॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥
अध्याय:- १२
विदुर ब्राम्हणाची कथा
भाग :-२
अशा प्रकारे या लोकी कित्येक पाप्यातल्या पापी लोकांपैकी शिवमंत्र घेऊन, शिवकथास्मरण करून, कित्येक जीव पापी जीवनातून उद्धरून गेले आहेत. भस्मातून निघालेल्या भस्मासुराचा शिवमंत्रामुळे कसा उद्धार केला ते आता मी तुम्हांला सांगतो. श्रोत्यांनी आपले मन शांत ठेवून ही भस्मासुराची कथा आता ऐकावी. असेच एकदा प्रदोषाचे दिवशी कैलासनाथ कैलास पर्वतावर बसले होते. आपल्या हातात भस्म घेऊन शंकर ते स्वतःच्या सर्वांगाला लावीत होते. भस्म लावीत असता त्या भस्मात त्यांना एक खडा सापडला. तो एका हाताने उचलून शंकरांनी जमिनीवर ठेवला. तसे शिवाचे चरित्र अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहेच. त्याप्रमाणे त्या खड्यातून एक भला मोठा राक्षस निर्माण झाला. शंकरांनी त्याचे नाव 'भस्मासुर' असे ठेवले. शंकरासमोर तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, देवा, आपण मला निर्माण केले. आता मी आपला सेवक आहे. तेव्हा देवा, मलाही आपली काहीतरी सेवा सांगा. "
तेव्हा शंकर त्याला म्हणाले, "हे भस्मासुरा, तू ज्या भस्मातून निर्माण झालास ते भस्म अंगाला लावण्यासाठी रोज मला आणून दे. रोज मला नवीन चिताभस्म आणून देत जा. शंकराची आज्ञा होताच. भस्मासुराला फार आनंद झाला. सर्व पृथ्वीवर फिरून शिवभक्त कुणी मेला असेल तर त्याचे रोज नवे भस्म तो घेऊन येई आणि शंकराला अर्पण करीत असे. तसेच, परमभक्तांच्या मस्तकांची माळ करून शंकराच्या गळ्यात घालीत असे. नेहमी स्मशानात पूर्ण वैराग्य नांदत असल्याने शंकर स्मशानात वस्ती करणे पसंत करीत असत. सर्वसामान्यपणे स्मशानात असेपर्यंत लोक विरक्त असतात, एकदा का घरी आले, की पुन्हा पहिल्याप्रमाणेच विषयसुखात दंग होतात. शरीरातील वास्तव्य करीत असलेली पंचमहाभूते आणि पिंडब्रह्मांड जाळून त्यापासून जे स्वात्ममुख उरत असे ते भस्म शंकरांना अतिशय आवडत असे. माणसाचे षड्विकार हे नाशवंत आहेत; पण कोठल्याही प्रकारचा विकाररहित असा शिव परब्रह्म हा अत्यंत निश्चित शाश्वत आहे, चिरकाल टिकणारा आहे. त्रिकालातील व्यापून राहिलेला आहे. यश, संपत्ती, कीर्ती, ज्ञान, औदार्य, वैराग्य हे सर्व एका ठिकाणी नांदत नाहीत; परंतु शंकराचे ठिकाणी मात्र ती सर्व एकत्र नांदत होती.
कर्तृत्त्व, नियंतृत्त्व, भक्तृत्त्व, विभुत्त्व, साक्षित्त्व व सर्वज्ञत्त्व ह्या सहा चिन्हांनी युक्त असलेले भगवान शंकर म्हणजे खरोखरीच परिपूर्ण असा ब्रह्मानंद होता. अशा शंकरांसाठी भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासुर गर्वाने अतिशय उन्मत्त झाला. आणि त्याच्या मनात आसुरी विचार थैमान घालू लागले. गाई आणि ब्राह्मण पाहिले, की त्यांना भरून टाकावे असे त्याला वाटे. या सर्वांना मारून येथे राक्षसांचे राज्य निर्माण करावे, ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनाही अन्य राक्षसांच्या मदतीने आपण जिंकून घ्यावे आणि त्यांचा संपूर्णपणे नाश करावा. अशा तऱ्हेने त्रिभुवन जिंकून इंद्राचेऐवजी या त्रिभुवनावर स्वतःच राज्य करावे, त्यासाठी शंकरांना फसवले पाहिजे.
