॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥
अध्याय १
दाशार्ह राजाची कथा
जगद्गुरु वेदव्यासांचे शिष्य म्हणतात, की “शिवचरित्र हे अतिशय अद्भुत असे आहे. ते जरी नुसते ऐकले तरी आपल्या सर्व पापांचे पर्वत जळून पूर्णपणे भस्म होतात. जो कोणी हे ऐकतो त्याला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. मनोवांछित संतती प्राप्त होते. शिवाय लक्ष्मीही त्या व्यक्तीवर अतिशय कृपा करते. एखाद्याला चारधाम यात्रा करून जे पुण्य महत्प्रयासाने मिळते तेच पुण्य हे शिवचरित्र ऐकल्यामुळे मिळते.
"ॐ नमः शिवाय' हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये अतिशय श्रेष्ठ असा आहे. तो मंत्रराज आहे. ज्याप्रमाणे सर्व तीर्थक्षेत्रात प्रयाग श्रेष्ठ आहे. वेदान्त हा सर्व शास्त्रात श्रेष्ठ आहे, अस्त्रात पाशुपत अस्त्र सर्वश्रेष्ठ आहे, देवात कैलासनाथ शंकर श्रेष्ठ आहे, पर्वतात हिमालय श्रेष्ठ आहे, तसाच हा मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ असा मंत्र आहे. या मंत्राबाबत विशेष गोष्ट अशी उच्चारणासाठी लिंगभेद, स्थानभेद, परिस्थितिभेद इ. कोठल्याही प्रकारच्या भेदांचे बंधन नाही. स्त्री, शूद्र, गृहस्थाश्रमी, ब्रह्मचारी किंवा कोणीही ह्या मंत्राचा जप अगदी सहजपणे करून मानव जन्माचे सार्थक करून घेऊ शकतो. या जपाला वेळकाळाचेही बंधन नाही. जी व्यक्ती ह्या मंत्राचा जप करते तिच्यामागे भगवान शंकर सतत उभे राहतात व त्यामुळे त्या व्यक्तीला शंकराचा आशीर्वाद सतत प्राप्त होत असतो. की याच्या हे सांगितलेले जरी खरे असले तरी भगवान शंकर सांगतात हा मंत्र अगदी प्रथम स्वतः न म्हणता प्रत्येकाने तो गुरुमुखातून घेतला पाहिजे. यासाठी गुरु कसा असावा ? मनापासून भक्ती करणारा, वैराग्य अंगी असणारा, दिव्यज्ञान प्राप्त असणारा, सर्वज्ञ म्हणजे धर्माचे सर्व ज्ञान असणारा, उदार, दीन-दु:खितांबाबत दयाळू अंतःकरणाचा असा असावा. गुरु विरक्त, शांत, अस्तिक असावा आणि चारी वर्णात वेदाने जो वर्ण ब्राह्मण श्रेष्ठ मानला आहे, त्या वर्णाचा असावा.
आपल्याला मंत्र ठाऊक आहे म्हणून आपणच त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली तर ते व्यर्थ होय. फार काय प्रत्यक्ष भगवंतांनी येऊन जरी तो मंत्र आपणास सांगितला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ज्याप्रमाणे मौंजीबंधनाशिवाय एखाद्या व्यक्तीने गायत्री मंत्राचा कितीही जप केला, तरी तो फुकट आहे असे शास्त्रत सांगितले आहे. सर्व वऱ्हाड विवाहासाठी जमले; पण जर वराचा च पत्ता नसेल तर लग्नघरी किंवा मंडपात जमा झालेल्या त्या वऱ्हाडाचा काय ऊपयोग ? पण हे खरे असते म्हणून गुरूला नम्रपणाने मनोभावे शरण जाऊन, गुरुचरणी नम्र होऊन त्याच्याच मुखातून मंत्र घ्यावा व मग त्याचा स्वमुखातून जप करावा. उत्तर क्षेत्रात या मंत्राचा जप करावा. शिवचरित्र मनापासून वाचण्याचा, ऐकण्याचा मनाला ध्यास लागला पाहिजे, मनाला तळमळ लागून राहिली पाहिजे. असे जर तुमच्याकडून घडले तर सांबसदाशिव तुमच्याजवळ आहे.
