Subscribe Us

Shivlilamrut Adhyay 13

 ॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥

 अध्याय तेरावा 

 शिव-पार्वतीचा विवाह व कार्तिकस्वामीचा जन्म 



 भाग :-१ 

      अपर्णेचा हृदयनाथ, भोळा सांब, कर्पूरगौर, नीलकंठ, गजाननाचा पिता असा जो शंकर त्याचे चरणावर प्रथम सगळेजण नम्र होऊन वंदन करू या. सुत, शौनक व इतर ऋषींना सांगू लागले, 

          फार फार वर्षांपूर्वी एकदा दक्ष राजाने एक महायज्ञ सुरू केला होता. शंकरांना त्याने मुळीच आमंत्रण दिले नव्हते. इतर सर्व देवांना मात्र मानाने बोलावले होते. ब्रह्मदेव आणि विष्णूसुद्धा ज्याला नेहमी वंदन करीत असत त्या शंकरांना त्याने जाणूनबुजून मुद्दामच वगळले होते. एवढेच नव्हे तर त्याने शंकराची निंदासुद्धा सुरू केली होती. 'काय ते शंकराचे रूप! अहाहा ! ध्यानच नुसते! गळ्यात अपवित्र आणि भयानक अशा मुंडक्यांची माळ काय घालतो, मेलेल्या हत्तीचे ओले कातडे पांघरतो, त्याला दुर्गंधी तरी कशी काय येत नाही ? बरं तो राहतो तरी उत्तम महालात असे म्हणावे तर तसेही नाही. वेड्यासारखा गावाबाहेरच्या एकांतजागी स्मशानात राहतो. स्मशानातील मेलेल्या माणसांच्या कवटीचे भांडे करून दारोदार भिक्षा मागतो. चिताभस्म संपूर्ण अंगाला फासतो. भयंकर फुत्कारणारे विषारी साप अंगावर खेळवतो, त्याच्या भोवताली सतत भुते नाचत असतात. या पृथ्वीवर जे जे अभद्र आहे ते ते सर्व या शंकराला आवडते. कोठलाही कसलाही विचार न करता कुणाला काहीही देऊन टाकतो. 



         कशाकशाचाही विचारच करीत नाही. याला काय देव म्हणायचे ? नेहमी रागावलेला, संतापलेला चेहरा आणि साऱ्या त्रिभुवनाला जाळून टाकील असे भगभगीत तेज असणारा, त्याचा तिसरा डोळा पाहताच अगदी प्राण कंठाशी येतो. डोळ्यावरून जटेतले गंगेचे पाणी ओघळते आहे आणि स्वतःच्याच कीर्तनात दंग होऊन स्वतः नाचतो आहे असे याचे ध्यान आहे. अगदी किळस येते त्याच्याकडे पाहताना. राक्षसांना कसले कसले वर देऊन यानेच माजवून ठेवले आहे. याला लहानथोर कोण हे मुळीसुद्धा समजत नाही. नंदिबैलासारखा मूर्ख पशू म्हणजेच याचे वाहन आहे, असा शंकर! याला कसा काय मोठा देव म्हणायचे ?' अशा प्रकारे दक्ष राजा रोज निंदा करीत असे. त्याला कारणही तसेच होते म्हणा. एकदा दक्ष राजा कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे गेला होता; पण शंकरांनी सासऱ्याकडे लक्षच दिले नाही. तेव्हा ते उठून उभे राहिले नाहीत. त्यामुळे शंकरावर दक्ष राजा रागावलेला होता. शंकरांना तो यज्ञभागही देत नसे.वाईट वेळ आली, की दुर्बुद्धी सुचते. दक्षराजाचे तसेच झाले होते. दक्षाने शिवाला बोलविले नाही म्हणजे एक प्रकारे विनाश काले विपरीत बुद्धी हेच होय. दक्षाला माहिती होते, की उमानाथ ज्याला आवडत नाही त्यांचे यज्ञ, जप, तप, सर्व फुकट आहे. व्यर्थ आहे. जो शिवाला भजत नाही त्याच्यावर अनेक संकटे एकामागोमाग एक कोसळतात. हे सर्व माहीत असून दक्षराजा हे विसरून गेला होता. असो इकडे कैलास पर्वतावर भवानी आपल्या माहेरच्या आमंत्रणाची वाट पाहत बसली होती. पार्वतीमाता म्हणजे एक स्त्री होती. माहेरची ओढ तिलाही फार होती. माझ्या वडिलांच्या घरी आता यज्ञ होणार. त्यांचे बोलावणे का नाही आले ? मी त्यांची कन्या आहे. मला माहेरचे बोलावणे येणार. दक्षराजा आपल्या कन्येला कसे विसरतील? मी श्रेष्ठ ज्येष्ठ कन्या. अजून कसे माहेरचे बोलावणे मला आले नाही ? पार्वती मनातल्या मनात बोलत होती.



