॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥
अध्याय :-६
चित्रवर्मा राजाची कथा
भाग :-२
तेजस्वी असा सूर्य ज्याचे नेत्र आहेत, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजेच ज्याचे अंत:करण आहे, बुद्धी ज्याची दुहीण आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे असा तो विराट पुरूष सांबसदाशिव आहे. जितके जितके देव आहेत ते सर्व शिवाचे अवयव आहेत. अकरा रूद्र आणि मित्र त्याच्यासमोर हात जोडून सदोदितच उभे असतात. अशा शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करणार ? मी म्हणजे शंकराच्या दासाचाही दास आहे.
चित्रांगदाचे हे नम्र व चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने स्वतः सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, " चित्रांगदा, तू मला फार आवडतोस ! देवांना कष्टानेसुद्धा मिळणार नाहीत अशा कित्येक गोष्टी येथे आहेत. तेव्हा तू माझ्याजवळ इथेच रहावेस अशी माझी इच्छा आहे.
चित्रांगद नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्या आई-वडिलांचा मी एकुलता एक पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सीमंतिनी फक्त चौदा वर्षांची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडला असेल. माझ्या घरी जाऊन आई वडिलांच्या पायाची सेवा मी कधी करीन असे मला झाले आहे. माझ्यावाचून माझी माता अगदी रोज एखाद्या माशासारखी तळमळत असेल. तिचे सारे प्राण नेत्रांत गोळा झाले असतील, तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रांगदाने कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे चक्क पायच धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या. त्याचबरोबर बारा सहस्र नागांचे बळ त्याला दान केले आणि जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल अशा वेळी माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याजवळ येईन" असेही आश्वासन दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणीही सप्रेम भेट दिला. भेट मिळालेल्या सर्व वस्तू एकत्र बांधल्या तर त्याचे पर्वताएवढे गाठोडे झाले. राक्षसांच्या डोक्यावर ते भलेमोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसवून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनेच्या तीरावर आणून सोडले.
नेमके त्याचवेळी सीमंतिनी यमुनेत स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघंही एकमेकांकडे अगदी टक लावून पहात होती; पण बोलत मात्र कुणीच नव्हते. त्याने सीमंतिनीला आपली ओळख दाखवली नाही. चित्रांगद राजा आता पूर्वीपेक्षा फारच तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची माळ तिने आपल्या गळ्यात घातलेली होती. तिच्या कमरेच्या कमरपट्ट्यावर पाचूंनी सुंदर नक्षीकाम केले होते. त्याचा प्रकाश धरणीवर पडला होता. तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवताच्या आशेने हरणे तिकडे धावत येत होती. अंगाला चंदनाचा सुवास येत होता, त्यामुळे अवतीभवती भुंगे गुंजारव करीत होते. चित्रांगद राजाला असे एकटक पाहून तिचे मन तृप्त होत होते. टक लावून सीमंतिनी त्याच्याकडे पहात होती. चित्रांगदही तटस्थ राहून तिच्याकडे पहात होता. स्वर्गातील रंभा उर्वशीने जिचे दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती; पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते, डोळ्यात काजळ रेखले नव्हते, चिंतेने तिचे शरीर खूप खूप कृश झाले होते, ग्रहण काळात चंद्राला राहूने ग्रासावे तशी ती कोमलांगी काळवंडलेली दिसत होती.
हळूहळू राजा चित्रांगद पुढे झाला आणि त्याने तिला विचारले, 'आपण कोण आहात ? मला आपली सर्व हकीगत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा ! "
मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीगत सीमंतिनीने चित्रांगदाला सविस्तर सांगितली. बोलताना तिने दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सीमंतिनीच्या मैत्रिणीही तिच्याजवळ होत्या. त्यांनी सांगितले, की 'तीन वर्षांपूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यात नावेतून पडून मरण पावला आहे. हिच्या सासुसासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदेत ठेवले आहे. ह्या सुंदरीची त्यामुळेच आज अशी ही दयनीय अवस्था झाली आहे. " तिची अशी ही हकीगत ऐकताना चित्रांगदाचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आपल्या उत्तरियाने तो आपले डोळे पुसत होता.
सीमंतिनीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले, की 'त्यांना त्यांचे नाव, गाव, कुठून आले? हे सर्व विचारा. त्यांच्याबद्दलही जाणून घेण्याची मलासुद्धा फार फार इच्छा आहे. सख्यांनी चित्रांगदाला तसा प्रश्न केला तेव्हा तो लटकेच तिला म्हणाला, 'आम्ही एक सिद्धपुरुष आहोत. तिन्ही लोकात आम्ही मुक्तपणाने संचार करीत असतो. भूत, वर्तमान, भविष्य या सर्वांचे आम्हांला पूर्ण ज्ञान आहे. " एवढे बोलून तिच्याजवळ जाऊन चित्रांगदाने सीमंतिनीचा हात आपल्या हातात धरला व तिच्या कानात सांगितले, " बालिके, तुझा पति मेला हे खरे नाही. तो अजून जिवंत आहे. आजपासून तिसऱ्या दिवशी मी तुझी व त्याची भेट घडवून आणीन. मी शंकराची शपथ घेऊन हे सांगतो आहे. तुझे ऐश्वर्य यापुढे सतत वाढते राहील पण तीन दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नकोस ! "
सीमंतिनी खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पहात होती. त्याच्या मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात साठवत होती. खरोखर हाच आपला पती असेल काय ? पण तो तर मृत्यू पावला आहे, तो परत कसा येईल ? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालवले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केलेच नसते आणि या सिद्धाबद्दलसुद्धा माझ्या मनात प्रेम दाटून येते आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी अकरा लाख वाती लावीन, अकरा लाख बिल्वदले तुला वाहीन. "
सीमंतिनी अशाप्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रांगद मी म्हणाला, सुकुमार स्त्रिये, आता तू खरेच घरी जा. तुझ्या सासू-सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने हे सांगताच सीमंतिनी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाल्या, 'सीमंतिनी, तू विश्वास ठेव. तो नक्कीच राजा चित्रांगद आहे. त्याच्याशिवाय असा तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरे कोण करील ? तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यांतून अश्रू वहात होते ते पाहिलेस ना ? '
" पुरे गं, आता बडबड नका करू. थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल ?" असे म्हणून सीमंतिनीने सख्यांना गप्प केले; पण तिच्या चेहऱ्यावर नकळत सौभाग्याची कळा चमकू लागली.
इकडे चित्रांगद एका क्षणात नैषध नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्यरूप धारण केले व तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आपल्या राज्याकडे आला आहे, तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा. नाही तर त्याच्याशी युद्ध करून त्याच्यापुढे मरायला तयार व्हा. चित्रांगदाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई-वडिलांना पहाताच चित्रांगदाने अतिशय आनंदाने त्यांचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीने आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. त्याच्या कपाळाची खूप आनंदाने कितीतरी चुंबने घेतले. चौदा वर्षांनंतर श्रीरामच कौसल्येला भेटत आहे असे ही मायलेकरांची भेट पाहून वाटत होते. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मांधाला दृष्टी यावी, किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे तसे चित्रांगदाला पाहून लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवलतालचे सर्व राजे व सर्व प्रजा चित्रांगदाला भेटायला उत्तमोत्तम व मौल्यवान नजराणे घेऊन धावत होती. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद या संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता तसाच आनंद चित्रांगदाच्या परत येण्याने आजही दाटला होता.
सर्व नैषधपूर लतापल्लव-पताकांनी शृंगारले होते. मातापित्यासह चित्रांगद प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळवण्यासाठी त्याच्या राज्याकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले आहेत' अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही हे त्याला सुचेना. चित्रवर्म्याच्या नेत्रांतून अखंड आनंदाश्रू वाहू लागले. त्याचा कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभवर्तमान येऊन सांगितले त्यांना राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला गेला. सर्वत्र मंगल वाद्ये वाजू लागली. राजाने आपला खजिना सर्वांसाठी उघडा केला व ज्याला जे जे हवे असेल ते ते घेऊन जावे असे सांगितले. 'जय जय उमानाथ' म्हणून राजा आनंदातिशयाने नाचत होता. त्याचे पायांतील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. सीमंतिनीला सख्यांनी उत्तमप्रकारे सजवले होते. शिवनामाचा जयजयकार करीत तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले होते. तिच्या सुंदर नेत्रांत काजळ रेखले होते. कपाळी कुंकुमाचा सौभाग्यतिलक पुन्हा एकदा लावला होता. दशगुणी विडा करून तिला खायला दिला होता. एकजण तस्त पुढे करीत होती. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सीमंतिनीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या. सीमंतिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमानें मिठी मारून म्हटले, "पोरी, तुझे सौभाग्य आज खरोखरच पुन्हा तेजाने झगमगते आहे, तू अशीच सुखात रहा.
