॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥
अध्याय चौदावा
पार्वतीच्या भिल्लीण रूपाची कथा
भाग:-१
हे भाललोचना, अपर्णेश्वरा, उमापती तुझ्या कृपेने तेरा अध्यायांत मी शिवकथा सांगितली. आता हा चौदावा अध्याय म्हणजे मंदिरावर कळस चढवणारा अध्याय श्री शंकराच्या कृपाप्रसादाने सुरू करतो.
तेराव्या अध्यायात अभूतपूर्व असे शिवगौरीचे रूम झाले, दोघांपासून कार्तिकस्वामीचा जन्म झाला. आता कार्तिकस्वामी आणि गजानन यांच्या लहानपणाची एक गोष्ट सांगतो ती ऐका.
गणपती आणि कार्तिकस्वामी दोघेही लहान होते. ते दोघेही पार्वतीला फार फार प्रिय होते. ती त्यांचे खूप खूप लाड कोडकौतुक करायची व दोघेसुद्धा पार्वतीला विसरत नसत दृष्टीआड होऊ देत नसत. ते पार्वतीमातेच्या मागे मागे फिरत असत. एकदा गजाननाला मांडीवर घेऊन पार्वती त्याला स्तनपान देत होती. सोंडेने दूध ओडून गणेश अगदी आरामात लोकत होता. मध्येच आपली सोंड आईच्या पाठीवरून फिरवत होता. सोंडेत दूध साठवून गणपतीने कार्तिकस्वामीला म्हटले "ब्रह्मादिक देवांनाही कधी न मिळणारे हे अमृत मी तुला देतो ते तू घे".
'असले तुझे उष्टे दूध नको! आई, हा लांवाक्या मला उगीचच उष्टे दूध देतो आहे. मी कशाला घेऊ असले उठे दूध ? याला काहीतरी सांग, रागाव!" कार्तिकस्वामी मोठ्याने ओरडून म्हणाला. आई, याला मी सोंडेला धरून खाली पाड़ का ? तू याचे हे नाक इतके लांब कशाला ग केलेस? इंद्र, चंद्र, सूर्य हे दिसायला कसे सुंदर आहेत; पण हा लंबनासिक पाहा दिसतो तरी कसा ! लांब नाक हत्तीसारखे कान, एक दात बाहेर आलेला, अशा बेढब मुलाला तू असा जन्म का दिलास ? आणि किती वेळ झाले तो तुझ्या मांडीवर बसलाय आता याला मांडीवरून खाली ठेव आणि मला मांडीवर घे, "
दोघांचे हे भांडण पाहून शंकर आणि पार्वती दोघांनाही आवरत नव्हते. पार्वतीने गणपतीला मांडीवरून खाली ठेवले आणि षडाननाला उचलून मांडीवर घेतले. त्याच्या एका मुखात पार्वतीने आपला स्तन दिला, त्याबरोबर उरलेली पांच तोंडे मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. त्याबरोबर आपले भले मोठे पोट हसण्याने गदागदा हलवत गणपती पुढे म्हणाला, आई, हा असला कसला गं तुझा मुलगा? एक स्तन याच्या तोंडात घातलास? आता आणखी पाच स्तन तुला कोठून आणशील ? अशा या सहा तोंडाच्या विचित्र मुलाला आई तू जन्म कशाला दिलास ? शंकर पाटील म्हणाले, "पार्वती, ऐक, गजानन हसून पार्वतीला तुला काय विचारतो आहे.... अपने डिवाळपणे हसून म्हटले, " हा अगदी तुमच्यासारखाच आहे. तुम्ही पंचमुख तर षणमुख! मी तरी काय करणार ? पार्वतीने त्या दोघांना खेळायला लावले. आपल्या त्या दोन्ही पुत्रांच्या लीला बघताना दोघेही मनामधून अतिशय सुखावले होते. एवढ्यात पार्वतीमातेला दोघांच्या रडण्याचा आवाज कानावर आला. तो आवाज ऐकून शंकर म्हणाले, "पार्वती, आपली दोन्ही मुले भांडतात आणि एकत्र खेळतात; पण त्यांची लटकी भांडणं चांगली वाटतात. बघ बघ काय झाले ? तो गणेश का रडत आहे ? ती झटकन उठली आणि गणपतीला जवळ घेऊन आपल्या पोटाशी लावत म्हणाली, काय झाले ? "
आई, हा सारख्या माझ्या खोड्या काढतो. माझे कान धरतो आणि ओढतोय. माझे डोळे लहान का ? असे मुद्दाम विचारतो. आणि डोळ्यात बोटेही घालतो. 'का रे कुमार! त्याला का असा त्रास देतोस ? " पार्वतीने लटकेच दरडावून षडाननाला विचारले. आई, मुळीच नाही गं, हा खोटे बोलतो. उलट याने बोटे दाखवून माझे बारा डोळे मोजले, मग मी मुकाट्याने गप्प का बसू? मी त्याला चिडवणारच ? 'काय रे गजानना, तू षडाननाचे डोळे बोटे दाखवून मोजलेस हे खरंय ना? हे असं करणं चांगलं नाही हं!' पार्वतीमाता लटक्या रागाने गणपतीला म्हणाली.