याविषयी सांगितली जात असलेली एक जुनी कथा आहे. फार फार वर्षांपूर्वी मथुरेला यादव वंशातील दाशार्ह नावाचा एक राजा राज्य करत होता. तो अतिशय पराक्रमी आणि शूर होता. तसाच तो स्वभावाने उदारही होता. त्याचे राज्य फार विस्तारलेले म्हणजेच मोठे होते. त्याने केलेले अनेक मांडलिक राजे त्याच्या दरबारात त्याच्यासाठी नजराणे घेऊन येत असत आणि दाशार्ह राजाला लवून प्रणाम करीत आणि मग राजाची कृपा झाली, की अतिशय आनंदित होत असत. त्याच्या राज्यातील ऋषिमुनी आणि सर्व प्रजाजन राजाचे सतत कल्याण होवो म्हणून देवाची नित्यनेमाने प्रार्थना करीत असत. जो कोणी याचक जे जे मागेल ते ते राजा त्याला तत्काळ देत असे. त्याच्या राज्यात दरिद्री, उपाशी, आजारी असा कधीच कुणीही नव्हता. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांत राजा स्वतः निपुण होता. त्याची अफाट चतुरस्त्र सेना पाहून इतर सर्व राजे भयभीत होत असत. दाशार्ह राजाचे बोलणे-वागणेसुद्धा अतिशय गोड होते, तो अतिशय सत्यवचनी होता. राजाच्या आवडत्या पट्टराणीचे नाव होते ' कलावंती.' ती धर्मतीर्थ मानण्यात आलेल्या काशी नगराची राजकन्या होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती. तिचे ओठ तोंडल्यासारखे तांबडे लाल होते. तिचे डोळेसुद्धा कमळासारखे सुंदर होते. ती सिंहकटी होती. तिची चाल हंसीसारखी अतिशय डौलदार होती. केस भरपूर लांबसडक आणि काळेभोर होते. तिचा चंद्रासारखा गोल चेहरा फारच लोभस दिसत असे. ती हसली, की तिचे हिरकण्यांसारखे पांढरेशुभ्र असलेले दात तेजाने झळकत असत. अशा ह्या अतिशय स्वरूपसुंदर राणीवर दाशार्ह राजाचे नितान्त प्रेम होते.
एक दिवस त्याने आपली पट्टेराणी कलावतीला आपल्या 'महालात यावे' असा तातडीने निरोप पाठवला; पण राणी काही आली नाही. तिच्या अतिशय सुंदर अशा स्वरूपाने वेडावलेला राजा कामातुर होऊन स्वतः आपणहून तिच्या महालात गेला. तिच्याजवळ जात मोठ्या प्रेमाने तो म्हणाला, 'राणी, मला नकार का बरं पाठवला ? तुझ्या मनात माझ्याबद्दल राग किंवा काही किंतु तर नाही ना? ये, अशी जवळ ये. आपल्याला चांगला रूपसंपन्न, गुणवान पुत्र असावा असे नाही का तुला वाटत ?
राणीने राजाचे हे बोलणे ऐकले, त्याबरोबर गोड हसून ती म्हणाली, 'महाराज, आपण माझे नाथ आहात, प्राणप्रिय पती आहात, आपली आज्ञा पालन करणे हे माझे कर्तव्य आहे; पण तरीही ती मी मानली नाही. कारण सध्या मी शंकराचे व्रत धरले आहे. म्हणून मी व्रतस्थ आहे. व्रतस्थ, रोगी, गर्भिणी, वृद्ध, अशक्त किंवा ऋतुस्नात असलेली स्त्री पतीने नेहमी दूरच ठेवावी, असे शास्त्रात सांगितलेले आहे. ज्यावेळी स्त्री-पुरुष दोघेही मनाने अतिशय आनंदी असतील, आणि चिंताविरहित असतील तो दिवस जर पर्वकाळ किंवा व्रताचा दिवस नसेल तर त्या वेळी पंचपक्वान्नांचे भोजन करून मोठ्या प्रीतीने एकमेकांनी प्रेमरसाचे प्राशन करावे, हा राजधर्म आहे. मी आज आपली आज्ञा मोडली त्याबद्दल क्षमा असावी. "
पण दाशार्ह राजा कामातुर झाला होता. अशा तऱ्हेच्या कामातुराला कोणाचे भय किंवा लाज नसतेच. राजाने राणीचे म्हणणे न ऐकताच जबरदस्तीने तिला एकदम आपल्या बाहुपाशातच ओढले; पण तेवढ्यात झाली मजा! एखाद्या अतिशय उष्णतेने तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मिठी मारल्यानंतर जसे सर्व अंग भाजावे तसे राजाचे संपूर्ण अंग भाजले. त्याक्षणीच कलावतीला एकदम दूर सारून राजाने तिला विचारले, "राणी हा काय प्रकार आहे? आम्हांला याचा अगदी स्पष्टपणे खुलासा हवा आहे !
