अध्याय दुसरा
जनमेजयाचें सर्पसत्र, दुष्यंत-शकुंतला आख्यान
सूर्याचा उचैःश्रवा नांवाचा घोडा पाहून घरीं गेल्यावर विनता आणि कढू यांच्यांत घोडा कोणत्या रंगाचा होता याबद्दल वाद सुरू झाला. विनता म्हणाली, 'तो घोडा शुभ पांढऱ्या रंगाचा होता. ' तिचं म्हणणं ऐकून कदू म्हणाली, ' तो जरी पांढऱ्या शुभ्र रंगाचा होता तरी त्याची शेपटी मात्र काळ्या रंगाची होती. 'तुझेच डोळे फुटले होते. म्हणून तुला शेपटीचा रंग नीट दिसला नाहीं. ' असें विनता कला म्हणाली. त्यावर उद्यां आपण घोडा पहावयास जाऊ असें कला उत्तर दिलें. तिनें पुढे सांगितलें कीं, 'घोड्याचें पुच्छ पांढरें असलें तर मी एक हजार वर्षेपर्यंत तुझी दासी होईन व घोड्याचें पुच्छ जर काळ्या रंगाचे असेल तर तितकीच वर्षे तूं माझें दासीपण करावेस.' विनतेनें तें सर्व कबूल केलें.
नंतर त्याच रात्रीं कडूनें सर्पास जवळ बोलावून ही गोष्ट त्यांना सांगितली आणि म्हटलें कीं, 'तुम्ही जर तेथें जाऊन घोड्याच्या शेपटीस देश केलात तर तेथील जागा काळी होईल व मग विनता माझी बटीक होईल. ' तिचें तें बोलणे ऐकून सर्प म्हणाले की, 'आम्ही जर तेथे गेलों तर सूर्य आम्हां सर्वांना जाळून भस्म करील, त्यामुळे आमच्या कडून ते काम होणार नाहीं.' ह्या सर्पाच्या बोलण्यानें क अतिशय संतापली व रागावून तिनें सर्पास शाप दिला कीं,'तुमचा संहार तुमचे सावत्र भाऊ आणि अभी यांच्याकडून होईल व जनमेजय राजाच्या यज्ञांत तुम्ही सर्व भस्म व्हाल. ' तिची शापवाणी एकून सर्व सर्प अतिशय भयभीत झाले व काळ्या केसांची रूपे घेऊन ते सूर्याच्या घोड्याच्या शेपटीस झोंबून राहिले. सर्पाचें हें कृत्य पाहून कद्रूचा राग शांत झाला. नंतर कद्रू विनतेला म्हणाली की, 'आवां पांढरे पुच्छ कोठें आहे तें मला दाखव' असें बोलून ती विनतेला ओरडूं लागली. त्याचवेळीं उच्चैःश्रवा काळ्या रंगाचें पुच्छ पाहून विनता अतिशय लज्जित बनली. अशा तऱ्हेनें कदूनें तिला आपली दासी बनविली. जेव्हां हजार वर्षे पूर्ण झाली त्यावेळीं विनतेचें अंडे फुटून गरुडाचा जन्म झाला.
गरुड आपल्या आईचे ( विनतेचें ) दर्शनासाठीं सर्पाच्या घरी पोचला. तेथे आपल्या आईचे होत असलेले हाल पाहून गरुडाला अतिशय वाईट वाटलें. त्याच प्रमाण सर्व सर्प गरुडाला दासीपुत्र म्हणून हांक मारूं लागले. त्यानंतर गरुडानें आईचें दर्शन घेतलें व तो पुढे म्हणाला कीं, 'माते ! तुझी या हालांतून सुटका करण्यासाठीं मी वाटेल तें करण्यास तयार आहे.' तेव्हां विनतेनें कद्रूस विचारलें, 'मी तुला काय दिलें म्हणजे तूं माझी या दास्यापावन सुटका करशील ?" तेव्हां कद्रूस म्हणाली की, 'मला आणि सर्व सर्पाना जर तूं अमृत आणून दिलेंस तरच तुझी या दास्यांतून मी सुटका करीन.' कद्रूचा हा विचार विनतेनें गरुडास कळविला.
