॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥
अध्याय:- ७
भद्रायूची कथा
आपण ज्या ज्या योनीत जन्म घ्यावा त्या त्या ठिकाणचा कुळाचा अभिमान मनात धरून प्राणी उगीचच नाचतात; पण आपण या योनीत कोठून उत्पन्न झालो असा प्रश्न ते स्वतःला कधी विचारीत नाहीत ? हा तुझा पुत्र कोठून आणलास ते सांग बरे ? आणि मृत्यू होऊन तो आता कोठे गेला हे तुला माहीत आहे का? तू आणि हे जमलेले सर्व लोक मृत्यूनंतर कुठे जाणार आहेत हे सांगता येईल का आणि पुढच्या जन्मात, कोणत्या योनीत जन्म घेणार आहेत, हे तुला माहीत आहे का ? 'आत्मरुपी शिव हा एकच फक्त शाश्वत आहे आणि हे मानवी शरीर अगदी क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे. असले हे शरीर नष्ट झाले म्हणून तू शोक करतेस, असे हे करणे बरोबर आहे का ? हे तू स्वतःला मनालाच विचारून मग मला सांग. आत्मा अविनाशी आहे. तो कुणाचा भाऊ नाही किंवा कुणाचा पुत्र नाही. तो कोणत्याही नात्याने बांधलेला नाही. ज्या शरीराकरता हा तू शोक करतेस ते तर आता तुझ्यापुढेच पडले आहे. मग शोक कशाचा करायचा ?
तळ्याच्या, नदीच्या किंवा सागराच्या जळात अनेक लाटा उसळून फुटतात आणि लगेच नष्ट पावतात. त्याचप्रमाणे हे आपले जीवन म्हणजे एक मृगजळ आहे. हे सत्य कसे होईल ? चित्रांतल्या वृक्षाखाली छायेसाठी कोणी कधी बसला आहे. का? चित्रातल्या अग्नीने कुणाचे घर जळाले आहे का ? चित्रातल्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत कुणी वाहून गेला आहे का ? विचार करून तू मला सांग बरे ! 'वंध्या स्त्रीच्या पुत्राने कधी द्रव्य आणून, भीष्माची कन्या मारुतीला अर्पण करून, गंधर्वनगरातले वऱ्हाड या प्रसंगी आणून कुणी असे लग्न कधी लावले आहे का ?
'वाऱ्याचा अतिभव्य मंडप शिवून, वायूचा मजबूत व मोठा दोर करून त्याने घट्ट बांधून दिशांच्या दिव्य भांड्यात आकाशाची अप्रूप अशी फुले कोणी भरली आहेत का ? कासवाच्या दुधाचे चांगले तूप करून, त्या तुपात मृगजळातले मासे आपल्या हातातील मशाली बुडवतात, आणि ते आपल्या पायात चाळ बांधून नाचतात, तो नाच जन्मांध व्यक्ती मोठ्या आनंदाने पाहतात असे कधी कुठे झाले आहे का ? चित्रातले चोर चोरी करून कुंडले आणतात हे जितके सत्य आहे तेवढाच हा प्रपंच म्हणजे माया आहे, म्हणजेच हे दिसणारे सर्व खोटे आहे, मग जे मुळातच खोटे आहे त्याचा शोक कशासाठी करायचा ?
