॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥
अध्याय १२
विदुर ब्राम्हणाची कथा
भाग :-१
हे शिवनामस्मरण कोणी करावे. तसेच, शिवकीर्तन कोणी करावे या बाबत कसलाही भेदाभेद मानत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थाश्रमी, स्त्री, मुले, तरुण, वृद्ध सर्वांनी शिवकीर्तन करावे. ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो शूद्राहून अतिशूद्र समजावा. त्याने आपल्या अंगावर अलंकार घातले तर प्रेत शृंगारले आहे असे समजावे. पशू ज्याप्रमाणे गवत खाऊन जगतात तसा हासुद्धा अन्न खाऊन पशूसारखा जगतो आहे असे समजावे. म्हणजे असा माणूस शेपूट नसलेला पशूच होय. त्याचे डोळे, कान, हात, पाय सारे केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे निरुपयोगी आहेत असे मानावे. त्याला जन्म देऊनही त्याची आई अगदी निपुत्रिकच राहिली आहे असे समजावे. मातेने दिलेल्या जन्माचे सार्थक करायचे असेल तर शिवभजनी मन रमवावे.
शिवभजन केल्याने संकटातून सुटका होते. शिवभक्तांना अग्नी, पाणी ह्यापासून भय नसते. जो शिवाचे भजन करीत नाही तो समुद्रात जाऊन बुडो, अग्नीत पडून जळून जावो किंवा त्याला जहाल असा विषारी नाग चावो.शिवभजनाबद्दल मनात नेहमी आसक्ती ठेवावी. ज्याप्रमाणे मुंगळा अर्धा तुटला तरी गुळापासून मुळीच दूर होत नाही, बरेच दिवस बेपत्ता असलेल्या आपल्या एकुलत्या एक पुत्राबद्दलची शुभ वार्ता ऐकायला त्याचे आईवडील जसे अत्यंत आतुरतेने व शीघ्रतेने धाव घेतात तशी धाव घेऊन, हातातली इतर सर्व कामे बाजूला सोडून देऊन पटकन शिवभजन ऐकायला जावे.
दूर देशी गेलेल्या आपल्या पतीचे पत्र खूप दिवसांनी आलेले पाहून ते वाचायला पत्नी जशी आपल्या मनात अत्यंत आतुर होईल, अत्यंत दरिद्री माणसाला धनाचा हंडा समोर दिसताच तो जसा धावून जाईल, जन्मांध असलेल्या माणसाला डोळे आले तर त्याला जसा आनंद होईल, तहानेने मरणोन्मुख झालेल्याला अचानक अगदी थंडगार पाणी मिळाल्यानंतर जसा आनंद होईल तसा आनंद मिळवण्यासाठी असलेली हातातील सारी कामे दूर सारून, चिंता आणि झोप यांना बाजूला सारून शिवभजन जेथे असेल तेथे ऐकायला जावे.
वक्ता स्वतः पंडित आणि अतिशय चतुर असावा. गुरु म्हणून त्याला नम्रपणे नमस्कार करावा. कामधेनूच्या आचळातून ज्याप्रमाणे अमृताच्या धारा वाहतात त्याप्रमाणे वक्ता शिवचरित्राचे आपल्या मधुरवाणीने रसाळ वर्णन करीत असताना आपल्या कानाद्वारे ते अमृत प्राशन करावे. वक्त्यावर ऐकणाराचा पूर्ण विश्वास असावा. वक्त्याशी वा अन्य कोणाशी उगाच वादविवाद करू नये. मानत काही शंका असतील तर त्या वक्त्याला विचाराव्यात आणि आपले निरसन करून घ्यावे. वक्ता सांगेल ते शांत चित्ताने ऐकावे. वक्त्याला नाना प्रश्न किंवा नाना शंका उगाच विचारून छळणारे पिशाच्च योनीत जातात. गर्वाने धुंद होऊन कधीही कथा अर्ध्यावर टाकून निघून जाऊ नये. तसे करणारा जीवनात अल्पायुषी होतो आणि त्याच्यावर एकामागे एक अशी संकटे येतात.
