Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय ८४ ते ८८ || shri ganesh puran kathasar adhyay 84 to 88

 ।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- ८४ ते ८८ 

२९. कार्तिकेय - जन्माख्यान, तारकासुर-वध


                   ब्रह्मदेव व्यासांना गणेशभक्तिपर दुसरी कथा सांगू लागला. तो म्हणाला, "शिवपुत्र कार्तिकेय हा कार्तिकस्वामी, षडानन, स्कंद, कुमार अशा विविध नावांनी प्रख्यात आहे. त्याने देवांचे सेनापतिपद स्वीकारून तारकासुराचा वध केला. तो इतिहास असा आहे.

            फार पूर्वी तारकासुराने तीव्र तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले. मी त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले, तो म्हणाला, "हे विधाता, मी अजिंक्य व्हावे." मी म्हणालो, "तारका, शिवपुत्र कार्तिकेयाशिवाय कोणताही देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस वा मनुष्य तुझा वध करू शकणार नाही. "

        या वरदानाने तारकासुर बलाढ्य झाला. त्याने उन्मत्तपणे त्रैलोक्यात थैमान घातले. प्रचंड संहार केला. मानवांचा छळ केला. ऋषिमुनींवर अनन्वित अत्याचार केले. त्याच्या जाचाने देवही हैराण झाले. सारी सृष्टी त्राहित्राहि करू लागली. ऋषिजनांनी व प्रजांनी मला साकडे घातले. तेव्हा त्याने सत्यलोक, कैलास आणि बैकुंठावर आक्रमण करून मला, विष्णूला आणि शंकराला पळवून लावले. त्याने इंद्राचा पराभव करून अमरावती हस्तगत केली आणि त्याच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनाच्या निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊ लागला.

           तारकासुराच्या वधासाठी ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा 'शंकराचा पुत्र तारकासुराचा नाश करील,' अशी आकाशवाणी झाली. म्हणून सर्व ऋषी देवांसह कैलासावर आले. शंकर तारकासुराच्या भयाने हिमालयातील गिरिकंदरांच्या आश्रयास गेला होता. त्याची भेट झाली नाही. पार्वती मात्र भेटली. त्या सर्वांनी तिला ईश्वरी योजनेनुसार शिवपुत्राचा जन्म होणे किती आवश्यक आहे ते समजावून सांगितले. तिला मदतीचे आवाहन केले.

                 पार्वतीने एका सुंदर भिल्लीणीचे रूप घेतले. तिने हिमालयात तपश्चर्यारित असलेल्या शंकराला शोधून काढले. तो प्रगाढ समाधी अवस्थेत होता. त्याला जागृत करणे ही सोपी गोष्ट नव्हती. म्हणून तिने मदनाला पाचारण केले. ती त्याला म्हणाली, "मन्मथा, जगाच्या कल्याणासाठी शंकरांच्या समाधीचा भंग होणे आवश्यक आहे. तू त्यांच्या मनाचा वेध घेऊन त्यांना कामप्रेरित कर. हे कार्य फार कठीण आहे. ते रागावले तर तुझ्या जिवावरही बेतू शकते. पण काहीही झाले तरी हे कार्य तुलाच करायचे आहे.' मदनाने पार्वतीचे म्हणणे आनंदाने मान्य केले. त्याने शंकराच्या भोवताली सुरम्य नंदनवन तयार केले, त्यामध्ये वृक्ष, फुलझाडे, वेली, सरोवरे, पुष्करिणी अशी सर्व व्यवस्था केली. मग त्याने आपल्या मित्राला, बसंत ऋतूला पाचारण केले. त्याने नंदनवनाची सजावट करून उन्मादक आणि आनंददायक वातावरण निर्माण केले. त्यानंतर मदनाने आपल्या भात्यातील अत्यंत सूक्ष्म आणि विलक्षण बाणाने शंकराच्या मनाचा वेध घेतला. त्यामुळे त्याची समाधी भंगली. त्याने डोळे उघडले. त्याला शृंगारलेले नंदनवन दिसले. अंतर्ज्ञानी शिवाने मदनाचे कपट तत्काळ ओळखले. त्याने संतापाने तृतीय नेत्र उघडून त्याला क्षणार्धात भस्मसात केले. त्याच्या नेत्रातील धगधगत्या अग्नीने सृष्टीचा विनाश होतो की काय, अशी प्रलयसदृश परिस्थिती निर्माण झाली.

                 तेव्हा पार्वती भिल्लीणीच्या स्वरूपात शंकराच्या संमुख गेली. ती त्याला कळवळून प्रार्थना करू लागली- "नाथ ! कृपा करा! राग आवरा ! तृतीय नेत्र मिटून सृष्टीचा संहार थांबवा! तारकासुराच्या छळाला कंटाळलेले सर्व देव तुम्हांला शरण आले आहेत. त्यांचे रक्षण करणे तुमचे आद्य कर्तव्य आहे. हे कार्य साधण्यासाठी मदनाने स्वतःला बळी दिले आहे."