गरुडाने मोठ्या हिंमतीने देवांजवळ असलेलें अमृत आणण्याचे कबूल केलें व तो तेथून निघाला. प्रवास करतांना गरुडाला रस्त्यांत भूक लागली. म्हणून त्यानें समुद्रांतील मासे खाल्ले. त्या माशामध्यें एक ब्राह्मण होता. ब्राह्मण हा श्रेष्ठ वर्णाचा असतो म्हणून गरुडानें त्या ब्राह्मणास ओकून बाहेर टाकला.
समुद्रांचील मासे खाऊनसुद्धां पोट भरलें नाहीं म्हणून गरुड कश्यपाजवळ जाऊन त्याला 'माझें पोट कशानें भरेल ? ' असें विचारू लागला. तेव्हां कश्यपानें त्यास उत्तर दिलें कीं, ' देवलोकी एक अमृताचे सरोवर आहे. त्या सरोवरांत कासव आणि हत्ती यांची भांडणें चालली आहेत. त्या दोघांना तूं खा. कासव आणि हत्ती हे पूर्वी विभावसु आणि सुप्रतीत असे दोघे भाऊ भाऊ होते. परंतु संपत्तीमुळे त्यांनी एकमेकांना शाप दिले. त्याच्यानंतर जरी ते दोघे भाऊ कासव आणि हत्ती झाले तरी अद्यापहि ते दोघे भांडतच आहेत. त्यानंतर गरुड सरोवराकडे गेला व त्यानें त्या दोषांस ठार मारलें व आपल्या पायांच्या नखांनी त्यांची प्रेतें धरून तो आकाशांतून जाऊं लागला.
पुढे एका जांभळीच्या झाडाची फांदी जी शंभर योजने लांब होती तिच्यावर तो जाऊन बसला. परंतु गरुडाच्या भाराने ती फांदी मोडली. त्याच फांदीच्या पानांवर साठ हजार बालखिल्य ऋषि बसले होते. फांदी मोडल्यावर ती जमिनीवर पडून सर्व ऋषि मरतील ह्या धास्तीनें गरुडानें ती फांदी आपल्या चोंचीत पकडली व तो आकाशांत फिरूं लागला. त्याचवेळीं कश्यपानें आपला मुलगा गरुड संकटांत सांपडला आहे, असें पाहून वालखिल्य ऋषींना फांदीवरून खाली उतरण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हां ते ऋषी फांदीवरून खाली उतरले व हिमालयावर जाऊन तप करूं लागले. पुढे गरुडानें त्या कासवास व हत्तीस खाऊन ती फांदी हिमालयावर नेऊन ठेवली. हे वालखिल्य ऋषि जरी शरीराने लहान असले तरी त्यांच्या तपामुळेच गरुडाचा जन्म झाला. ती कथा अशी:-
कश्यपनीनें एकदां यज्ञाची सुरुवात केली होती. त्याच वेळेस अंगठ्याएवढे लहान असे हे वालखिल्य ऋषि समिधा आणण्यास जात होते. तेव्हां रस्त्यांत एका गाईचे पाऊल उमटून त्यांत पाणी सांडलें होतें. त्या पाण्यांत हे सर्व ऋषि पाय घसरल्यामुळे पडले व कासावीस होऊन आपला जीव वांच विण्यासाठीं ते एकमेकांस धरूं लागले. त्यावेळीं इंद्र विमानांत बसून जात होता. हे ऋषि पडलेले पाहून त्यांना वर काढण्या साठीं तो त्यांच्याजवळ तर आला नाहींच, परंतु हंसून त्यांची कुचेष्टा करूं लागला. त्यामुळे सर्व ऋषींनीं विष्णूचा घांबा केला व विष्णूनें त्या सर्वांस बाहेर काढले. या प्रसंगी इंद्रानें आपल्याला मदत केली नाहीं तर उलट थट्टा केली, म्हणून त्या ऋषींस इंद्राचा अतिशय राग आला व दुसरा