२.भगवान श्रीकृष्णाचा अवतार आणि गोकुळात जाणे
वसुदेवाच्या अजूनही काही पत्नी होत्या. कंसाच्या भयाने त्या मथुरा सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून गेल्या. वसुदेवाचा मित्र होता नंद. तो गोपांचा राजा होता आणि मथुरेच्या समोर यमुनेच्या दुसऱ्या काठावर गोकुळात राहात होता. वसुदेवाची एक पत्नी रोहिणी जेव्हा गर्भवती झाली तेव्हा ती मथुरेहून नंदाकडे गोकुळात जाऊन राहू लागली.
जेव्हा देवकीला सातवे अपत्य होणार होते, तेव्हा भगवंताने आपल्या योगमायेला सांगितले, "देवकी मातेच्या गर्भात या वेळेला संकर्षण आहे. त्याला रोहिणीच्या गर्भात पोहोचवावे. त्यानंतर मी माता देवकीकडे प्रकट होईन आणि तू नंदाची पत्नी यशोदेची कन्या म्हणून प्रकट हो.
भगवंताच्या आज्ञेप्रमाणे योगमायेने देवकीचा गर्भ रोहिणीच्या गर्भात पोहोचवला. रोहिणीचा गर्भदेखील त्यातच मिसळला गेला. यामुळे बलराम प्रकट झाला. मथुरेत सर्वांना असेच कळले की देवकीचा सातवा गर्भपात झाला. त्यानंतर जेव्हा स्वतः भगवंत देवकी - मातेपोटी जन्म घेणार होता, तेव्हा देवकी मातेच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज पसरले. कोणी तिच्याकडे पाहू देखील शकत नसे. आठव्या गर्भधारणेची बातमी ऐकून कंसाने कारागृह बंद केले आणि बरेचसे पहिलवान पहारेकरी तेथे नेमले.
भाद्रपद महिन्यात कृष्णपक्षात अष्टमीच्या मध्यरात्री कंसाच्या कारागृहात वसुदेव-देवकीसमोर भगवंत प्रकट झाला. भगवंताच्या शरीराचा रंग निळ्या कमळाप्रमाणे सुंदर नील - श्याम होता. त्याने विजेप्रमाणे चमकणारा पीतांबर नेसला होता, त्याला चार हात होते आणि त्यात शंख, चक्र, गदा तसेच पद्म होते. भगवंताने रत्नजड़ित मुकूट, कुंडले कंकण, बाजूबंद इत्यादी बहुमोल आभूषणे घातली होती आणि त्याच्या शरीरातून इतका प्रकाश येत होता की संपूर्ण कारागृह प्रकाशित झाले होते.
वसुदेव त्याचप्रमाणे देवकीने भगवंताची स्तुती केली. माता देवकीने भगवंताला प्रार्थना केली, “आपण आपले हे चतुर्भुज रूप लपवावे. आपल्या अवताराची बातमी ऐकून कंस ताबडतोब धावत येथे येईल. कंसाची मला खूप भीती वाटते. "
भगवंताने आपले चतुर्भुज रूप लपवले आणि तो लहानसे मूल बनला. भगवंताने वसुदेवाला सांगितले होते की, "तू मला गोकुळात पोहोचवावे आणि तेथून यशोदेच्या कन्येला घेऊन जावे." भगवंताची आज्ञा ऐकून वसुदेवाने त्याला एका सुपात ठेवले. भगवंताच्या इच्छेमुळे वसुदेवाच्या हाताच्या हातकड्या त्याचप्रमाणे पायाच्या बेड्या आपोआप उघडल्या. सर्व दरवाजे देखील आपोआप उघडले गेले आणि सर्व पहारेकऱ्यांना गाढ झोप लागली.
त्यावेळी विजा चमकत होत्या. जोरात पाऊस पडत होता. वसुदेव जेव्हा कारागृहातून निघाला तेव्हा शेषनाग चुपचाप त्याच्या मागून गेला आणि आपले सहस्र फणे उभारून भगवान श्रीकृष्ण तसेच वसुदेवाच्या वर छत्र धरून पावसापासून त्यांना वाचवू लागला. यमुनेला पूर आला होता, पण वसुदेवासाठी ती इतकी आटली की तिच्यात गुडघ्यापेक्षाही कमी पाणी राहिले.
वसुदेव जेव्हा गोकुळात पोहोचला, तेव्हा भगवंताच्या मायेने तेथे देखील लोक गाढ झोपेत होते. त्याचवेळी यशोदेला देखील मुलगी झाली होती. परंतु यशोदा देखील भगवंताच्या इच्छेप्रमाणे निद्रेत होती. तिला हे देखील माहिती नव्हते की तिला मुलगी झाली आहे की मुलगा. वसुदेव सरळ नंदाच्या घरात गेला. त्याने यशोदेची आताच जन्मलेली मुलगी उचलली आणि तेथे भगवंत श्रीकृष्णाला ठेवले आणि तो मथुरेला परतला. वसुदेव कारागृहात येताच दरवाजे आपोआप परत बंद झाले. वसुदेवाने हातकडी व बेड्या देखील घातल्या. त्याचवेळी ती गोकुळातून आणलेली मुलगी रडू लागली. तिचे रडणे ऐकून पहारेकऱ्यांची झोप उडाली. ते कंसाकडे धावत पोहोचले आणि त्याला देवकीला मूल झाल्याची बातमी दिली.
कंस तर भीतीने देवकीला पुत्र होण्याचीच वाट पाहात होता. त्याला झोप येतच नव्हती. बातमी मिळताच तलवार घेऊन उघड्या डोक्यानिशीच तो धावू लागला. देवकीने कंसाला येताना पाहून त्या मुलीला पदरात लपवले. रडत-रडत देवकीने कंसाला प्रार्थना केली, “दादा ! ही तर मुलगी आहे. तू हिला मारू नकोस."
पापी कंस देवकीवर ओरडला आणि मुलीला हिसकावून तिचे पाय पकडून दगडावर आपटू लागला, परंतु ती कोणी साधारण मुलगी तर नव्हतीच, ती योगमाया होती. कंसाच्या हातून निसटून ती आकाशात निघून गेली. तिथे ती अष्टभुजारूप धारण करून कंसाला म्हणाली, “दुष्ट कंसा ! तुला मारणारा जन्मला आहे. तू आता उगाचच निरपराध लोकांना त्रास देऊ नकोस.'
तेजोमयी अष्टभुजा देवी कंसाला ही बातमी देऊन अदृश्य झाली. तिची बातमी ऐकून कंसाला खूप भीती वाटली आणि दुःखदेखील झाले. त्याने विचार केला की वसुदेव-देवकीच्या पुत्रांना उगाचच मारले. त्याने त्याचा मेव्हणा वसुदेव त्याचप्रमाणे बहीण देवकीच्या हातकड्या बेड्या काढल्या. आपल्या अपराधाबद्दल क्षमा मागून कंसाने त्याला घरी पाठविले.
कारागृहातून परतल्यावर सकाळ होताच कंसाने आपल्या राक्षस मंत्र्यांना बोलावून अष्टभुजा देवीची बातमी ऐकवली. कंसाचे राक्षस मंत्री देखील अतिशय पापी आणि खुनशी होते. त्यांनी कंसाला सल्ला दिला की इथे दहा पंधरा दिवसात जितकी मुले झाली असतील, ती सर्व मारून टाकावी. कंसाने पूतना, शकटासुर, व्योमासुर इत्यादी राक्षसांना सर्व ठिकाणी फिरून मुलांना मारण्याची आज्ञा दिली.

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.