असा कपटी विचार आपल्या मनात ठेवून भस्मासुर एके दिवशी शंकराजवळ गेला आणि म्हणाला, "भोलानाथ, आज मी सर्व पृथ्वी हिंडलो. सारी गावे, राने, जंगले आणि स्मशाने धुंडाळली, अगदी पृथ्वीचा कानाकोपरा पालथा घातला; पण मला आज शुद्ध भस्म कोठेही मिळाले नाही. माझा तर आतापर्यंतचा नेम आहे, की तुम्हांला रोज नवीन चिताभस्म आणून द्यायचे. तेव्हा या नेमात खंड पडू नये यासाठी पार्वतीनाथा, आपण मला मी ज्याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म होईल असा वर द्यावा.
कपटी भस्मासुराने नाटकी नम्रपणे शंकराला लोटांगण घातले. निष्कपटी भोळा शंकर त्याच्या या नाटकाला फसला आणि लगेच वर द्यायला सिद्ध झाला. पार्वती मातेने अत्यंत त्वरेने शंकराचा हात धरला आणि म्हटले, “देवा, जर त्याला हा वर दिलात तर हा राक्षस सर्व पृथ्वी भस्म करील. आधीच बोंबा, मारायची हौस त्यात फाल्गुनमास आला असे होईल. नक्की माहीत असलेल्या वाटचोरी करणारास राजानेच निरोप देऊन पाठवावे, किंवा एखाद्या कामांध पुरुषास स्त्रीराज्यात मुख्य म्हणून नेमावे, दारू पिणाऱ्या व्यक्तीला अख्खे शिंदीचे वन दाखवावे तसा हा वर याला दिलात तर होईल. एखाद्या भूतबाधा झालेल्या माणसाला जहाल विंचू चावला, की तो जसा थयथयाट करून नाचेल तसा हा भस्मासुर सगळीकडे मग नंगानाच करील, तेव्हा तुम्ही याला काही हा वर देऊ नका.
कार्तिकस्वामी, गणपती, वीरभद्र आणि नंदिकेश्वर सर्वांनी शंकरांना हेच सांगितले; पण शंकरांना हे पटले नाही. त्या सर्वांचे म्हणजे डावलून त्यांनी भस्मासुराला त्याने मागितलेला वर दिला. वर मिळताच भस्मासुर अतिशय आनंदाने थयथया नाचू लागला. त्याला झालेला आनंद त्रिभुवनात मावेना. लगेच तो मृत्युलोकात आला आणि संत, भक्त, गाई आणि ब्राह्मण यांना शोधून शोधून काढून त्यांचे भस्म करू लागला. सर्व अतिशय तपस्वी आणि विद्वान अशा ऋषींचे त्याने भस्म केले. छपन्न देशांचे राजे शोधून त्यांचेसुद्धा भस्म केले. सगळीकडे अनर्थ माजला. विद्वान ब्राह्मण आपल्या सर्व कुटुंबियांसह भीतीने गुहेत लपून बसले. बहिरी ससाणा पक्षी ज्याप्रमाणे आकाशातून झेप येऊन आपले भक्ष्य अचूकपणे पकडतो तसा भस्मासुरसुद्धा आकाशातून झेप घेऊन हव्या त्या प्राण्याचे पहाताक्षणीच भस्म करी. आता भस्मासुरापुढे कुणाचेच काही चालेना. जर एखादा नास्तिक माणूस वेडेवाकडे बरळू लागला तर पंडितांनाही त्याला मुळीसुद्धा आवरता येत नाही, तसे भस्मासुरापुढे आता कुणाची काहीही युक्ती चालेना.