पण गणपतीची तक्रार तयार होतीच. अग आई, हा माझी सोंड विती घालून मोजतो. याला मार दे पाहू. " गणपती म्हणाला. हे ऐकून मग कुमार काय गप्प बसणार आहे." काय म्हणून मलाच मार ? तू माझे हात नाही मोजलेस ? तो म्हणाला. आई, हा मला सारखा म्हणतो, तू फार मोदक खातोस म्हणून तुझे पोट हे असे भले मोठे आहे. मी अधाशी आहे. का ग आई ? तुम्ही दोघेही शहाणे आहात." असे म्हणून पार्वतीने दोघांना हवे ते दिले. पोरे पुन्हा खेळू लागली. त्यांचे भांडण केव्हाच संपले होते.
मुलांचे हे सारे कोडकौतुक इतका वेळ शंकर आनंदाने बघत बसले होते. मुले खेळायला निघून जाताच जगदंबा त्यांच्याजवळ जाऊन बसली. शंकराकडे बघता बघता तिला एकदम हसू आले. "का हसलीस ? " शंकरांनी तिला विचारले. 'अहो, तुमच्या त्या जटाभारात मला एक स्त्रीसारखी आकृती दिसते आहे. खरोखरीच तुमची करणी अद्भुत आहे हे मात्र खरे !
"हे सुंदरी, अपर्णे, अगं, मी माझ्या मस्तकावर जल धारण केले आहे ना म्हणून तुला तसा भास झाला असेल. " अहो सदाशिवा, त्या डोक्यावरच्या पाण्यात मला अगदी स्पष्टपणे स्त्रीचे मुखकमल दिसते आहे. मग हा भास कसा असू शकेल बरे? " 'हे बिंबाधरे, तू मनात काहीतरीच शंका घेऊ नकोस. ते स्त्रीमुख नाही, तर पाण्यात उगवलेले टवटवीत असे दिसणारे कमळ आहे. "अहो व्याघ्रचर्मवसना, तिचे डोक्यावरचे असलेले काळेभोर, कुरळे केससुद्धा मला अगदी स्पष्ट दिसत आहेत. 'अग अपर्णे, त्या कमळाच्या सुवासाला भुलून अनेक भुंगे गुंजारव करीत पिंगा घालीत कमळावर येऊन बसले आहेत. केस कसे दिसतील ? काही तरी नसते प्रश्न विचारत बसतेस तू, 'नाथ, त्या कमळाला अतिशय सुंदर भुवयासुद्धा कशा दिसतात हो? तुमच्या मायेची अद्भुत करणी श्रुतिस्मृतीसुद्धा जाणू शकत नाहीत, तर मी कशी काय जाणणार म्हणा !
"वेडे, तुझी दृष्टी बिघडली आहे का ? त्या पाण्यावरच्या सुंदर लहरीच तुला भुवयासारख्या दिसतात म्हणून विचारतो. हिमनगाचे जामात उद्गारले. 'पतिदेवा, तिथे तिचे सुंदर काळेभोर डोळेही मला दिसत आहेत... त्याचे काय ? अग अपर्णे, जरा नीट निरखून पाहा ना! ते डोळे नाहीत, पाण्यातले पोहणारे मासे आहेत, मासे. " राजीव, अहो कमंडलूसारखे स्तनयुगलही दिसताहेत तिथे मला मग ते... खरं खरं सांगा बर. पार्वती म्हणाली. "
अग तुला आज असं झालंय तरी काय ? चक्रवाक पक्षी आकाशात विहार करता करता उतरून गंगेच्या दोन्ही तीरावर येऊन अलगद बसले आहेत,... आणि तू पुरे झाले ! मी जरी काही म्हणाले तरी तुमची असली मखलाशी कधी संपायची नाही. एकाचे अनेक करून हे त्रिभुवन निर्माण करणारे तुम्ही... तुमच्यापुढे माझा काय पाड लागणार ? मौनं सर्वार्थ साधनम् म्हणतात त्याप्रमाणे आपले मौन धरावे हेच चांगले. " अपर्णा म्हणाली.
