श्री कृष्णाचा पाळणा
पहिल्या दिवशी जन्मीलं बाळ ।
कळस सोन्याचा देतोया ढाळ ।
पडला परकाश तिनीया ताळ ।
दिप्ती नेत्तर दोनीया डोळा ।
कसा मारीला बाळाचा काळ ।
करील भक्ताचा परतपाळ ।
जु बाळा जु बाळा जुजु रे ॥१॥
दुसऱ्या दिवशी दुसरा रंग ।
रूप सावळं गोर्याच अगं ।
जसं चमकतं आइन्यातल भिंग ।
नागिनी पद्मिनी झाल्यात्या दंग येड्या गौळणी बाळाच्या संग ।
श्री कृष्ण बाळावर शिंपीती रंग ।
जु बाळा जु बाळा जुजु रे ॥२॥
तिसऱ्या दिवशी आनदं मोठा ।
शीता सावित्री बायांनो ऊठा ।
दान धरम गाईच्या पेटा ।
खारीक खोबरं साखर वाटा ।
आयो नारीनो आवा ग लुटा ।
जु बाळ जु बाळा जुजु रे ॥३॥
चवथ्या दिवशी चवथी करीती ।
आठ रंगाच्या बोलावून नारी ।
पाळणा बांधील यश्वदा घरी ।
त्याला लावली रेशमी दोरी ।
जुजु म्हणून हालवितो हरी ।
पाळणा गातात न्हानाल्या पोरी ।
जु बाळा जु बाळा जुजु रे ॥४॥
पांचव्या दिवशीं पांचवा राडा ।
रानसटवीनं येढीला वाडा ।
लिंब नारळ देवीला फोडा ।
तान्ही वासरं गाईला सोडा तिनी ।
सांजाचा अंगारा लावा ।
तान्ह्या बाळाची दृष्ट हो काढा ।
यश्वदा मातेचा जीव थोडा थोडा ।
जु बाळा जु बाळा जुजु रे ॥५॥
सहाव्या दिवशीं कल्लीचा वारा ।
जशा तुटती अस्मानी तारा ।
ऊठा सयांनों घागरी भरा ।
चला घेऊन यश्वदा घरां ।
कृष्ण जल्मला मान एक हिरा ।
राधा घालीति वारा ।
जु बाळा जु बाळा जुजु रे ॥६॥
सातव्या दिवशीं सातवीचें मोल ।
छप्पन रंगाचं काढीलं गोलं ।
चारी बाजूला चारीचं लाल ।
मधीं चंदन होईल मोल ।
श्रीकृष्ण मांडीवर यश्वदा झुल ।
जु बाळा जु बाळा जुजु रे ॥७॥
आठव्या दिवशीं आठवा थाट ।
भुलल्या गवळणी तीन साठ ।
दह्या-दुधाचा भरुनी माठ ।
श्रीकृष्ण - बाळाची पहात्यात वाट ।
जू बाळा जु बाळा जुजु रे ॥८ ॥
नवव्या दिवशीं नवाच फंद ।
तान्ह्या बाळानं घेतीला छंद ।
वसुदेवानं सोडवील बंद ।
धन कीं गवळ्या राजा तूं नंद ।
जु बाळा जु बाळा जुजु रे ॥९॥
दहाव्या दिवशीं दहायासी राती ।
तेहतीस कोटी देव मिळूनी येती ।
तान्ह्या बाळाला वंदूनी जाती ।
यश्वदा माता डोळ्यांनीं पाती ।
ओवाळूनी टाकिती माणिक मोतीं ।
जु बाळा जु बाळा जुजु रे ॥१०॥
आकराव्या दिवशी आकरावा गदा ।
नित्त पाण्याच्या वाटेला उभा ।
सोडावा रस्ता जाऊंदे दादा ।
जु बाळा जु बाळा जुजु रे ॥११॥
©कृष्णरेखा / krushnarekha
बाराव्या दिवशीं बारसावळी ।
कंसमामाची जळती होळी ।
अनसूयानं वाजिवली टाळी ।
नांव ठेवावं वनैयामाळी ।
जु बाळा जु बाळा जुजु रे ॥१२॥
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.