॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥
अध्याय चौदावा
पार्वतीच्या भिल्लीण रूपाची कथा
'खरे तर सृष्टीचा घडामोड करण्याचे सामर्थ्य त्या बयेत आहे. शुंभनिशुंभासारखे राक्षस तिने त्यांच्याबरोबर मोठ्या पराक्रमाने युद्ध करून मारले आहेत; पण हे सुंदरी, आता प्रत्यक्ष पार्वती जरी येथे आली, तिने जरी नम्र होऊन, अगदी पाया पडून प्रार्थनाही केली, तरी मी कैलासावर अजिबात परत जाणार नाही. तुझ्याजवळच राहीन. तिच्याबरोबर मुळीच बोलणार नाही. तू नेशील तिकडे येण्याला आता मी तयार आहे. मी तू म्हणशील ते ऐकेन; पण तू माझ्याशी विवाह कर. शंकर भिल्लिणीला म्हणाले आणि आणखी तिच्याकडे सरकले.
तेव्हा भिल्लिण त्यांच्यापासून आणखी दूर सरकत म्हणाली, "अहो, त्या पार्वतीने दोन वेळा तुमच्याशी विवाह केला. तरीही तिला तुम्ही सोडून निघून आलात. मग तिच्यापुढे माझा तर काय पाड? मला सोडून तुम्ही केव्हा पटकन निघून जाल, मला अजिबात समजणारसुद्धा नाही. तूच पण लावून तिच्याशी खेळलास आणि आपले सर्व हरलास त्याला भवानी तरी काय करणार ?"
आता शंकर काहीच बोलले नाहीत. भिल्लीण तशीच नृत्य करीतच होती. तिला आलिंगन देण्यासाठी आपले दोन्ही बाहू पसरून शंकर पुढे सरकले. तशी अंबा त्यांच्याकडे तोंड फिरवून भराभरा पुढे चालू लागली.
"अग सुंदरी, जरा मागे वळून तर बघ! मी तुला टाकून खरेच कोठेही निघून जाणार नाही, वचन देतो; पण जरा थांब तरी.
पार्वती लगेच थांबली आणि लाडिक हसून म्हणाली, मग असे करा. तुम्ही माझ्या घरी या. मग मी तुमच्याशी नक्की विवाह करिन . जरूर जरूर ! चल मी आताच तुझ्याबरोबर येतो. " असे म्हणून शंकर तिच्यामागोमाग लगेचच चालू लागले. पार्वतीने अशा रीतीने शंकराला भुलवून कैलासावर आणले. सिंहासनावर बसवले आणि मनापासून षोडशोपचारे पूजा केली. मग शंकराच्या गळ्यात माळ घातली आणि शंकराचे चरण घट्ट पकडले.
शंकर आश्चर्याने भिल्लिणीकडे पाहू लागले. तेव्हा देवीने आपले मूळचे खरे स्वरूप प्रगट केले. आता दोघे एकमेकांकडे पाहात राहिले. पार्वतीने आपला राग घालविण्यासाठी पूर्णपणे फसविले हे त्यांनी ओळखले. नंतर शंकरांनी हसून पार्वतीला आपल्याजवळ घेतले. अशा रीतीने पार्वतीने रूसलेल्या शंकराची समजूत घालून त्यांना कैलासावर आपल्या घरी परत आणले.
सुत शौनक व इतर ऋषींना ही कथा सांगत होते. पुढे काय झाले! असेच एकदा शंकर-पार्वती बोलण्यात अगदी दंग झालेले असताना नारदमुनी वीणा वाजवीत तेथे येऊन उभे राहिले.
पार्वतीने यावेळीही त्यांचा यथोचित आदरसत्कार केला. सत्कार स्वीकारल्यानंतर शंकरांशी गप्पा मारता मारता नारदमुनी म्हणाले, "हे विश्वनाथा, तुझे पुष्कळ चांगले चांगले भक्त मी पाहिले; पण खरोखर राजा श्रियाळासारखा श्रद्धावान भक्त एखादाच म्हणायला हवा. तो खूप गंभीर, अतिशय उदार आणि सदाचरणी आहे. आपल्याकडे आलेल्या शरणागताला कृपाळू मनाने क्षमा करणारा आहे. दहा हजार वर्षे त्याने अन्नछत्र चालवले आहे आणि तेथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीला इच्छाभोजन देतो आहे. तेथे चटकन न मिळणारी वस्तूही एखाद्याने जर मागितली तर खूप खूप प्रयत्न करून राजा श्रीयाळ त्याच्यासाठी ती वस्तू घेऊन येतो आणि अतिथीला संतुष्ट करतो, अशी त्याची सर्वत्र कीर्ती आहे. आणि विशेष म्हणजे तुझा तो फार मोठा अनन्यसाधारण भक्त आहे. मी आताच कांतिनगरीतून आलो असल्याने मला सहज राजा श्रीयाळची आठवण झाली. "
एवढे बोलून झाल्यावर थोड्या वेळाने नारदमुनी निघून गेले. शंकरांनी ठरवले, की आपल्या असल्या भक्ताची- राजा श्रीयाळची परीक्षा घ्यायची. मग शंकरांनी काय केले ? स्वतः अतिशय घाणेरडे रूप धारण केले, आणि अतिथी म्हणून श्रीयाळ राजाच्या दारात तो उभा राहिला. अतिथी अतिशय कोपिष्ट दिसत होता. त्याचे बोलणेही कठीण होते.