           आपले पिता फार मोठा यज्ञ करतो आहे. अनेक जणांना तो बोलावणारच आहे. त्याचे आपल्याला आमंत्रण नक्की येईलच, असे तिला वाटत होते. अपर्णा शंकरांना म्हणाली, "देवा, माझ्या सर्व बहिणींना पित्याने यज्ञाकरिता आमंत्रण दिले आहे, असे मला नक्की माहिती आहे. मग तो मला आमंत्रण द्यायचे चुकून विसरला आहे का काय, ते समजत नाही. त्याचे बोलावणे आले नसले तरी मग मीच जाऊ का माहेरी ? माझ्या बहिणी, मेव्हणे व इतर माहेरच्या नातेवाईकांची भेट तरी होईल त्या निमित्ताने. तेव्हा शंकर म्हणाले, "हे सुंदरी, तू तेथे जाऊ नयेस असे मला वाटते. तुझा पिता माझा नेहमीच राग राग करीत असतो. माझी नेहमी निंदा करतो हे तुला माहीत आहे. त्यामुळे तो तुझाही अपमान करील. ज्याला आपल्याबद्दल प्रेम नाही त्याचे तोंडही पाहू नये. "

        शंकर असे सांगत आहेत तोच तोंडाने नारायण नारायण असे म्हणत नारदमुनी कैलासावर आले. ते पार्वतीला म्हणाले, 'देवी, आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीने आमंत्रणाची किंवा मानाची वाट कधीच पाहू नये. पार्वतीला ते एकदम पटले आणि आपला पती शंकर, याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नंदीवर बसून ती दक्षराजाकडे जाण्यासाठी निघाली. तिने आपल्याबरोबर भूतगण घेतले होते. अशा तऱ्हेने सर्वजण चालत असतानाच दक्ष राजाचे निवासस्थान आले.



         राजाच्या घरासमोर खूप मोठा आणि सुंदर असा मंडप घातला होता. सर्व देव आणि ऋषी मंडपात सन्मानपूर्वक आपापल्या आसनावर बसले होते. फक्त शंकराशिवाय सर्व देवांना दक्ष राजाने मानाचे स्थान दिले होते. दक्षराजाने सर्व देवांची आणि ऋषींची यथासांग पूज केली होती. दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून होमकुंडामध्ये आहुती टाकत होता. भवानीला तेथे आलेली पाहून तेथे आलेल्या सर्व देवांना, ऋषींना खूप खूप आनंद झाला; परंतु दक्ष राजाने आपल्या या श्रेष्ठ कन्येकडे नजर वर करून नुसते पाहिलेदेखील नाही. नंदीवरून खाली उतरून भवानी पित्याजवळ येऊन उभी राहिली तरीही त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. भवानीला वाटले, धुराने पित्याचे डोळे बंद झाले. असल्याने कदाचित ती पित्याला दिसलीच नसेल. तरीपण दक्ष राजाने सर्व बहिणींचा खूप खूप आदरसत्कार केलेला स्पष्टपणे दिसत होता. पार्वतीने आपल्या मातेकडे नजर टाकली; पण मातेनेही मान दुसरीकडे मुद्दामच फिरवली. दक्ष राजा मनात म्हणत होता, 'या भवानीला कुणी येथे यायला सांगितले होते ? ही आणि हिचा नवरा- तो जोगड्या मला दृष्टीसमोरसुद्धा नको वाटतात.  इतक्यात पार्वतीने वडिलांचे लक्ष वेधून घेतले, तेव्हा 'पार्वती, तुला कोणी बोलवणे केले होते? माझ्या डोळ्यासमोर तू व तुझा पती नकोय. काय तुझ्या पतीचा अवतार! काय त्याचे ते राहणे वेड्यासारखे! तो स्मशानात काय राहतो! जा. माझ्या डोळ्यासमोरून जा ! बोलला. " असे पार्वतीकडे पाहत दक्ष राजा बोलला. 



