Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय २८ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 28

।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-२८ 

 पिंगला सती गेली 


।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

           आता बारा वर्षे संसार करायचा, मग सर्वस्वाचा त्याग करायचा असा निर्धार मनात धरून भर्तरी शिकारीहून परत आला. आता त्याला आपली अवंती नगरी वेगळी भासू लागली. तो सभेचे कामकाज आटोपून आणि रात्रीचे भोजन करून पिंगलेच्या महालात गेला. सोन्याच्या मंचकावर मऊमऊ शय्येवर सुगंधी फुलांचा शृंगार केलेला होता. प्राणप्रिया पिंगला त्याच्याशी गुजगोष्टी करीत होती. पिंगला म्हणत होती, "नाथ अशीच तुमच्या मांडीवर डोके टेकून मी झोपले असता मला मरण यावे." भर्तरी म्हणाला, "पिंगले, माणूस लाख गोष्टी ठरवितो, पण देवाच्या मनात काय असेल तेच घडते. जर मलाच आधी नेण्याचे ठरविले तर मलाच गेले पाहिजे." "छे छे, असे बोलू नका! तुमच्या मागे मी एक क्षणभरही जिवंत राहणार नाही. 

          पुढे एकदा भर्तरी शिकारीसाठी रानात गेला असता पिंगलेचे तेच शब्द त्याला आठवले भर्तरीने हरिणाला मारून आपली काही वस्त्रे त्याच्या रक्तात भिजवून कोणाच्याही नकळत आपल्या अगदी विश्वासू नोकराला ती वस्त्रे दिली व म्हणाला, "ही माझी हरिणाच्या रक्तात भिजवलेली बने थे, हा फेटा आहे, हे उपरणे आहे, ही काही तुटलेली भूषणे आहेत, ही घेऊन अवंतीस जा. राणीला रडत सांग, "चणीसाहेब, भर्तरी महाराजांना वाघाने झडप घालून नेले. त्यांचे हे पहा तुटके अलंकार, हे कपड़े, हाय हाय असे सगळे नाटक कर!"

           सेवकाने आज्ञापालन करायचे ठरविले. राजा सर्वांचा डोळा चुकवून दूर अरण्यात लपून बसला. सेवक सर्वांना सोडून नगरात गेला. जे जे वाटेत भेटले त्यांना पण पढविलेली कथाच त्याने सांगितली. सर्वजण शोक करू लागले. नंतर सेवक लगबगीने एकदम अंतःपुरात गेला. "राणीसाहेब, घात झाला हो घात झाला!" तो ओरडतच आत शिरला. ती रक्ताने माखलेली वस्त्रे पुढे ठेवून व भूषणे हाती घेऊन रडू लागला. पिंगला पुढे आली. ते कपडे, ती भूषणे पाहून तिच्या डोळ्यांसमोर सर्व राजवाडा गरगर फिरू लागला. "वाघाने अचानक हल्ला करून राजांना उचलून नेले व खाल्ले. त्यांचे हे कपडे." एवढेच शब्द सेवक बोलला. ते ऐकून पिंगलेने धाडकन अंग टाकले आणि धाय मोकलून रडू लागली. अखेर पिंगलेने निर्वाणीची आज्ञा केली, "मी सती जाणार आहे. या शिरोवस्त्रांसह या उत्तरियासह चिता सज्ज करा.

                 स्मशानात चिता तयार करावीच लागली. वन्ही धडाडून पेटला. चितेवर एक शिलाखंड ठेवला होता. पिंगलेने सर्वांना नमस्कार केला, केस मोकळे सोडलेले, कपाळी मळवट भरलेला, धीरगंभीर स्वरात "जय भर्तरी, मी आले हो नाथ!" असे गर्जत तिने चितेला आपले शरीर अर्पण केले. चिता पेटली व ज्वाळांनी तिच्या शरीराला लपेटून गगनात उंच जाण्यास प्रारंभ केला. दुःखी प्रजाजन भडकलेल्या चितेला आणि जळणाऱ्या पिंगलेला नमस्कार करून घरोघर गेले. तिकडे अरण्यात भर्तरी सूर्यास्तापर्यंत थांबला. नंतर आपल्या नगराकडे सायंकाळी वळला. नगरद्वाराजवळ पेटलेल्या मशाळींच्या तांबूस उजेडात भर्तरी व त्याच्यामागून निवडक सेवक अश्वारूढ होऊन येत होते. 

                ते पाहून द्वारपाल आवासून बघतच राहिले, भर्तरीला वाघाने खाल्ले नी हा कोण ? पुढे जाऊन त्यांनी नीट पाहिले. भर्तरीच हा! "महाराज तुम्ही जिवंत आहात ? हाय हाय ! केवढा घोटाळा झाला हो ! वार्ता ऐकून पिंगला सती गेली." भर्तरी दौडतच स्मशानात गेला, चिता विझत आली होती. भर्तरी त्या निखाऱ्यात उडी घालणार तेवढ्यात त्याला कित्येक नागरिकांनी धरून ठेवले व बाजूला नेले. भर्तरी आला आहे नि स्मशानाकडे गेला आहे ही बातमी नगरभर पसरली. भर्तरीला विलाप ऐकून व त्याला पाहून सर्व प्रजाजनही त्यासारखे रडू लागले. थोर व प्रौढ मंडळी भर्तरीचे सांत्वन करू लागली. मथुरानगरीत सुद्धा हे वृत्त कळाले. 

           शुभविक्रम, विक्रम, सुमंत व सत्यवर्मा हे सगळे तेथे होते. पिंगलेचे वृत्त कळताच तेही त्वरेने अवंतीस आले. विक्रमाने भर्तरीचे सांत्वन केले. त्याला घेऊन मोठ्या प्रयत्नाने विक्रम नगरात राज-महालात आला. पण भर्तरीचे मन कशातच लागेना. तो सारखा स्मशानात जाई, तिथेच शून्यपणाने बसून राही. विक्रम त्याची समजूत घालून बळेबळे त्याला परत नेई त्याने अशी बारा वर्षे काढली. त्याचा देह क्षीण झाला. 

             ओठ सूक्ष्म हालचाल करीत होते. ते 'पिंगले' एवढेच म्हणत होते. भर्तरीचे प्राण आता जातील की मग जातील अशी अवस्था झाली. ते पाहून मित्र - वरुण खिन्न झाला व दत्तात्रेयांकडे गेला. त्यांना म्हणाला, "पहा, माझ्या लेकरांची काय गती झाली आहे. दत्तात्रेया, त्याच्याकडे तुमचे लक्ष आहे ना?" दत्तांनी अंतर्दृष्टीने पाहिले. "सूर्यनारायणा, माझे शिष्य मच्छिंद्रनाथ यांचा तपस्वी शिष्य गोरक्षनाथ याच्यासह तीर्थयात्रा करीत आहे. तोच भर्तरीला शुद्ध मार्गाला लावील. भर्तरी चिरंजीव होणार आहे. आपण चिंता करू नये.

अध्याय फलश्रुती :- गुणवान स्त्रीशी लग्न होईल, व ती अखंड सेवा करेल.  

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या