Subscribe Us

श्री शिवलीलामृत - अध्याय सातवा || Shivlilamrut Adhyay 7 || शिवलीलामृत अध्याय ७ || कृष्णरेखा krushnarekha

॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥

अध्याय:-७ 

भद्रायूची कथा


भाग :-१

हे सारे विश्व व्यापूनसुद्धा उरलेल्या विश्वनाथा, तुझी लीला फार अगाध अशी आहे, मंदस्मित करीत करीत हे शंकरा. तू सहाव्या अध्यायात परमभक्त सीमंतिनीचे संपूर्ण चरित्र सांगितलेस. श्रीधर कवीचे निमित्त पुढे करून त्यांच्या वाणीतून तूच आपले गुणवर्णन केलेस. व्यासरूपाने अवतीर्ण होऊन सूतास मूर्तस्वरूप दिलेस आणि आपल्या भक्तांचे पापहरण करणाऱ्या कथा त्याच्या मुखाने तूच सांगितल्यास. आता आणखी एक कथा ऐकावी. फार पूर्वीच्या काळी विदर्भ देशात वेदमित्र नावाचा एक विद्वान ब्राह्मण रहात होता. त्याच्या एका परम मित्राचे नाव होते सारस्वत. दोघेही वेदशास्त्रात अतिशयच निपुण होते. बुद्धीने खूप तेजस्वी होते. दोघांनाही एक-एक सुपुत्र होता. वेदमित्राच्या पुत्राचे नाव होते सुमेधा आणि सारस्वताच्या पुत्राचे नाव होते सोमवंत.


दोघांच्या वडिलांमध्ये असलेल्या मैत्रीप्रमाणे या दोन्ही मुलांची दाट मैत्री होती. रोज दोघेही बरोबरच विद्याभ्यास करीत होते. अशा तऱ्हेने सोळा वर्षे गेली. सुमेधा आणि सोमवंताची विद्या पूर्ण झाली होती. दोघांनी दशग्रंथांचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला होता. सारीच्या सारी पुराणे त्यांनी मुखोद्गत केली होती. संहिता, पदक्रम, आरण्यक, ब्राह्मण, छंद, निघंटू, ज्योतिष, कल्प, व्याकरण वगैरे सर्व विषयांत दोघांनीही उत्तम प्रकारे प्राविण्य मिळवले होते.


एके दिवशी वेदमित्र आणि सारस्वत दोघांनीही आपल्या मुलांना सांगितले, की मुलांनो, तुमचा विद्याभ्यास आता पूर्ण झाला आहे. तेव्हा आता तुम्ही आपल्या राजाला जाऊन समक्ष भेटा, आणि आपल्या अंगच्या गुणांनी त्याची कृपा प्राप्त करून आपल्या विद्येच्या जोरावर खूप संपत्ती मिळवा. मग एखादी चांगली सुयोग्य वधू पाहून तुमचा विवाह करू.


आपल्या वडिलांची आज्ञा प्रमाण मानून सुमेधा आणि सोमवंत दोघेही राजाच्या नगरीत जाऊन राजाला भेटले. आपले विद्याभांडार दोघांनी राजापुढे मोकळे केले. दोघांचीही विद्वत्ता पाहून राजा खूष झाला. त्या दोघांकडे पहात राजा त्यांना म्हणाला, “मुलांनो, मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट ऐकाल तर मी तुम्हांला खूप खूप द्रव्य देईन. " राजन्, आज्ञा करावी. दोघे मित्र अतिशय आनंदाने व आदराने म्हणाले. तेव्हा राजा म्हणाला, 'नैषधनगरीला राजा चित्रांगण राज्य करीत आहे. त्याच्या अतिशय सुंदर, चतुर व शिवभक्त अशा पत्नीची, सीमांतिनीची कीर्ती सर्व जगात पसरली आहे. ती शंकराचे व्रत म्हणून नेहमी दांपत्याची पूजा मनाभावे करीत असते. तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेष घ्यावा व नैषघनगरीला दांपत्य म्हणून जावे. सीमंतिनी तुमची पूजा करून तुम्हांला खूप द्रव्य देईल. ते द्रव्य घेऊन तेथून तुम्ही पुन्हा माझ्याकडे यावे. मी तुम्ही मागाल तेवढे द्रव्य देईन. आपले माता, पिता, गुरु आणि राजा यांची आज्ञा मोडू नये, असे शास्त्रात सांगितले आहेच.


