. सर्वांनी सन्मार्ग पार सोडून दिला.

            कलियुगात असे होईल असे नारायणाला अगदी पहिल्यापासूनच वाटले होते. मग या कलियुगातील जनतेच्या उद्धाराकरिता नारायणांनी महर्षी व्यासांचा अवतार धारण केला आणि असलेल्या चारी वेदांचे भाग वेगवेगळे करून, त्यातले सार काढून 'महाभारत' हा ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे विष्णुपुराण, शिवपुराण, नादब्रह्म पुराण, मार्कंडेय पुराण, भागवत पुराण, ब्राह्म पुराण, अग्र पुराण, भविष्य पुराण, वराह पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, लिंग पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण अशी अठरा पुराणे लोकांच्या उद्धारासाठी लिहिली. मग विद्वान लोक एकेका भागाचा नीट बारकाईने अभ्यास करू लागले. इतिहास, पुराणे वाचून त्यांना पुन्हा एकदा पहिला सन्मार्ग सापडला; पण पुन्हा कलीच्या प्रभावामुळे या सृष्टीवर संकट आले.



 

                  वेद, शास्त्रे, पुराणे यांची निंदा करून, नंतर त्यांचा त्याग करून, नास्तिक असे बौद्धमत सर्व लोक इतरांना सांगू लागले. त्याप्रमाणे सगळे वागू लागले. चारी वर्णांच्या लोकांनी आंधळेपणाने अत्यंत अधर्माने वागायला सुरुवात केली. सर्व पृथ्वीवर बौद्धधर्म पसरला. लोक जैनशास्त्रे घरात आणून त्यांची पूजा करू लागले. वेद, शास्त्रे, पुराणे यांचे महत्त्व कमी कमी होऊ लागले. नव्हे जवळ जवळ नाहीसेच झाले. श्रुति, स्मृती, पुराणोक्त पंथ पार पार लोप पावले.

               आता तुम्ही विचाराल - पूर्वीच्या इतक्या चांगल्या अशा या सृष्टीत इतका अधर्म माजायला कारण काय घडले असावे ? त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो ऐका...




                 मंडनमित्र नावाचा एक अत्यंत विद्वान जैन साधू होता. तो खूप विद्वान तर होताच; फर्डापण वक्ताही होता. त्याचा सर्व शास्त्रांचा अभ्यास दांडगा होता. त्याने अनेक अनुष्ठाने करून सरस्वती आणि कृशान यांना प्रसन्न करून घेतलेले होते. अग्नीत हवन करून याचकाला हवी असेल ती वस्तू तो अग्नीमधून काढून देत असे आणि त्याला संतुष्ट करीत असे. पूर्वी एकदा रावणपुत्र इंद्रजिताने हवन करून अग्नीतून अश्वासह रथ बाहेर काढला होता तसा हा मंडनमिश्र हवन करून पितांबरासारख्या अतिशय मौल्यवान वस्तू अग्नीतून बाहेर काढीत असे. त्याची विद्या तेजस्वी होती. सूर्यालासुद्धा 'तेथेच थांब' असे म्हणायची ताकद त्याच्या विद्येत होती.

           त्यामुळे शास्त्रीपंडितांना या मंडनमिश्र अय्याचा खूप खूप धाक वाटत असे. त्याच्याबरोबर वादविवाद करायला ते कोणीही पुरे पडत नसत. स्वतः नवीन नवीन शास्त्रे रचून मंडनमिश्र सभेत सर्वांना अगदी निरुत्तर करीत असे. मोठमोठे पंडित त्याच्याबरोबर चर्चा, वादविवाद, शास्त्रार्थ करून थकले. सर्व पृथ्वीवर आता अय्याचा अंमल सुरू झाला. 