मग दोघांनी सारीपाट मांडून खेळायला सुरूवात केली. खेळायला लागून थोडा वेळ झाला आणि इतक्यात वीणा वाजवत नारदमुनी तेथे आले आणि दोघांमध्ये रंगलेला खेळ पाहात बसले. खेळ बघता बघता ते म्हणाले, "अहो देवेश्वरा, शंकरा, असा खेळ म्हणजे मिळमिळीत वाटतो बुवा! काहीतरी पण लावून खेळायला हवे तरच त्यात मजा.' शंकरपार्वती दोघांनाही ही कल्पना फार फार आवडली. " जो जिंकेल त्याला आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याने द्यावी असे ठरले. सोंगट्यांचा डाव टाकला. पहिला डाव अपर्णेने जिंकला. शंकराचे व्याघ्रांबर तिने जिंकून घेतले. तेव्हा ते पाहून नारदाला हसू आले.
दुसऱ्या डावासाठी सोंगट्या टाकण्यात आल्या आणि तो दुसरा डावही भवानीने जिंकला आणि शंकराचे गजचर्म तिने काढून घेतले, आणि मग मजाच झाली, ती सोंगट्या टाकत होती आणि प्रत्येक डाव पार्वती जिंकत होती. असे एकामागे एक डाव जिंकत जिंकत शंकराची कौपीन, आयुधे, भूषणे असे सर्व सर्व काही तिने काढून घेतले, आणि शंकर अगदी खरोखर दिगंबर झाला... तेव्हा शंकर पार्वतीला म्हणाले, 'पार्वती, तूच सगळे डाव जिंकून मला अगदी नग्न केलेस. माझा सपशेल पराभव केलास.
त्याबरोबर खदाखदा हसून नारदमुनी म्हणाले, “शंकरा, एका स्त्रीने तुम्हांला जिंकून घेतले... अरेरे! आतापर्यंतचा तुमचा महिमा अगदी फुकट आहे. ही सर्व सृष्टी मायाधीन आहे. स्त्रीची, पार्वतीमातेची आहे हेच खरे. तू निर्गुण, निराकार, तुला काय करता येणार म्हणा ? हे सर्व चराचर या स्त्रीच्या स्वाधीन आहे! तुला तिने सगुणरूप दिले म्हणूनच तुला हे मोठेपण मिळाले. नाही तर तुला कोण विचारत होते ? हे शंकरा, अरे, आता तू मायेचा झालास, मायाधीन झालास ! मग आता तुझ्या भक्तांना तू काय सांगशील बरे ? "
असे बोलून हळूच कळ लावून नारदमुनी तिथून निघून गेले. त्याचे असे टोचणारे बोलणे ऐकून शंकर रूसले आणि सर्वसंगपरित्याग करून निघून जाऊन लपून बसले. कोणाला त्यांचा पत्ता अजिबात सापडेना.
जगदंबा आपल्या सर्व मैत्रिणींना घेऊन एकूण एक रानावनात फिरून आली. डोंगरदऱ्या, मठ, गुहा सगळीकडे अगदी झाडून शोधले; पण शंकर काही सापडले नाहीत. सर्व तीर्थस्थाने शोधली; पण शंकराचा पत्ता लागेना. डोळे मिटून, सतत ध्यान करणाऱ्या, नग्न राहून मौन व्रत धरून, सतत चिंतन करणाऱ्या, सतत फक्त एक किंवा दोन पायांवर उभे राहून, फक्त वायूवर जगणाऱ्या, अशा विविध प्रकारे तपस्या करणाऱ्या अनेक तपस्व्यांना पार्वतीने शंकराचा ठावठिकाणा विचारला; परंतु त्यांनाही काही ते सांगता आले नाही. चौसष्ट कला आणि चौदा विद्या या सगळ्या एकत्र करून यज्ञयाग करून शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण तोही फसला. जेथे अनंतशक्तीची स्वामिनी असलेली पार्वतीसुद्धा दमली, तेथे तिच्याहून सामान्य असणाऱ्या इतरांची काय कथा!