हे राजाचे भाषण ऐकून दोघे कुमार एकदम म्हणाले, "छे, छे! राजन्, आपण आम्हांला अशी निंद्य गोष्ट करायला कदापि सांगू नका. एखाद्या पुरुषाने स्त्रीचा वेष धारण केला आहे असे लक्षात येताच सचैल स्नान करावे. असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे. हे दृश्य पहाणाऱ्याचा लगोलगच अधःपात होतोच; पण जो पुरुष हा वेष घेतो तो जन्मोजन्मी स्त्री म्हणूनच जन्माला येतो. म्हणून असले हे अनुचित कर्म करायला आम्हांला लावू नका. असे निंद्य कृत्य करून धन मिळविण्यापेक्षा आम्ही सत्कृत्याने व सन्मार्गाने वाटेल तेवढे धन मिळवू असा आम्हांला ठाम विश्वास आहे. आमच्या दारातील विद्येची कामधेनू सोडून आम्ही असे निंद्य कर्म कधीही करणार नाही. खरोखर मातापित्याहूनही विद्या अतिशय श्रेष्ठ आहे. संकटात, अडचणीत, प्रवासात ती मदत करते. विद्येमुळे मोठमोठे राजेलोकही विद्यावंतापुढे अतिशय नम्र होतात. ज्याला विद्या नाही तो पुरुष म्हणजे कोरडा पाषाण आहे. शेपूट नसलेला पशूच आहे. जिवंत असून मेलेला आहे. त्याने या पृथ्वीवर जन्म घेऊन आईला उगाचच त्रास दिला, त्याचे तोंडही कधी कोणी पाहू नये, असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. दोन्ही कुमारांनी अनेक तऱ्हेने राजाला समजावण्याचा खूप खूप प्रयत्न केला; परंतु राजहट्टापुढे त्यांचे काहीही उपाय चालले नाहीत. मग राजाने अतिशय सुंदर व नवीन वस्त्रे आणि अलंकार मागवले आणि सारस्वत पुत्र सोमवंताला स्त्रीवेश दिला. राजाज्ञेप्रमाणे हे दांपत्य सोमवारी संध्याकाळी सीमंतिनीच्या शंकराच्या व्रताच्या पूजेच्या वेळेला नैषध नगरीत आले.


रंभा उर्वशीपेक्षा सुंदर असणाऱ्या सीमंतिनीने सर्व स्त्रियात श्रेष्ठ अशी कीर्ती सर्वत्र मिरवली होती. रेणुका, जानकी किंवा कृष्णभगिनी द्रौपदीसारखी तीसुद्धा अतिशय महान पतिव्रता होती. हे दांपत्य जेव्हा तिच्यासमोर येऊन उभे राहिले, त्याबरोबर सीमंतिनी मनात हसली. तिला अंतर्ज्ञानाने कळले, की हे खरे दांपत्य नसून दोघे पुरुषच आहेत, तिने शंकराची नेहमीप्रमाणे अतिशय मनोभावे प्रार्थना केली आणि शंकर-पार्वती म्हणून त्या दोघांची पूजा केली. त्यांना भोजन दिले आणि संतुष्ट केले. वस्त्रे आणि अलंकारही दिले आणि आपण काही कळलेच नाही अशा भावनेने शेवटी नम्रपणे नमस्कार करून त्यांना निरोप दिला.