आपले हे शरीर म्हणजे रोगाचे भांडार आहे, अनेक प्रकारच्या कृमिकीटकांचे माहेर आहे, केशरूपी वृक्षांचे जंगल जेथे माजलेले आहे, आपले शरीर म्हणजे पापाचा समुद्र आहे, किंवा भ्रांतीचे आकाश आहे. मूत्र, घाण, मांस, रक्त यांनी आपल्या शरीरातील अस्थींची मोळी लिंपली आहे. भोवतालून कातडी लावून त्यांची मोट बांधली आहे. मातेचा विटाळ आणि पित्याचे रेत यापासून हे शरीर निर्माण झाले आहे. हे शरीर मूळचेच अपवित्र आहे, असत्य आहे. हे अपवित्र शरीर गोमूत्राने म्हणजे एका सामान्य पशूच्या मूत्राने संपूर्ण शुद्ध होते. वस्तऱ्याने जरी डोक्यावरील सर्व केस कापले तरी ते शुद्ध कसे होणार? शंकराला जे प्राणी मनोभावे शरण जात नाहीत ते कायम असेच जन्ममृत्यूचे फेरे पुनः पुन्हा घेत फिरत राहतात. त्यांना कधीच मुक्ती मिळत नाही. हे सुमती, तुझे मागील जन्मांतले पती कोठे आहेत ते स्मरण करून मला सांग बरे! हा सर्व मायेचा खेळ आहे. तेव्हा तू आता ताबडतोब सावध हो.
आपले शरीररूपी घर त्रिगुणांचे चांगले पाच वासे आणून बांधले आहे. याला कोठून आणि केव्हा अग्नी लागेल ते सांगता येत नाही. हे शरीररूपी वस्त्र केव्हा जीर्ण होईल फाटून, कुजून किंवा त्याचे तुकडे तुकडे होतील. आणि त्याचा ऋणानुबंध आपल्यापासून केव्हा संपेल हे कळत नाही, मृगजळ किंवा मार लागलेल्या स्वप्नांतले राज्य जसे खोटे असते तसे हे शरीरसुद्धा खोटे आहे; पण पृथ्वीवरील सर्व पापी लोक संपत्ती, धन, धान्य आणि पुत्र यांसारख्या सामान्य आणि नष्ट होणाऱ्या गोष्टींची इच्छा करीत असतात. खरे म्हणजे दूरपर्यंत वहाणाऱ्या गंगेत दोन लाकडे कधी कधी एकत्र येतात, थोडा वेळ एकत्र राहतात आणि पुन्हा वेगळे होऊन दोन दिशांनी निघून जातात तसाच आपला हा संसार आहे. पृथ्वीवर जन्म घेतले स्त्री-पुरुष थोड्या वेळाकरता एकमेकांच्या जवळ येतात आणि काही काळ एकत्र संसार करतात आणि संबंध तोडून या जगातून निघून जातात. मोठ्या वृक्षावर कितीतरी पक्षी येतात, काही काळ आसऱ्याला तेथे बसतात, काही दुसऱ्या झाडावर उडून जातात. आपली झालेली मुले म्हणजे असे तात्पुरते आसऱ्याला आलेले पक्षी आहेत. एखादा प्रवासी उन्हातून काम केल्यामुळे श्रमून आला, की वृक्षाच्या छायेत विश्रांतीसाठी थोडा वेळ बसतो. ऊन संपले, की त्या झाडाखालून उठून पुढे चालू लागतो. त्याचे भाऊ आणि नातेवाईक हे त्या झाडाखाली क्षणभर आलेल्या पांथस्थाप्रमाणे असतात.
मायेच्या प्रपंचरुपी वृक्षावर जीव आणि शिव हे दोन पक्षी असेच बसलेले असतात. त्यांपैकी शिव हा पक्षी नेहमी सावध चित्ताने बसलेला असतो. जीव पक्षी मात्र प्रपंचवृक्षावर लागलेली मोहून घेणारी विषयरूपी फळे पाहताच भुलून जातो. फळांच्या मोहात स्वतःलाही विसरून जातो आणि मग स्वतःच त्यावर जन्ममरणाचे फेरे गुंफत राहतो. त्यापैकी एखादाच पुण्यवान सद्गुरुला शरण जातो आणि शिवपक्षी होऊन शंकराची मनोभावी भक्ती करतो आणि या मायेच्या विषयसागरामधून तरून जातो.