शिवस्वरूप आपल्या दृष्टीस पडण्यासाठी अनेक देवदेवता तप करीत होत्या. सगळे वेदसुद्धा प्रयत्न करीत होते. ऋग्वेदाने कर्मयोग समजावून सांगितला. यजुर्वेदाने नवनवीन गोष्टींचे ज्ञान दिले. अथर्ववेदाने उत्तम प्रकारची उपासना शिकवली. सामवेदाने न्यायशास्त्र सांगितले. सर्व वेदांनी मिळून सांगितले - ईश्वर हा सर्वात सामर्थ्यवान आहे, जीव हा फार फार लहान आहे. तो ईश्वरासारखा कधीच होऊ शकत नाही. ईश्वराचे पद तो कधी घेऊ शकत नाही. मीमांसकांनी कर्ममार्ग स्थापला. सांख्यांनी आपला प्रकृतिपुरुषविभाग समजावून सांगितला. पातंजलीने योगशास्त्र सांगितले, व्याकरणात विविध शब्दविभागांची माहिती दिली. आणि हे सर्व जे उरले ते म्हणजे ब्रह्म होय, आणि शंकर म्हणजे ब्रह्मानंद होय. वेद शास्त्रांना तो अगम्य आहे, सापडणे अत्यंत कठीण आहे.
अशा या प्रत्यक्ष ब्रह्मानंद असणाऱ्या शंकराचे नावाने मोठमोठ्याने हाका मारत पार्वती घनदाट अरण्यात फिरू लागली. शेवटी काकुळतीला येऊन शंकरांना शरण जाऊन म्हणाली, प्राणवल्लभा, नारदाने आपल्यास खिजविले आणि मी हसले ही माझी चूकच झाली. त्याबद्दल मला क्षमा करा; पण आपले दर्शन द्या. शेवटी सर्व तत्त्वे शोधता शोधता एकदम ज्याप्रमाणे साक्षात्कार व्हावा त्याप्रमाणे अचानक हिमालयात स्वात्मसुखात तल्लीन झालेले शंकर पार्वतीला दिसले. 'वा! स्वारी माझ्या माहेरी येऊ राहिली काय! हिमालयाच्या म्हणजे सासऱ्याच्या गोड मायेत पहा जावयाची कशी डोळे मिटून समाधी लागलीय ! पार्वती मनाशी बोलू लागली. सासरच्या घरी राहून, डोळे मिटून शंकर तल्लीन होऊन बसले होते. अपर्णेने मनाशी विचार केला, 'माझ्या याच रूपात जर मी त्यांच्याजवळ गेले तर शंकर नक्की चिडतील, तेव्हा वेष बदलायला हवा; पण मग कोणता बरे वेष घ्यावा? हे डोंगरात बसलेत म्हणजे डोंगरातल्या भिल्लिणीचाच वेष घ्यावा झाल.
मनात येताच अपर्णेने आदिवासी भिल्लिणीचे रूप धारण केले. ती मोरांच्या पिसांचे सुंदर वस्त्र नेसली आणि फुलांचा सुंदरसा शृंगार करून ती शंकराजवळ गेली. तिथे जाऊन तिने गोड आवाजात गाणे म्हणायला सुरूवात केली. गाणे म्हणता म्हणता पैंजणाच्या झंकारात नृत्य करायला सुरूवात केली. अत्यंत मधुर आवाजात गाणे व उत्तम नृत्य ती करीत होती. अप्सरा, यक्ष, किन्नर सर्व विमानांत बसून पार्वतीचे नृत्यगायन ऐकत होते आणि गायन ऐकून व नृत्य पाहून ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.
