Subscribe Us

शिवलीलामृत अध्याय २ || श्रीशिवलीलामृत कथासार || shri shivlilamrut adhyay 2 || श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा

 ॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥

अध्याय २

व्याध-हरणाची कथा


भाग :-१
            ज्या ज्या ठिकाणी नेहमी शंकराचे स्मरण चालू असते तेथे मुक्ती वास करीत असते आणि त्यामुळे मोठमोठी संकटे नाश पावत असतात. हे शिवस्मरण मुद्दाम केले किंवा चेष्टा करता करता केले, अथवा नकळत केले तरीही कोणत्याही प्रकारे नामस्मरण करणारावर श्रीशंकर प्रसन्न होतो. ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला म्हणणे त्याचे जसे सोने होते, तसेच नकळत अमृत प्राशन केले तरी त्याप्रमाणे अमरत्व प्राप्त होते, अथवा योग्य औषधी आपणास न समजता भक्षण केली तरी रोग नाहीसा होतो, वाळलेल्या गवताच्या गंजीवर एखाद्या अजाण बालकाने त्याला न समजता ठिणगी टाकली तरी ती सगळीच्या सगळी गवताची रास जळून खाक होते, त्याप्रमाणे कळत-नकळत कसेही शिवनाम घेतले तरी नामस्मरण करणाऱ्या त्या व्यक्तीच्या पापांचा नाश झाल्याशिवाय राहात नाही. एखाद्याने विनोदाने शिवाचे नाम घेतले असले किंवा इतर लोक शिवनामाचा जप करतात म्हणून एखाद्याने चिडून अरे हे असे का सारखे जीव गेल्यासारखे 'शिवशिव' ओरडत आहेत, माझे डोके उठले आहे. त्यांच्या या ओरडण्याने एकसारखे शिव शिव म्हणून त्यांना काय मिळते कुणास ठाऊक? मला तरी काहीच कळत नाही, " असा त्रागा केला; पण तसा त्रागा करताना शंकराचे नाव नकळत त्याच्या तोंडून घेतले गेले. 
            
               एवढेच काय आपल्या स्वत:च्या किंवा घरातील मुलांची नावे शंकराची ठेवली असल्याने त्यांना दिवसभरात हाक मारताना आपोआप शंकराचे नामस्मरण झाले तरीही भोळा शंकर त्यांच्यावर प्रसन्न होतो. त्यातही महाशिवरात्रीच्या शुभदिनी जर उपवास व जागरण घडले, बिल्वपत्रांनी शंकराची मनोभावे पूजा केली गेली तर हजार जन्मांची पातके तत्काळ नष्ट होऊन जातात. तसेच, जो कोणी शंकराला रोज बेल वाहतो तो स्वतः उद्धरून जातो. इतकेच नव्हे तर अशा त्या व्यक्तीच्या दर्शनाने इतरही व्यक्तींचा उद्धार झाल्याशिवाय राहात नाही. 

         महाशिवरात्रीच्या पवित्र अशा दिवशी वसिष्ठ, विश्वामित्र यांच्यासारखे थोर विद्वान, पूजनीय श्रेष्ठ मुनी, तसेच, यक्ष, गंधर्व, देव, देवीसुद्धा शंकराची पूजा करीत असतात. कारण महाशिवरात्रीचे महत्त्वच अतिशय आगळे असे आहे. सहज एखाद्याकडून शंकराचे नामस्मरणे घडले तरी पापी माणूस कसा पुण्यवान होतो त्याची एक सुरस अशी कथा आहे, ती अशी फार फार जुनी कथा आहे ही. त्यावेळी विंध्य पर्वतावर एक भिल्ल रहात होता. त्याच पर्वताच्या जंगलात रहाणारी हरणे, पक्षी, इतर जंगली जनावरे मारावीत आणि त्यावर आपली रोजची उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते. त्याच्या नावावर रोजच्या रोज घडणाऱ्या प्राणिहत्येची पापे चढली होती; पण त्या अजाण, अज्ञानी भिल्लाला त्याची थोडीसुद्धा जाणीव नव्हती.