       आपली अशा तऱ्हेने चाललेली उपेक्षा पाहून आदिमाया, अनंत ब्रह्मांडाचा स्वामिनी असलेली पार्वती मनातून अतिशय संतापली. तिचा चेहऱ्यावर संताप पाहून सर्व देव खूप घाबरले. आता पुढे काय होते याची ते सर्वजण चिंता करू लागले. संतापलेल्या पार्वतीने विजेसारखी एकदम समोरच्या कुंडात उडी टाकली. त्याबरोबर सगळी पृथ्वी डळमळू लागली. शेषनागसुद्धा थरथर कापू लागला. वैकुंठ आणि कैलास उलटेपालटे झाले. यमराजसुद्धा अतिशय घाबरला. पार्वतीबरोबर आलेले शिवगण लगेच तसेच धावत धावत परत शंकराच्या जवळ आले आणि दक्षाच्या यज्ञमंडपात घडलेला प्रकार त्यांनी सविस्तर जसाच्या तसाच शंकरांना सांगितला. हे ऐकताच शंकर आश्चर्य व संतापाने म्हणाले, “ काय पार्वतीने यज्ञकुंडात उडी टाकली हे खरे आहे. माझ्या गणांनो, माझी शक्ती दक्षाला दाखवतो.

           शंकर संतापाने लाल लाल झाले आणि आपल्या जटा रागाने आपटायला सुरुवात केली. प्रलयाशी आणि बारा सूर्य जर एकत्र आले तर त्याचे जसे भयंकर असे धगधगते रूप दिसेल तसा अत्यंत तेजस्वी वीरभद्र तेथे आला. त्याच्या तेजात चंद्र-सूर्यसुद्धा डळमळत होते. आकाशाला झोडपल्यामुळेच की काय चांदण्यांचा सडा पडला होता. पृथ्वी पार बुडू लागली होती. चौदा लोकांत आवाज दुमदुमत होता. इकडे दक्षाच्या घरीसुद्धा रक्ताचा पाऊस पडायला लागला. दिवसा दक्षाच्या नगरीत सर्वत्र घुबडे ओरडू लागली. शंकराचे हे एकदमच वेगळे रूप पाहून दक्षाच्या अंगातली सारी शक्तीच एकदम लोप पावली.



               अतिशय रागावलेला वीरभद्र शंकराची स्तुती करून कैलासावरून निघाला. त्याच्याबरोबर एकवीस कोटी पद्मे एवढे अफाट सैन्य होते. आठ कोटी गण बरोबर घेऊन त्याच्यामागून शंकरही निघाले. शिवाचा पुत्र गणपती सर्वांच्या पुढे होता. रागावलेला वीरभद्र सैन्य घेऊन चालून आला आहे हे पाहातच दक्षाच्या घरी जमलेले देव, ऋषी, ब्राह्मण सर्व वाट फुटेल तिकडे पळू लागले. तिन्ही लोकात अतिशय आक्रोश सुरू झाला. प्रलयकालच्या अग्नीनेसुद्धा आता उग्र रूप धारण केले. वीरभद्राची भीती घेऊन पळताना अनेकांची फजिती झाली. काहींची पळता पळता धोतरे सुटली. काहींनी अत्यंत घाबरल्याने धोतरातच मलमूत्र विसर्जन केले. कोंबड्याचे रूप घेऊन चंद्र धूम पळाला. बगळ्याचा वेष घेऊन यमाने आपले खरे रूप दडवले. नैऋत्यपती कावळा बनला, रसनायक ससा बनला, अर्क कबूतर झाला. अशा तऱ्हेने प्रत्येकाने वेगवेगळी रूपे घेतली आणि सर्व वेगाने पळून गेले.