मग राणी कलावती नम्रपणे राजा दाशार्हला म्हणाली, 'महाराज, आपण रागावू नका. मी सार काही आपणास स्पष्ट करून सांगते. दुर्वासमुनी हे माझे गुरु. त्यांनी मला जप करण्यासाठी शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्या मंत्राचा सध्या मी अहोरात्र जप करते आहे. मी स्वतः आता त्या जपामुळे पावन झाले आहे. अतिशय पवित्र आहे.. मीपूर्णपणे शुद्ध आहे. माझे सर्वांग चंद्राप्रमाणे अतिशय शीतल आहे; पण महाराज, आपली काया आपल्या मनात निर्माण झालेल्या विषयामुळे अपवित्र झालेली आहे. आपण कधीही चुकूनसुद्धा शंकराची पूजाअर्चा केली नाही, अभक्ष्य अधूनमधून भक्षण केलेले आहे. गुरुकृपेमुळे मला आता त्रिकाल ज्ञान प्राप्त झालेले आहे. आपल्या हातून कधीही व कोणत्याही प्रकारे गुरुसेवा झालेली नाही. तेव्हा राज्योपभोगानंतर आपल्या नशिबी नरकयातना आहेत, हे अगदी सत्य आहे.
दाशार्ह राजा कलावतीचे ते बोलणे अगदी बारकाईने, लक्षपूर्वक ऐकत होता. आपले दोष आता स्पष्टपणे त्याला दिसत होते. कलावतीचे बोलणे ऐकून आता त्याचे मन पश्चात्तापाने पावन झाले होते. म्हणून गंभीरपणे तो कलावतीला म्हणाला, 'प्रिये कलावती, तू मला तो शिवमंत्र दे. म्हणजे आजपर्यंत जी जी पापे मी जाणते अजाणतेपणी केली त्यांचा समूळ नाश होईल व त्यायोगे माझ्या जीवनाचे सार्थक होईल.
तेव्हा राणी कलावती राजा दाशार्हला म्हणाली, " महाराज, तुम्ही माझे सर्वस्व आहात, नाथ आहात, मी तुमची दासी आहे. धर्माप्रमाणे तुम्हीच माझे गुरू आहात. तेव्हा मी तुम्हांला धर्माचरणाच्या विरूध्द वर्तन करून मंत्र देऊ शकत नाही.
'तर मग मला मंत्र मिळण्यासाठी मी काय करायला हवे ? 'नाथ, मी सांगते ते नीट ऐका. यादव कुळात गर्गमुनी नावाचे श्रेष्ठ ऋषी आहेत. ते अतिशय विद्यावंत आहेत. तेव्हा आपण आता त्या गर्गमुनींना शरण जा आणि त्यांच्याकडून स्वतःसाठी शिवमंत्राची दीक्षा घ्या. कलावती राणी नम्रपणाने म्हणाली. राणीचे हे बोलणे ऐकून झाले आणि मग राजा तिच्यासह गर्गमुनींच्या आश्रमात जाऊन दाखल झाला. आपल्याकडे एक महान राजा येतो आहे हे पाहून गर्गमुनी त्या दोघांना सामोरे आले. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून नम्रपणे गर्गमुनींसमोर उभा राहिला.
'महाराज, आपण स्वतः का येणे केलेत ?” गर्गमुनींनी त्यांना विचारले. 'गुरूराज, आपण मला शिवदीक्षा द्या... मंत्र द्या... .मी पापी आहे... हे... माझ्यावर कृपा करा.