इंद्र निर्माण व्हावा म्हणून ते ऋषि तप करूं लागले. या गोष्टीमुळे इंद्र अतिशय घाबरला व तो कश्यपास शरण गेला. नंतर कश्यपानें वालखिल्य ऋषींजवळ अशी प्रार्थना केली कीं, 'तुम्ही दुसरा इंद्र निर्माण केला आहे तो आतां गरुड ( खगेंद्र) करा. गरुडाचें सामर्थ्य इंद्राहून जास्त असेल, त्याचप्रमाणे तो इंद्राचा पराभव करून प्रसिद्ध पावेल. याप्रमाणे समजूत घालुन कश्यपानें त्या वालखिल्य ऋषींचें समाधान केलें. नंतर बारा आदित्य एकत्र होऊन विनतेच्या पोटीं गरुडाचा जन्म झाला. असा हा गरुड देवाजवळून अमृत आणण्यासाठी निघाला होता.
त्याचवेळीं अंगिरा ऋषींचा पुत्र बृहस्पति यानें अमृताचें अत्यंत सावधपणें रक्षण करण्यास इंद्राला सांगितलें होतें. त्याचप्रमाणें इंद्रानें पुष्कळ उपाय योजले, परंतु त्याच्या हातून अमृताचे रक्षण झालें नाहीं. सर्व देव गरुडाशीं युद्ध करून मेटाकुटीस आले होते व त्यांच्या फौजेची धुळधाण झाली व त्यांचा पहारेकरीसुद्धा पळून गेला. कोणत्याहि शस्त्राचा मारा गरुडापुढे चालला नाहीं. शेवटीं गरुड जेथें अमृत ठेवलें होतें तेथें गेला. तेथें अमृताच्या संरक्षणासाठीं भोवती अग्नि ठेवलेला होता तो विझवन गरुडाने रुप्याच्या भांड्यांत अमृत भरून घेतलें व तो तेथून जाऊं लागला. शेवटीं गरुडाच्या मार्गात अडथळा आणण्यासाठी विष्णू तेथे आला व त्यानें गरुडास वर मागावयास सांगितले. त्यावर तूंच माझ्याजवळ वर माग असें गरुडानें गर्विष्टपणे विष्णूला उत्तर दिलें. तेव्हां ‘तूं माझें वाहन हो' असें विष्णूनें गरुडास सांगितले. विष्णूचे मागणें गरुडास कबूल करावें लागलें. नंतर तो धांवत जाऊन श्रीविष्णूच्या पाया पडला. त्या वेळेपासून गरुड विष्णूचें वाहन बनला.
मग इंद्रानें मोव्या प्रेमानें गरुडाची भेट घेतली व तो गरुडास म्हणाला कीं, तूं माझा सख्खा भाऊ आहेस. कारण तूं कश्यपाचा मुलगा आहेस. अमृत पाजून तूं सर्पांना अमर करूं नकोस. त्यावर गरुड इंद्रास म्हणाला की, 'मी अमृताचे भांडें सर्पांजवळून कांहीं अंतरावर ठेवितों, तेथून तूं तें घेऊन ये.' त्या दोघांचा असा चेत ठरल्यावर गरुड सर्पांच्या घरीं गेला आणि अमृताचे भांडे कद्रूस व सर्पास दाखवून म्हणाला की, 'मी माझ्या प्रतिज्ञे प्रमाणें अमृतकलश आणून तो या दर्भावर ठेविला आहे. तुम्ही आंघोळी करून या व अमृत प्राशन करा. पृथ्वी आणि सूर्य यांच्या साक्षीनें माझी आई तुमच्या दास्यत्वांतून मुक्त झाली' असें गरुडानें सर्पास सांगितलें, गरुडानें अमृताचे भांडें दर्भावर ठेवल्यावर सर्प गंगेत स्नानाकरितां गेले. इतक्यांत यम ज्याप्रमाणें कोणास कळू न देतां प्राण घेऊन जातों त्याप्रमाणें इंद्रानें अदृश्य रूप घेऊन दर्भावरचें अमृताचें भांडें उचलून नेलें.