हे दांपत्य आता आपल्या घराकडे परत जाण्यासाठी निघाले होते. पती पुढे चालला होता व पत्नी मागे चालत होती. पत्नी नानाप्रकारचे कामुक हावभाव करून आपल्या पतीला जवळ बोलावत होती. जाता जाता रस्त्यामध्ये एक घनदाट अरण्य लागले तेव्हा सुमेधाचा हात स्त्रीरूप घेतलेल्या सोमवंताने धरला आणि अतिशय व्याकुळ स्वरात विनवले, 'पतिदेवा, आता या घनदाट अरण्यात आपल्याला हवा तसा एकांत आहे. कामज्वराने मी भयंकर त्रस्त झाले आहे. मला जवळ घ्या. माझी इच्छा पूर्ण करा. मी तुम्हाला खरोखर विनवते आहे. मी स्त्री झाले आहे. जरा माझ्या जवळ येऊन निरखून बघा. " तेव्हा सुमेध थोड्या रागाने आपल्या मित्राला म्हणाला, “सोमवंता, आता असली ही चेष्टा पुरे झाली. ही स्त्रीची वस्त्रे सोडून टाक आणि माझा मित्र म्हणून तू आता माझ्याबरोबर चल.


त्याचे हे शब्द एकेताच स्त्रीरुपी सोमवंत मूर्च्छित होऊन पडला. सुमेध मागे आला आणि म्हणाला, अरे 66 तू आणि मी गुरुबंधू आहोत. अगदी ब्रह्मचारी आहोत आणि आज असली चेष्टा तुला का सुचते आहे ? तेव्हा सोमवंत म्हणाला, अरे, मी आता पहिल्यासारखा पुरुष राहिलो नाही. आता मला खरोखरच स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. खरोखरच आता मी कमज्वराने तप्त झाले आहे. तेव्हा मला शांत कर. "


सुमेधा अतिशय आयने सोमवंताकडे एकटक पहात होता.सोमवंताने त्याला दाट अरण्यात नेले. तेथे खूप मोठे मोठे वृक्ष आकाशाला भिडले होते. खाली गळून पडलेल्या पानांची शय्या आपोआपच तयार झाली होती. अशा ठिकाणी सोमवंताने सुमेधाचा हात धरला व म्हटले, “हे माझे कमंडलूसारखे मोठे मोठे स्तन बघ. माझ्या सुकुमार अशा अंगावर हात फिरवून बघ. तू माझा खरेच पती आहेस व मी तुझी पत्नी आहे. आता तू खरोखरीच माझा स्वीकार कर.. असे म्हणून सोमवंताने जवळ ओढून, सुमेधाचे चुंबन घेतले. त्याच्या गळ्यात आपले नाजूक हात घातले; परंतु सुमेधाने ते झिडकारून म्हटले, "चल दूर हो. मला हे अजिबात पटत नाही. आपण दोघे गुरुबंधू आहोत. एवढी विद्या एकत्र अभ्यास करून अतिशय कष्टाने आपण मिळवली. ती तू पार विसरलास का? मला नसत्या मोहात पाडू नकोस असे म्हणून सुमेधा सरळ पुढे चालू लागला. मग नाईलाज होऊन स्त्री बनलेला सोमवंतही त्याच्या मागून चालत निघाला.


अतिशय सुंदर आणि सद्गुणी तरुणी एकांतात स्वतः पुढाकार घेऊन आपले कोमार्य अर्पण करायला तयार झाली असतानाही ज्याची मनोवृत्ती अत्यंत स्थिर रहाते, जो त्या मोहात सापड नाही तो माणूस नव्हे तर प्रत्यक्ष शंकरच आहे असे समजावे. त्याच्यापाशी सर्व तीर्थस्थाने येऊन वास करतात. सभोवताली कुणीही नसताना एखाद्याला भरलेला धनाचा हंडा समोर दिसला आणि त्याने त्याला स्पर्शही केला नाही, तर तो माणूस म्हणजे शंकरच आहे असे समजावे. अतिशय चांगले काम करणारा, सत्यवचनी आणि सर्व विद्यांत अतिशय पारंगत असलेला माणूस जर अहंकारी नसेल, तसेच गर्विष्ठ नसेल तर तो माणूस म्हणजे शंकरच आहे असे निश्चितपणे समजावे. आपल्याला पहाताच आपल्या वर्मावर धाव पडेल असे बोलणाऱ्या निंदकाचेसुद्धा शब्द विसरून जाऊन ज्याला आनंदच होतो, दुसऱ्याचे वाईट गुण, वाईट कर्मे यांची माहिती असूनही जो त्याचा उच्चार दुसऱ्या कुणापाशीही करीत नाही, ज्याला हे सर्व चराचर गुरुरूपच आहे असे वाटते, तो आपले केलेले सत्कर्म, तप किंवा दान कुणाला कधीही सांगत बसत नाही तो माणूस म्हणजे शंकरच आहे असे निश्चितपणाने समजावे.