              वेदांनी दाखवलेला फार प्राचीन काळापासूनचा मार्ग अधर्माचा आहे आणि आपला मार्ग अतिशय उत्तम आहे असे लोकांना सांगून त्याने आपल्या शास्त्राचे महत्त्व खूप वाढविले. चारी वर्ण आणि अठरा जाती त्याचा शब्द, मान व दरारा मानू लागल्या. अगदी प्रत्येक ग्रामदेवतासुद्धा त्याने आपल्या हाती घेतली. पूर्वीची सर्व शास्त्रे पार मागे पडली. अय्याच्या विद्वत्तेने सर्व अतिशय चकित झाले होते. आमच्या पुरातन धर्मापेक्षा जैन धर्म हा खरोखरीच चांगला आहे, असे त्यांच्या मनात आल्याने लोक खूप खिन्न बनले होते. पुढे चारी वर्ण आणि अठरा जातींनी आपला मूळचा खरा धर्म सोडून दिला. सर्वजण जैन धर्माने सांगितल्याप्रमाणे वर्तन करू लागले.

          या मंडनमिश्राला देवी सरस्वती अत्यंत प्रसन्न होती. त्यामुळे त्याच्या जिभेवर ती सतत राहत असे आणि तो जे जे बोलेल ते खरे करीत असे. सरस्वती आता तर त्याच्या अगदी अंकित झाली होती. रोज सकाळी अय्या मद्याचा घट मांडून तेथे देवी सरस्वतीची स्थापना करीत असे. तिला नैवेद्यही मद्याचाच असे आणि तो स्वतः तिन्ही त्रिकाळ पूजा करून देवीचा प्रसाद म्हणून यथेच्छ मद्य प्राशन करीत असे. त्याला स्वतःलाच काही आचार-विचार असा राहिलेला नव्हता, तो कर्मभ्रष्ट झाला होता, सर्व लोकांचा तो गुरु बनला होत. कुणालाच तो पूर्वधर्माचे आचरण करून देत नव्हता. असा अनाचार सगळीकडे माजला होता आणि संपूर्ण पृथ्वी आता दुःखाचे उसासे सोडू लागली. सारखी आपल्या डोळ्यांतून अश्रू गाळू लागली. पृथ्वीवरील देव, ब्राह्मण, संत हे सर्व अतिशय दुःखात आहेत.




           असे शंकरांना कैलास पर्वतावर कळले आणि मग मात्र शंकर फार रागावले. 'पृथ्वीवरील सर्वांनी वेदाने सांगितलेला धर्माचा खरा मार्ग सोडून जैन धर्माचे आचरण सुरू केले आहे, या अनर्थाला काय म्हणावे ! आता मीच पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतो. मानवजन्म घेतो आणि जैनधर्माचा नाश करतो. माझ्यापुढे तरी आता दुसरा उपायच नाही. " शंकर रागाने थरथरत म्हणाले.

        आणि अनाथांचा नाथ, पतितांचा उद्धारक, दीनांचा कृपाळू, कनवाळू असलेल्या ह्या पुराणपुरुष महादेवाने पृथ्वीवर पुन्हा जन्म घेण्याची तयारी केली. उत्तर प्रदेशात निर्मळ क्षेत्र येथील एका ब्राह्मणाचे कुळात शंकरांनी पुन्हा एकदा मानव जन्मात अवतार घेतला. त्यावेळी समुद्र-धरेला फार आनंद झाला. देवही मनात खूप खूप संतोषले. मंद सुगंधी वारा सर्वत्र वाहू लागला. विहिरी, तळ्यांचे पाणी अगदी स्वच्छ झाले. पृथ्वीवर अशी शुभचिन्हे हग्गोचर होऊ लागली. हे वर्तमान पृथ्वीवरील सर्व ऋषींना कळले. तेव्हा ऋषींनी निर्मळ क्षेत्री त्या विप्राच्या घरी स्वतःच जाऊन बालकाचे नाव 'शंकराचार्य' असे ठेवले. आता या नावाचा अर्थ काय आहे तो मी तुम्हांला सांगतो, ते ऐका. शं म्हणजे कल्याण. कुञ धातूचा अर्थ करणे आणि आचार्य म्हणजे सद्गुरू. सर्व लोकांचे सतत कल्याण करणारा असा तो शंकराचार्य असा या शब्दाचा अर्थ होतो.




           यथावकाश शंकराचार्यांची जुन्या धर्मशास्त्राप्रमाणे मुंज झाली. नंतर त्यांची लहान वयातच सर्व विद्यांचा सखोल अभ्यास केला आणि लहान वयातच घरादाराचा मोह सोडून संन्यास घेतला. 