अशा तऱ्हेने राजाचे अत्यंत नम्रतेचे बोलणे गर्गमुनींनी त्याच्या पाठीवर ममतेने हात ठेवला. तेव्हा राजाला अतिशय धन्य वाटले. त्या दिवशी राजाने मुनींच्या आश्रमातच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी गर्गमुनींनी राजाला पवित्र अशा यमुना नदीत स्नान करून येण्याची आज्ञा केली. मुनींनी केलेल्या आज्ञेप्रमाणे राजा व राणी यमुना नदीतध्ये स्नान करून बाहेर आले. मग एका अतिशय भव्य वृक्षाखाली गर्गमुनींनी दोघांकडून विधिवत यथासांग शिवाचे पूजन करून घेतले. राजा-राणीने भगवान शंकराला हिरेमाणकांनी अभिषेक केला. उत्तम वस्त्रे, दागदागिने व भरपूर दक्षिणा वगैरे देऊन गुरूची मनोभावे पूजा केली. जणू काही कुबेरानेच भांडार इथे ओतले आहे असे तेथील अपूर्व दृश्य पाहून वाटू लागले. गर्गमुनींना दाशार्ह राजाने अतिशय नम्रपणे प्रणिपात केला. गुरूंनी राजाला प्रेमातिशयाने आलिंगन दिले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा कृपाहस्त ठेवला व प्रसन्न होऊन राजाला शिवमंत्र सांगितला.
त्याबरोबर दाशार्ह राजाचे हृदयात ज्ञानरूपी चंद्र तेजानें प्रकाशित झाला व मनात असलेला आतापर्यंतचा अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला. राजा जसजसा मंत्राचा अहोरात्र जप करू लागला तसतसे राजाचे शरीरातून वास करून असलेले पापरूपे कावळे बाहेर पडू लागले. काहींचे जळून भस्म झाले, काहींचे तर पंख जळाले, तर काही चडफडत तडफडत राजाच्या शरीरामधून बाहेर पडले. थोडीशी ठिणगी पडली तर काट्यांचे रानच्या रान संपूर्ण जळून खाक होते त्याप्रमाणे शिवमंत्राने राजाची आजपर्यंतची सर्व पापे जळून भस्म झाली. वा अनुभूतीमुळे राजालासुद्धा खूपच आश्चर्य वाटले.
न रहावून राजाने ऋषींना प्रश्न केला, "गुरूमहाराज, माझे तनमन मला आता खूपच निर्मळ झाल्यासारखे वाटते आहे! हे कशाने बरे झाले ?" राजाने निष्पापपणे विचारले.
तेव्हा गर्गमुनी राजाला म्हणाले, "राजा, तुझ्या शरीरात वास करून असलेली अनंत जन्मींची महापापे कावळ्यांच्या रूपाने तुझ्या शरीराबाहेर निघून गेली आहेत म्हणून तुला अशा तऱ्हेची अनुभूती प्राप्त झालेली आहे. "
मग राजाने गुरूला पुन्हा अतिशय आदराने नमस्कार केला व म्हटले, "गुरूमहाराज, आपण खरोखरच धन्य आहात. आपण दिलेला पंचाक्षरी मंत्रमुद्धा खरोखरच धन्य आहे. आपण मला संपूर्णपणे पावन केलेत. इतके दिवस काम, क्रोध, लोभ, मत्सर या महाभूतांच्या तडाख्यात मी सापडलो होतो, तसेच आशा आकांक्षा, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना या जखिणी मला छळत रात्रंदिवस होत्या. माझा या सर्वांनी केलेला तो सर्व छळ आता थांबला आहे. खरोखर सहस्र जन्मांचे ज्ञान आपल्यामुळे मला प्राप्त झाले आहे. माझी सर्व पापे आता जळून खाक झाली आहेत.