इकडे गंगेतील पाण्याने आंघोळ करून सर्प परत आले आणि दर्भावर अमृतकलश ठेवलेल्या ठिकाणीं व आजुबाजूस शोध करूं लागले. परंतु अमृताचें भांडे त्यांना मिळालें नाहीं. तेव्हां गरुडाने कपट करून आम्हास फसविलें असा सर्प आक्रोश करूं लागले. शेवटीं अमृतकलश ज्या दर्भावर ठेवला होता तो दर्भ सर्प चाटू लागले. परंतु त्यामुळे त्यांच्या जिभा कापल्या जाऊन त्या दोन झाल्या. म्हणून त्यांना अतिशय दुःख झालें. त्याचवेळीं गरुडानें सत्तावीस सर्पाच्या कुळांचा खाऊन संपूर्ण नाश केला व उरलेले सर्प पाताळांत पळून गेले. मग गरुड विनतेस घेऊन आपल्या आश्रमांत आला व त्याने कश्यपाची व तिची भेट करून दिली. नंतर शेष, वासुकी या सर्पांनीं हिमालयावर जाऊन तपश्चर्या केली. तेव्हां ब्रह्मदेवानें त्यांना तप करण्याचें कारण विचारलें असतां वासुकीनें त्यास सांगितलें कीं, ह्या चांडाळ सर्पाच्यामुळे आमचा पण नाश होत आहे. त्यांनीं गरुडाशीं वैर धरल्यामुळे व सर्व सर्पजात भस्म होईल असा गरुडाच्या आईनें शाप दिला आहे, त्यामुळे प्रखर अशा तपश्चर्येच्या अनींत आम्ही स्वतःला जाळून घेत आहोत.
'सर्पाचें भाषण ऐकून ब्रह्मदेवाने त्यांना अभय दिलें व तो शेषास म्हणाला कीं, 'पृथ्वीचा भार डोक्यावर घेऊन तुम्ही पाताळांत स्वस्थ रहा व रात्रंदिवस ईश्वराचें स्मरण करीत जा म्हणजे तुम्हांला शाप बाधणार नाहीं. ' मग शेषानें मोहरीप्रमाणें पृथ्वी आपल्या मस्तकावर उचलून घेतली व दुष्टभाव टाकून तो परमेश्वराचें स्मरण करूं लागला. शेष हा सहस्र फणांचा आहे व तो परमभक्त म्हणून नारायण त्याच्यावर झोपूं लागला. पुढे त्या सर्पांमधील जे दुष्ट सर्प होते ते एकत्र झाले व त्यांनीं जनमेजयाचें सर्पसत्र अयशस्वी होण्यासाठी बोलणी सुरू केलीं. कांहीं सर्प म्हणाले की आम्ही जनमेजयाच्या प्रधानास मोहून टाकू, यज्ञ मोई, यज्ञांतील ब्राह्मणांस दंश करूं, होमाचें जें साहित्य असेल त्यांत विष घालू किंवा परिक्षितीप्रमाणे जनमेजयास देश करून मारून टाकू अशा अनेक गोष्टी बोलत असतांना सर्वांचा राजा वासुकी म्हणाला कीं, तुमच्यापैकीं जे दुष्ट असतील त्यांचा अग्नींत नाश होईल आणि जे चांगले आहेत त्यांचे रक्षण, जरत्कारूपासून जरत्कारी नामक शेषाच्या कन्येस झालेला मुलगा आस्तिकमुनि हां करील.