             माघ महिना अगदी संपत आला होता; पण बोचरी थंडी अजूनही अंगाला बोचत होती. पोटाची खळगी भरायलाच हवी होती म्हणून हा भिल्ल त्या दिवशी भल्या पहाटेला आपल्या घरातून बाहेर पडला. धनुष्य, बाण, जाळे आणि इतर हत्यारे आपल्याबरोबर घेऊन तो नेहमीप्रमाणे चालला होता. गावाच्या अगदी टोकाला एक छोटेसे; पण अतिशय सुंदर शिवमंदिर होते. आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता, त्यामुळे आजुबाजूच्या खेड्यांतून अनेक लोक शंकराचे दर्शनासाठी त्या देवळात मुद्दाम आले होते. मंदिर आंब्याचे टहाळे-कागदांच्या पताका लावून उत्तम प्रकाराने शृंगारले होते. कळसावर शंकराचा ध्वज फडफडत होता. मंदिराजवळ दिवे लावून आरास केली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी पवित्र असे सुंदर शिवलिंग होते. लोक मोठ्या भक्तिभावाने शंकराची पूजा करीत होते.. अभिषेक पात्रातून शिवलिंगावर पवित्र पाण्याच्या धारा गळत होत्या. मंत्रघोष चालू होता. टाळमृदुंग हातात घेऊन तन्मयतेने भक्तजन कीर्तन करीत होते, नाचत होते. देवळात दिव्यांची आरास केली होती. भक्तांनी भक्तीने लावलेल्या उदबत्तीकापूर यांचा सुगंध गाभाऱ्यात सर्वत्र दरवळत होता. 'शिवशिव... हर हर सांब सदाशिव अशा जयघोषाने सारे वातावरण भक्तीमय झालेले होते, भारून गेलेले होते.

            या देवळाजवळ घरामधून उपजीविकेसाठी बाहेर पडलेला तो आपला भिल्ल येऊन पोहोचला. तेथे असलेली अफाट गर्दी पाहून तेथे तो थोडा थांबला व लोक काय काय करीत आहेत हे मोठ्या कुतूहलाने पाहू लागला. अशा तऱ्हेने तो तेथे थांबला असताना बराच वेळ गेला.

               आणि मग 'काय हा मूर्खाचा बाजार भरला आहे! पण या दगडाच्या देवाला कधी पाझर फुटणार आहे ? बोलून-चालून एक निर्जीव दगडच तो! हे मूर्ख त्याच्यासमोर पैसे काय ठेवत आहेत, फळे काय ठेवत आहेत! पंचपक्वान्ने खाणे यांच्या नशिबात असूनही उपवास करीत आहेत आणि या न हलणाऱ्या, न बोलणाऱ्या दगडाच्या देवाचा 'हर हर महादेव' म्हणून जयजयकार करत आहेत! काय म्हणावे अशा या लोकांना ? आपले आपण चला... या मूर्खाच्या नादी लागून उपयोग नाही. मला तर माझे व माझ्या बायकामुलांचे पोट भरण्यासाठी शिकार करायलाच हवी, ""असे स्वतःशीच तो भिल्ल आपल्या दैनंदिन कामासाठी चालू लागला व गर्द रानात शिरला. देवळाच्या डाव्या बाजूला लोकांची वर्दळ नसल्याने त्याने देवळाच्या उजव्या बाजूने चालत जाऊन रस्ता पकडला. रस्त्याने पुढे पुढे चालत जात असताना लोकांची नक्कल करण्यासाठी तोही आपल्या तोंडाने हर.. हर.. महादेव हर हर.. शिव शिव !" असे सतत म्हणत होता; पण त्यामुळे झाले काय ? लोकांची नक्कल म्हणून शंकराचे नाव आपल्या तोंडाने घेतल्यामुळे त्याचे दोष, त्याची आतापर्यंतची सर्व पापे हळूहळू नष्ट होऊ लागली. बराच वेळ रानात इकडे तिकडे भटकून शोधाशोध करण्यात घालवून आज त्या भिल्लाला एखादी लहानशीसुद्धा शिकार मिळाली नाही. सूर्य मावळतीला गेला, अस्त पावला. हळूहळू रजनीने आपले काळे पांघरूण सर्व विश्वावर तत्परतेने अगदी अलगद पसरले. विद्वान लोक सभेतून निघून गेल्यानंतर ज्याप्रमाणे मूर्ख लोक जोरजोरात ओरडून आपले मत जाहीर करतात त्याप्रमाणे सूर्यराज पश्चिमेला निघून गेल्यानंतर तारे उसन्या प्रकाशाने आकाशात चमचम करू लागले. हळूहळू सारे आकाश ताऱ्यांनी व्यापून टाकले.