आपल्या दारात अतिथीचा आवाज ऐकून राजा श्रीयाळ व चांगुणा दोघेही घराबाहेर आले आणि त्यांनी त्या अतिथीचे पाय धरले. तुम्ही मला इच्छाभोजन देणार आहात का ? तरच माझे पाय धरा नाहीतर मी तुमचे सत्त्व घेऊन आलो तसा परत जातो.
आपण म्हणाल तसे भोजन तयार करवतो. आत चलावं. हे याचका, आपण घरात प्रवेश करावा! अतिथीपूजा व इच्छा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. आपण आपली इच्छा सांगावी.' असे नम्रपणे म्हणून राजाने अतिथीला आत नेले आणि आसनावर बसविले. त्याचे अत्यंत कठोर शब्द ऐकत षोडशोपचार पूजा केली आणि हात जोडून त्याला राजाने म्हटले, आज्ञा व्हावी. लगेच त्याप्रमाणे घडेल. मला नरमांसाचे भोजन हवे आहे. तू कुणाला तरी धरून आणून मारशील; पण तसे वाट्टेल त्याचे नरमांस मला नको आहे. " अतिथीरूपी शंकर कठोरपणाने म्हणाले.
मी माझे मांस आपणास द्यायला तयार आहे. "चांगुणा राणी नम्रपणाने म्हणाली. "छे, छे! माझ्या सुकुमार राणीच्या मांसापेक्षा मी 'महाराज, माझे मांस देतो. त्याचा आपण स्वीकार करा. राजा श्रीयाळ म्हणाला. 'हे पाहा, तुम्ही दोघे अत्यंत पवित्र आहात; परंतु याचकांचे मातापिता आहात तेव्हा तुम्हांला मी खाऊन टाकले तर हे अन्नछत्र कायमचे थांबेल, म्हणून तुमचे मांस मला नको; परंतु तुमचा पाच वर्षांचा बत्तीस लक्षणांनी युक्त असलेला सुंदर, एकुलता एक असा चिलया बाळ आहे ना, त्याचे मांस मला द्या. ते मला चालेल.
अतिथीचे बोलणे ऐकून दोघांच्या डोळ्याला क्षणभर अंधेरी आली. मन एकदम बधिर झाले; पण मायासह क्षणात अगदी दूर सारून राजा श्रीयाळ अतिथीला म्हणाला,माझा बाळ मी तुम्हांला देऊन टाकला, घेऊन जा. मी काय जंगलातला वाघ आहे का लांडगा आहे ? तुझा मुलगा नेऊन मी काय त्याला कच्चा खाणार आहे का ? त्याचे मांस शिजवून तुम्ही मला आनंदाने वाढा... तुम्ही जर रडू लागलात तर मी पानावरून उठून निघून जाईन. त्याबरोबर तुमचे सत्त्वही जाईल. " शंकर कठोरपणे म्हणाले. अश्रू पुसून चांगुणा राणी उभी राहिली आणि तिने बाहेर खेळणाऱ्या चिमण्या बाळाला हाक मारली. बाळ धावत धावत | आत आला. आल्याबरोबर आईवडील आणि अतिथी सर्वांना नमस्कार करून आईला म्हणाला, 'मला का बोलावलेस आई ? "
"हे आपले अतिथी भोजनासाठी तुझे मांस मागत आहेत, त्यांना संतुष्ट करण्यासाठी म्हणून हाक मारली. एवढेच ना? हा माझा देह मी कधीच शिवार्पण केला आहे. त्याचा मला मुळीच मोह नाहीं. मला खाऊन जर अतिथीमहाराज संतोषतील तर प्रत्यक्ष शंकरच माझ्यावर खूष झाले असे होईल. मी यासाठी तयार आहे आई.