त्या शिवयोग्याकडून असे निरुपण ऐकल्यावर भारावलेली सुमती मुलाच्या प्रेताजवळून उठली आणि तिने त्या योग्याचे पाय धरले. मग गहिवरलेल्या आवाजात ती त्या योग्याला म्हणाली, "तू म्हणजे साक्षात् शंकरच आहेस. खरोखरीच तुझे ज्ञान अगाध आहे. भक्ताच्या रक्षणाकरता प्रत्यक्ष शिवच तुझ्या रुपाने येथे आला आहे, असे मला वाटते. आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर. मग योग्याने सुमतीला मृत्युंजय मंत्र सांगितला. नंतर आपल्या हातात भस्म घेऊन त्यावर मंत्र घातला आणि ते भस्म सुमतीला तिच्या सर्वांगाला लावायला सांगितले. सुमतीने तसे करताच ती रंभा, उर्वशी या अप्सरांहूनसुद्धा अतिशयच सुंदर दिसू लागली. मग परत त्या शिवयोग्याने मृत्युंजय मंत्राने भस्म पवित्र करून ते बाळाच्या सर्वांगाला लावले, त्याबरोबर ते मृत पडलेले बाळ जिवंत झाले आणि तोही बत्तीस लक्षणांनी युक्त असा सुंदर बनला.
मग योग्याने सुमतीला नेहमी नियमितपणे शंकराचे ध्यान आणि उपासना करायला सांगितले. परीस लागल्याबरोबर ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे शिवयोग्याच्या कृपेने राणी सुमती आणि तिचा बाळ असे दोघेही अत्यंत निरोगी आणि अतिशय सुंदर बनले. शिवकृपेने राणी सुमती आणि बाळाला मिळालेला प्रसाद पाहून राजा पद्माकरही आश्चर्यचकित झाला. गुरुमंत्राची महती आता सर्वांना कळली होती. फक्त आपला गुरुच आपल्याला मृत्यू आणि भय यांच्यापासून संरक्षण देऊ शकतो हेही आता सर्वांना समजले होते. जे गुरुचरणावर नितांत श्रद्धा ठेवतात आणि त्याने सांगितल्याप्रमाणे आचरण करतात त्यांना धनधान्याला कधीही कमी पडत नाही. त्यांच्यावर कधीही अनिष्टकारक संकटे येत नाहीत.
आपल्या बाळाला राणी सुमतीने त्या शिवयोग्याचे पायावर घातले आणि त्याच्या समोर हात जोडून ती म्हणाली, 'गुरुमहाराज, माझ्या शरीरावरील कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी माझ्यावर झालेले तुमचे उपकार फिटणार नाहीत. आपली आमच्यावर सदोदित अशीच कृपा असावी. " 'तथास्तु! सुमती, तुझ्या पुत्राला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभेल. तसेच, तो पृथ्वीचे राज्य करील. त्याची कीर्ती संपूर्ण त्रिभुवनात पसरेल आणि शेवटी त्याला शिवपदाची प्राप्ती होईल. आजपासून याचे नाव मी 'भद्रायू' म्हणून ठेवतो आहे. तुला दिलेल्या मृत्युंजय मंत्राचा जप मात्र निष्ठा ठेवून न विसर पडू न देता सदोदित करीत रहा." इतके बोलून तो शिवयोगी तेथेच अंतर्धान पावला. त्यावेळी सुमती गुरुंच्या चरणावर लीन झाली होती.