            आज संपूर्ण दिवसभरात भिल्लाला काहीच शिकार मिळाली नव्हती. सकाळपासून त्याच्या पोटात अन्नाचा एक कणसुद्धा गेलेला नव्हता. त्यामुळे काय करावे हे त्याला सुचेना! तेवढ्यात त्याला थोड्याशा अंतरावर एक मोठे सरोवर दिसले. सरोवरात सुंदर सुंदर कमळे फुललेली होती. आणि सरोवराच्या काठी हिरव्यागार मोठमोठ्या बिल्ववृक्षांची दाटी होती. झाडी इतकी दाट होती, की. समोरचे अगदी हाताच्या अंतरावरचे सुद्धा दिसत नव्हते. चंद्राचे किरणही आत प्रवेश करायला घाबरतील इतकी हिरवीगार गर्द झाडी त्या शांत व सुंदर सरोवराभोवती पसरलेली होती. आता तर रात्र अधिकाधिकच गडद होत चालली. भिल्ल तिथल्या एका उंच बेलाच्या झाडावर चढून बसला. सरोवराचे पाणी पिण्यासाठी या रात्रीच्या वेळेत तरी एखादे जनावर येईल या आशेने धनुष्याला बाण लावून अगदी सावधपणाने तो तयारीने बसला होता. कान आवाजाचा कानोसा घेत होते व तो संधीची वाट पहात होता; पण पानांच्या दाटीमुळे त्याला समोरचे काहीच दिसत नव्हते. अशा स्थितीत मग त्याने आपले धनुष्य व बाण डाव्या हातात धरले आणि उजव्या हाताने झाडाच्या फांदीची चेहऱ्यासमोर येणारी पाने तेथेच खुडून खाली टाकायला सुरुवात केली. दैवयोगाने तो ज्या झाडावर बसला होता त्याच झाडाखाली एक शंकराचे लिंग होते.     
                
                  भिल्ल ज्या झाडावर बसला होत्या त्या बेलाची पाने तोडत होता व खाली टाकत होता. ती पडलेली पाने नकळत पिंडीवर पडत होती. भिल्लाला संपूर्ण दिवसभरात शिकार न मिळाल्याने सकाळपासून उपवास घडला होता. आता रात्रीच्या वेळी झाडावर बसून शिकारीची वाट बघताना आपोआप जागरण घडत होते. बिल्वपत्रांनी भिल्लाला न कळत त्याच्या मनात नसतानाही शंकराची पूजा झाली होती आणि लोकांच्या मूर्खपणाला हसण्यासाठी तो आपल्या तोंडाने सारखा शिव शिव हर हर ." असे म्हणत त्यांची नक्कल करत होता. त्यामुळे आपोआपच नकळत शिवाचे नामस्मरण त्याच्याकडून होत होते. रात्रीचा एक प्रहर उलटला असेल आणि बेलाच्या झाडावर बसलेल्या भिल्लाला जनावराची चाहूल लागली. त्याने त्या अंधारातही नीट निरखून पाहिले. तेव्हा त्याला दिसले, की एक सुंदर हरिणी त्या सरोवराचे पाणी पिण्यासाठी तेथे आली होती. 

                    भिल्लाने भात्यातून बाण काढून प्रत्यंचा ताणली आणि धनुष्याला बाण लावला आणि तो आता बाण सोडणार तोच ती हरिणी मनुष्यवाणीने त्यालाम्हणाली, "अरे व्याधा, थांब. तू बाण सोडू नको! मला आधी सांग, की मी तुझा काही अपराध केला आहे का ? मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवांनी तुझे काय केले आहे ? माझ्यासारख्या गर्भवती हरिणीला मारलेस तर तुला फार मोठे पाप लागेल, हे लक्षात घे. शंभर बैल मारले तर गोहत्या केल्यासारखे पाप होते. शंभर गोहत्या केल्या म्हणजेच शंभर गायींना ठार मारले तर एक ब्राह्मण मारल्याचे पातक मारणाऱ्याच्या माथी लागते. शंभर ब्राह्मण मारले तर एका स्त्रीचा वध केल्याचे पातक लागते. अशा शंभर स्त्रिया जो मारील, त्याला गुरुहत्या केल्याचे पातक लागते... आणि व्याधा; गुरुहत्येतूनही शंभरपट जास्त पातक एक गर्भिणी मारल्यामुळे लागते. म्हणून तू माझ्यावर बाण सोडण्यापूर्वी नीट विचार कर आणि एवढ्या मोठ्या पापाचे धनी व्हायचे का हे तूच ठरव.

