Subscribe Us

Shivlilamrut Adhyay 6 || श्रीशिवलीलामृत कथासार || श्री शिवलीलामृत अध्याय ६ || श्री शिवलीलामृत अध्याय सहावा

 ॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥

 अध्याय ६ 

चित्रवर्मा राजाची कथा


  
भाग :-१ 

                    
           हे कामदेव अर्थात मदनाला जाळणाऱ्या मनमोहना मदमत्सररूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या, गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा, कर्पूरगौरा, विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा रंग आला आहे, अशा हे महेशा, दुष्ट आणि बलाढ्य राक्षसांचा नाश करणारा, त्रितापाचे हरण करणारा, सर्व भक्तांचा प्रियसखा असा जो शंकर त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही.

         जे आपल्या मनात विषयसुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषयपदार्थ तू मिळवून देतोस, मग तुझ्याकडे त्यांचे खरेच ध्यान लागते. त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात. सोमवार, शिवरात्र आणि प्रदोष ही व्रते विधिवत् करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत. शौनक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐका. मी आता

             'पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता. पूर्वीच्या नलराजा किंवा सत्यव्रती हरिश्चंद्रराजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता. तो गोब्राह्मण प्रतिपालकसुद्धा होता. तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता. शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे.

               भगीरीरथाप्रमाणे तो फार फार प्रयत्नशील होता. तसेच, मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरांगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता. शंकर आणि विष्णु अशा दोघांचीही तो नेहमी भक्ती करीत असे. त्याला त्याच्यासारखेच शूर असणारे अनेक पुत्र होते; पण कन्या नव्हती. कन्येसाठी त्याने देवांना अनेक नवस केले आणि त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली. ती इतकी सुंदर होती, की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते. कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल व नयनमनोहर होते. विधात्याने त्रैलोक्यातले सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते. तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण

                राजवाड्यात जमले होते. तिची अचूक जन्मवेळ पाहून मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, "पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहेत. ती खरोखरच दहा हजार वर्षे या पृथ्वीवर राज्य करील.” हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनात फारच खूष झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन, धान्य दान केले, अलंकार दिले. उत्तमोत्तम भरजरी वस्त्रे दिली. पत्रिका

               मुलीचे बारसे मोठ्या थाटात साजरे झाले. रूपाची सीमा या कन्येपाशी झाली म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले म्हणून राजाने तिचे नाव 'सीमंतिनी' असे ठेवले. सर्वत्र अतिशय आनंदीआनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, " सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे; पण सीमंतिनीसला तिच्या चौदाव्या वर्षी वैधव्ययोग आहे तो काहीही करून टळला पाहिजे.

               पंडिताचे भाषण ऐकून राजा मनातून खूपच खिन्न झाला. आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे किंवा कुणीतरी वज्राचा आघात आपल्या शरीरावर करीत आहे असेच त्याला वाटले.

              पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काहीही कारण नाही. शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल, याची खात्री बाळग. तू शंकराची भक्ती कर. मी बोललो ते कधीही खोटे होणार  नाही. आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही. ' राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. सर्व आमंत्रित ब्राह्मण व दूतर पाहुणे मंडळी आपापला घरी निघून गेली. हळूहळू दिवस जात होते. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सीमंतिनी मोठी होत होती. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांत ती अतिशयच निपुण झाली होती. आता सीमतिनी उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करकरून त्याचा मेंदू फार फार शिणला होता.

            सीमंतिनी आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळासुद्धा लाजून गप्प बसत असत. तिच्या सर्वांगाला असा काही सहजसुंदर मधुर सुवास येत असे, की कस्तुरीच्या मागे शोध येत पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सीमंतिनीच्या मागे धावत असत. वडिलांना तर ती जीव, की प्राण वाटत होती. तिचे मुखकमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे. तिची नाजूक कटी बघून सिंह लज्जित होत असत. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्याभोवती फिरून रुंजी घालत असत. कमळे, हरणे आणि मासे तिचे तेजस्वी, सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असत. लांबसडक केसांची काळीभोर, इकडे तिकडे हलणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसे. तिची सरळ नासिका पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारीत असत. तिचे लालचुटुक ओठ पाहिल्यावर बिंबफळे लाजत असत. डाळिंबाचे पांढरेशुभ्र दाणे एका ओळीत ठेवावेत असे तिचे दात सुंदर होते. कमंडलूसारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा दरवळणारा सुवास दहा मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रभाही तशीच सर्वत्र पडत असे.