पद्माकर राजाला तर आता फार आनंद झाला होता. आपल्या सुनय पुत्रापेक्षाही सुमतिपुत्र भद्रायूवर तो जास्त प्रेम करीत होता. त्याचे सर्व प्रकारचे लाड आनंदाने पूर्ण करीत होता. आठव्या वर्षी राजा पद्माकरने आपला पुत्र सुनय आणि सुमतिपुत्र भद्रायू यांचे मौजीबंधन केले. दोघांना सारखे अलंकार केले आणि दोघांना एकाच गुरुकडून सारखेच आणि उत्तम प्रकारचे शिक्षणसुद्धा दिले. भद्रायू आता बारा वर्षांचा झाला. तो स्वभावाने अतिशय सुशील होता. आपल्या आईची सेवा करण्यासाठी तो नेहमी तत्पर राहत होता. एके दिवशी अकस्मात पुन्हा एकदा मागचाच शिवयोगी
सुमतीच्या घरी आला. सुमती आणि भद्राय धावतच त्याच्यापुढे स्वागतासाठी गेले. आनंदाश्रूंनी दोघांनी त्याचे चरण धुतले. केसरुपी वस्त्राने स्वच्छ पुसले. स्नेहाचा सुगंध त्याच्या चरणांना लावला. गुरुला प्रदक्षिणा घातल्या. त्याची षोडशोपचार पूजा केली. अतिशय आनंदाने फार मोठा सोहळा केला. सुमती म्हणाली, 'गुरुमहाराज, तुमच्यामुळे मी आज पुत्रवती म्हणून मानाने या जगामत जगत आहे. " मग शिवयोग्याने भद्रायूला उत्तम प्रकारे नीतिशास्त्र शिकवले. आपल्या श्रुतिस्मृतिपुराणात जसे सांगितले आहे तसेच तू सदैव नीतीने वाग. माता, पिता आणि गुरु यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. गाय, ब्राह्मण आणि प्रजा यांचे आपल्या मुलाप्रमाणे पालन कर. सर्व प्राणिमात्रात शंकरच भरला आहे याची तू नेहमीच आठवण ठेव. स्वधर्माने नेहमी वाग. वर्णाश्रमाचे चांगल्या प्रकारे पालन कर. मनामत पूर्ण विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नको. 'शब्द' दुसऱ्या कुणाला लागणार नाहीत याचा विचार करूनच दुसऱ्यासमोर बोलत जा. शत्रू कोण आणि मित्र कोण, हे जाणून घेत जा. आपली प्राप्ती किती आहे आणि खर्च किती आहे याचा विचार करूनच व्यवहारात वागत जा. आपली शक्ती किती आहे? आपले सेवक कसे आहेत ?
त्यांच्यामुळे आपल्याला जीवनात यश मिळाले आहे का अपयश मिळाले आहे ? याच्यावर नीट ध्यान ठेव. घरी किंवा दारात आलेले सर्व अतिथी, देव, मित्र, आपला स्वामी, सर्व वेद, अग्निहोत्र, पशु, शेती, धन आणि विद्या या सर्वांकडे जातीने, बारकाईने एक सारखे लक्ष ठेवीत जा. लहान वयाचे मूल, पत्नी, शत्रू, सेवक, रोग आणि कौटुंबिक गोष्टी या सर्वांकडे आपण जर नीट लक्ष दिले नाही तर फार मोठी हानी होते हे तू नीटपणाने लक्षात ठेव.
तसेच, जगातील ज्ञानी लोक ज्या मार्गाने नेहमी जातात त्या मार्गानेच तू स्वतः जात जा. आपले आईवडील आणि योगी पुरुषांची तू स्वतः कधीही निंदा करू नको. वैश्वदेव करण्याच्या वेळी जर एखादा अतिथी आपल्या दारात आला तर त्याला त्याची जातपात वगैरे काहीही न विचारता आनंदाने अन्नदान कर. शंकरासाठी म्हणून सर्वांनाच नेहमी अन्नवस्त्राचे दान करीत रहा. दुसऱ्याला तू स्वतः होऊन कधी त्रास देऊ नको. गोब्राह्मणांचे रक्षण कर. दुसऱ्यांनी निंदा आणि वादविवाद करणे सोडून दे. भगवान शंकराचे आपल्या मनामधून सदोदित स्मरण करीत रहा. तसे केले तर मौन पाळल्यासारखे होते, हे चांगलेपणे व अगदी पक्के तुझ्या लक्षात असू दे.