        मग आपल्या शिष्यांसह ते संपूर्ण पृथ्वीवर फिरू लागले. या भटकंतीमध्ये जैन मताचा पगडा सर्व जनतेवर बसलेला आहे हे त्यांच्या चटकन लक्षात आले. ते जेथे जेथे जातील तेथे तेथे शंकराचार्यांचा लोक अपमान करीत आणि जैनशास्त्रांकडे आपले चित्त एकाग्र करीत असत.

         असेच एक दिवस एका गावात भिक्षा मागत ते आपल्या शिष्यांसह चालले होते. कासारांची आळी आली. ते सर्व कासार जैनमताचे बनले होते. त्यामुळे ते शंकराचार्यांना हसू लागले. एकजण म्हणाला, आमच्या घरात काचरस कढईत उकळतो आहे, पाहिजे असला तर तुला हा सर्व भिक्षा म्हणून वाढतो. " जरुर जरुर, चालेल मला ते. हे जैनमताने चालणाऱ्या लोकांनो, मला तुम्ही रसच भिक्षा म्हणून वाढा. मला दुसरी भिक्षाच नको.

           आपल्या शिष्यांनाही त्यांची हाताची ओंजळ पुढे करून भिक्षा घ्या असे सांगितले; पण शंकराचार्यांचे नुसते बोलणे ऐकूनच शिष्य त्यांना सोडून एकदम दूर दूर पळून गेले. 'हा असला तप्त काचरस पिऊन मरण्यापेक्षा आपण दुसरा गुरु करू.' असे ते म्हणत होते.




               शंकराचार्य मात्र आपल्या हाताची ओंजळ पुढे करून काचेचा रस प्यायला तयार होऊन उभे होते. अत्यंत जहाल अशा कालकूट विषाचे प्राशन करणाऱ्या शंकरांना काचेचा रस पचवणे मुळीच अवघड नव्हते.

         त्या दुष्ट कासारांनी खरोखरच तो तापलेला काचरस आतून आणून शंकराचार्यांच्या ऑजळीत ओतला. एक थेंब जर जमिनीवर पडला तर जमीन पार पळून जाईल इतका तो रस अत्यंत गरम होता; पण जगद्गुरु शंकराचार्य मात्र माठातले गार पाणी प्यावे इतक्या आनंदाने तो तप्त रस अगदी सहज, शांतपणाने गटगटा प्यायले. हे पाहून ते दुष्ट कासारही मनातून दचकले. हा दिसतो तसा अगदी सामान्य नसून खरोखरीच हा कुणीतरी वेगळा आहे हे त्यांच्या त्यावेळी पटकन लक्षात आले. आम्ही तो लाल लाल असा तप्त रस नुसता पाहिला तरी आमचे डोळे गरगर फिरतात आणि संन्यासी मात्र तो रस अगदी थंडपणे सहजच पिऊन स्वस्थ उभा आहे. हा माणूस नाही. देव असावा असे मनात वाटून त्यांनी शंकराचार्यांचे पाय घट्ट धरले.




           मग तेथून शंकराचार्य निघाले ते थेट जैनग्रामाला आले. शिष्यांकडून त्यांनी मंडनमिश्राला निरोप पाठवला, की आम्ही आपल्याशी वादविवाद करण्यासाठी आलो आहोत. तेव्हा "तुम्ही आमच्याबरोबर वादविवाद करायला यावे. जर या वादविवादात तुम्ही आमचा पराभव केला तर आम्ही तुमच्या धर्माची नवीन शास्त्रे शिकू आणि आम्ही जिंकलो तर मात्र तुम्ही आमची प्राचीन काळापासून चालत आलेली शास्त्रे शिका.