       नाना पक्ष्यांची रूपे घेऊन तेथे आलेले नवग्रह पळून गेले. इंद्र कीराचे रूप घेऊन पळाला. एवढ्यात दक्षावर विजेसारखा वीरभद्र येऊन कोसळला. आपल्या सहा हातात त्रिशूळ, डमरू, धनुष्यबाण वगैरे शस्त्रे घेतलेला वीरभद्र रागाने लालेलाल होऊन थरथरत होता. त्याने येताक्षणीच आपला पराक्रम दाखवायला सुरुवात केली.पूषाचे सगळेच्या सगळे दात पाडून टाकले. भगदेवाचे डोळे फोडून त्याला पार आंधळा बनवले. ऋत्विजाच्या मिशा उपटून तोडल्या. अनेकांना पाय धरून गरगरा फिरवून जमिनीवर आपटले. अनेकांचे हातपाय मोडले. वीरभद्राला पाहताच काहीजणांचे तर प्राण तत्काळ निघून गेले. वीरभद्राचे पाठोपाठ रागावलेले शंकरसुद्धा आले आणि त्यांनी दक्षपूतनेला ठार मारले. यज्ञमंडप आणि यज्ञकुंड संपूर्णपणे पार मोडून तोडून एकदम दूर फेकून दिला. दक्षाला वीरभद्र म्हणाला, “हे शतमूर्खा, तू अहंकाराने आणि जाणूनबुजून मुद्दामच शंकराची निंदा केलीस, आता त्याच्या परिणामाला भोगायला तयार हो. " असे म्हणून वीरभद्राने दक्षराजाचे शिर खड्गाच्या एका फटक्यात धडावेगळे केले. ते शिर वर आकाशात खूप उंच उडाले आणि खाली येऊन धरणीवर पंडले. वीरभद्र त्या शिरावर नाचला आणि त्या शिराचा पार चेंदामेंदा करून टाकला.



       इकडे भयभीत झालेले सर्व देव विष्णूसह शंकराभोवती जमले आणि त्याची स्तुती करू लागले. त्यांनी शंकराला विनंती केली, शंकरा, दक्ष अपराधी आहे. पण तो शेवटी आपला सासरा आहे. त्याला क्षमा करा आणि पुन्हा जिवंत करा. अतिशय रागावलेला भोळा शंकर देवांनी केलेल्या या स्तुतीमुळे शांत झाला आणि त्या देवांना म्हणाला, दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून परत जोडा म्हणजे तो जिवंत होईल. पण दक्षाच्या शिराचा वीरभद्राने चेंदामेंदा केला होता. आणि तो तर अजून भलताच रागात होता. तो मोठ्याने गर्जना करून म्हणत होता, “जे शिवाचा द्वेष करतील त्यांना मी जन्माची अद्दल घडेल अशीच शिक्षा करणार. जे कधी तोंडाने शिवनाम घेत नाहीत त्यांची जीभ मी तोडून टाकीन. जो शिवाची पूजा करीत नाही त्याचे काहीही विचार न करता मी हातपाय तोडून टाकीन. जो शिवालयात जात नाही त्याला जन्मभर ठार आंधळा करीन. विष्णु मोठा आणि शंकर लहान आहे असे जो म्हणेल त्याला मी जिवे मारून टाकीन. मी दक्षाचे शिर तुम्हांला देत नाही. काय करायचे ते करा. बघू या आता कोण माझ्याशी दोन हात करायला तयार आहे. पाहूया कोणाची हिंमत आहे आता माझ्याशी लढण्याची.