सोमवार व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सीमंतिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे अकरा लाख दांपत्यांचे व्रताचे दिवशी पूजन केले होते. तेवढ्यात चित्रांगद राजा आपल्या आई-वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाने खूप खूप आनंदाश्रू गाळले. दशदिशा अतिशय पुलकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्यांच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आणले आणि तेथे पुन्हा चित्रांगद व सीमंतिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजा नंतर चित्रांगदाने एकांतात सीमंतिनीची भेट घेतली. पाताळनगरीतले आणलेले अतिशय अद्भुतरम्य अलंकार त्याने सीमंतिनीला घालावयास दिले. पाताळनगरीतला सुगंधराज आपल्या हाताने त्याने सीमंतिनीला लावला. लावण्यवती सीमंतिनी आता पाताळनगरीच्या आभूषणांनी आणखीन जास्तच सुंदर दिसत होती..
नंतर आपल्या सासऱ्यालासुद्धा चित्रांगदाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या. आपल्या सासुसासऱ्यांना सीमंतिनेने नम्रपणे नमस्कार केला. तेव्हा 'तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे,' असा त्यांनी तिला शुभ आशीर्वाद दिला.
मग सर्वजण परत नैषधनगरीला आले. पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमताने चित्रांगद राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले राज्य आपल्या मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेले. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रांगदासारखेच तेजस्वी आठ पुत्र सीमंतिनीला झाले. चित्रांगद व सीमंतिनीने दहा हजार वर्षे या पृथ्वीवर सुखाने राज्य केले. पूर्वीच्या नलराजाप्रमाणे चित्रांगदानेही आपली चांगली कीर्ती दाहीदिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्र, सोमवार प्रदोष ही व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवली. सीमंतिनीचीही कीर्ती दाहीदिशात पसरली.
असे हे सीमंतिनीचे सुंदर सौख्यकारक आणि वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे ऐकतील त्यांचे सौभाग्य वृद्धिंगत. कुणाचा पती दूर गेला असेल तर तिला तिचा पती पुन्हा लवकर परत येऊन भेटेल. ज्या विधवा स्त्रिया हे आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी सुंदर पती मिळून चिरंतन सौभाग्याचा लाभ होईल.
म्हणून एकदा सुरु केलेले सोमवार व्रत कोणीही सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्यावर एखाद्याचा हरवलेला मुलगा त्याला पुन्हा येऊन भेटेल. हे आख्यान ऐकणारांचे आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढेल. ज्ञान आणि विद्या प्राप्त होईल आणि मृत्यूचे गंडातर टळेल. जवळचे गेलेले धन प्राप्त होईल. त्यांच्या शत्रूचा त्यांच्याकडून अगदी सहजपणे पराजय होईल.
हे सीमंतिनी आख्यान म्हणजे एक तीर्थांचे तीर्थ मानलेले प्रयागक्षेत्र आहे. भक्तिरूपी माघ मासात यात स्नान करताच लागलेले सर्व दोष नष्ट होतील व अंती शिवपद प्राप्त होईल.
सीमंतिनीचे आख्यान म्हणजे अमृत आहे. फक्त सज्जनांनी हे प्यावे. निंदक, राक्षस, तापट इत्यादी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी केवळ अहंकाररूपी मद्यच प्यावे.
श्रीधरस्वामी म्हणतात, अपर्णेचा पती म्हणजे खरोखरीच ब्रह्मानंद आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.