             शंकराचार्यांचा असला निरोप ऐकून गर्वाने अत्यंत फुगलेला मंडनमिश्र म्हणाला, 'अरे, आजपर्यंत असे खूप पंडित येथे येऊन गेले वादविवाद करायला. माझा पराभव कुणीही केला नाही. जो तो फुशारकी मारत आला आणि पराभूत होऊन मान खाली घालून गेला. आणि आता हा संन्याशी मोठा निरोप पाठवून सांगतोय, मी त्याचा पराभव करणारच. पाहूया तरी त्याची हिम्मत. शेवटी पळवून नाही लावला तर.... मग मंडनमिश्र सरस्वतीचे ध्यान करून शंकराचार्यांकडे वादविवाद करण्यासाठी आला. आता दोन तेजस्वी तारे अगदी. समोरासमोर बसले होते. दोघे आपापल्या क्षेत्रात अत्यंत पराक्रमी होते. तुल्यबळ होते..




               आज सभा घेण्याचे ठरले. वेदशास्त्रांची स्वमुखे चर्चा व्हावी असे ठरले. पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून दोघांनीही अर्थ सांगावा. ज्याचा अर्थ पूर्ण होणार नाही त्याचे शास्त्र फुकट आहे, असे समजावे आणि जो पराजय पावेल त्याचे सर्व धर्मग्रंथही पाण्यात बुडवून टाकावेत असा दोघांचा करार झाला.

           त्यामुळे या दोन विद्वानांमधील वादविवाद ऐकायला फार गर्दी जमा झाली होती. मंडनमिश्राने पडद्याआड आपल्या नेहमीच्या पद्धतीने मद्याच्या घटात सरस्वतीची स्थापना शंकराचार्यांच्या नकळत केली होती. मद्याच्या घटात बसलेल्या सरस्वतीने त्यावेळी अय्याला आश्वासन दिले, तू घाबरू नकोस. या शंकराचार्यांचा मी नक्की पराभव करते. तू फक्त चमत्कारच बघ. मी तुला प्रसन्न झालेली आहे. '

        सरस्वतीचे ते बोलणे ऐकून मंडनमिश्राला मनातून फार आनंद झाला. मग पडद्याआड बसून त्याने शंकराचार्यांना मोठ्या घमेंडीतच विचारले, ' कोणता वेद सुरू करू ? कोणत्या वेदाचा अर्थ सांगू ?





              शंकराचार्यांनी सांगितले, "चारी वेद मला ऐकायचे आहेत. तुम्ही वेद सांगत असतानाच मी मधे मधे प्रश्न विचारीन. त्याचे मला त्याच वेळी योग्य उत्तर द्यावे. हे जर घडले नाही तर मात्र पराभव मान्य करावा.

         मग अय्याने प्रथम ऋग्वेदाला आरंभ केला. संपूर्ण ऋग्वेद ऋचांसहित त्याच्या मुखातून त्याच्या जिभेवर बसलेली देवी सरस्वती अस्खलितपणे बोलत होती. मधे मधे शंकराचार्य प्रश्न विचारीत होते, त्याची उत्तरे तीच देऊन त्यांचे समाधान करीत होती.

         ज्यांनी वेद निर्माण केले त्या ब्रह्मदेवाची सरस्वती ही कन्याच असल्याने ती कुठेही थोडीसुद्धा अडखळत नव्हती. अशा तऱ्हेने प्रथम ऋग्वेद समाप्त झाला. मग शंकराचार्यांनी मंडमिश्राला यजुर्वेदाची सुरुवात करायला सांगितले. त्याबरोबर पडद्याआडून मद्याच्या घटातील सरस्वतीने यजुर्वेद म्हणायला सुरुवात केली. शंकराचार्य मधे मधे शंका विचारी आणि सरस्वती मोठ्या कुशलतेने त्यांचे शंका-समाधान करीत होती. आतापर्यंत अशा तऱ्हेने मंडनामिश्रांचा कोठेच पाडाव होत नव्हता. आता काय करावे ? हे शंकराचार्यांना सुचत नव्हते. विचार करता करता त्यांना एक उपाय सापडला. ते अय्याला म्हणाले, "हे बघ, तू सध्या यजुर्वेद सांगतो आहेस. पण मला ऋग्वेदातील एक शंका पुन्हा आली आहे तर तू ती ऋचा पुन्हा म्हणून तिचा मला अर्थ सांग.