                 भिल्ल म्हणाला, "हे बघ हरिणी! मला आज एकही शिकार न मिळाल्यामुळे कडकडीत उपवास घडला आहे. माझी बायकापोरही घरी उपाशीच झोपली असतील. त्यांना उपाशी ठेवल्याचे पातक मला लागलेच आहे; पण तू हरिणी असूनही शास्त्रात पारंगत असल्यासारखी बोलत आहेत, हे कसे काय घडले, याचे मला फार आश्चर्य वाटत आहे. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले ? हे सर्व मला तुझ्याकहून जाणून घेण्याची इच्छा आहे आणि हे जर तू मला सांगणार असशील तर मात्र मी तुझ्यावर दया करीन, हे तू लक्षात घे. 

                 त्याबरोबर ती सुंदर हरिणी त्या भिल्लाला म्हणाली, "अरे व्याधा, समुद्राचे मंथन करून त्यामधून देवदानवांनी जी चौदा अनमोल अशी रले बाहेर काढली त्यातले एक बहुमोल रत्न म्हणजे मी ! माझे नाव रंभा. मला पाहताक्षणीच देवदानव दोघेही पार पाघळले. माझ्या अंगाचा येणारा वासच इतका सुंदर होता, की त्या वासाने मोहित होऊन ऋषीमुनी आपले तप-जपजाप्य, पूजा-अर्चा. ' ईश्वरसाधना सोडून वेगाने वेड्यासारखे धावत येत असत. माझे गाणे ऐकणे म्हणजे तर सर्वांना सुखाची एक पर्वणी वाटत असायची. त्यामुळे माझ्या रूपाचा आणि नृत्यगायन कलेतील नैपुण्याचा मला अतिशयच गर्व झाला. मी अहंकारी बनले. माझे वागणेही तसेच झाले. माझ्यापुढे सर्व जग मला अगदी कस्पटासारखे तुच्छ वाटू लागले आणि मी भगवान शंकराला तर पार म्हणजे पारच विसरून गेले. रात्रंदिवस शंकराची भक्ती करणारी मी; पण त्याची भक्ती करण्याचे अजिबातच सोडून दिले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे उपवासही मी नित्यनेमाने करीत असे, आता ते करणेही मी सोडून दिले होते.

                'गर्वाने धुंद झालेल्या मला आता नशेत रहावेसे वाटू लागले. अमृतापेक्षा मला मद्य अधिक प्रिय वाटू लागले. देवांचे अप्राप्य असे प्रेम लाथाडून मी हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळले. त्याच्याबरोबर मदहोशीत मी रमून गेले.

           असाच एक दिवस हिरण्य राक्षस शिकारीला गेला होता. देवांचा तर तो शत्रूच होता. देवाचे नाव घेतलेलेही त्याला अजिबात आवडत नसे. तो घरी नाही हे पाहून तेवढ्यात भगवान शंकराचे दर्शन घेऊन यावे असे त्या दिवशी का कोणास ठाऊक माझ्या मनाला वाटले आणि मी गुपचूप कैलास पर्वतावर आले.

              'मला तेथे आलेली पाहताच भगवान शंकर तर फार रागावले आणि त्यांनी रागाच्या भरातच मला शाप दिला... हे मूर्ख स्त्रिये, तू आता माझ्यासमोर येऊ नकोस! जा... मृत्यूलोकात जाऊन तू हरिणी हो... तुझ्या त्या दोन अत्यंत आवडत्या मैत्रिणी त्याही तुझ्यासारख्याच ! तुम्ही सर्वजणी मला विसरलात, आता भोगा आपल्या आपल्या कर्माची फळे ! त्याही तुझ्यासारख्याच हरिणी बनतील आणि तुझ्याबरोबर मृत्युलोकी जातील आणि तुझा जो यार तो राक्षस हिरण्य तोसुद्धा हरिण होईल. आता माझ्यासमोरून निघून जा आणि पृथ्वीतलावर जाऊन आनंदाने तुमचा संसार करा

           'मी पश्चात्तापाने आणि दुःखाने रडत रडत शंकराचे पाय धरले. तेथे मी पुनः पुन्हा शंकराची स्तुतिस्तोत्रे गायिली आणि 'मला उ:शाप द्या' अशी विनंती भगवान शंकराला केली.