जनमेजयानें सर्पसत्र करण्याचें कारण असें कीं, त्याचा बाप परिक्षिती हा एकदां शिकारीस गेला असतां श्रमिक नांवाचा एक ऋषि ध्यानस्थ बसलेला त्यास दिसला. तेव्हां सहज विनोदाने परिक्षितीनें त्याच्या गळ्यांत एका मेलेल्या सापाचें वेटोळें घातलें. ही गोष्ट त्याच्या शृंगी नांवाच्या मुलास समजल्यावर त्यानें परिक्षितीस असा शाप दिला कीं, 'परिक्षिती सात दिवसांत तक्षक दंश होऊन मरेल. ' हा सर्व वृत्तांत शृंगीनें आपल्या वडिलांस सांगितला. तेव्हां त्यानें आपल्या मुलास परिक्षितीसारख्या धार्मिक राजास शाप दिल्याबद्दल दोष दिला. परंतु हा शाप खोटा ठरणार नाहीं असें समजल्यामुळे त्या ऋषीने ही गोष्ट आपल्या गौरमुख नांवाच्या शिष्याकडून राजास कळविली. ही गोष्ट परिक्षितीस समजल्यावर त्याला फार वाईट वाटलें व त्याने अनेक प्रकारें पुण्य करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे शुक महर्षींनीं त्यास त्या सात दिवसांत श्रीमद् भागवत सांगण्याचे ठरविलें. तें ऐकण्यासाठी राजानें एक अतिशय उंच असा लोखंडाचा खांब उभा केला व त्यावर एक उत्तम मंदिर बाधलें व तो तेथें भागवत श्रवण करीत बसला.
त्यावेळीं सर्पाचें विष उतरविणारे वैद्यहि आपल्याजवळ ठेवण्याची राजानें योजना केली. ही गोष्ट ऐकून कश्यप नांवाचा एक सर्प विष उतरविणारा महामांत्रिक वैद्य राजाकडे येत असतां तक्षकानें त्यास वाटेंत गांडून विचारलें कीं, 'हे ब्राह्मणा, 'आज एवढ्या घाईनें तूं कुठे जातो आहेस ?' त्यावर कश्यपानें उत्तर दिलें की, 'पांडवांच्या वंशांतील परिक्षिती राजास सर्पदंश झाला तर मी तें विष उतरवून त्याचे प्राण चांचवीन.' हे ऐकून तक्षक म्हणाला कीं, राजास देश करावयास जाणारा तक्षक मीच आहे. म्हणून तुझी मंत्रविद्या तूं मला दाखव' असे बोलून तक्षकानें तेथें एका सरोवराच्या कांठीं एक ब्राह्मण वटवृक्षावर पानें खुडीत होता, त्या वृक्षास दंश केला. त्याबरोबर तें झाड ब्राह्मणासुद्धां जळून गेलें. परंतु कश्यपानें मंतरलेलें पाणी झाडावर टाकतांच तें झाड त्या ब्राह्मणासह पूर्वीप्रमाणे जिवंत झालें. तें पाहून कश्यपास तक्षकानें शाबासकी दिली आणि शृंगी ऋषीचें शापवचन खोटें ठरू नये व आपल्या प्रतापास उणेपणा येऊ नये म्हणून तक्षक कश्यपास परत जाण्याचा आग्रह करूं लागला. परंतु कश्यप त्यास म्हणाला कीं, मी गरीब असून माझ्या हातून विष उतरविण्याचे कार्य झाले तर राजा मला पुष्कळ संपत्ति देईल, म्हणून मला हस्तिनापुरास गेलेच पाहिजे. कश्यपाचें हें बोलणे ऐकून तक्षकानें एका भुयारांतून त्यास पुष्कळ संपत्ति काढून दिली व आपण गुप्तरूपानें हस्तिनापुरास गेला.