            आचार्यांचा हा प्रश्न ऐकून आता मात्र सरस्वती एकदम गप्प बसली. ऋग्वेद म्हणताना ती म्हणू शकली; पण त्याची आठवण आता तिला राहिली नव्हती. कारण सर्व वेद, शास्त्रे, पुराणे आरंभापासून शेवटपर्यंत क्रमानुसार नीट सांगावी हा सरस्वतीचा खरा मार्ग होता; पण पुढील विवेचन करीत असताना जर कोणी मागील अर्थ पुन्हा विचारला तर सरस्वतीला मागे जाऊन तो पुन्हा एकदा सांगता येत नसे, हे तिचे खरेखुरे वर्म कुणाला ठाऊक नसल्याने आलेल्या सर्व विद्वानांचा आजपर्यंत तिने अगदी सहजासहजी पराभव केला होता.

            शंकराचार्य अतिशय चतुर होते. ते मनात विचार करता करता म्हणत होते, इतक्या सुस्पष्टपणे सर्व वेद या जगात ब्रह्मा आणि सरस्वती यांच्याशिवाय दुसरे कोणीही म्हणू शकणार नाही. अय्याच्या पिताश्रींनाही असे वेद म्हणणे शक्य होणार नाही, मग हा क्षुद्र पंडित कोठून बोलू शकेल ? तरी येथे काहीतरी कपट नक्की असेल.





            सरस्वतीला आता काही केल्या उत्तर देता येईना. सर्व सभेत अतिशय शांतता पसरली. अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या. मंडनमिश्राच्या शिष्यांच्या हृदयांची धडधड वाढली तेव्हा शंकराचार्यांनी अय्याला पुन्हा विचारले, 'अरे, विद्वान पंडिता, थांबलास का ? माझ्या प्रश्नाचे उत्तर देतोस ना ? " सर्वांसमक्ष शंकराचार्यांनी अय्याला तोच प्रश्न तीन-चार वेळा केला; पण अय्याने उत्तर मात्र दिले नाही. तेव्हा शंकराचार्य उठले आणि त्यांनी समोरचा पडदा बाजूला केला तेव्हा त्यांना मद्यघटातून बाहेर तोंड काढलेली सरस्वती दिसली. तिला मद्यघटात पाहिले आणि त्याबरोबर शंकराचार्यांना फार संताप आला. त्यांनी एकदम ओढून पडदा टर्रकन् फाडून टाकला आणि आपल्या हातातील मजबूत अशा काठीचा त्या घटावर जोरात प्रहार केला. त्याबरोबर त्या घटाचे पूर्णपणे चूर्ण झाले. संतापाने कठोर  आवाजात आचार्य देवी सरस्वतीला म्हणाले, "चांडाळणी, त्या जैनाला प्रसन्न होऊन रात्रंदिवस वेदशास्त्राची चर्चा करतेस... तुला लाज कशी नाही वाटत? अगं दुराचारिणी, तुझे तोंडसुद्धा आता पाहू नये. प्रत्यक्ष आपल्या जन्म देणाऱ्या बापाबरोबर, ब्रह्मदेवाबरोबर व्यभिचार करणारी तू एक निर्लज आणि नीच स्त्री आहेस. आता या अय्याला प्रसन्न होऊन जैनशास्त्र सगळीकडे स्थापन करायचा तुझा विचार दिसतो आहे.




               याला अशा तऱ्हेने साहाय्य करून सर्व पृथ्वीवर तू भ्रष्टाचार माजवला आहेस. प्राचीन काळापासूनही वेदशास्त्रे, पुराणे दूर सारून तू या जैनाची नवीन शास्त्रे अभिमानाने सांगते आहेस.. तुला म्हणू तरी काय ? तुझ्यामुळेच येथील प्राचीन अशा सर्व ग्रामदेवतांचा नाश झाला. सगळीकडे याच्या साहाय्याने तूच अनाचार घडवून आणलास. आता तू अशा या नीच वर्णाच्या लोकातच राहा. त्यांच्याच मुखाने प्रकट हो. तुझा आतापर्यंतच्या सर्व प्रताप मी कैलासावर बसून ऐकला होता म्हणूनच मी पृथ्वीवर पुन्हा हा अवतार घेतला आहे. " शंकराचार्यरूपी भगवान शंकर म्हणाले. शंकराच्या या शापवाणीने सरस्वतीनेही अतिशय रागावून आचार्यांना म्हटले, "धर्म स्थापन करायला तू साक्षात शंकर जरी अवतरला असलास तरी तुझा देहान्त कीटकदेशी होईल, हा मी तुला शाप देते.

