Subscribe Us

पांडव प्रताप ग्रंथ अध्याय तिसरा || krushnarekha

।। श्री पांडव प्रताप ग्रंथ ।।

 अध्याय तिसरा 

जनमेजयाचें सर्पसत्र, दुष्यंत-शकुंतला आख्यान 


जनमेजय राजानें सर्पयज्ञाला आरंभ केला. तेव्हां ब्राह्म णांच्या मंत्रसामर्थ्यानें हजारों अजगर, दुतोंडी, गांडूळ, फोढसे, कवडे, किरडे, धामण्या, डोंब इत्यादि अनेक जातींचे महान् असे विखार त्या यज्ञकुंडांत येऊन पडूं लागले. त्यामुळे नागलोकीं एकसारखा आकांत चालला; म्हणून वासुकीनें आपली बहीण जरत्कारी हिचा पुत्र आस्तिक याची प्रार्थना करून त्यास जनमेजयाकडे पाठविलें त्यानें जनमेजयाची व तेथे जमलेल्या ऋषिमुनींची पुष्कळ स्तुति केली, आणि यश समाप्त करण्यास सांगितले. परंतु जनमेजय म्हणाला कीं,  'ज्या शत्रूच्या नाशासाठीं मी यज्ञ केला तो तक्षक या कुंडांत येऊन पडल्यावांचून माझें समाधान होणार नाहीं. नंतर तक्षक आणण्याकरितां जनमेजय ब्राह्मणांस घाई करूं लागला. 


तेव्हां ब्राह्मणांनी अंतर्ज्ञानाने जाणलें कीं, तक्षक सध्यां इंद्राकडे गेला आहे. इंद्राने तक्षकाच्या दुष्टपणाबद्दल त्याची पुष्कळ निंदा केली. पण शेवटीं तो शरण आल्यामुळे, श्रीव्यासाच्या उपदेशानुसार परोपकार हेच पुण्य व परपीडा हे महत्पाप असे जाणून इंद्रानें त्यास अभय वचन दिलें. शेवटीं राजानें 'इंद्रासह तक्षक येवो' असा मंत्र ब्राह्मणांस म्हणावयास सांगितला. तो मंत्र म्हणतांच इंद्र तक्षकासह तेथें आला, परंतु आस्तिक ऋषीच्या मंत्रसामर्थ्यानें तो कुंडांत पडेना. तेव्हां ब्राह्मणांनी जनमेजयास असें सांगितलें की, 'आस्तिकाचें स्वागत केल्याशिवाय हे कार्य होणार नाहीं. ' तेव्हां राजानें आस्तिकाला योग्य स्थानीं बसवून, तूं मागशील ते देतों, असे सांगितलें. तेव्हां आस्तिक म्हणाला की, 'राजा ! मला दूसरें कांहीं नको. हा यज्ञ करून तूं अर्जुन, अभिमन्यु यांच्याप्रमाणेच महान् कीर्तिमान् झालास, तेव्हां आतां हा यज्ञ पुरा करूं.

 

 'राजानें सांगितलें कीं, 'ज्या तक्षकाकरितां मी असंख्य सर्पाचा नाश केला, त्या तक्षकाचा नाश झाल्याशिवाय हा यज्ञ संपविता येत नाहीं.' शेवटीं आस्तिकानें राजाची निरनिराळ्या रीतीनें समजूत घातल्यावर राजानें यज्ञ समाप्त केला. त्यामुळे नागलोकीं सर्वांना आनंद झाला. तेव्हांपासून आस्तिक ' असा शब्द ऐकतांच सर्पानें पुढे जाऊ नये अशी मर्यादा सर्वांनी घालून घेतली. ती ते अद्याप चालवितात.