जो मूर्ख आणि गुणी अशा दोन्ही व्यक्तीला सारखेच मानतो, कोणत्याही उपायाने आपली कीर्ती उगाचच वाढवावी असे ज्याच्या मनात येत नाही, आपल्या विद्वत्तेचा जो कधी, कुठे डांगोरा पिटत नाही, आपल्याभोवती शिष्टसमुदाय उगाचच जमा करीत नाही, ज्याला खरोखरीच एकांत आवडतो तो माणूस म्हणजे शंकरच आहे असे निश्चितपणे समजावे. काम, क्रोध, लोभापासून जो कायमचा मुक्त झाला आहे, ज्याची शंकराचे चरणी कायमस्वरूपी भक्ती जडली आहे, धन आणि माती दोन्ही ज्याला एकाच योग्यतेची वाटते आहे, खरोखरच असा पुरुष म्हणजे प्रत्यक्ष शंकरच आहे असे समजावे. कवी श्रीधर म्हणतात, अशा या ब्रह्मानंदात नेहमी मग्न होणाऱ्या पुरुषाचे पायातील खडावा होऊन आपण रहावे असे वाटते.


सुमेधा, असाच एक उत्तम पुरुष होता. तो सोमवंताला म्हणाला, 'आपण आता प्रथम आपल्या गावी जाऊ आणि मग सर्व गोष्टींचा विचार करू. नंतर दोघेजण आपल्या गावी येऊन घरी आले. सुमेधाने आपल्या पित्याला घडलेला सारा वृत्तांत सांगितला. सोमवंताचा पिता हे सारे कळताच शोकाने अतिशय व्याकुळ झाला. त्याचा एकुलता एक लाडका पुत्र आता स्त्री झाला होता. त्याच्या घराण्याचा, कुळाचा आता निर्वंश झाला होता.


मोठमोठ्याने रडत, शोक करीत सारस्वत ब्राह्मण आपल्या राजाजवळ आला व त्याला म्हणाला, “हे दुष्ट राजा! हे तू काय केलेस? माझी म्हाताऱ्याची आधाराची काठी, माझा एकुलता एक लाडका पुत्र, वेदशास्त्रसंपन्न असणारा, अतिशय शुचिर्भूत ब्राह्मण त्याला तू स्त्री बनवलंस! माझा पार निर्वंश केलास. तुला म्हणू तरी काय ? " सारस्वत ब्राह्मणाचे अशा तऱ्हेचे दुःखाचे शब्द ऐकून राजा विदर्भ खाली मान घालून म्हणाला, " माझी खरोखरीच मोठी चूक झाली. आम्ही त्यांना घ्यायला सांगितले; पण ते सोंग खरे ठरले. खरोखर शिवाची माया अद्भुत आहे. "


राजाने लगेच मोठमोठ्या ऋषींना आपल्या नगरीत आमंत्रण दिले. अनेक वेदशास्त्रासंपन्न असे ब्राह्मण बोलावले व त्यांना नम्र विनंती केली, केवढाही खर्च करा; पण मोठा यज्ञ करून आपल्या विद्वत्तेने, तपाने या सोमवंताला त्याचे पुरुषत्व परत प्राप्त करून द्या. तरच माझ्या या दग्ध मनाला आता शांती मिळेल. ब्राह्मण म्हणजे, 'राजन्, ही त्या सामर्थ्यशाली अशा ईश्वराची करणी आहे. आमच्या हातून त्यात कदापिही बदल होणे शक्य नाही. "