       असा शाप देऊन सरस्वती गुप्त झाली. आता मंडनमिश्र आचार्यांच्या पायावर लोळू लागला. त्याने जैनशास्त्रांची गाठोडी बांधून ती सर्व गाठोडी समुद्रात नेऊन बुडविली. त्यातला 'अमरकोश' हा ग्रंथ मात्र सर्वांच्या उपयोगी पडण्यासारखा होता म्हणून तो ग्रंथ फक्त बुडवला नाही.

         असो. नंतर सर्व लोकांना आचार्यांनी आपल्या जवळ बोलावले. व उपदेश केला. ठिकठिकाणी जाऊन गावात ग्रामदेवतांची पुन्हा प्रतिष्ठापना केली. ही जरी जैनाने स्थापन केली असली तरी तुम्ही तिचे भजन-पूजन करा, असा आदेश दिला. प्रत्येकाने आपला धर्म पाळावा असे देव प्रत्येकाला सांगतो. प्रत्येकाने आपापला धर्म नीट पाळावा.




                    अय्याने आचार्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले व त्यांना म्हटले, 'आता माझा व माझ्या जैनशास्त्राचा पराभव झालाच आहे; पण ग्रामदेवतांच्या शेजारी जैनमताची काहीतरी थोडीशी निशाणी राहू द्या, अशी माझी विनंती आहे. " उदार शंकराचार्यांनी ग्रामदेवतांच्या शेजारी जैनाचा धोंडा स्थापला. त्यामुळे ग्रामदेवतांबरोबर त्याचीही पूजा होऊ लागली. मग शंकराचार्यांनी सर्वांना आज्ञा केली. आपापल्या जातीधर्माचे सर्वांनी पुन्हा एकदा पहिल्याप्रमाणे पालन करावे. वेदशास्त्रे आणि पुराणे यांचा अभ्यास पुन्हा पहिल्यासारखाच चालू करावा.

              शंकराचार्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे लोक आपला धर्म आचरू लागले. ब्राह्मणांनी पुन्हा वेदाध्ययन सुरू केले. बाकीच्या सर्वांनीही आपापली कामे संभाळली. अशा रीतीने शंकराचार्यांनी आपल्या अतिशय तीव्र अशा बुद्धिबळावर जैनांचे पाखंडी मत खोडून काढले आणि पुन्हा वैदिक धर्माची स्थापना केली. अशा तऱ्हेने श्रीशंकरांनी शंकराचार्यांना अवतार घेऊन भूमीवर वाढत असलेला पापांचा भार हलका केला. शिवमंत्राचा नियमितपणे जप करणाऱ्याला शंकर नेहमी साहाय्य करीत असतो. या कलियुगात सर्वत्र खोटे गुरु पैशाला तीन मिळतात, त्याचा उपयोगी नाही. सद्गुरु असल्याशिवाय गुरुचा किंवा गुरुमंत्राचा प्रभाव अजिबात पडत नाही.




           खोटे गुरु केवळ मिळणाऱ्या द्रव्यलोभाने मंत्रतंत्र करून लोकांना आपल्या नादी लावतात. हल्लीचा शिष्यही गुरुचरणावर दृढ श्रद्धा असणारी नसतो म्हणून दोघांनाही शेवटी नरक प्राप्त होतो.

             कृतयुगात मनुष्याच्या अस्थीमध्ये प्राण होता. त्यामुळे तपस्वी ऋषी अस्थी गळून जमिनीवर पडेपर्यंत तप करीत असत. अस्थी गळून जमिनीवर पडल्या, की प्राण जात असे. त्रेतायुगी चामडीत प्राण असे. चामडीपर्यंत प्राण आला म्हणजे चामडी झडून गेली, की प्राण जात असे. द्वापार युगात नाडीपर्यंत प्राण आला म्हणजे नाडी थांबली, की प्राण गेला, असे समजत असत. पूर्वी मनुष्याला आयुष्यही हजार, दहा हजार वर्षांचे सहज लाभत असे. म्हणून तपही मोठे करता येत असे. अंगावर वारुळे वाढत. मग भगवंत प्रसन्न होऊन त्यांना आपल्या पायापाशी जागा देत असत.