आस्तिकानें त्यावेळी आपल्या पूर्वजांचं मोठें गुणवर्णन केलें. तें ऐकून त्याचा सर्व वृत्तांत ऐकावा असा हेतु जनमेजय राजाच्या मनांत उत्पन्न झाला. तोच तेथे श्रीव्यासमुनी प्रकट होऊन त्यांनीं आपला शिष्य वैशंपायन यास जनमेजयाला संपूर्ण इतिहास सांगण्याची आज्ञा केली. याप्रमाणे विचार ठरल्यावर मोठमोठे राजे, ऋषि वगैरे सर्व लोक एकत्र बसले व वैशं पायनानें भारत इतिहास सांगण्याची सुरुवात केली. तो म्हणाला कीं, 'राजा जनमेजया, चैद्य देशाचा वसू या नांवाचा एक राजा होता. त्यानें आपल्या तपाच्या जोरावर इंद्राची कृपा संपादन केली व मृत्युलोकीचें सार्वभौम पद मागितले. इंद्राने त्याची तपश्चर्या पाहून त्यास त्याच्या इच्छेप्रमाणें वर दिला. तेव्हां राजानें त्याच्या नांवानें तात्काळ ध्वज उभारला. तो वर्षाचा पहिला दिवस होता. त्या दिवसापासून गुढी उभारण्याची वहीवाट झाली आहे. ह्या राजानें प्रजेचें चांगल्या प्रकारें रक्षण केलें. म्हणून त्याला उपरिचर असें नांव मिळाले. त्या राजाच्या वसुपतीनगरीजवळ शक्तिमती नांवाची एक नदी होती. "त्या नदीजवळ कालाह नांवाचा एक पर्वत होता. त्याला तिच्याविषयीं अभिलाषा उत्पन्न होऊन त्यानें तिला अडवून धरलें, त्यामुळे शहरांत पाण्याचा दुष्काळ पडला. हे जाणून उपरिचर राजानें शिकारीच्या हेतूनें जाऊन लाथ मारून तो पर्वत फोडला व प्रवाह चालू केला. 


त्या नदीला त्या पर्वता पासून एक मुलगा व एक मुलगी झाली. तिनें तीं मुलें राजास दिलीं. राजानें त्या मुलास सेनापतीचा अधिकार दिला व मुलगी फारच सुंदर असल्यानें त्यानें तिच्याशी लग्न केलें. तिचें नांव गिरिका असें होतें. पुढें तो राजा एकदां एकटाच शिकारीसाठीं वनांत गेला असतां त्याला तिची व सुरतसमयाची आठवण होऊन त्यांचं रेत गळलें तें त्यानं द्रोणांत घालून श्येन पक्ष्याच्या चोंचीत दिलें व त्यास असें सांगितलें कीं, माझी स्त्री ऋतुस्नात आहे तिच्याजवळ दे. परंतु वाटेंत इतर पक्ष्यांनी श्येन पक्ष्याशीं दांडगाई करून तें सांडलें तें खाली नदी होती, त्या नदीत पडलें व तें एका मच्छीने गिळले. त्यापासून तिला गर्भ राहिला. त्या मासळीस एका कोळ्यानें धरलें व तिला कापतांच त्यांतून एक मुलगा व मुलगी निघाली. ती त्यानें उपरिचर राजास दिली. राजानें त्या मुलास स्वतःजवळ ठेवले व मुलगी परत केली. ती मुलगी कोळ्याच्या आज्ञेवरून यमुना नदीवर नौका चालविण्याचे काम करीत असे. तिचें नांव मत्स्यगंधा. तिला सत्यवती असेंहि म्हणत. 