शंकरांना मात्र या गोष्टीचीसुद्धा दादफिकीर नव्हती. कारण शंकरांना भस्म आणून देताना खोटेपणानेच तो अतिशय नम्र बनत असे. नंतर भस्मासुराने आपल्या मनात विचार केला, प्रथम आपल्याला मिळालेल्या वराने इंद्राचे भस्म करावे. मग विष्णुलोकात जाऊन पृथ्वीपालक विष्णूचे भस्म करावे. शेवटी आपल्याला निर्माण करणाऱ्या गंगाधराचे भस्म करावे आणि त्रिभुवनात सुंदर असलेली त्याची पत्नी पार्वती हिरावून घ्यावी. भस्मासुराच्या या कृत्याने पृथ्वीवर सर्वत्र हाहाकार माजला. सर्व ऋषी आणि चारी वर्णाचे लोक विष्णूजवळ गाऱ्हाणे घेऊन आले आणि भस्मासुराची सर्व हकीकत त्यांनी विष्णूला सांगितली.
ते सर्वजण म्हणाले, "हे देवा, शंकराने काय केले हे ? शंकराने त्याचे कष्ट कमी करण्यासाठी, त्याचा नेम चुकू नये म्हणून वर देऊन बसला; पण त्याने आता आम्हां सर्वांना जगणे अशक्य केले. आपण पृथ्वीचे प्रतिपालक आहात. तेव्हा आम्ही सारे आता आपणास शरण आलो आहोत. आपण आम्हांला वाचवा. मग त्या सर्वांना घेऊन नारायण शंकराजवळ आला आणि भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गांजले आहे याची सविस्तर हकीकत सांगितली. त्याच्या संकटातून आता आम्ही एवढेच जमलो आहोत; पण भस्मासुर कोठे आणि कसा येईल आणि डोक्यावर हात ठेवील सांगता येत नाही. शंकरा, मला तर तुमच्या प्रांतही अजिबात सुरक्षित दिसत नाही. पार्वतीमातेला सांभाळा. विष्णूनी अगदी स्पष्टपणे सांगितले. एकंदरीत तुमच्या सर्व हकीकतीवरून भस्मासुराचे मरण आता जवळ आले आहे असे मला दिसते. आता तुम्ही निश्चितपणे आपापल्या घरी जा. असे त्यांना शंकर म्हणाले.
तेवढ्यात भस्मासुरच नेहमीच्या नाटकीपणाने तेथे आला. आपले गाऱ्हाणे घेऊन तेथे आलेल्या जमावाकडे त्याने आपली क्रूर दृष्टी फेकली. "येथे जे जे आले आहेत त्यांचे त्यांचे उद्या भस्म करायचे. असा त्याने आपल्या मनाशी निश्चय केला. भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले, “हे राक्षसा, तुझ्या भल्यासाठी मी तुला वर दिला आणि तू त्याचा गैरफायदा घेतलास. तुला मी वर दिला आणि तू पृथ्वीचा संहार केलास ! तुला लाज वाटते का ? तू तर पक्का दगाबाजच निघालस ! त्याबरोबर भस्मासुरही रागाने म्हणाला, वर देण्यापूर्वीच तू विचार करायला हवा होता. मला मिळालेल्या शक्तीचा मी उपयोग करून उपभोग का घेऊ नये? तुम्ही म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवीच कशाला ? मला देऊन टाक मुकाट्याने. नाहीतर मी आता तुझ्याच मस्तकावर हात ठेवतो ! भवानी उठून घरात निघून गेली. तिच्याकडे कामुकदृष्टीने बघत असुर म्हणाला, अशी जाऊन तू कुठे जाणार आहेस ? शिवाचे आधी भस्म करून मग मी तुला पळवून नेईनच.
शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी तो असुर पुढे आला. त्याबरोबर, तेथे जमा झालेले ऋषी, मुनी सर्व पळू लागले. लाघवी उमानाथांनीही त्याच्यापासून वाचण्यासाठी पळायला सुरुवात केली, अरे जोगड्या, थांब पळतोस कुठे? आता मी तुझे भस्म करून अंगाला राख फासतो" असे म्हणत भस्मासुर शंकराच्या मागे मागे धावू लागला. खरोखर वेदशास्त्रांना ज्याचा पार कधी लागला नाही त्या मायेचे चक्र चालवणाऱ्या शंकरांना त्यांनीच निर्माण केलेला भस्मासुर धरू पाहात होता. पळता पळता एकदम शंकरांना आपण पकडले असे वाटे तेवढ्यात ते दूर गेलेले दिसत. असा भस्मासुर कोटी कोटी वर्षे शंकरांचे मागे धावत होता; पण सर्वेश्वर शंकर त्याच्या हातास अजिबात लागत नव्हते, सर्व विद्या एकत्र करून घोकल्या तरी मदनाला जाळणाऱ्या शंकरांना पकडता येणे शक्य नव्हते. तरीपण भस्मासुराला मात्र याची जाणीवच नव्हती. तो आपल्याला मिळालेला वर म्हणजे एक दिव्य शक्ती आहे असे समजत होता. त्यामुळे तो आता स्वतःला अजिंक्य समजून गर्वाने अगदी धुंद झाला होता. त्याला सारासार विवेकच राहिलेला नव्हता. पण जे प्रेमळ भक्त होते त्यांच्याकडे मात्र आपोआप शंकर ओढले जात होते. उमेसह ते त्या भक्तांच्या घरी अगदी आनंदात रहात होते. तप, बल, विद्या आणि धन यांच्या जोरावर त्रिभुवनाचे नियंत्रण आपल्या शंकरांना धरून ठेवू पाहणारे मूर्ख ठरत. अशा गर्वाने जे अंध होतात ते जन्ममरणाचे फेरे सतत पुनःपुन्हा घालीत असतात. असो
अशा रीतीने अहंकाराने उन्मत्त झालेल्या भस्मासुराला शंकर कधीही सापडणे शक्यच नव्हते. इकडे भवानीने सर्वांवरील संकट निवारण्यासाठी आपल्या बंधूची, श्रीविष्णूची प्रार्थना आरंभिली, " हे कमलनयना, कमलेच्या प्रियकरा, जगाला वंद्य असणाऱ्या जनार्दना, जगरक्षका चक्रधरा, भवभय हरणाऱ्या शेषशायी भगवाना, तू आता प्रकट हो. " विष्णूंनी जेव्हा साक्षात भवानीची प्रार्थना ऐकली त्याबरोबर सुंदर मोहिनीचे रूप धारण केलेले विष्णु भस्मासुर राक्षसाला आडवे आले.
वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर उभे होते. अत्यंत सुंदर आणि लावण्यवती, यौवनाने बहरलेल्या मोहिनीला प्राहताच भस्मासुर अगदी वेडा झाला. मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशात सर्वच देवांची दाटी झाली होती. अष्टनायिकांचे सौंदर्य अत्यंत मोहक असलेल्या त्या मोहिनीच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे इतकी ती सुंदर होती. तिचे नृत्यू पाहून तन्मय झालेला भस्मासुर कामांधपणाने तिला म्हणाला, "हे स्त्रिये, तुझ्यावरून लक्ष्मी आणि पार्वती अगदी ओवाळून फेकून द्याव्यात. तुझे सुंदर मुखकमल बघून माझे प्राण अगदी कासावीस झाले आहेत. तुझ्या अती तीक्ष्ण यौवनाच्या नयनबाणांनी माझ्या मनाचा हरिण अगदी जखमी झाला आहे. तो पाहा, तुझ्या पावलांचा मागोवा घेत घेत वसंत ऋतू येतो आहे. चल मला माळ घाल, मी जन्मभर तुझा दास होऊन राहीन. " खरच भस्मासुरा ? " 'होय मोहिनी. ती पार्वती काय, लक्ष्मी काय तुझ्यासमोर तुच्छ आहेत. तुझ्या ह्या गोड बोलण्याने मला प्रसन्नता आलीय. चल, चल, मोहिनी, माझ्याबरोबर विवाह कर. मी तुझा दास होईन.