       तिच्यासारख्याच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत. तिच्याशी गप्पा मारत. त्यांच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते, आपल्याला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितलेले आहे. ते ऐकल्यानंतर सीमंतिनी मनातून फार घाबरली होती. आणि म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी पत्नी मैत्रेयी भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गहिवरल्या आवाजात सीमंतिनी तिला म्हणाली, "हे माते, तुला मी शरण आले आहे. माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी, सौभाग्य वाढण्यासाठी मी कोणते व्रत करू ? याचे मार्गदर्शन तू मला कर. कोणत्या देवाची पूजा करू ? कोणत्या गुरूला शरण जाऊ? ते तू मला सांग. मला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार आहे, असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे. ही दुर्गती टाळण्यासाठी मग आता मी करू तरी काय ? "

           मग तिला धीर देत मैत्रेयी म्हणाली, "मुली, शांत हो, मी सांगते ते तू ऐक. तू सोमवारचे व्रत धर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते तो कायम लक्षात ठेव. आणखी काय काय करायचे ते नीट ऐकून घे. रात्री शंकराची यथासांग पूजा करावी. गंध, अक्षता, फुले, पंचामृत, नैवेद्य अशी षोडशोपचाराने पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी हे व्रत सोडू नको. ब्राह्मणभोजन घाल. सवाष्ण ब्राह्मणाचे मेहुण सांग, त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर  मोठेमोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळू नकोस. तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको." मैत्रेयीने सीमंतिनीला उपदेश केला. आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सीमंतिनीने सोमवारचे व्रत धरले.

           सीमंतिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच. नलराजाचा नातू आणि आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रांगद हा वर सीमंतिनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबांच्याप्रमाणे नलराजाच्याप्रमाणे चित्रांगदही फार शूर, पराक्रमी होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा सुंदर तरुण पुरुष नव्हता. सीमंतिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला.

              सीमंतिनी यती मैत्रेयीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरीत होती. दर आठ दिवसांनी आपल्या घरी अकराशे सवाष्ण-ब्राह्मण ती जेवू घालीत असे. त्यांना चांगले वस्त्रालंकार देत असे. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे. यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरीतील रत्नखचित शिवमंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजाविधीत ती काहीही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. त्याला गंध, अक्षता, फुलांच्या माळा वाहिल्या, की स्त्रीचे सौभाग्यवर्धन होते. शिवापुढे धूप जाळला, की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला, की दिवा लावणाऱ्याचा  वंश वाढतो, त्याचे आयुष्य वाढते. शिवाला नैवेद्य दाखवला, की त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. विडा ठेवला, की चारी पुरुषार्थ मिळाल्यासारखे होते. मनोभावे नमस्कार केला, की आरोग्य लाभते. शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या, की मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला, की त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होमहवन केले, की संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकरच त्याच्यापुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केले, की ध्यान करणारास महाज्ञान मिळते. शिवाचे गुणगान ऐकले, की आधीव्याधी नष्ट होतात. शिवापुढे नृत्य केले तर जन्ममरणाचा फेरा चुकतो. भगवान शंकराला अलंकार वाहिले, की सर्व ठिकाणी जय मिळतो. ब्राह्मण-भोजन घातले, की त्याला हवे असेल ते प्राप्त होते. सीमंतिनी अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करीत होती. शिवपूजनात मन होती.

                    चित्रवर्मा राजाने चित्रांगदाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सीमंतिनी त्याला अर्पण केली. संपूर्ण नगरीत चार दिवस डोळ्याचे पारणे फिटण्यासारखा फार मोठा सोहळा सुरू होता. त्याचे वर्णन केले तर कथाफार वाढेल. सहस्र अब्ज सोन्याच्या मोहरा राजाने आपल्या जावयास वरदक्षणा म्हणून दिल्या. वस्त्रे, अलंकार, रत्ने किती दिली यांची तर गणतीच करणे कठीण. तसेच, अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा आणि नृत्यशाळा याही त्याने जावयाला आंदण दिल्या. चार दिवस चारीवर्गाचे सर्व लोक जेवायला बोलावून त्यांना स्वादिष्ट व यथेष्ट जेवण देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना एवढे धन दिले, की त्यांना ते उचलून नेणेसुद्धा शक्य होईना. म्हणून त्यांनी त्यातील काही रस्त्यात टाकून दिले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्याने दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव करू लागताच दारिद्रयाचा धुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्तीरूपी तृणांकुर नगरीत सगळीकडे उगवले.

         नैषधनगरीचे लोकसुद्धा वधू सीमंतिनीला पाहून फारच खूष झाले होते. चंद्राच्या सोळा कला चिरून तिचे बत्तीस दात बनवले आहेत का काय, असा तिच्याकडे पहाणाऱ्या प्रत्येकास भास होत होता. तिच्या श्वासोच्छ्वासात सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमाच देता येत नव्हती.

             लग्नसमारंभ आनंदाने आणि अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर वऱ्हाडासह राजा इंद्रसेन नैषध देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले.

            अगदी कृष्ण-रुक्मिणीसारखा चित्रांगद-सीमंतिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्यांची सर्व हौसमौज चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले !

                आपल्याबरोबर आपले खास दासदासी आणि मोठी सेना घेऊन चित्रांगद राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनाजोगती झाली; पण त्या धावपळीने राजाला फार फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते. म्हणून त्याने एक सुंदर नौका मागविली आणि आपल्या एका विश्वासु शरीरक्षकाला घेऊन चित्रांगद राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणाने विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनेच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपल्या राजाच्या म्हणजे आपल्याच जावयाच्या रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते.

             यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे ? यमुनेच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्या वेळातच ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली आणि त्याबरोबर लोक आकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूर वीर होते; पण अशा स्थितीत काय करावे ते त्यांना कळतच नव्हते. धावत पळत आणि रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि त्याला त्यांनी ही बातमी सांगितली.