            शेवटी एक बोकडाचे डोके आणून ते दक्षाच्या धडाला लावले. दक्ष जिवंत झाला आणि लगेचच शंकर तीर्थयात्रेला निघून गेले. बारा वर्षे रानात वनात ते हिंडत होते. त्यानंतर शंकर स्मशानात एकांतात राहू लागले. पुढे त्यांनी हजार वर्षे घनघोर असे तप केले.



                            प्रत्यक्ष जन्मदात्या मातापित्यांनी केलेली उपेक्षा मनास लागल्याने व आपण पतीचे न ऐकता माहेरी आलो असे मनातून वाटल्यामुळे इकडे यज्ञकुंडात उडी टाकलेल्या पार्वतीने भवानीचा आपला जन्म संपवून टाकला होता. हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. तिला एक भाऊ होता. त्याचे नाव होते, मैनाकपर्वत. अख्ख्या ब्रह्मांडात तिच्यासारखी अतिशय सुंदर स्त्री नव्हती. तिचे सौंदर्य एवढे अप्रतिम होते, की तिला नुसते पाहण्यासाठी स्वर्गाचे देव आणि पृथ्वीवरचे राजे हिमालय पर्वताकडे सतत येत असत. हरणे आणि मासे हे सुंदर डोळे असलेले प्राणीसुद्धा तिचे नेत्र पाहून लाजत. स्वर्गातील सौंदर्योत्तम अशा अप्सरांचे सौंदर्यही तिच्यापुढे फिके पड़े मोठे आणि लांब लांब असे तेजस्वी नेत्र, निर्मळ मुखकमल, गोड आवाज, अतिशय नाजुक सावळी अंगकांती तिला खूपच शोभून दिसत असे. तिला पाहिल्यानंतर इंद्रनीळ मणी गाळून तिची सुंदर मूर्ती बनवली आहे असे वाटे. तिच्या पांढऱ्याशुभ्र दंतपंक्तीचे तेज दगडावर पडले तर दगड रत्नाप्रमाणे चमकू लागत. अशी ही स्वरूपसुंदर आदिमाया आता पुन्हा एकदा कन्यारूपाने हिमालयाचे पोटी अवतरली होती. तिच्या अंगाचा सुवास त्रिभुवनाला वेड लावत होता. ती बोलू लागली, की तेजस्वी प्रकाश पडत असे. जिथे जिथे पावले उमट होती तिथे तिथे सुंदर अशी सुगंधी कमले निर्माण होत असत. त्या कमळांच्या मधुर वासाला भुलून वसंत ऋतू तेथे सारखा नुसताच पिंगा घालीत असे. सोन्याची सुगंधी अशी अतिशय नाजुक वेलच कैलासावरून पृथ्वीवर हिमालयात आली आहे, असे पार्वतीला पाहताच पाहणाऱ्याच्या मनात वाटत असे.



                  एकदा असेच नंदीला बरोबर घेऊन हिमालयात शंकर आले असता नगराज हिमालय शंकराचे दर्शनासाठी आला. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याची कन्या पार्वतीही होती. शंकराला नमस्कार करून त्याने शिवस्तुती आरंभली. पार्वतीही पित्याबरोबर तल्लीन होऊन शिवभजन करू लागली. आपल्या साठ हजार अतिशय सुंदर मैत्रिणींसह पार्वती शंकराची अगदी मनापासून सेवा करू लागली. ज्या ठिकारी शंकर नेहमी ध्यानस्थ बसलेले असत त्या ठिकाणी त्या येत व विविध प्रकारे सेवा करीत. तारकासुराचे तीन मुलगे, तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन हे तिघेही भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तप करीत होते. हजार कमळे घेऊन रोज तिघेजण शंकराची पूजा करीत असत. एक दिवस त्या हजार कमळात चुकून एक कमळ कमी आले. आता ऐनवेळी कमळ कसे मिळणार ? कमळाचे फूल नसले तरी आपल्याकडे आपले शिर आहेच ना असा विचार केला. त्याबरोबर या तिघा तारकपुत्रांनी आपापली शिरे तीक्ष्ण शस्त्रांनी कापून शंकराला वाहिली.