         पार्वतीची विनंती ऐकून शंकर शांत झाला. त्याने आपला तृतीय नेत्र मिटून घेतला. तिच्याकडून सर्व वर्तमान जाणून घेतले. त्याने देवांचे सांत्वन केले. 'मी तुमचे कार्य करतो,' असे आश्वासन देऊन तो पार्वतीसह कैलास पर्वतावर निघून गेला. तेथील एकांतात ते दोघे रतिक्रीडेत रममाण झाले.

           अशी सहस्र वर्षे लोटली. कैलासावरून शिवपुत्राच्या जन्माची वार्ता ऐकण्यास देव उत्सुक झाले होते, पण तसे काहीही घडले नाही. तेव्हा त्यांनी अग्नीला पाचारण केले व म्हणाले, "तू शिवापाशी जाऊन त्याला त्याच्या कार्याचे स्मरण करून दे." त्याप्रमाणे अग्नी याचकरूपाने कैलासलोकी गेला. शिवपार्वतीच्या क्रीडाभवनाच्या प्रवेशद्वारावर उभा राहून त्याने 'भिक्षा घाला हो!' अशी हाक दिली. त्याच क्षणी रतिक्रीडेत मग्न असलेल्या शंकराचे दिव्य तेज (वीर्य) स्खलित झाले. देवकार्यासाठी तेच तेज पार्वतीने भिक्षुकरूपाने आलेल्या अग्नीच्या ओंजळीत घातले. 'हे तेज पृथ्वीवर पडले तर तिचे अस्तित्वच नष्ट होईल,' असा विचार करून अग्नीने ते शिववीर्य स्वतः ठायीच धारण केले. त्यामुळे त्यास गर्भ राहिला. तो लज्जेने लपून बसला. काय करावे हेच त्याला समजेना. तेवढ्यात एक युक्ती सुचली. 'गंगा ही शिवाची अर्धांगिनीच आहे, ती या गर्भाला आनंदाने धारण करील,' असा विचार करून त्याने गंगेत स्नान केले आणि आपल्या उदरातील गर्भ तिच्या प्रवाहात सोडून दिला.

           तो कार्तिक मास होता. कृत्तिका नामक सहा ऋषिस्त्रिया कार्तिकस्नानासाठी गंगेवर आल्या होत्या. अग्नीने आपला गर्भ गंगेत सोडल्यावर प्रवाहाच्या वेगाने त्याचे सहा भाग झाले. हे सहा भाग त्या सहा ऋषिस्त्रियांच्या गर्भाशयात प्रवेशले. त्या गरोदर राहिल्या. 'हे असे कसे घडले?' या विचारांनी भयभीत झाल्या. त्यांनी घरी जाऊन आपापल्या पतींना सर्व वर्तमान सांगितले. त्यांनी 'तुम्ही गर्भत्याग करून आल्याशिवाय तुम्हाला घरात प्रवेश नाही,' असे स्पष्ट बजावले. त्या पुनरपि गंगेवर गेल्या. त्यांनी आपापले गर्भ प्रयत्नपूर्वक बाहेर काढून प्रवाहात विसर्जित केले. ते सहा भाग पुन्हा एकत्र आले. त्यांपासून सहा शिरे, बारा हात व दोन पाय असलेला एक दिव्य बालक उत्पन्न झाला.

                गंगास्नानासाठी आलेल्या नारदांचे त्याकडे लक्ष गेले. अंतर्ज्ञानी देवर्षीनी हा शिवपुत्र आहे हे तत्काळ ओळखले. त्यांनी गंगेला त्या पुत्राची काळजी घेण्यास सांगितले. मग ते त्वरेने कैलासावर गेले. तेथे शिवपार्वतीला पुत्रजन्माचे शुभवृत्त सांगितले. अपर्णा त्वरेने गंगेवर आली. आपल्या पुत्राला पाहून तिचा आनंद गगनात मावेना. तिने त्याला बात्सल्याने हृदयाशी धरले तेव्हा तिला पान्हा फुटला. त्या वेळी 'हा माझा पुत्र आहे' असे म्हणून गंगेने त्यावर आपला अधिकार सांगितला. तेवढ्यात अग्नी आणि सहा कृत्तिकाही तेथे आल्या. बालकावर अधिकार सांगून ते सर्व जण एकमेकांशी वाद घालू लागले. आपल्या बाळाला आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन पार्वती कैलासावर आली. निजपुत्राला पाहताच शंकराचे पितृसुलभ वात्सल्य जागृत झाले. त्याने त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर घेऊन खेळवू लागला. शंकराने त्या पुत्राचा स्वीकार केलेला पाहून अग्नी, गंगा आणि त्या कृत्तिका निराशेने आपापल्या स्थानी परतल्या.