इकडे परिक्षिती राजा भागवत ऐकत होता. सातव्या दिवशीं तें संपत आलें. राजा तो ग्रंथ एकाग्र होऊन ऐकत असल्यामुळे राजाचें पाप कमी कमी होत होतें. स्तंभाच्या भोंवती ब्राह्मण जपजप करीत होते. तें पाहून तक्षकास हंं आलें. तो मनांत म्हणाला कीं, त्यानें अनेक उपाय केले. तरी ऋषींचें शापवचन कधीं खोटें ठरणार नाहीं.' मग तक्षकानें संध्याकाळच्या सुमारास इतर सर्पांना ब्राह्मणाचें रूप देऊन राजाकडे पाठविलें राजाच्या दर्शनास जावयाचें म्हणून त्या ब्राह्मणांनी पुष्कळ फळें आणि फुलें बरोबर घेतलीं होतीं. तक्षकहि एका लहान किडीचें रूप घेऊन त्याच्या हातांत असलेल्या एका फळांत लपून बसला होता. ते कपटी ब्राह्मण वेद म्हणत तेथें पोहोंचल्यावर तपोवनाहून ब्राह्मण आल्याची बातमी प्रधानाने राजास सांगितली. तेव्हां त्यानें आनंदानें त्या ब्राह्मणांना आपल्याजवळ येऊ देण्याची आज्ञा केली. ते ब्राह्मण लोहस्तंभावरील मंदिरांत गेल्याबरोबर राजानें त्यांस नमस्कार केला. मग राजानें शुक्राचार्याची पूजा केली तेव्हां तो अंतर्धान पावला.
शुक्राचार्य गुप्त झाल्यावर त्या कपटी ब्राह्मणांनी राजास आशीर्वाद देऊन फळे व फुलें दिलीं. ती राजाने सर्वांस वाटली व आपण एक फळ हातांत घेतलें. त्याच फळांत तक्षक कीड होऊन राहिलेला होता. तें फळ खाण्याचा ब्राह्मणांनी राजास फार आग्रह केला. राजानें तें फळ फोडतांच आंतून एक लाल कीड निघाली. ती पाहतांच राजा अतिशय दचकला व आपल्या मरणाची वेळ आली आहे, असें त्यानें बोलून दाखविलें, तोंच तक्षकानें विशाल रूप धारण केलें व राजाच्या मानेला कडकडून दंश केला. तेव्हां प्रधान, ब्राह्मण वगैरे लोक तेथून पळून गेले. राजा तेथल्या तेथेंच भस्म झाला. या प्रकाराने हस्तिनापुरांत दुःखाची छाया पसरली.
ही गोष्ट परिक्षितीचा मुलगा जनमेजयास समजतांच त्याला अतिशय दुःख झालें. वस्त्रानें तोंड झांकून तो रहूं लागला. शेवटीं वाटेल ते करून तक्षकाचा प्राण घेईन व सर्पकुळाचा फडशा उडवीन, असा त्यानें निश्चय केला. तो पुढे म्हणाला कीं, 'त्या दुष्ट तक्षकानें कपट करून कश्यपास धन देऊन परतविला व माझा पिता सात दिवसांचा उपाशी असतांना त्याला पाणीसुद्धां घेऊ दिलें नाहीं, म्हणून मी सर्व सर्पांचा संहार करणार.' असे बोलून राजानें सर्पसत्र करण्याचा बेत ठरविला. मंत्र म्हटल्यावर सर्प जळून जातील अशा उत्तक रुरु इत्यादि ऋषींना राजानें बोलावणें केलें. तसेंच देशोदेशीचें ब्राह्मण आणवून मंडपांत यज्ञकुंड तयार केलें व यज्ञाची सर्व सिद्धता केली. त्या ठिकाणीं भूत, भविष्य व वर्तमान जाणणारे मोठमोठे ज्योतिषी आले होते. त्यांनी राजास सांगितलें कीं, 'तुझा यज्ञ निर्विघ्नपणे सिद्धीस जाणार नाहीं, कारण आस्तिक या नांवाचा ब्राह्मण येथे येऊन फार हट्ट करील व पूर्णाहुति होऊ देणार नाहीं.