एके दिवशीं पराशर ऋषि त्या ठिकाणी आला. त्याला सत्यवती नावेंत बसवून पलीकडे नेत होती. तेव्हां तिला पाहून तो मोहित झाला. तिने अनुकूल व्हावे म्हणून तो तिला विचारू लागला. तेव्हां ती म्हणाली कीं, ही विपरित गोष्ट करण्यास मी कशी तयार होणार ? मी अद्यापि अविवाहित स्त्री आहे. ही गोष्ट जर उघडकीस आली तर माझं लग्न होण्यास अडचणी येतील. तशांत आतां सकाळ होण्याची वेळ झाली आहे. दोन्ही तीरावर लोक आहेत. ते पाहातील व माझी जन्मभर फजिती करतील. म्हणून तूं माझ्या वडिलांजवळ माझी मागणी कर. हें ऐकून पराशर म्हणाला कीं, तूं ज्या अडचणी सांगतेस त्या मी दूर करीन व तुझी फजिती होणार नाहीं, याची काळजी घेईन. मग त्यानें असा चमत्कार केला कीं, धुक्यानें सूर्य झांकून सगळीकडे अंधार केला. तिच्या अंगाला जी दुर्गंधी येत होती ती नष्ट करून तिच्या अंगाचा सुगंध दूरवर जाईल असें केलें व तुझ्या कौमार्याचा भंग होणार नाहीं व एक महाप्रतापी राजा तुझ्याशी विवाह करील असे तिला सांगितलें. 


तेव्हां तो केवळ एक ईश्वर आहे असे मानून ती त्यास अनुकूल झाली. तिच्याशीं रममाण होऊन, मनोरथ पूर्ण झाल्यावर, तुला मुलगा होईल, असें सांगून पराशर ऋषि निघून गेला. नंतर नऊ महिने भरल्यावर मत्स्यगंधा प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. तोच व्यास होय. तो जन्मतःच शास्त्रें, पुराणे यांच्यांत निपुण व विद्वान झाला. त्यानें आईला नमस्कार करून तपश्चर्येस जाण्यासाठीं तिची आज्ञा मागितली. तेव्हां सत्यवती म्हणाली की, 'बाळ! तुला अजून मी पुरतें पाहिलेंहि नाहीं. तूं एकदां गेलास, तर मला कसा भेटशील ?' हे ऐकून तो म्हणाला कीं, 'तुला ज्या ज्या वेळीं मला भेटावेसे वाटेल, तेव्हां मी प्रकट होऊन तुला भेट देईन.' असे सांगून योगबलानें तो तेथेंच गुप्त झाला.


पुढें जनमेजयानें वैशंपायनास विचारलें कीं, आमच्या वंशजास भारत म्हणण्याचे कारण कोणतें ? ' तेव्हां वैशंपायनानें राजास कथा सांगितली ती अशी कीं, 'कुरु वंशामध्यें दुष्यंत नांवाचा सार्वभौम राजा होता. तो सद्गुणी, स्वरूपवान व महापराक्रमी असा होता. एकदां तो दुष्यंत राजा अपार सैन्य घेऊन शिकारीस गेला असतां परत येतांना कण्वमुनीचा आश्रम त्यास दिसला. मग तसाच तो त्या आश्रमांत शिरला. पण तेथें त्याला कोणी दिसलें नाहीं. म्हणून राजानें हांक मारली. त्यास कोणी दिसलें नाहीं, परंतु कण्वमुनींची कन्या शकुंतला बाहेर येऊन तिनें मोठ्या सत्काराने त्यास बसण्यासाठीं आसन दिले व त्याची पूजा केली. तिला . पाहून राजास अतिशय आनंद झाला. 


शकुंतलेनें राजास नांव काय म्हणून विचारलें. तेव्हां तो म्हणाला, 'मैथुनी राजाचा मी पुत्र. मला दुष्यंत म्हणतात. मी कण्व ऋषींची भेट घेण्या साठीं आलों होतों, ' तें ऐकून शकुंतला म्हणाली की, 'हे नृपनाथ ! माझा पिता फळें आणण्यासाठीं अरण्यांत गेला आहे. थोडा वेळ आपण बसावें. तो लगेच येईल. ' त्यावेळीं एकांत पाहून राजाचें मन कामानें विचलित झालें. राजा तिला म्हणाला की, 'कण्वमुनी ब्रह्मचारी असतां, त्यास तूं कन्या झालीस हें कसें घडलें ?' त्यावर शकुंतला म्हणाली कीं, एका ऋषीजवळ पूर्वी माझ्या जन्माची गोष्ट सांगितली आहे ती मी ऐकली आहे, ती तुम्हांस सांगते. '