              त्याबरोबर त्यांना शंकर प्रसन्न झाले आणि त्या तिघा राक्षसांना त्यांनी मागितले ते वर त्यांना देऊन टाकले. त्यामुळे तारकापुत्र फार उन्मत्त झाले आणि त्रिभुवनाला अनन्वित छळू लागले. त्यांनी देवांनासुद्धा स्वर्गातून हाकलून दिले. त्यांच्या अशा उन्मत्त वागण्यामुळे सर्वत्र पृथ्वीवर हाहाकार माजला. मग देव, ऋषी सर्व मिळून वैकुंठात जगताचा पालनहार विष्णूचे दर्शनासाठी गेले. विष्णूची प्रार्थना करून त्यांना सर्व वृत्तांत कथन केला. नंतर विष्णूसह सर्व शंकराच्या जवळ आले आणि त्यांची स्तुती करू लागले. 'मी प्रसन्न आहे. हवा तो वर मागा, उदार सदाशिव उद्गारले. मग विष्णूंनी पुढे होऊन त्रैलोक्याचे गा-हाणे शंकरांच्या कानावर घातले. ते ऐकून शंकर म्हणाले, एक उत्तम रथ पाहिजे. मी त्रिपुरासुराला ठार मारीन.



              “आम्ही तसा रथ सजवून देतो. पृथ्वीचा रथ, तेजस्वी सूर्यचंद्र ही त्याची दोन चाके, उत्तुंग असा मंदरगिरी हा ध्वज, चारी पुरुषार्थ हे रथांचे मजबूत स्तंभ, चारी वेदांचे घोडे, शास्त्रांचे दोर, पुराणांचे तटबंद, उपपुराणांचे टोकदार खिळे, कनकाद्रीचे धनुष्य, भोगींद्र धनुष्याची दोरी आणि वैकुंठीचा सुकुमार हा तीक्ष्ण बाण करून असा हा सुंदर रथ सजवून देतो; पण त्रिपुरासुर व त्याच्या साथीच्या राक्षसांचा वध करा." सर्वांनी शिवाला कळवळून सांगितले. मग सर्वांनी मिळून तसा रथ तयार केला. शंकर त्या रथात चढले. त्याबरोबर रथ एकदम पार रसातळाला जाऊ लागला. सर्वांनी आपापला सर्व जोर लावला; पण रथ काही वर निघेना. शेवटी नंदीने आपल्या मजबूत व टोकदार शिंगाने तो दिव्य रथ बाहेर काढला. मग एक पाय स्थात व एक पाय नंदीवर ठेवून शंकरांनी त्रिपुरासुराबरोबर घनघोर युद्ध केले आणि अनेक राक्षसांना ठार मारले. वीरभद्रानेही आपले युद्धकौशल्य पणाला लावून असंख्य राक्षसांचा वध केला; पण राक्षसांच्याकडे भरलेले अमृताचे कुंड होते. ते अमृत मेलेल्या राक्षसांवर शिंपडून राक्षस पुन्हा जिवंत करीत असत. मग शिवांनी मेघास्त्र सोडले आणि अमृताचे कुंड पाण्यात बुडवून टाकले; परंतु शंकरांच्या आशीर्वादाने त्रिपुर राक्षस वर अंतराळात भ्रमण करीत असल्यामुळे शंकराचे बाणाला तो बळी पडत नव्हता. अशा तऱ्हेने शंकर व त्रिपुर राक्षसाचे युद्ध अनेक वर्षे चालू होते. शंकराचे अंगातून घामाच्या असंख्य धारा वाहू लागल्या. त्या वाहता वाहता त्या घामाच्या पाण्याची नदी बनली. ती नदी म्हणजेच 'भीमरथी गंगा' होय. नेत्रातूनसुद्धा जे जलबिंदू पडले त्याचे 'रुद्राक्ष' बनले.

 भाग २ वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या