                   शंकराला पुत्र झाल्याचे वर्तमान हा हा म्हणता सर्वत्र पसरले. त्याला पाहण्यासाठी देवांनी कैलासावर गर्दी केली. मी आणि देवगुरु बृहस्पतींनी त्याला अनेक नावांनी अलंकृत केले. कार्तिकात जन्म झाला म्हणून त्याचे 'कार्तिकेय' हे नाव ठेवण्यात आले. शंकराचे वीर्य त्रिवार स्कन्न झाले म्हणून 'स्कंद', पार्वतीचा पुत्र म्हणून 'पार्वतीनंदन', सहा कृत्तिकांनी . त्याला गर्भरूपाने धारण केले म्हणून 'षण्मातुर', शर नावाच्या तृणात गर्भ एकवटून त्याचा जन्म झाला म्हणून 'शरजन्मा', तारकासुराचा वध करणारा म्हणून 'तारकजित' आणि देवांचा सेनापती म्हणून 'महासेन' व 'सेनानी' अशा प्रकारे त्याला आमच्याकडून अनेक संबोधने प्राप्त झाली.

          इंद्रादी देवांनी त्या शिवपुत्राला तारकासुराच्या अत्याचारांची पूर्ण कल्पना दिली. त्याचा संहार करून त्रिभुवनाला संकटमुक्त करण्याची विनंती केली. त्याला देवांची सेनापती म्हणून घोषित केले.

                कार्तिकेय दिसामासाने लहानाचा मोठा होऊ लागला. तो महाविद्वान होता: तो अल्पावधीतच सर्वज्ञानसंपन्न झाला. त्याची शस्त्रास्त्रविद्या वाखाणण्यासारखी होती. बालपणापासूनच त्याचे क्षात्रतेज जाणवत होते. शंकराला कुमाराचे नेहमी कौतुक वाटत असे. ते दोघे परस्परांशी छान गप्पागोष्टी करीत असत. एके दिवशी कुमार शंकराला म्हणाला, “पिताश्री, तुम्ही मला आजपर्यंत अनेक प्रकारचे ज्ञान दिलेत. मला अनेक कथा, व्रते, उपासना, मंत्र व त्यांची अनुष्ठाने, क्षेत्रांची व तीथांची माहात्म्ये या संदर्भात विस्तृत माहिती सांगितलीत. आत्ता ज्यायोगे शत्रूवर विजय मिळवता येईल आणि माझी त्रिभुवनात कीर्ती होईल असे एखादे व्रत असल्यास सांगा. मी त्याचे निष्ठेने आचरण करीन."

         ते ऐकून शंकराला आनंद झाला. तो म्हणाला, “कुमारा, तू गणपतीचे वरद चतुर्थी व्रत कर. हे व्रत शत्रूंचा व संकटांचा नाश करणारे, सर्व मनोरथांची पूर्तता करणारे व कीर्तीसह मानसन्मान मिळवून देणारे आहे.

          शंकराने कुमाराला गणेश चतुर्थी व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. त्याप्रमाणे त्याने त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या सेवेने संतुष्ट झालेल्या गणपतीने मयूरारूढ स्वरूपात त्याला दर्शन दिले. त्याला अनेक वर दिले. स्वतःचे मयूरवाहनही देऊ केले. तेव्हापासून कुमाराला 'मयूरध्वज' हे नाव प्राप्त झाले.

             गणपतीच्या कृपाप्रसादाने स्कंदाला मोठे मनोधैर्य लाभले. त्याने देवांना संघटित केले. युद्धाच्या योजना आखल्या. सर्व सिद्धता झाल्यावर त्याने गणपतीची पूजा केली. मातापित्याचे व ऋषिजनांचे आशीर्वाद घेतले. पुढे एका सुमुहूर्तावर त्याने तारकासुरावर स्वारी केली. तो संग्राम एक लक्ष वर्षे चालला होता. त्या युद्धात त्याने दैत्यांची प्रचंड हानी करून तारकासुराला ठार केले. असुरांची सत्ता नामशेष झाली. त्रिभुवन आनंदाने डोलू लागले. सर्वांनी कुमाराचा (कार्तिकेयाचा) जयजयकार केला. देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. ते आपापल्या अधिकारपदावर रूढ झाले. सृष्टिचक्र पूर्वीप्रमाणे व्यवस्थित चालू लागले. वेदपठण, यज्ञयाग, अग्निहोत्र, अध्ययन, अध्यापन, तपश्चर्या या गोष्टी पूर्ववत सुरू झाल्या.

           जगात शांती नांदू लागली. स्कंद आणि तारकासुराचे युद्ध झाले ते स्थान 'लक्षनगर' म्हणून प्रसिद्धीस आले. जेथे गणपतीने स्कंदाला दर्शन व वरदान दिले तेथे 'घृसुणेश्वर' व 'लक्षविनायक' अशी दोन पुण्यक्षेत्रे निर्माण झाली. " 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या