पूर्वी गांधी राजाचा पुत्र विश्वामित्र ह्यानें घोर तपश्चर्या केली त्यामुळे इंद्रास धास्ती वाट्टं लागली व त्यानें विश्वामित्राच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी मेनकेला पाठविलें. मग ती मेनका कौशिकारण्यांत विश्वामित्राजवळ गेली. तेथें विश्वामित्र ऋषीस नमस्कार करून तिनें नृत्यगायन करावयास सुरुवात केली. त्यामुळे तिला फार श्रम झाले व ती आपली वस्त्रें तळ्याच्या कांठी ठेवून नग्न होऊन स्नान करावयास गेली. इतक्यांत वाऱ्यानें वस्त्रे उडून गेलीं. ती वस्त्रें धरावयास ती विवस्त्र वर येत असतां विश्वामित्रानें तिला पाहिलें. तिचें रूप पाहून विश्वामित्राला मोह पडला. त्यानें धांवत जाऊन तिला आलिंगन दिलें. मग ती दोघें विषयविलासाचा उपभोग घेऊ लागली. नंतर ती गरोदर राहिली. 


शेवटीं विश्वामित्र शुद्धीवर येऊन पुन्हा तपश्चर्येस गेला व मेनका क्रूरपणे आपल्या उदरांतील माझा गर्भ हिमालयावर टाकून स्वर्गाला गेली. पुढें शकुंत पक्ष्यांनीं माझ्यावर सावली धरली. ते पक्षी माझ्या तोडांत मद्य घालत व इतर कोणी माझ्याजवळ येऊ लागल्यास आपल्या पंखांनी त्याच्यावर झडप घालून ते माझें रक्षण करीत होते. अशा रीतीनें शकुंत पक्षी माझें संरक्षण करीत असतां अचानक कण्वऋषि तेथे आले. त्यांनी मला कडेवर घेऊन घरी आणून माझें पालन पोषण केलें. शकुंत पक्ष्यांनी माझें रक्षण केल्यामुळे, कण्वऋषि मला 'शकुंतला' म्हणूं लागले. त्यांनी अजूनपर्यंत माझा सांभाळ केला म्हणून मी त्यांनी कन्या व तो माझा पिता होय.


शकुंतलेचा हा इतिहास ऐकून राजानें तिच्याशीं लग्न करण्याचे ठरविलें. तो तिला म्हणाला कीं, 'तूं अतिशय सुंदर असून या अरण्यांत तूं रहाणें ही गोष्ट अयोग्य आहे. जर तूं मला वरशील तर मी तुला पट्टराणी करीन. शकुंतलाहि राजावर अनुरक्त झाली होती, परंतु पित्याच्या परवानगी शिवाय ती लग्नास तयार होईना. त्यावर राजा म्हणाला कीं, तूं उपवर असून कण्वऋषि आपल्या विवाहास प्रतिबंध करणार नाहींत. तेव्हां अशी संधि पुन्हा यावयाची नाहीं असें तिच्या मनांत आलें व आपल्या मुलास राज्यावर बसविण्याचें वचन तिनें त्याच्याकडून घेतले व ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार झाली. मग दुष्यंत व शकुंतला यांचा गांधर्व विवाह झाला व राजानें आपले मनोरथ पूर्ण केले. त्याचवेळी तिला गर्भ राहिला. ' कांहीं दिवसांनी तुला राज्यांत न्यावयास छत्रचामरें असलेली पालखी पाठवितो, ' असें सांगून दुष्यंत राजा आपल्या नगरीकडे गेला.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या