महाराज, आता मी माझ्या पापांचे वर्णन काय करू ? अभक्ष्य भक्षण करणे, मद्य प्राशन करणे, परस्त्रीकडे पापी दृष्टीने पाहणे, गुरूची निंदा करणे, असा अनाचार माझ्याकडून घडत होता. गोहत्या करणे, ब्रह्महत्या करणे, स्त्रीहत्या, गुरुहत्या करणे, दुसऱ्यांची निंदा करणे, मित्राचा, गुरूचा द्रोह करणे, धर्माची निंदा-नालस्ती करणे, पंक्तिभेद करणे, असा दुराचार करण्यास मला काहीच वाटत नव्हते. शंकर आणि विष्णू यांच्यात भेद करणे, दुसऱ्याचे ज्ञान चोरणे, ग्रंथ चोरणे, पक्ष्यांना ठार मारणे, व्यर्थ नास्तिकपणा दाखवून वृथा वाद घालणे, स्त्रीलंपट होणे, कृतघ्न होणे, दुसऱ्याचे धन हिरावून घेणे, तीर्थांचा नायनाट करणे, दीन माणसांना मारणे इत्यादी गोष्टी करण्यास माझे मन अजिबात कचरत नसे. भगिनी, माता, पिता ह्यांची हत्या करणे, कन्येचा विक्रय करणे, गाईला विकणे, दूध विकणे, गाव जाळणे, आत्महत्या करणे, भ्रूणहत्या (बालहत्या) करणे अशा तऱ्हेची अनेक महापापे माझ्या हातून सहस्र जन्मांत घडली होती. आपल्या कृपेमुळे माझी ही सर्व पापे जळून नष्ट झाली व त्यांच्या बंधनातून मी मुक्त झालो, त्यांचा शिवमंत्राने नाश झाला आहे. माझ्या पदरी थोडेफार पुण्य होते म्हणून मला हा मानव जन्म मिळाला आणि गुरूकृपेने मला प्राप्त झालेल्या या मानव जन्माचे आज खरोखरच सार्थक झाले. असे म्हणून राजाने पुन्हा एकदा गुरूला नम्रपणे नमस्कार केला व सर्वप्रकारे दान, दक्षिणा देऊन संतुष्ट केले.
अशा तऱ्हेने आपल्या जवळपासच गुरु असूनही त्याचा जे अनुग्रह घेत नाहीत. तसेच, गुरु संकटात असताना आपण स्वत: मजेत रहातात अशांना ज्ञानरूपी गुरु कसा काय प्रसन्न होणार ? काही असे म्हणतात- गुरूला तनमनधन अर्पून काय मिळणार? गुरु थोडाच शाश्वत आहे? त्याला काय अमरत्व प्राप्त झाले आहे ? तोही नाशवंतच आहे पण असे जे म्हणतात त्यांचे मिळविलेले ज्ञान, वैराग्य, शास्त्रपठण सर्व काही व्यर्थ गेले असे समजावे. कारण ज्या मापाने तांदूळ मोजतात त्या मापाला तांदळाचा काहीच लाभ होत नाही, असे व्यवहारात आपण नेहमीच पाहात असतो. चरकात उसाचा रस काढला जातो, त्याला पण त्या रसाची चव अजिबात कळत नाही. तसेच, ज्या भांड्यात साखर भरून ठेवलेली असते त्या भांड्याला साखरेची गोडी थोडीसुद्धा कळत नाही. त्याचप्रमाणे या जगतामध्ये गुरूला न मानणाऱ्या माणसाची स्थिती होत असते हे सतत लक्षात ठेवले पाहिजे.
आता 'ॐ नमः शिवाय' या शिवमंत्राचा उपदेश घेतलेला दाशार्ह राजा तसा नव्हता. त्याने गुरूला पूर्णपणे संतुष्ट केले आणि आपल्या कलावती राणीसह तो आपल्या घरी परतला. राणी कलावतीने अशा रीतीने आपल्या पतीचा खरोखर उद्धार केला. राजाने शिवमंत्राचा जप सतत चालू ठेवला. त्यामुळे त्याच्या राज्यातून रोग, मृत्यू, दुष्काळ हे सर्व कायमचे पळून गेले. कोणीच दु:खी राहिले नाही. संतुष्ट झालेल्या दाशार्ह राजाने कृतार्थतेने कलावतीला मोठ्या प्रेमाने अलिंगन दिले. पूर्वीच्या राजाच्या सर्वांगाला जाळून काढणाऱ्या तिच्या मृदू स्पर्शातून आता चांदण्यांचा शीतल असा शिडकाव होत होता. यथा राजा तथा प्रजा' म्हणतात त्याप्रमाणे आता या राजामुळे त्याची सर्व प्रजाही शिवपूजन, शिवकीर्तन, शिवमंत्राचा सतत जप करू लागली. घरोघरी रूद्राभिषेक, ब्राह्मण-भोजन, मंत्रजागरणे होऊ लागली आणि सर्व प्रजाजन सुखी झाले.
अशा तऱ्हेने भवमुक्त झालेल्या दाशार्ह राजाची ही गोष्ट जे नित्य वाचतात त्यांचा शंकर पाठीराखा असतो, त्यांचा संसार सुखाचा होतो, आणि दाशार्ह राजाप्रमाणेच या संसाराच्या सर्व व्याप-तापातून त्यांना मुक्ती मिळते..
श्रीशिवलीलामृत कथासार पहिला अध्याय समाप्त
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.