सभेत शिरल्यानंतर वक्त्याखेरीज उगाच दुसऱ्याला नमस्कार करू नये. पापी, लबाड, धूर्त असा मुख्य श्रोता असू नये. तो तसा नाही याची खात्री पटवून घ्वावी. दूध हे जरी उत्तम आणि पूर्ण अन्न असले तरी नवज्वरात ते घेणे म्हणजे विष घेतल्यासारखे अत्यंत वाईट आहे; त्याप्रमाणे कथामृत श्रवण करून मग नास्तिकपणे त्यावर टीका करणे हे अतिशयच वाईट आहे. त्याचे ऐकण्याचे सर्व श्रम फुकट गेले. कथा ऐकताना आपण कधीही दुसऱ्या कुणाबरोबर गप्पा मारू नयेत. संपूर्णपणे एकाग्र चित्ताने संपूर्ण कथा ऐकावी तरच कथा ऐकल्याचे फळ ऐकणारास मिळेल. वस्त्रे, अलंकार, दक्षिणा देऊन पुराणिकाला संतुष्ट करावे. त्याला आपण धन दिले तर आपल्यालासुद्धा नंतर अपार धन मिळते. पुराणिकाला आपण जर रत्नाचे दान केले तर प्रतिष्ठा वाढते. पुराणिकाची षोडशोपचा मनोभावे पूजा केली, की शंकर प्रसन्न होतो. ज्या पदार्थाचे दान करावे तो पदार्थ मोठ्या स्वरूपात देणाऱ्याला परत मिळतो. कथा ऐकायला येताच आतापर्यंत झालेली पाये नष्ट होऊ लागतात, इतके दिवस असलेले दारिद्र्य जाते आणि शेवटी श्रोता शिवपदास जातो. आपल्या मस्तकावर टोपी, फेटा, पगडी वगैरे शिरस्त्राण घालून कीर्तन ऐकायला कधीच बसू नये. डोक्यावरील फेटा काढून 'ठेवणे जर शक्य नसेल तर मुख्य पदर तरी सोडून ठेवावा. तोंडात पानाचा विडा खाता खाता कीर्तन ऐकू नये. तसे केले तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर यम फार छळतो असे व्यासमुनींनीच सांगितले आहे. कीर्तन ऐकताना अतिशय स्वस्थ बसावे. शिवलीला ऐकताना आपले हृदय समाधानाने काठोकाठ भरून आनंदाश्रू वाहू लागावेत. कथेत अजिबात झोपू नये किंवा पेंगू नये. खरे तर एकांतात आपले द्रव्य मोजताना माणसाला कितीही जागरण घडले तरी त्याचे डोळे मिटत नाहीत; पण त्याला कथा ऐकताना मात्र झोप येते! जर झोप येऊ लागली तर उभे रहावे आणि झोप येणार नाही असे उपाय करावेत आणि पूर्णपणे जागे राहूनच कथा मन लावून श्रवण करावी.
पुराणिकाहर उच्चासनावर ऐकणाराने स्वतः बसू नये. जे बसतात 'जेठा मारुन बसतात जन्मी कावळे होतात. जे आपले दोन्ही पाय पसरून बसतात त्यांना यम काठ्यांनी बेदम मारतो. जे मुद्दाम त्यांना यमदूत निश्चितच नरकात टाकतात. जो कथेत झोपतो त्याला पुढच्या जन्मी अजगराचा जन्म येतो. कथेत इतर इकडची तिकडची गोष्ट बोलणारा बेडकाच्या जन्माला जातो. जो त्यावेळी आनंदाने टाळ्या वाजवत नाही त्याला संसारात खूप दुःख भोगावे लागते. जे शिवकीर्तनाची जाणूनबुजून हेळसांड करतात ते मृत्यूनंतर कुत्र्याच्या जन्माला जातात आणि कथा सांगणाऱ्या पुराणिकाला दुरुत्तरे करतात त्यांना सरड्याचा जन्म येतो. जे कथा लक्षपूर्वक ऐकत नाहीत त्याला घाणीत वावरणाऱ्या डुकराचा जन्म येतो. जे रागाने अगर द्वेषाने शिवचरित्र तोडून फाडून टाकतात त्यांना लांडग्याचा जन्म येतो. पुराणिकाला आसन दिले, की देणाऱ्यावर शंकर प्रसन्न होतात व तो शिवाच्या अगदी जवळ जातो. पुराणिकाला उत्तम प्रकारचे अन्नवस्त्र दिले, की ते शंकराला पावते. कथा ऐकून भक्ती आणि वैराग्य मनात ठसते असो. फार फार वर्षांपूर्वी दक्षिण देशात अमंगळ नावाचे एक गाव होते. गाव नावाप्रमाणे अतिशयच घाणेरडे होते. तेथे राहणारे धर्माचे पालन करीत नसत. सर्व स्त्रीपुरुष वाटेल तेजारकर्म करण्यात पटाईत होते. नीती अजिबात शिल्लक राहिली नव्हतीच. वेदशास्त्र, जपतप तेथे अस्तित्वातही नव्हते. नव्हे तर या लोकांना ऐकूनही माहिती नव्हते. खरं म्हटल तर वेद आणि शास्त्र हे खरे तर ब्राह्मणाचे दोन डोळे आहेत. यांपैकी एक येत नसेल तरी त्याला एकाक्ष म्हणायला हवे. मग या नगरीतील ब्राह्मणाला दोनपैकी दोन्हीही येत नव्हते. म्हणजे ते आंधळेच होते. त्या नगरात चहाडखोर, दारुडे, दुराचारी, मातापित्यांना छळणारे असे लोक फार मोठ्या संख्येने रहात असत.