मग राजाने स्वतःच देवीची आराधना सुरू केली. अतिशय कडक व्रत धरले. महायाग सुरू केले. अशा तऱ्हेने सात दिवस राजाने कडक उपोषण केले. शेवटी देवी राजाला प्रसन्न झाली व म्हणाली, 'मी प्रसन्न आहे, तेव्हा आता तू तुझ्यासाठी वर माग. तेव्हा तो विदर्भ राजा हात जोडून नम्रपणाने म्हणाला, देवी या सोमवंत ब्राह्मणाला स्त्रीरूप प्राप्त झाले आहे तरी तू याला या रूपातून मुक्त करून त्याला पहिल्यासारखा पुरुष कर.


देवी म्हणाली, 'राजा, मलासुद्धा ते करता येणार नाही. कारण सीमंतिनी निःसीम पवित्र आहे. शंकराची परमभक्त आहे. तिने आपल्या चारित्र्याने, भक्तीने केलेला बदल मला पुन्हा बदलता येणार नाही. आता कुणालाच सोमवंताला पुन्हा पुरुषत्व देता येणार नाही. तेव्हा आता तू असे कर. या सोमवंतरूपी स्त्रीचे सुमेधाबरोबर खरोखरचे लग्न लावून दे. या सारस्वत कुमाराला वेदशास्त्रसंपन्न असा अतिशय सुंदर पुत्र होईल. एवढे बोलून देवी गुप्त झाली. राजाने लगेच सुमेधा व सोमवंताचा विवाह लावला. धन्य ती सीमंतिनी ! तिचे कर्तृत्व प्रत्यक्ष पार्वतीलाही मान्य करावे लागले. पार्वतीलाही त्यात कोणताही बदल करता आला नाही.


नंतर व्यासमुनींनी दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. अवंतीनगरात फार पूर्वी एक ब्राह्मण रहात होता. त्याचे नाव होते मदन. तो अतिशय कामुक असा पुरुष होता. त्याच नगरात पिंगला नावाची एक अतिशय तरुण वेश्या रहात असे. तिच्याकडे हा ब्राह्मण नेहमी पडलेला असे. पिंगला वेश्येकरता त्याने आपले जन्मदाते आईबापा सुद्धा सोडले होते. आपले ब्राह्मणाचे कर्तव्यसुद्धा पार सोडले होते. आपल्या धर्मपत्नीकडे तर त्याचे लक्षच नव्हते. तो ब्राह्मण सदोदितच पिंगला वेश्येच्या दारात पडलेला असे. दारू पीत असे, नेहमी अभक्ष्य असा मांसाहार करीत असे आणि तो रात्रंदिवस वैषयिक सुखात बुडलेला असे.


एकदा या सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीतलावर सर्वत्र फिरत असलेले ऋषभ नावाचे एक मोठे योगी पुरुष एक दिवस अकस्मात पिंगलेच्या घरी आले. तो शिवयोगी अचानक असा समोर बघताच मदन ब्राह्मण आणि पिंगला वेश्या दोघेही अधीरतेने एकदम त्याच्याकडे धावली. त्या योग्याची त्यांनी विधिवत षोडशोपचारे पूजन केले. उत्तम प्रकारचे अन्न तयार करून योग्याला जेवायला घातले. त्याला अनक वस्त्रे आणि अनेक अलंकार दान केले. नंतर अतिशय मऊ मऊ शय्या तयार करून त्यावर शिवयोग्याला निजवले आणि ते दोघेजण मिळून त्याचे पाय चेपू लागले. एक दिवस राहून तो शिवयोगी तेथून निघून गेला. आपल्याला खरोखरच प्रत्यक्ष शंकरच दर्शन देऊन गेले असे त्या दोघांना मनातून वाटत होते. अशीच काही वर्षे उलटून गेली. कालांतराने मदन ब्राह्मण आणि पिंगला वेश्या दोघेही मरण पावली. त्या दोघांच्या हातून आतापर्यंत अनेक पापे घडली होती तरीही शिवयोग्याचे मनापासून पूजन केल्याचे पुण्य त्यांच्याजवळ जमा झाले होते. त्यामुळे त्यांना परत मनुष्यजन्म मिळाला.