आस्तिक ऋषि हा जरत्कारू ऋषीचा मुलगा होय. जरत्कारूनें वृद्धापकाळ होईपर्यंत लग्न केलें नव्हतें. तो एकदां फिरत फिरत अरण्यांत गेला असतां कांहीं ब्राह्मण एका विहिरीच्या खांचेत दुःखी होऊन डोके खाली करून लोंबकळत आहेत असें त्यास दिसलें. तेव्हां जरत्कारूने त्यांची चौकशी केली. त्यांनी रडत रडत त्यास सांगितलें कीं, 'आम्ही तुझे वाडवडील आहोंत, तूं वंशाचे खंडन केलेंस म्हणून आम्ही स्वर्गातून येथें आलों. म्हणून तूं आधीं स्त्री निर्माण करून वंशाची वृद्धि कर म्हणजे ब्रह्मदेव आम्हांस ब्रह्मपदीं जागा देईल.' त्यावर जरत्कारूने त्यांना असें सांगितलें कीं, माझ्याच नांवाची जर मला स्त्री मिळेल, तरच मी गृहस्थाश्रमानें वागून वंशवृद्धि करीन' असे बोलून जरत्कारू पृथ्वीपर्यटन करावयास निघाला. प्रवासांत घरोघर भिक्षा मागतांना तो म्हणे कीं ' माझ्या नांवाची जर कोणी स्त्री असेल, तर तिची भिक्षा मला घाला. मी वृद्ध असून अशक्त आहे व माझ्याकडून तिच्या अन्नवस्त्राची सोय होणार नाही. तरीपण जर तिनें माझी आज्ञा पाळली नाहीं, तर त्याचक्षणीं मी तिचा त्याग करीन.' त्याच्या ह्या भाषणाचे लोकांस मोठें नवल वाटे. तो पृथ्वी व स्वर्ग या ठिकाणी फिरला, पण तो तामसी आहे असें समजून त्यास कोणीहि उत्तर देत नसे.
शेवटी तो पाताळ लोकांत गेला व माझ्या नांवाच्या स्त्रीची मला कोणीतरी भिक्षा घाला, अशी त्यानें तेथे मोठ्यानें हांक 'मारली. ही गोष्ट सर्वांनीं वासुकीस सांगितली. तेव्हां त्यानें पुढील भविष्य जाणून, आपली धाकटी बहीण जरत्कारी ही त्याला देण्याचा बेत केला व तिला दागदागिने घालून सजविली. मग वासुकी तिला स्वीकारण्याची जरत्कारूस प्रार्थना करूं लागला. तेव्हां जरत्कारू म्हणाला कीं, 'ही तुमची मुलगी श्रीमंताची आहे. उर्वशी, रंभा हिच्या दासी शोभतील, अशी ही रूपवान आहे व अलंकारांनी पूर्ण भरलेली आहे. परंतु हिचें लग्न जर माझ्याबरोबर होणार असेल तर हिने नम्रपणे बोलण्याचे व मर्यादेनें रहाण्याचें कबूल केलें पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे वागण्यांत हिच्या कडून जर चूक झाली तर मी तिचा त्याग करून निघून जाईन.' याप्रमाणं जरत्कारूचें म्हणणे ऐकून वासुकी म्हणाला कीं, 'माझी बहीण समंजस असून ती फार चतुर आहे. पतीच्या मर्जीबाहेर ती कधीं वागायची नाहीं. दागदागिने, अन्नवस्त्र हैं सर्व मी देईन, कांहीं कमी पडूं देणार नाहीं. आपण निःसंशय हिचा स्वीकार करावा.