चांगुणेने आपल्या बाळाला कडेवर उचलून आत नेले. त्याला हृदयाशी घट्ट धरून तिने त्याचे चुंबन घेतले. "आई, मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईन. आता शोक करू नकोस. उगीच अतिथींना उशीर होईल ना ! "
आपल्या मनातील मायामोह दूर सारून चांगुणेने चिलया बाळाला ठार मारले. त्याचे शिर तसेच ठेवून अंगाचे मांस काढून घेतले आणि ते शिवजले. 'अतिथीदेवा, भोजनाला चलावं. आपल्या इच्छेप्रमाणे आमच्या एकुलता एक बाळाचे मांस आपण भक्षण करून संतुष्ट व्हावे. अनंत ब्रह्मांडाचा समाचार घेणाऱ्या भगवान शंकरांना चांगुणेने आपल्या मुलाचे शिर ठेवून दिले आहे हे समजल्याशिवाय थोडेच राहणार ! नाना नाटकी शंकर न जेवता तसेच उठून चालायला लागले. राजा श्रीयाळ व चांगुणाने त्यांना अडवले आणि असे रूष्ट होऊन जाण्याचे कारण विचारले. आमच्या हातून काही अपराध घडला का असे विचारून क्षमा मागितली.
"मानवाच्या सर्व गात्रांत शिर हे अतिशय मुख्य असताना ते तुम्ही ठेवून दिले आणि.... " 'अतिथीमहाराज, आम्ही ते शिरकमळही आनंदाने शिजवून आपल्याला वाढतो, रागावू नका. आमच्या अज्ञानामुळे काही चूक झाली असेत तर क्षमा करा..
अतिथी पुन्हा आसनावर येऊन बसला आणि त्याने चांगुणेला ते चिलया बाळाचे शिर बाहेर आणून त्याच्यादेखत उखळात घालून कांडायची आज्ञा दिली आणि पुन्हा एकदा कठोरपणे बजावले, जर तुझ्या नेत्रात मी सत्त्वही घेऊन जाईन.. अश्रू आले तर पुत्र गेलाच आहे, चांगुणेने हृदयावर दगड ठेवून आनंदाने आतून चिलया बाळाचे शिर आणले. निजसत्त्वाचे उखळ करून, धैर्याचे मुसळ हातात धरून अतिशय निराधाराने ती बाळाचे शिर कांडत होती. राजाचे अगत्य व चांगुणेचा निर्धार पाहून अतिथीरूपी शंकरही मनात अतिशय सद्गदित झाले होते; पण तरीही त्यांनी “गाणी गात गात हे काम कर. नुसते मुक्याने कांडू नकोस. असे सांगितले. ती कोमलहृदयी, अतिशय सुकुमार, अत्यंत सुंदर अशी चांगुणा अतिथीच्या आज्ञेप्रमाणे गाऊ लागली. गाण्याचा आशय असा होता 'हे सुकुमार चिलया बाळा, माझ्या पदरी तू आलास आणि मी खरोखरीच धन्य झाले. सुकुमारा, माझे मुसळाचे घाव तुझ्या मस्तकाला लागत आहेत, मला त्याची पूर्णपणाने जाणीव आहे.
आता 'तुझ्याशिवाय मी खरेच भिकारी झाले आहे, अतिशय दुबळी झाली आहे. मला आता पान्हा फुटला आहे. कंचुकीबाहेर दुग्धधारा वाहात आहेत. त्यांचा भूमीवर अभिषेक होत आहे. बाळा, हे अतिथी आत्ता जेवून राजद्वाराबाहेर गेले, की मी या देहाचा त्याग करून तुझ्या मागोमाग लगेचच येईन. बाळा, तू एकटाच कैलासाच्या वाटेने कसा जातोस ? थोडा वेळ वाटेतच थांब..मलाही तुझ्याबरोबर घेऊन चल. तू एवढे मोठे पुण्य प्राप्त करून प्रत्यक्ष कैलासाची प्राप्ती करून घेतली आहेस. मी तुझ्याबरोबर आले तर माझाही खरोखर उद्धार होईल. पाण्यावाचून जसा एखादा मासा तडफडतो तशी मी तुझ्यावाचून आता तडफडते आहे. मी अशी क्रूर बनली आहे.... ... आता मी लोकांना तोंड तरी कसे काय दाखवू ? मला लाज वाटते आहे. तू तर जीवनाचे सार्थक करून खरोखरीच शिवपदास गेला आहेस. ह्या संपूर्ण त्रिभुवनात तुझ्यासारखा बाळ शोधूनसुद्धा सापडणार नाही.'