दाशार्ह देशात त्यावेळी राजा वज्रबाहू राज्य करीत होता.त्याच्या आवडत्या पट्टराणीचे नाव होते सुमती. मदन ब्राह्मणाने सुमतीच्या पोटी जन्म घेतला आणि पिंगला वेश्येने कीर्तिमालिनी या नावाने महासती शिवभक्त अशा सीमंतिनीच्या पोटी जन्म घेतला. मदन ब्राह्मण राणी सुमतीच्या गर्भात असतानाच त्याच्या सावत्र आया त्याचा सारखा द्वेष करू लागल्या होत्या. कारण त्यांना अजून मूल झाले नव्हते आणि पट्टराणी सुमतीला जर पुत्र झाला तर ती राजाची फार लाडकी होईल आणि राजा आपल्याकडे पार दुर्लक्ष करील असे वाटून त्यांनी एके दिवशी संधी साधून सुमतीच्या अन्नात विष मिसळून तिला खायला दिले. सवतीची इच्छा होती, की सुमती राणी मरून जावी पण घडले वेगळेच. त्या मायलेकरांच्या अंगावर मोठमोठे फोड उठले. त्यातून सारखे रक्त आणि पू वाहू लागले.


राजाने देशोदेशीचे निष्णात असे वैद्य आणून औषधे दिली; पण त्यामुळे काही केल्या थोडासुद्धा फरक पडेना. छोटा बाळ दुःखाने एकसारखा रडत असे आणि आता या जखमांच्या ह्या वेदना सहन करण्यापेक्षा मृत्यू यावा असे राणी सुमतीला सारखे वाटत असे. बाळ एक सारखे रडायचे त्यामुळे राजाला थोडीसुद्धा स्वस्थ झोप लागत नव्हती. शेवटी तो राणीला आणि मुलाला कंटाळला. आणि एके दिवशी त्या दोघांना रथात बसवून त्याने घोर अरण्यात नेले आणि तेथेच त्यांना सोडून दिले. अरण्यात अजिबात मनुष्यवस्ती नव्हती. तेथे वाघ, सिंह हिंडत होते. बाळाला आपल्या कडेवर घेऊन राणी सुमती वेड्यासारखी त्या रानात इकडे तिकडे भटकत होती. तिच्या अनवाणी पायात काटे बोचत होते. तिने कितीही आक्रोश केला तरी तेथे ऐकायला कुणी नव्हते. प्यायला पाणीही मिळत नव्हते. त्यात तिच्या अंगाच्या जखमा अधिकच ठणकू लागल्या होत्या.


शेवटी देवाला शरण जाऊन सुमती राणी त्याला म्हणाली, “हे कैलासपती, हे जगताला वंद्य असणाऱ्या शंकरा, नेहमीच भक्तजनांचा कैवार घेणाऱ्या शिवा, तुझी मंगल कीर्ती त्रैलोक्य सतत गात असते. तू विश्व व्यापून सर्वत्र उरलेला आहेस, ही सर्व अगम्य अशी माया सांभाळणारा तूच आहेस. मग माझा हा आर्त टाहो तुझ्या कानावर अजिबात येत नाही का ? हे सदाशिवा, माझी तुला अजिबात दया येत नाही का रे ? मी आता काय करू ? ह्या हिंस्त्र वाघ-सिंहांनी मारलेल्या कान फोडून टाकणाऱ्या भयंकर आरोळ्या ऐकून माझी छाती भीतीने फार धडधडते आहे. मी आता कुठे जाऊ ? सांग तरी देवा मला. असा त्या दुःखी सुमतीचा आक्रोश ऐकून पशुपक्षीसुद्धा रडू लागले. नंतर ती जेव्हा मूर्च्छा येऊन जमिनीवर पडली तेव्हा वृक्ष आणि पक्षी तिच्यावर छाया धरत असत. पक्षी आपल्या चोचीनं पाणी आणून ते बाळाला पाजीत असत आणि त्याच्या अंगावर शिंपडत असत. काही पक्षी गोड गोड फळांचा रस आणून बाळाच्या तोंडात घालीत. वनगाई आपल्या झुपकेदार आणि केसाळ अशा शेपटीने त्याला वारा घालीत असत. रात्री हिंस्त्र प्राण्यांपासून त्यांचे रक्षण करीत असत.