तिचे स्वर्गीय गाणे ऐकून वनातील सर्व श्वापदे आपले वैर विसरून गेली, खाणे सोडून तिच्या भोवती येऊन बसली. गाणे ऐकू लागली. नद्या आपले वाहणे विसरल्या. वारा एकदम स्तब्ध झाला. पृथ्वीचा भार दूर फेकून देऊन वर येऊन गाणे ऐकावे असे शेषाला सुद्धा वाटू लागले. पार्वतीच्या अंगाचा सुवास दाहीदिशांत पसरला. अत्यंत तल्लीन होऊन नृत्य करताना पार्वती चेहऱ्यावर सुंदर सुंदर भाव दाखवीत होती आणि ते पाहण्यासाठी निरनिराळी रूपे घेऊन स्वर्ग सोडून पृथ्वीवर उतरले होते. चंद्रकिरणांनी आपली शीतलता आणि सूर्यकिरणांनी आपली दाहकता पूर्णपणाने सोडून दिली होती. देवांच्या सर्व स्त्रियाही अगदी तन्मय होऊन पार्वतीचे नृत्यगायन पाहात होत्या. आदिमायेची माया प्रत्यक्ष देवही जाणू शकत नाहीत तर मग तिचे वर्णन इतरांनी कसे करावे बरे! भिल्लीणरूपी पर्वतीचे दात हिऱ्यासारखे अत्यंत तेजाने लखलखत होते. दगडधोंड्यावरसुद्धा ते तेज पडले, की तेही हिन्यासारखे झगमगू लागत असत. अंगाचा सुवास आकाशात सर्वत्र कोंदला होता. जेथे तिची नाजूक पावले पडत तेथे सुंदर सुवासिक कमळे उगवत आणि त्यांच्या आकर्षणाने लुब्ध होऊन वसंतऋतू तेथे फेऱ्यांवर फेऱ्या घालीत होता. अगदी विजेसारखे तिचे अंग लवत होते, विजेसारखे तेज पसरले होते.
शेवटी शंकरांनी आपले डोळे उघडले त्यावेळी पार्वती नृत्य करीतच होती. तिच्या हातातील कांकणे आणि पायांतले पैंजण तिला चांगल्या प्रकारे साथ करीत होते. आपल्या सुंदर भुवयांतून कटाक्षरूपी नजरेचे बाण फेकून तिने शंकराला जखमी केले, त्याचे मन जिंकले.
शंकर भिल्लिणीकडे आकर्षित झाले आणि आपले तप विसरून भिल्लिणीची चौकशी करू लागले, "हे सुंदरी, तू खरोखरीच कोण आहेस? तुझ्यासारखी सुंदर स्त्री अद्याप मी त्रिभुवनात पाहिली नाही, तुझा सुंदर मुखचंद्रमा पाहून चकोराप्रमाणे मी अत्यंत घायाळ झालो आहे. तू माझ्याशी विवाह कर, तुझ्या स्पर्शासाठी अत्यंत आतुर झालो आहे. खरोखरीच तू माझे हरण केले आहेस व त्यामुळे तुझा बनलो आहे. "
" उमेसारखी खूप सुंदर पत्नी आणि कैलासासारखे सुंदर घर सोडून तुम्ही येथे येऊन बसलात! मी तर परनारी आहे. मग मी तुमच्याशी विवाह कसा करू शकेन? तुम्ही तपस्वी म्हणवता. येथेही तप करीत होता; पण तुम्ही स्वतःचे मन अजून जिंकले नाही, मग तप कशाला करता ? "
यावर पिनाकपाणी म्हणाले, “हे त्रिभुवनसुंदरी, त्या दुर्गेवर रागावून तर मी इकडे निघून आलो आहे. आता मला तिचे तोंडसुद्धा बघण्याची मुळीच इच्छा नाही. स्वप्नातसुद्धा मला तिची थोडीही आठवण येत नाही..
अहो, पण माझा नवरा तर फार रागीट आहे, त्याला जर हे कळाले तर तो खूप रागावले आणि रागाच्या भरात तो सारे त्रिभुवनसुद्धा जाळून टाकील! "
'असू दे तो रागीट असला तर, पण मला त्या पार्वतीचा रागच आला आहे. ती अतिशय कठीण हृदयाची स्त्री आहे. आपल्या वडिलांच्या दक्षाच्या घरी मी नको नको म्हटले तरी गेलो, आणि अपमान झाल्याबरोबर रागावून दक्षाच्या यज्ञकुंडात तिने उडी टाकली. नंतर मग या हिमालयाच्या पोटी पुन्हा जन्म घेतला. माझ्या प्राप्तीसाठी केवढे मोठे तप केले आणि शेवटी माझ्याशी विवाह करून मोकळी झाली. ती फार कपटी बाई आहे. खरोखरीच तुला माहीत नाही. " शंकर पुढे येत म्हणाले, 'मी तर असं ऐकलंय, की तिच्यापेक्षा तूच जास्त कपटी आहेस. खरे तर भोळी भवानी बिचारी फसली. महाराज, दुर्गेसारखी अत्यंत गुणी आणि अतिशय सुंदर राणी सोडून तुम्ही या वनात फिरता आणि दुसऱ्यांच्या स्त्रिया पाहून त्यांना आपल्या जाळ्यात ओढू पाहाता ! अशा वृत्तीच्या तुम्हांला म्हणावे तरी काय ?
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.