त्या गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण रहात होता. आता आपण त्याची गोष्ट पाहूया. तो नेहमी विषयवासनेत बुडालेला असे. तो सतत वेश्येच्या घरी पडलेला असे. त्याची बायको दिसण्यास खूप रूपवान होती. अशा या ब्राह्मणाच्या बायकोचे नाव होते बहुला. तीही वाईट चालीची होती. तीसुद्धा जारकर्म करीत असे. एकदा जाराबरोबर एकांत करीत असताना पतीने तिला पकडले. जार कसाबसा निसटून पळून गेला. बहुलेला विदुर ब्राह्मणाने खूप मारले. तिची निर्भर्त्सना केली तेव्हा ती म्हणाली, 'तूसुद्धा नेहमी वेश्येकडे पडलेला असतोस ! मग मी काय करावे? तू जे रोज करतोस तेच मी आज केले आहे. ' तिचे हे उत्तर ऐकून अधिकच चिडून जाऊन तिला लाथांनी मारत विदुर ब्राह्मण म्हणाला, तू " जारकर्म करून जो पैसा मिळवला आहेस ना, आण तो सर्व माझ्याकडे. '
तिने काही केल्या त्याच्याकडे पैसे दिले नाहीत. म्हणून विदुर ब्राह्मणाने तिचे सर्व अलंकार काढून हिसकावून घेतले. घरातला सारा पैसा घेतला आणि आपण रोज जिच्याकडे जायचा त्या वेश्येला नेऊन दिला. अशा तऱ्हेने दोघेही सारखे व रोजच पापाचरण करीत असत. पुढे कालांतराने तो ब्राह्मण मरण पावला. यमदूतांनी त्याला नेताना व वर गेल्यावरसुद्धा फार छळले. आयुष्यात पापे करणारात यमलोकातच जावे लागते व तेथे आपल्या पापकर्माची फ त्यांना भोगावीच लागतात. म्हणून तेथे यमदूत अशा लोकांचा छळ करतात. मग त्याला त्यांनी भयानक अशा कुंभीपाकान टाकले. त्यानंतर विंध्याचल पर्वताच्या दऱ्याखोऱ्यांतून पिशाच्या रूपाने तो भटकू लागला. नेहमी भयंकर भूक आणि तहानेने तो अतिशय व्याकुळ झालेला असे. शरीराला भयंकर जखमा झालेल्या असत. कुष्टरोगाने त्याचे सर्व शरीर सडले होते. कधी कधी वृक्षाला उलटे टांगून घ्यावे, उगाच हाका मारत रानावनात इकडे तिकडे हिंडावे, काट्यांनी भरलेल्या रानात कसलीच फले मिळू नयेत, अशा तऱ्हेने आपल्या पापाचे भोग तो ब्राह्मण भोगत होता.
