Subscribe Us

पांडव प्रताप ग्रंथ अध्याय चौथा || krushnarekha

 ।। श्री पांडव प्रताप ग्रंथ ।।

 अध्याय चौथा 

दुष्यंत- शकुंतला आख्यान [ पुढे चालू ]



         दुष्यंत राजा आपल्या नगरांत गेल्यावर त्याच दिवशीं कण्वऋषि आपल्या आश्रमांत परत आला. त्याला पाहून शकुंतलेला लाज वाटू लागली. ऋषीला अंतर्ज्ञानानें सर्व गोष्ट कळली होती. त्यानं तिला न रागावतां, असा आशीर्वाद दिला की, 'वंशाला भूषण होणारा व रूपवान असा मुलगा तुला होईल.' पुढे नऊ महिने पूर्ण होतांच तिला मुलगा झाला. तो दिसण्यांत फारच सुंदर होता. त्याचे नांव भरत ' असे ठेवण्यांत आलें. तो सहा वर्षांचा झाला तेव्हां पासून निर्भयपणे वाघ, सिंह यांच्याशीं मस्ती करीत असे. त्याचें है अचाट धैर्य पाहून तेथील इतर ऋषींनीं त्याचें नांव सर्वदमन असें ठेविलें. दुष्यंतानें शकुंतलेस, 'मी तुला पालखी पाठवितो,' असें सांगितलें होतें, परंतु त्यानें तसें केलें नाहीं. शेवटीं कण्वानें विचार करून आपल्या शिष्यांसह शकुंतलेची दुष्यंताकडे रवानगी केली.


           ती मंडळी जेव्हां राजाकडे पोहोंचली तेव्हां राजा प्रधान वगैरे मंडळीसह सर्भेत बसला होता. त्यावेळीं शकुंतलेचें रूप पाहून सर्वांना असें वाटलें कीं, ही कोणी स्वर्गाहून आलेली स्त्री असावी. तिच्या मुलाकडे पाहून सर्वजण म्हणूं लागले कीं, ' हा जणूं मूर्तिमंत चंद्रच पृथ्वीवर आला आहे. त्यावेळीं  कण्वाच्या शिष्यांनीं राजास आशीर्वाद देऊन असें सांगितलें कीं, 'आपल्या ह्या स्त्रीचा आपण स्वीकार करावा.' तेव्हां शकुंतला भरताला म्हणाली की, 'बाळा, आपल्या पित्याला नमस्कार कर.' तें ऐकून भरतानें दुष्यंताला नमस्कार केला. नंतर शकुंतला म्हणाली की, 'महाराज, कण्व ऋषींच्या आश्रमांत येऊन गांधर्व विधीनें विवाह केलेल्या स्त्रीची ओळख आपण विसरलात काय ? आपण मला जें वचन दिलें होतें त्याची आठवण करावी. याप्रमाणे ती बोलत असतां राजानें तिला ओळखलें होतें. 


           परंतु तो मोठ्या रागानें धिक्कारत तिला म्हणाला कीं, 'तुझ्याशी लग्न केल्याचे मला आठवत नाहीं. तुझी व माझी ओळखसुद्धां नाहीं, तेव्हां तुझ्या मुलासह तुझा स्वीकार भी करावा असें तूं कसें म्हणतेस ? 'हे ऐकून शकुंतलेस फार वाईट वाटले. तिनें राजाची खात्री पटावी म्हणून पुष्कळ भाषण केलें. विश्वामित्र व मेनका ह्यांच्यापासून माझा जन्म झाला असून, तुम्ही गांधर्वपद्धतीनें माझ्याशी लग्न केलें आहे वगैरे माहिती सांगून शकुंतला रडूं लागली.


           तिचें तें बोलणें सर्वांना खरें बाहूं लागलें, परंतु राजानें तिला स्पष्ट सांगितलें कीं, अप्सरा म्हणजे केवळ वेश्या. तिची तूं मुलगी, तुझ्यासारख्या अशा खोडसाळ बायकोचा स्वीकार करून मी माझ्या पवित्र वंशास डाग लावू काय ? तू जशी आलीस, तशीच निघून जा. हे ऐकतांच निर्दोष शकुंतला आकाशाकडे पाहून म्हणाली की, 'देवा, या ठिकाणीं खरी साक्ष देणारा तूंच आहेस. 'एवढे बोलून ती परत फिरणार तोच, गंभीर आकाशवाणी झाली कीं, 'हे राजा दुष्यंता, ' शकुंतला ही अतिशय साध्वी स्त्री आहे. 


         तूं तिच्याशीं गांधर्वविधीनें विवाह केला आहेस व तुझ्यापासून तिला जो मुलगा झाला आहे, तो तुझ्या वंशाचा उद्धार करील. तूं हिचा त्याग करूं नकोस.' असा आवाज ऐकतांच राजा म्हणाला की, 'सभाजनहो ! ही आकाशवाणी तुम्ही ऐकलीच आहे. ह्या स्त्रीशी लग्न केल्याची मला आठवण होती, परंतु ही गोष्ट गुप्तपणे झाल्यानें व आजपर्यंत मी ती गोष्ट कोणास सांगितली नसल्यामुळे मला हिचा स्वीकार करता येईना.' नंतर राजानें शकुंतलेचें समाधान करून तिला व पुत्राला आपल्या सिंहासनावर बसविलें.


         त्यामुळे तिला आनंद झाला. पुढे राजानें अनेक प्रकारांनी तिचें मन रिझविलें. दुष्यंतामागून त्याचा मुलगा भरत राज्य करूं लागला. त्यानें सर्व पृथ्वीची सत्ता स्वतःकडे घेतली व अतिशय उत्तम प्रकारें राज्य केले. त्याचेच नांव त्याच्या वंशाला चालू झालें. त्याच वंशांतले तुम्ही आहांत म्हणून भारत ' असें नांव तुम्हांलाहि चालू आहे व तुमच्या वंशजांच्या इतिहासग्रंथालाहि यावरून तेंच नांव पडले आहे. 

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या