नंतर चांगुणेने चिलयाचे शिरही शिजवले. अतिथीला राजाराणीनी बाहेर जाऊन परत एकदा 'जेवायला चला' अशी विनंती केली. अतिथीने यजमानाला म्हणजे राजा श्रीयाळला 'आपल्याबरोबर जेवायला चल, असे सांगितले. आपल्याच मुलाचे मांस आपण कसे खाणार म्हणून क्षणभर राजा भांबावला. तेव्हा चांगुणाराणी धीराने म्हणाली, "नृपश्रेष्ठ, आता तुम्ही आपले सत्त्व जाऊ देऊ नका. आपल्या घरी आलेल्या अतिथीला विन्मुख पाठवू नका. मी नऊ मास बाळाला उदरात जपला होता. मग तुम्हांला त्याला चार प्रहर आपल्या पोटात जागा द्यायला काय हरकत आहे ? चला, अतिथीबरोबर जेवायला बसा.
चांगुणेचे बोलणे ऐकून राजाही गुपचूप उठला. चांगुणेने ताटे वाढून आणली. " तूही आमच्याबरोबर बस. " असे अतिथीने म्हणताच तीही पानावर बसली. एवढ्या कठीण प्रसंगातही दोघे सत्त्व जाऊ देत नव्हते म्हणून आणखी एक परीक्षा घेण्याचे शंकराने मनात ठरविले.
पुन्हा अतिथी जेवायचा थांबला. राजाराणी दोघेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले, तेव्हा तो म्हणाला, "तुमच्या घरी मी अन्न घेऊ शकत नाही. निपुत्रिक माणसाचे तोंडसुद्धा पाहू नये असे आपले शास्त्र सांगते. दिव्यावाचून जसे घर दिसते तसे पुत्राशिवाय तुमचे घर दिसते आहे. एखादा नाक नसलेला चेहरा, फळे नसलेला वृक्ष, बुबळे नसलेले डोळे जसे शून्य, उदास दिसतात तसे तुमचे घर मला दिसते आहे. " अतिथीचे असे हे बोलणे ऐकून चांगुणा व्याकुळ झाली. आपला एकुलता एक मुलगाही गेला आणि शेवटी सत्त्वही गेले, टाहो फोडून मोठ्याने रडत ती म्हणाली, "देवा, माझा एकुलता एक बाळ त्याच्याच इच्छेप्रमाणे मी अतिथीला भोजनासाठी अर्पण केला आणि आता मी पुत्र आणू कुठून ? माझा बाळ तर उगाचच गेला. आणि माझे सर्व सत्त्वही गेले. अरे शंकरा, तू आहेस तरी कुठे? तुला माझी दया कशी येत नाही ? उमाकांता, आता लवकर धाव घ्या आणि येथे या. आमचा वंश संपला, मी आता बाळाला कुठे पाहू ? " चांगुणेचा तो मातृशोक ऐकून अतिथीरूपी शंकराचे डोळे अश्रूंनी एकसारखे गळू लागले.
इकडे सर्व नगरात ही बातमी वाऱ्यासारखी पोहोचली होती.. लोक दुःखाने रडत रडत राजवाड्याकडे धावत येत होते. राजपुत्राचे गुण ऐकून रडत होते. यावेळी हा प्रसंग पहाण्यासाठी देवांच्या विमानांनी आकाशात दाटी केली होती. श्रीयाळ आणि चांगुणेची सर्वजण मनापासूनच स्तुती करीत होते. आता शंकर पुढे आणखी काय करतात ते अतिशय उत्सुकतेने बघत होते. अतिथी चांगुणेला म्हणाला, “हे सद्गुणी स्त्रिये, तुझी सत्त्वशीलता मला आवडली. मी संतुष्ट झालो आहे. आता तुला सर्वांत काय प्रिय आहे ते मागून घे... या जगात आता मला सर्वजण निपुत्रिक म्हणतील. माझा आयुष्यातला तो कलंक घालवा. मला दुसरे काही नको. मग तुझ्या चिलया बाळाला तू हाक मार. अतिथीरूपातील शंकर चांगुणेला म्हणाले. "तुझी इच्छा पूर्ण होईल. "
आपल्या देखत आपल्याच हातांनी मरण पावला आहे हे माहीत असूनही अतिथीवर विश्वास टाकून तिने बाहेर जाऊन बाळाला हाक मारली, "चिलया बाळा, लवकर लवकर पळत पळत ये. हा अतिथी तुझ्याशिवाय घास घेत नाही...तू कुठे गुंतला आहेस ? माझ्या पाडसा, धावत ये आणि आमचे सत्त्व तूच राख ! तू आला नाहीस तर माझे हे प्राण आताच उडून जातील. लवकर ये राजा. आणि काय आश्चर्य! सूर्यासारखा तेजस्वी झालेला चिलया बाळ राजवाड्याबाहेरच्या अंगणातून धावत धावत आईकडे आला. मायलेकरांची ती भेट पाहून राजा श्रीयाळही प्रेमाने भारावला होता. त्याच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू उभे राहिले. त्याने हात जोडून शंकराचे स्मरण केले.