इकडे पतीच्या निधनानंतर बहुलेला एक मुलगा झाला; पण तो कुणापासून झाला हे काही तिला सांगता आले नसते. असेच दिवस गेले. एकदा शिवरात्रीला यात्रेकरूंचा मेळा गोकर्णक्षेत्राला चालला होता. बहुला आपल्या पुत्रासह त्या यात्रेत सामील झाली. तेथे आलेल्या अनेक पुण्यवंत ऋषींचे दर्शन घेऊन सर्वजण पवित्र झाले. बहुलेनेही सर्वांबरोबर स्नान केले आणि गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेतले. मग ती पवित्र मनाने पुराण ऐकायला जाऊन बसली. पुराणिकबुवा सांगत होते "जारिणी स्त्रीला यमदूत मुळीच क्षमा करीत नाहीत. लोखंडाची जाड जळई तापवून लालबुंद करून तिच्या योनीमार्गात घालतात. बहुला हे निरूपण ऐकून अत्यंत बैचेन झाली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. पुराण संपल्यावर तिने पुराणिकाला नम्रपणे नमस्कार करून आपली हकीकत कोणताही आडपडदा न ठेवता सांगितली आणि त्याला म्हणाली, गुरुवर्य, माझे हातून असलेच फार पाप झाले आहे. आता यमदूत मला फार फार छळतील. मला त्यांच्यापासून कोण सोडवील ? स्वामी, भीतीने मी थरथर कापते आहे. आता मी काय करू ? मी अत्यंत पापिणी आहे. मी चांडाळीण आहे. मी जारकर्म केले आहे आणि म्हणून मला भय वाटते आहे.
आता कधीही यमदूत मला पकडून नेतील नरककुंडात टाकतील, तापलेल्य भूमीवरून चालायला लावतील, तीक्ष्ण शस्त्राने टोचतील, तप्त सुळावर चढवतील, मिरच्यांची धुरी देतील आणि किती तरी प्रकारांनी तेथे माझा छळ करण्यात येईल. माझे हालहाल करण्यात येतील. महानरकात घालतील, तेथून मला कोण सोडवील? त्यातून सुटण्याचा काही उपाय असेल तर कृपया सांगा. त्या दिवसापासून बहुलेला अन्नपाणी गोड लागेना. शेवटी ती त्या ब्राह्मणाला शरण गेली आणि त्याला म्हणाली, मी आपणाला शरण आले आहे, तेव्हा कृपा करून माझ्यावर दया करा. मग त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षरी मंत्र सांगितला. देवालयात आपल्यासमोर बसवून 'शिवलीलामृत' ऐकवले. तिनेही अत्यंत मनोभावे व अत्यंत आदराने ती सर्व कथा ऐकली.
श्रवणभक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. बहुलेने श्रवणभक्ती केली आणि बहुलेची पापे सत्संगतीने लगेचच पटापट नष्ट होऊ लागली. ती आता सदोदित शिवनामाचा जप अगदी मनापासून करू लागली. त्यामुळे तिचे सर्व दोष एकापाठोपाठ एक याप्रमाणे नष्ट होऊन ती पवित्र झाली. ज्याप्रमाणे तव्याचा गंज घासून काढला, आरशासारखा स्वच्छ होतो, परिसाला सान्निध्यात येऊन लोखर लागले, की त्याचे संपूर्णपणे सोने होते, वाळलेले लाकूड अमीन पडले, की तेसुद्धा पूर्णपणे अग्निरूप होते, पवित्र अशा गंगेला छोटासा ओहोळ मिळाला, की तो गंगारूप होऊन जातो, आणि मग त्याचे पाणीही गंगाजळ बनते, त्याचप्रमाणे बहुलासुद्धा तिची सर्व पापे शिवकृपेने नाहीशी होऊन पूर्णपणे शुद्ध झाली.
रोज नित्यनेमाने केलेल्या शिवकथा-श्रवणाने बहुला निर्दोष बनली. ती स्वतःच आपल्या सुखाने रात्रंदिवस शिवकीर्तने गाऊ लागली. 'शिवलीलामृता'च्या श्रवणाने सर्व पावन होतात, याच जन्मी त्यांना पूर्णपणे मुक्ती लाभते. तीर्थाटन केल्याचे पुण्य फक्त शिवकीर्तन श्रवण केले, की मिळते. योग, याग, व्रत, साधन हे काहीही न करता केवळ श्रवणाने नवविद्या भक्ती केल्याने पुण्य मिळते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारी वर्णांच्या आणि ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम या चारही आश्रामातल्या सर्व लोकांनी शिवकथामृत नित्यनेमाने, मनोभावे व भक्तीने ऐकून पावन व्हावे. बहुलासुद्धा आता पार बदलून गेली होती. आता तिला संतांचा सहवास आवडू लागला. ती आता आपल्या तोंडाने कोणाची निंदा न करता फक्त आपल्या गुरूची मनोभावे सेवा करीत असे.