मायावी वेषधारी विष्णु हसून भस्मासुराला म्हणाले, समोर जो मोठा वृक्ष दिसतो आहे ना ? त्यात आमच्या कुळाचे आराध्य दैवत लपलेले आहे. लग्नापूर्वी माझ्या पतीसह, मी तुझ्याशी त्या वृक्षासमोर नृत्यगायन करीन. मगच पतीला माळ घालीन, असा माझा पण आहे. कारण कित्येक दिवस माझे हे मुसमुसणारे तारुण्य अगदी फुकट चालले होते. मनाजोगा कोणी पतीच मला मिळत नव्हता. ज्याला मी वरायचे तो माझ्या सौंदर्याला घाबरूनच मला नाकारायचा आणि लोचटपणे माझा स्वीकार करणाऱ्यांना मीच नाकारायचे; पण आज तुझ्या रूपाने माझे मनोरथ पूर्ण झाले आहेत. आता आधी मला मी बोललेला नवस फेडलाच पाहिजे. 'मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे; पण आधी तू माझ्याबरोबर नृत्य कर. मी जिथे हात ठेवीन तेथे तू हात ठेवला पाहिजेस. मी जे हावभाव दाखवीन तेच तू दाखवले पाहिजेस. हीच तुझी परीक्षा आहे, तुझी कसोटी आहे. या कसोटीत. तू आधी उत्तीर्ण हो. तुला ते सहज शक्यसुद्धा आहे. कारण आमचे दैवत फार कडक आहे. ते जर कोपले तर सर्व ब्रह्मांडसुद्धा जाळून भस्म करून टाकीन.
अत्यंत सौंदर्यशालिनी मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने तिच्या प्राप्तीच्या आशेने तिच्या साऱ्या अटी मान्य केल्या. त्याला भुलवून ती त्या वटवृक्षासमोर म्हणजेच शंकरासमोर घेऊन आली. वटवृक्षाला नम्रपणाने वंदन करून मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. ती गाणे स्वतःच म्हणू लागली. तिचे नृत्य आणि गायनातील ते कौशल्य पाहून अप्सरा, गंधर्व, किन्नर सर्व अगदी तटस्थ झाले होते. सर्व देव त्यावेळी भुंग्याचे रूप घेऊन गुंजारव करीत तिच्याभोवती पिंगा घालीत होते. तिचा अतिशय गोड आवाज ऐकून शेषशायी, डोक्यावरचे पृथ्वीचे ओझे सोडून वर येण्यासाठी अत्यंत आतुर झाला होता. मोहिनी जेथे जेथे हात ठेवील तेथे तेथे भस्मासुरही हात ठेवत होता.. तिच्या नृत्याच्या प्रत्येक मुद्रेप्रमाणे हावभावाप्रमाणे तो हावभाव करीत होता. मोहिनी प्राप्त झाल्याच्या आनंदात बेभान होऊन, तल्लिन होऊन तो नाचत होता. धायाळ नजरेने मोहिनीकडे पाहात तसे हातवारे करीत होता, नाचत होता. नाचता नाचता शेवटी मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले. भस्मासुरानेही तसेच केले आणि तो जागच्याजागी भस्म झाला. मग त्याच क्षणी मोहिनीचे रूप टाकून विष्णु चतुर्भुज रूपात प्रगटले. वटवृक्षाचे रूप सोडून शंकरही पुन्हा मुळ रूपात प्रकटले.
तेथेच हरिहरांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. देवान वरून दोघांच्यावर पुष्पवर्षाव केला. कारण भस्मासुराच्या ना त्रैलोक्यावरचे संकट टळले होते. मोहिनीचे सुंदर रूप पाहताच शंकरसुद्धा संयम विसरले होते. त्यामुळे शंकराचे वीर्यस्खलन झाले होते. भूमीवर पडता पडता त्याचे आठ भाग झाले व ते अष्टभैरव बनले. अतितांग, रुह चंड, क्रोध, उन्मत, कपाल, भीषण आणि संहार अशी त्यांची नावे आहेत. ते शिवाचेच अंश आहेत. भस्मासुर मेल्याची बातमी कळताच त्रिभुवनात अतिशय आनंद पसरला. शंकर आणि विष्णू हातात हात घालून अतिशय आनंदाने कैलास पर्वतावर आले. अंबिकेने दोघांची पूजा केली. खरोखरीच दोघांची लीला अगाध आहे. त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबेला अपार आनंद झाला.
अध्याय समाप्त
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.