               छाती दुःखाने बडवतच राजा यमुनेकाठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सीमंतिनीही तेथे आली. सर्वजण शोकसागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्च्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसेतरी सावरले. सीमंतिनीची आई आपल्या मुलीच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सीमंतिनीचा त्यावेळचा शोक ऐकून पृथ्वीसुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणीही खूप तापले. पशु, पक्षी, वृक्ष, लता, पर्वत सर्वजण सीमंतिनीच्या बरोबर शोकसागरात आकंठ बुडाले. दुःखाचा अतिरेक झाल्याने सीमंतिनी तेथेच बेशुद्ध पडली. तेवढ्यात चित्रांगदाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला.

               सुनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रांगदाची आई, लावण्यवती खालची जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत अतिशय शोक करू लागली. माझा एकुलता एक लाडका बाळ ह्या कालिंदीने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करतो आहे ? माझी आंधळीची आधाराची काठी यमुनेच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे ? माझे पाडस कोठे आहे ? माझा चित्रांगद कुठे लपला आहे ? कुणीतरी मला दाखवा हो... मी पूर्वी काय पाप केले ? भगवान शंकराचे प्रदोष व्रत मधेच सोडले ? का शिवरात्रीला उपवास न करता जेवण केले ? का सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले ? असे मी केले तरी काय ?

                  विष्णू आणि शंकर यांच्यात मी कधी तरी भेदभाव केला का, हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी मोडता घातला का पंक्तिभेद केला? का मी दुसऱ्याच्या धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली ? माझ्या हातून असे भयंकर काय घडले तेच मला कळत नाही.

              'का मागच्या जन्मी दान देते म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले होते ? कुणी दाता दान करीत असेल तेव्हा त्यात मी विघ्न आणले होते का? कुणाच्या तोंडचा घास काढून मी घेतला ? की गुरूचा द्रोह केला, का पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून लावले, का हरिणी आणि तिच्या पाडसाला मी कधी विरहाचे दुःख दिले, काही कळत नाही. माझे सौख्यनिधान आज एकाएकी नष्ट झाले! आता मी काय करू ? "

              प्रधानांनी, मंत्र्यांनी राजाराणींना कसेबसे सावरून धरले. चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन, त्याची पत्नी लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नागरीला परत गेले. तो आपले नैषध देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले. शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले; पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले.

               सीमंतिनीनेसुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला. आता मैत्रेयीने सांगितलेल्या गोष्टीचे तिला स्मरण झाले. ती म्हणाली होती केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. सीमंतिनीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले. दर आठ दिवसांनी अकराशे सवाष्ण-ब्राह्मणांची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखोपभोगाचा त्याग केला. दिवस-रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी... एक... दोन.. तीन वर्षे निघून गेली.

             इकडे जेव्हा चित्रांगदाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळनगरीत नेले. तेथील नागलोकाचे सौंदर्य पाहून चित्रांगद राजा फार फार आश्चर्यचकित झाला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंखिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरूणी होत्या. त्यांच्या दिव्य सुगंध येत होता. तपस्व्याचे असे सौंदर्य त्यांना लाभले होते. सर्व विस्तीर्ण व लांब रस्त्यावर नवरत्नांचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहूनही येथील नागलोकांतले सुख श्रेष्ठ होते. पाताळनगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्यांनी चित्रांगदाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रांगद राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रांगदाने आपली सर्व हकीगत त्याला सविस्तरपणाने सांगितली.

          तक्षकाने विचारले, "तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता ? 'आम्ही भक्ती करतो शंकराची. शंकरकृपेचा महिमा फार अगाध आहे. " चित्रांगदाने उत्तर दिले.

              प्रकृती आणि पुरूष दोघेही शंकरांनीच निर्माण केली आहेत. या अनंत ब्रह्मांडाचा सारा सारा पसारा त्यांनीच मांडला आहे. त्यांची इच्छा बदलली तर एका क्षणात ते त्यांनी निर्माण केलेल्या या सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृतिपुरुषात सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदिपुरुषात सामावतात. आदिपुरुष आदिपुरुष ज्याला म्हणतात तो आदिपुरुष म्हणजेच सदाशिव. आम्ही त्याचीच मनापासून भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले. त्यांचा सत्त्वांश म्हणून त्यांनी विष्णूची निर्मिती केली, रजांश म्हणून विरंचीस निर्माण केले आणि तमांश म्हणून रुद्र निर्माण झाला. तो पुराणपुरुष असणारा सांबसदाशिव ) दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव आहे. आम्ही आपल्या मनापासून त्याची भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन, इतकेच नव्हे तर पंचतत्त्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू हे सर्व व्यापूनही जो शिल्लक उरला आहे त्या शिवाची मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेनेच, फुले, वनस्पती, लतावेली हे सर्व काही निर्माण झाले आहेत. ज्या कैलासनाथाने ही पृथ्वी, हे सर्व विश्व व्यापले आहे त्याचे आम्ही नम्र उपासक आहोत.


भाग २ वाचण्यासाठी इथे क्लिक करा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या