गोकर्ण क्षेत्रात राहून तीर्थात नेहमी स्नान करीत असे. सर्वांगाला भस्म फासून रुद्राक्ष गळ्यात घालीत असे, त्यामुळे बहुला अत्यंत पवित्र झाली. शंकराने तिला शिवलोकात घेऊन येण्यासाठी दिव्य विमान पाठवले आणि तिचा उद्धार करून आपल्या पायांशी तिला कायमची जागा दिली. बहुलेसारखा एवढ्या पापिणीचा उद्धार भगवान शंकरांनी केला. ते पाहून सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले होते. शंकराच्या पायांपाशी गेल्यानंतर बहुलेने शंकरपार्वतीची स्तुती केली. तेव्हा अंबा बहुलेला म्हणाली, "मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तेव्हा आता तू तुझ्यासाठी हवे ते माग. मी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करीन. 'देवी, माझा पतीही पापी होता. त्याला आता कोणती गती प्राप्त झाली आहे, हे मला ठाऊक नाही. माते, त्याला क्षमा कर, त्याच्यावर कृपा कर आणि त्याला पावन करून येथे आण. 'बहुला पतीच्या आठवणीने अतिशयन गहिवरून म्हणाली.
'बहुले, तू खरोखरीच धन्य आहेस. आपल्याबरोबर आपल्या पापी पतीच्या उद्धाराची तुझी तळमळ पाहून मला आनंद वाटला. आता खरोखरच तुझ्या पतीची भेट घडवावी असे मलाही वाटते आहे. " असे म्हणून पार्वतीने सांगितले, "बहुले, तुझा पती आता पिशाच्च होऊन विंध्याचल पर्वतावर भटकत आहे. तू तुंबराला आपल्याबरोबर घेऊन त्या पर्वतीवर जा. त्याला शिवकथा ऐकव म्हणजे तो पावन होईन. पार्वतीचे बोलणे ऐकताच बहुलेला अपार आनंद झाला. तुंबराला आपल्याबरोबर येऊन ती विंध्याचल पर्वतावर आली. तेथे विदुर ब्राह्मण पिशाच्च रूपाने वेड्यासारखा दऱ्याखोऱ्यातून इकडे तिकडे फिरत होता. तुंबराने आपली सर्व शक्ती खर्चून त्याला पकडले आणि तेथे त्याला एका झाडाला वेलींनी गच्च बांधून टाकले.
मग तुंबराने तेथे त्याच्यासमोर शिवकीर्तन सुरू केले. ते ऐकताना भोवतालचे पशुपक्षीसुद्धा उद्धरले. विदुर ब्राह्मणही ते कीर्तन ऐकून सावध झाला. त्याच्यातील पिशाच्च वृत्ती नाहीशी झाली. तो शुद्धीवर आला. आपल्याला बांधले आहे ते सोडावे अशी त्याने तुंबराला विनंती केली. तुंबराने त्याला सोडले. त्याच्या वृत्तीत आता बदल झाला होता. त्यामुळे त्याला झाडापासून सोडताच विदुराने तुंबराचे पाय धरले. आपली स्त्री बहुला हिला त्याने पाहिले. गहिवरून तो म्हणाला, "बहुले, तू धन्य आहेस. माझ्यासारख्या पापी माणसाचा केवळ तुझ्यामुळे या तुंबरांनी उद्धार केला आहे. आता तुलाच मी शरण आलो आहे.
मग तेथेच तुंबराने विदुराला पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. विदुर ब्राह्मण लगेचच त्या मंत्राचा जप करू लागला. त्याबरोबर वरून शिवलोकातून दिव्य विमान आले. बहुलेसह दिव्यरूप पावलेला विदुर ब्राह्मण त्या विमानात बसला. मग दोघांनी महादेवाला नमस्कार केला. मीठ जसे पाण्यात विरघळून जाते तसे दोघेजण शिवस्वरूपात पूर्णपणे विलीन झाले. गार जशी पाण्यात विरघळते, आकाशात निर्माण झालेला किंवा गेलेला आवाज जसा वातावरणात विरून जातो किंवा कापरात जशी ज्योत मिळून जाते, गंगा जशी एकरूप होते त्याप्रमाणे बहुला आणि विदुर शिवस्वरूपात विलीन झाले.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.