अशा तऱ्हेने त्या अरण्यात ह्या सर्वांच्या सहवासात राणी व बाळ राहत होते. एक दिवस धष्टपुष्ट अशा चांगल्या बैलावर माल टाकून व्यापारासाठी त्या रानातील रस्त्याने निघालेला एक वाणी तिला दिसला. त्याच्या सोबतीने चालत चालत ती वैश्यनगरीला आली. तेथे एक वैश्य राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते पद्माकर. त्याने सुमतीला आपल्याकडे बोलावले आणि तिची सगळी हकिकत विचारली. सुमती राणीने अगदी प्रथमपासून सर्व घडलेली हकीगत राजाला सांगितली. 'ती ऐकून पद्माकर राजालासुद्धा फार वाईट वाटले. त्याच्या डोळ्यातून एकसारखे टपाटप अश्रू पडू लागले. कर्माची गती किती गहन आहे", असे तो मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाला.


'वज्रबाहूसारख्या बलाढ्य राजाची असलेली पट्टराणी अनाथासारखी या वनात एकाकी पडली आणि दीन होऊन शेवटी माझ्याकडे आश्रयाला आली. या घटनेला केवळ कर्मगती म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणणार ?


राजाने सुमतीला आपली धर्मकन्या मानले आणि आपल्या राजवाड्याशेजारीत तिला रहायला एक जागा दिली. त्यानेही आपल्या राज्यातील निष्णात वैद्य आणून उपचार केला; पण त्या उपचारांनीही ते फोड बरे झाले नाहीत. बिचारा राजपुत्ररा रात्रंदिवस नुसता तळमळत होता. शेवटी त्या व्याधीने राजपुत्राचा प्राण घेतला. शोकातिशयाने सुमती राणी मोठमोठ्याने रडू लागली. माझे अनमोल रत्न गेले, म्हणून अतिशय शोक करू लागली. लगेचच शेजारी-पाजारी तिच्याभोवती जमा झाले. राजा पद्माकरही तेथे आला. सर्वजण परोपरीने तिची समजूत घालत होते; पण ती सारखी रडतच होती. तेवढ्यात अचानक एक शिवयोगी तेथे आला. एखाद्याचे भुकेने प्राण कासावीस झाले असता खिरीचा समुद्र त्याच्यापुढे दिसावा किंवा एखाद्या दुर्बलाचे घर शोधत शोधत चिंतामणी स्वतःच त्याच्यापुढे यावा तसे या वेळी तेथे असलेल्या सर्वांना वाटले. राजा पद्माकर अतिशय नम्रपणे पुढे झाला. नंतर सुंदर आसनावर त्याला बसवून त्याची मनोभावे पूजा केली. सुमतीची हकीगत शिवयोग्याने ऐकली आणि तिला गंभीरपणे सांगितले, “हे मुली, आता शोक आवर. तू अशी उगाच का रडते आहेस ? त्याचा व तुझा असलेला संबंध संपला. तो आता या देहातून निघून गेला. तुझे पूर्वजन्माचे पुत्र, जन्मदाता पिता आता कुठे आहेत तुला माहीत आहेत का ? चौऱ्याऐंशी लक्ष योनी प्रवास करताना फिरत फिरत तू येथे आली आहेस. त्या त्या मागील जन्मातले तुझे सखे, सोयरे, आप्त आता कुठे आहेत बरे ? ते तुझ्याकडे कुठून आले होते ? आणि आता कुठे गेले आहेत ? मला सांग बरे! अशा तऱ्हेने तू पुन्हा आणखी जन्म घेशील; पण मग आता तू कुणासाठी शोक करते आहेस ?.


भाग २ वाचण्यासाठी इथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या