याप्रमाणें वासुकीचें भाषण ऐकल्यावर जरत्कारीचें लग्न विधीप्रमाणे जरत्कारुबरोबर लागलें. बारा दिवस लग्नसोहळा झाल्यानंतर तो खीस घेऊन आपल्या आश्रमांत गेला. त्यावेळीं वासुकीनें त्यास पुष्कळ संपत्ति दिली. त्यास एक सुवर्ण मंदिर बांधून दिलें व सेवेकरितां सर्प दिले. याप्रमाणें जरत्कारीच्या हातून रोजचीं नैमित्तिक कार्ये होऊ लागली. अन्नशांति होऊं लागली. पतीच्या आज्ञेप्रमाणें जरत्कारी अतिथींची पूजा व दानधर्म करी. ह्याप्रमाणे कित्येक दिवस लोटल्यानंतर जरत्कारी गरोदर राहिली. पण आपल्या उदरा मध्यें गर्भ राहिला आहे हें तिला समजलें नाहीं. एके दिवशीं नित्यकर्म आटोपल्यानंतर जरत्कारु आपल्या स्त्रीच्या मांडीवर डोके ठेवून निजला होता. कांहीं वेळानें संध्याकाळ होऊन सूर्य अस्तास चालला, तें पाहून तिच्या मनांत विचार आला कीं, पतीची संध्या, होम वगैरे कर्मे करण्याची वेळ टळली तर पति रागावेल व त्यास जागे केलें तर त्याची झोप मोडल्या बद्दल त्याला राग येईल. शेवटीं नैमित्तिक कर्म चुकण्यापेक्षां निद्राभंग हा सौम्य अन्याय होईल, असें जाणून ती पाय चेपीत असतां ऋषीला म्हणाली कीं, सूर्यास्त झाला आहे. त्यास अर्ध्य देऊन मग अंथरुणावर निजावें.
हे ऐकतांच जरत्कारु चरफडत रागाने उठला व तिला म्हणाला कीं, 'तूं नाजूक आहेस व तुझ्या मांडीवर भार झाला म्हणून मला उठविलेंस काय मी म्हातारा नवरा म्हणून तूं माझी गर्वानें अवहेलना करतेस ? अग माझें अर्ध्य घेतल्यावांचून सूर्य अस्तास जाईल कसा ? मी उठलों नाहीं तर सूर्य मावळतो कसा, हा चमत्कार तरी तूं क्षणभर थांबून पहावयाचा होतास.' याप्रमाणें त्यानें तिला बराच दोष दिला व पुढे आपल्या भावाकडे जाऊन राहा, असे सांगून, तो तिचा त्याग करून निघून गेला. ती त्याच्या पाठोपाठ गेली व पाय धरून न जाण्यविषयीं विनंती करूं लागली. तो ऐकेना. शेवटीं कुळाचा उद्धार होण्यासाठीं व सूर्यकुळाचें रक्षण होण्यासाठी तिनें पुत्रदान मागितलें. तेव्हां वसिष्ठ, वामदेव, शुक यांच्यासारखा महासमर्थ अशा आस्तिक नांवाचा पुत्र तुझ्या उदरांत आहे, असे सांगून तिला शांत करून जरत्कारु तेथेंच गुप्त झाला.
त्यावेळी पतीच्या वियोगामुळे जरत्कारी बेशुद्ध पडली. तिला सर्वांनी सावध करून घरीं नेलें. तेव्हां वासुकीनें तिला असें विचारलें कीं, ' आपल्या रक्षणाची काय व्यवस्था होणार आहे ?' त्यावर तुमचा रक्षक माझ्या उदरांत आहे असे तिनें सांगितलें. त्यामुळे सर्व सर्पांस आनंद झाला. पुढे नऊ महिने पूर्ण होतांच जरत्कारी प्रभूत होऊन तिला पुत्र झाला. पुढे त्याचें नांव आस्तिक असें ठेवण्यांत आलें. त्याचें जातकर्म, मुंज वगैरे सर्व संस्कार वासुकीनें केले व तो मोठा झाल्यावर त्यास च्यनभार्गवानें विद्या शिकविली.
अध्याय दुसरा समाप्त 👍
।। कृष्णार्पणमस्तू ।।

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.