ज्याप्रमाणे आपण किंवा अन्य कोणी केलेल्या वमनाकडे पाहून आपण त्यापासून तोंड फिरवतो, त्याप्रमाणेच दुसऱ्याचे असलेले धन आणि दुसऱ्याची असलेली स्त्री पाहून तुला तुझ्या मनातून वाटू दे. नेहमी मनोभावे साग्रसंगीत शिवपूजा करीत जा. नेहमी शास्त्रपुराणे ऐकत जा. पवित्र स्नान, होम, जप, अभ्यास, पंचयज्ञ, गाय, ब्राह्मण यांची रोज सेवा, शिवगुणांचे नित्यनेमाने श्रवण, मनन, चिंतन या ठिकाणी कधीही तू आळस करू नकोस. आपल्या पत्नीसह आनंदाने वैषयिक सुखाचा उपभोग घे पण परस्त्रीकडे चुकून कधी पाहूही नकोस. शत्रूला जरूर शिक्षा कर; पण साधुसंतांच्या ठिकाणी नम्रपणाचा भाव ठेव. संसारात कोणाचाही मत्सर हा फार मोठा शत्रू आहे म्हणून तू कुणाचा कधीही हेवा करू नकोस किंवा मत्सर करू नकोस.
दुर्जनांना तुझी शक्ती दाखव; पण सज्जनांना मात्र नेहमी नमस्कार कर. आपल्या अंगच्या अहंकाराने सर्व पृथ्वीवरची राज्ये तू लीलया जिंकून घे आणि निरहंकाराने सर्व ब्राह्मणांना आपलेसे कर. तुझी वाचा नेहमी शिवनास्मरणात दंग असू दे. दान करण्याने तुझ्या दोन्ही हातांचे सार्थक होऊ दे. यात्रा करण्यासाठी किंवा देवदर्शनाला जाण्यासाठी चालून जाण्याचे दोन्ही पायांचे सार्थक होऊ दे. शिवध्यानासाठी रोज न चुकता बसत जा. संतांना प्रेमाने आलिंगन देऊन तुझी त्वचा अतिशय पवित्र होऊ दे. पुराणे ऐकून तुझे दोन्ही कान पवित्र होऊ देत. शिवाचे मंगल आणि पवित्र रूप पाहताना दोन्ही नेत्रांचे सार्थक होऊ दे. 'शिवनिर्माल्याचा आपल्या नाकाने सतत वास घेत जा आणि अशा रीतीने तू आपली सर्व इंद्रिये नित्य शिवभजनी लाव. कुणी दीन, अज्ञानी, अनाथ असा तुला राज्यात आढळला तर त्याच्यावर सदैव कृपा कर. ईश्वरावर नेहमी श्रद्धाठेव.
संतांची सतत मैत्री ठेव. जे देवांना कधी मानत नाहीत त्यांची तू नेहमी उपेक्षा कर. दररोजच नियमित आहार आणि नियमित निद्रा घेत जा. शिकार करतानासुद्धा नेहमीच नीतीचे पालन कर. विद्या, मैत्री, पुण्य, स्मृती, उत्साह, धैर्य आणि दान हे सर्व नेहमी वाढते असू दे. तसेच, आपली संपत्ती, जगलेले आयुष्य, आपला झालेला गृहकलह, संभोग, खाल्लेले औषध, सत्कर्म, मंत्र, दिलेले दान, मान, झालेला अपमान ही सर्व नेहमी आपल्या स्वतःच्याच मनात ठेवत जा. अतिशय दुष्ट, नास्तिक, धूर्त आणि चोर, तसेच जार कर्म करणारे, सतत चंचल मनोवृत्तीचे, अतिशय कपटी असे लोक तू आपल्या दरबारात कधीही ठेवू नकोस. सतत दुसऱ्याची निंदा करणारे, शिवभक्तांना त्रास देणारे, कायम दारू पिणारे, आपल्या गुरुला छळणारे, कृतघ्न आणि धर्माला न मानणारे असे जे कोणी असतील त्यांचे दर्शनही तू कधी घेऊ नकोस.