           पण आता मात्र अन्नमय प्राण झाला आहे. जर अन्न मिळाले नाही तर मृत्यू येतो. आयुष्यही थोडे फक्त शंभर-सव्वाशे वर्षांचे झाले आहे. आजचा दिवस गेला, उद्याचा कसा जाईल ? ही लोकांना काळजी पडू लागली आहे. म्हणून देवाला भजण्याचा, मोक्षाला जाण्याचा एक अतिशय सोपा असा मार्ग जगदीशाने सांगितला, 'सद्गुरुला शरण जावे.' आता हा सद्गुरु कसा असावा ? नेहमीच आनंदी असा, अतिशय विद्वान असावा आणि त्याचे शिष्यही गुरुची भक्ती करणारे असावेत. श्रीधरस्वामी सांगतात, जे पंचाक्षरी मंत्र पूर्वीच्या अध्यायात दाशाई राजाला, भद्रायूला किंवा सुमतिराणीला सांगितले तेच मंत्र सर्व लोकांना सांगितले आहेत.





              तुम्ही म्हणाल मग त्या मंत्राने पूर्वीसारखे मंत्र म्हणणारे, जप करणारे लोक आता या काळात उद्धरून का जात नाहीत ? त्याचे कारण असे, की जप करताना जपकर्त्याचे मन अतिशय शुद्ध पाहिजे. ते हल्ली मुळीच नसते म्हणून तसा अनुभव येत नाही.

           सर्वांनी नेहमी शिवलीलामृत नियमितपणे, लक्षपूर्वक ऐकावे. आपल्या प्रपंचात जसे आपण तन-मन-धनाने नेहमी सावध असतो तसा सावधपणा शिवस्मरणातसुद्धा ठेवावा. म्हणजे या जगात त्याला काहीच कमी पडणार नाही. असो.

               शंकराचार्यांचे रूप घेऊन भगवान शंकर या कलियुगात पृथ्वीवर प्रगटले आणि त्यांनी खऱ्या धर्माचा प्रसार केला. शंकराचे स्मरण न करता जे नेहमी नुसते आपल्याच कामात दंग असतात ते अतिशय अल्पवयात अकस्मात निधन पावतात. प्रपंचात गुंतून जे शंकराला पूर्णपणे विसरतात ते जन्मले काय आणि मेले काय, दोन्हीही सारखेच असते. शेवटी यम त्यांना नरकात टाकतो. तेथे अनेक भयंकर असे भोग त्यांना भोगावे लागतात. आणि पुन्हा त्यांना नाना योनीत जन्म घ्यावा लागतो. त्यांचा जन्ममरणाचा फेरा असा सततच चालू राहतो म्हणून शंकराचे चरणी सतत भाव धरून सतत 'शिवलीलामृत' पठण करावे. 





              शिवलीलेचे खरे तर मूळचे चौदा अध्याय असताना हा पंधरावा अध्याय कुठून आला ? अशी काहींच्या मनात शंका येईल. शिवानेच या कलियुगात धर्म स्थापण्यासाठी शंकराचार्यांचा अवतार पुन्हा एकदा घेतला आणि शिवाच्या आज्ञेनेच हा पंधरावा अध्याय लिहिला. येथे कसलाही विकल्प मनात येऊ देऊ नये. कधीही मद्यमांस भक्षून किंवा स्नान न करता हे अध्याय वाचू नयेत. रजस्वला स्त्रीच्या कानी शिवमंत्र कधीच पडू नयेत. ज्याचा शिवावर अजिबात विश्वास नाही त्याला ही कथा मुळीच ऐकवू नये. या ग्रंथाच्या पठनाने वाचणाऱ्या भक्ताच्या मनात असेल ती इच्छा शंकर भगवान पूर्ण करतात, हे त्रिवार सत्य आहे.


इति ॐ नमः शिवाय ।

॥ इति श्री श्रीशिवलीलामृत कथासार समाप्तः ।।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या