राजा श्रीयाळ सत्त्वपरीक्षेत उतरला हे पाहून भगवान शंकरही मनापासून संतुष्ट झाले आणि अतिथीरूप टाकून शंकर स्वतः च्या रूपात प्रगट झाले. त्यांनी चिलयाला हृदयाशी धरले. श्रीयाळ व चांगुणा शंकराच्या पाया पडली. सर्व देवांनी वरून पुष्पवृष्टी केली. सर्व नगरात आनंदीआनंद झाला. लोक राजवाड्याकडे धावत येऊ लागले. मंगल वाद्ये वाजू लागली. चिलयाला राज्याच्या गादीवर बसवून, प्रधानांचे हातात सर्व राज्यकारभार देऊन शंकरांनी पाठवलेल्या विमानात बसून राजा श्रीयाळ व राणी शिवपदाला जाऊन पोहोचली.
कांतिनगरात सौख्याचा सागर उचंबळला. श्रीधरस्वामी म्हणतात असा हा ब्रह्मानंद अभंग आहे. तो कधीच नाहीसा होत नाही. तो लवकर कोणालाच सापडत नाही; पण सापडला म्हणजे संपतच नाही. अशा रीतीने चौदा भुवनांचे सार सांगण्यासाठी हे चौदा अध्याय सांगितले. हे अध्याय म्हणजे चौदा विद्यांचे सार आहे. चौदा रत्नांचा प्रकाश येथे एकत्र झाला आहे.
हे अध्याय नुसते श्रवण केले, वाचले, आपल्या हातांनी लिहिले, भक्तीने ग्रंथाचे मनापासून संरक्षण केले, ह्या अध्यायामुळे शंकरांचा जरी नुसता ध्यास लागला, किंवा यातील अर्थाला अनुमोदन दिले... यांपैकी काहीही केले तरी सर्वांना सारखेच फळ मिळेल. शिवशंकर त्यांच्यावर प्रसन्न होईल. त्यांच्यावर कृपा करील आणि अशा भक्तांचे आईप्रमाणे रक्षण करील. त्या भक्तांना आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही त्वरित मिळेल. त्यांच्या मनातील सर्व चिंताव्याधी नष्ट होतील. जिला पुत्र नसेल तिला पुत्र प्राप्त होईल. पुष्कळ दिवस न भेटलेला बंधू किंवा पिता अकस्मात येऊन भेटेल व मनाला तृप्ती देईल. असलेले कर्ज सहजतेने अल्पावधीत फिटेल. घरात लक्ष्मी नांदेल. सारे शत्रू नष्ट होतील. ज्याच्या घरी या ग्रंथाची पारायणे नियमितपणे होतात त्या घरी शिवभक्त असा पुत्र निपजेल. ज्या घरात फक्त हा ग्रंथ असेल त्या घरात भूतपिशाच्च अजिबात पाऊलही टाकू शकणार नाही.
या ग्रंथाचे सलगतेने असे तीन महिने पारायण केले तर सर्व संकटांचा संपूर्ण नाश होतो. सोमवारी, शिवरात्रीला किंवा प्रदोषकाळी या ग्रंथाची पूजा केली आणि शुचिर्भूत होऊन स्वस्थपणे झोपेल तर शंकर स्वप्नात येऊन त्याला स्वतः दर्शन देतील. जे जे संकट असेल त्याचा नाश करतील. श्रीधरस्वामींनी आपल्या मातापित्यांना अत्यंत आदराने आणि नम्रपणाने वंदून शके सोळाशे चाळीसमध्ये फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा ग्रंथ लिहून पूर्ण केला.
'हे अपर्णाजीवना, कर्पूरगौरा, ब्रह्मानंदाजगदुद्धारा, दयानिधे, शंकरा, तुला भक्तिभावाने नमस्कार करून हा चौदा अध्यायांचा शिवलीलामृत ग्रंथ पूर्ण करतो.
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
॥ शुभं भवतु ॥
अध्याय समाप्त !
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.