आपली पत्नी, पैसा आणि पोटचा पुत्र यांच्यात आसक्तीने कधी गुंतू नकोस. आपला संसार करूनही कमलपत्राप्रमाणे अलिप्त रहा. वडील बंधू, छोटे बंधू नातेवाईक तसेच सासरे आणि स्वतःची माणसे यांच्याबद्दल नेहमी आपल्या मनात साधारण प्रेम ठेवीत जा. वाटेल त्या विषयाची आपल्या मनात तू कधीही आसक्ती ठेवू नकोस. नेहमी रुद्राक्ष अंगावर धारण कर. त्यांच्या माळा करून डोक्यावर, गळ्यात, दंडात, हातात सदैव बांधत जा. जरी प्राण गेला तरी कधीही शिवाची पूजा सोडू नकोस. असा समग्र उपदेश करून 'शिवकवच' आपल्या अंगाभोवती कसे वेष्छून घ्यावे ह्याचे ज्ञान शिवयोग्याने भद्रायूला दिले. तसेच, आपल्या सर्व अंगाला भस्म लावले म्हणजे रणांगणात लढताना शत्रूच्या शस्त्रांची भीती राहणार नाही असे सांगितले. “मृत्यूपासून मृत्युंजय मंत्र आपले रक्षण करतो. या मार्गात विघ्न आणणाऱ्यांना काहीही विचार न करता वध करावा.
सोमवार व्रत, शिवरात्र व्रत आणि प्रदोष व्रत यांचे विधियुक्त नेहमी आचरण करावे. श्रीशंकराचे आणि विष्णूचे कीर्तन जेथे कोठे चालू असेल तेथे मनापासून ऐकावे. ग्रहणाच्या काळामध्ये भोजन करू नये. व्यतिपात, वैधृती, संक्रमण, महापर्व, कुयोग आणि श्राद्धदिन अशा या दिवशी वैषयिक सुख कधी घेऊ नये. सत्पात्री दान दिले म्हणजे आयुष्य वाढते; पण जर अपात्री दान केले तर मात्र दारिद्र्य येते असे शास्त्रवचन आहे, तेव्हा तेही तुझ्या नेहमी लक्षात असू दे. वेद, शास्त्र आणि पुराण गुरुमुखाने किंवा ब्राह्मणाच्या मुखाने मनोभावे ऐकावे. दान दिल्याने देणारास फार पुण्य मिळते; पण जो पूजेला पात्र नाही त्याची पूजा केली तर पूज्य व्यक्तीचा अपमान होतो. त्यामुळे भयंकर असा दुष्काळ, भय आणि मरण अशा आपत्ती राज्यातील जनतेवर ओढवतात.
खोल डोहात उडी टाकणे, श्रेष्ठ पुरुषाबरोबर मनात वैर धरणे, बलवानाबरोबर स्पर्धा म्हणजे आपल्याच अनर्थाला आपणच आमंत्रण दिल्यासारखे होते. नुसती सुवर्ण कडी आणि सोन्याने मढवलेल्या खड्यांच्या अंगठ्या घालून हात शोभत नाहीत तर तो केलेल्या दानाने शोभतो. नुसती कुंडले घालून कान शोभत नाहीत तर ते नित्यनेमाने शिवगुण श्रवण करण्याने शोभतात, हे सतत ध्यानात असू दे. ज्याचे बोलणे अतिशय गोड आहे, ज्याची पत्नी दिसायला खूप सुरेख आहे, पतिव्रता आहे, जो अतिशय श्रीमंत आहे; पण मनाने उदार आहे त्याचे जीवित धन्य होय. हो किंवा नाही हे सत्य सांगण्याचे व्रत सदोदित घेतलेले असावे. विद्येसाठी सदोदित दान देत असावे. विपत्ती येईल त्यावेळी मनात धैर्य धरावे, वादविवादात बोलून नेहमी यशस्वी व्हावे, युद्धात अतुलनीय असा पराक्रम करावा. याचकांना कधीही रित्या हाताने विन्मुख पाठवू नये. ब्राह्मण, मित्र आणि पुत्र यांच्यासह आनंदाने पोटभर जेवण घेणे म्हणजे उत्तम भोजन झाले असे समजावे. कोठेही जाताना हत्ती-घोड्यांच्या लवाजम्यासह रस्त्यावरून जावे. ज्या शिवलिंगाची पूजा होत नसेल तेथे स्वतः जाऊन त्याची पूजा करावी.
अनाथ माणसाच्या प्रेताचा दहनविधी स्वतः होऊन करण्यासारखे मोठे पुण्य नाही, हे नेहमी लक्षात ठेवावे. ब्राह्मणांचा द्वेष करण्यासारखे दुसरे पाप नाही, हेच खरे आहे. संतांचा सहवास नेहमी मनापासून आनंदाने लुटावा. व्यर्थ कोणावर संतापू नये. दुसऱ्याच्या सुखाने स्वतः हर्षभरित व्हावे, चांगल्या गोष्टी ऐकण्यात नेहमी सौख्य मानावे. असे जो वागतो तोच शंकराचा खरा भक्त असतो. हेतू पक्केपणाने जाणून घे. तू ही सर्व पृथ्वीवरची चकाकणारी रत्ने फुकट आहेत. या पृथ्वीवर फक्त चार रत्ने सर्वश्रेष्ठ आहेत. आपण खातो ते अन्न, पितो ते पाणी, बोलत असलेली चांगली भाषा आणि औदार्य ही चार रत्ने आहेत. कुणाचे कधी उणे काढू नये. श्रेष्ठांचे नेहमी आशीर्वाद घ्यावेत. आपल्या मागील जन्मीच्या पापपुण्याप्रमाणे भाग्य किंवा दुर्भाग्य या जन्मात आपल्या वाट्याला येत असते म्हणून आपण स्वधर्म कधीही सोडू नये, पूर्वी आपला शत्रू असणारा जरी आता मित्र झाला तरी त्यावर विश्वास टाकू नये. आई ज्याप्रमाणे आपल्या पोटातील गर्भाला अपते त्याप्रमाणे अत्यंत काळजीपूर्वक प्रजेथे पालन करावे
आपला गुरु आणि सदाशिव एकच आहेत असे सतत समजावे. यासंपत्तीचा आणि विद्येचा गर्व कधीही करू नये. माणसाची शोभा म्हणजे त्याचे प्राप्त झालेले स्वरूप असते, स्वरूपाचे अलंकार हे त्याच्या ठायी असलेले सद्गुण असतात, गुणांचे अलंकार म्हणजे मिळविलेले ज्ञान असते, ज्ञानाचे भूषण म्हणजे केलेली क्षमा आणि शांती असते, हे कायमचे ध्यानात ठेव. कुल, शील, विद्या, पैसा, राज्य, तप आणि तारुण्य ह्या आठ गोष्टींनी स्वतःला कधीही थोडासुद्धा अहंकार येऊ देऊ नको. "
अशा प्रकारे शिवयोग्याने भद्रायूला उत्तम प्रकारे उपदेश केला, शिवयोग्याने केलेल्या उपदेशाप्रमाणे या जगात जो वागेल त्याला सर्व सुखे विनासायास प्राप्त होतील
या अध्यायात स्वतः प्रत्यक्ष कैलासनाथ वास्तव्य करीत आहेत. या अध्यायाचे पारायण करणे म्हणजे शंकराला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. जो अशी पारायणे नित्यनेमाने करील त्याला यशश्री निश्चितच लाभेल. ही कथा म्हणजे साक्षात हिमालय पर्वत आहे, भक्ती ही त्याची कन्या महानशक्ती देवी पार्वती आहे. ह्या पार्वतीचे पाणिग्रहण करून शंकर येथे श्वशुरगृहीच राहिला आहे. या पुचील कक्षेत भाकर शिवयोगी भद्रायूवर कृपा करील. तीआता आपण ऐकू या.
अध्याय समाप्त
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.