             'मला मनातून खरोखरच पश्चात्ताप झालेला पाहून भोळ्या शंकराचा राग थोडा कमी झाला आणि मग मला शंकर म्हणाले, बारा वर्षे मी दिलेला माझा शाप तुम्हांला भोगावाच लागेल. बारा वर्षांनंतर तुम्ही शापमुक्त होऊन पुन्हा कैलास पर्वतावर याल. जा... आता... आणि अशा रीतीने शंकराच्या शापाप्रमाणे आम्ही पृथ्वीवर मृगयोनीत जन्म घेतला. अरे व्याधा, मी गर्भिणी आहे... माझे दिवस पूर्ण भरले आहेत. मला आता प्रसववेदना सुरू होत आहेत. तेव्हा तू थोडा वेळ माझ्या घरी जाण्याची परवानगी दे. मी प्रसूत झाले, की माझ्या बाळाला मी त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करून लगेच येथे तुझ्याकडे परत येते. मग तू तुझ्या धर्माप्रमाणे उपजीविकेसाठी मला जरूर ठार कर!"

              हातातले धनुष्यबाण खाली धरून भिल्ल म्हणाला, अगे हरिणी, तू बोलतेस तर फार गोड... पण तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा काय ठेवू ? आपला प्राण तर प्रत्येकाला प्रियच असतो. तू येथून एकदा का जिवंत गेलीस तर परत थोडीच इथे मरायला येणार आहेस ? तेव्हा मला तुझ्यावर विश्वास ठेवता यावा यासाठी तू कसली तरी शपथ घे आधी ! "

                त्याबरोबर ती हरिणी पुढे म्हणाली, तर मग व्याधा ऐक, मी शपथ घेते. ब्राह्मण कुळात जन्म मिळूनसुद्धा जो वेदांचा थोडासुद्धा अभ्यास करीत नाही, रोजच्या रोज मनापासून स्नानसंध्या करीत नाही, आपल्याजवळ असलेली विद्या दुसऱ्याला देताना जो पैसे घेतो, त्याचप्रमाणे ज्याला भजनपूजन अजिबात आवडत नाही, अशा गोष्टीमुळे त्याला लागणारे पाप माझ्या शिरावर राहील. दान देण्यासाठी जर कुणी तयार झाला तर त्यात जो कोणी विघ्न आणतो, आपल्या गुरूची निंदा करतो, तसेच शंकर- विष्णू यांनी निंदा-नालस्ती करतो, ब्राह्मणांना एखादे दान देऊन ते पुन्हा त्यांच्याकडून हिसकावून घेतो, विद्वान आणि सत्त्वशील, सदाचरणी अशा ऋषींची निंदा करतो, आपल्या स्वतःचा धर्म सोडतो, दुसऱ्यांच्यामध्ये भांडणे लावतो, त्यामुळे जी पातके लागतात ती सर्व पातके मला लागतील.

              "देवळात पुराण-कथाकीर्तन चालू असताना जे कोणी विडा खातात त्यांच्या अंगावर कोड उठते. जे कोणी देवळात रतिसुखात रमतात, तसेच पति-पत्नीत मुद्दाम भांडणे लावून देतात ते पुढील जन्मी नपुंसक म्हणून जन्म घेत असतात.

           'दुसऱ्याच्या वर्मावर जे मुद्दाम आघात करत असतात ते कावळे होतात. आपल्याला येत असूनही जो गुरू शिष्याला आपल्याजवळची विद्या देत नाही तो पिंगळा होतो. जे ब्राह्मण लोकांच्याकडून अनुचित दान घेतात त्यांना गंडमाळा होतात. दुसऱ्याच्या गाई जे चोरून आणतात ते अतिशयच अल्पायुषी होतात. जो राजा आपल्या प्रजेला उगाच छळतो तो पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो. एखाद्याने एखाद्या साधूचा उगाच छळ केला तर असा छळ करणाऱ्याचा निर्वंश होतो. घरात धान्य भरपूर असूनसुद्धा आपल्या पतीला जी चांगला स्वयंपाक करून वाढत नाही किंवा स्वतः व्रतवैकल्याचा मोठा थाटमाट करून पतीला अजिबात विचारतसुद्धा नाही अशा स्त्रीला मृत्यूनंतर वटवाघळाचा जन्म येतो. आपला नवरा दिसायला मनासारखा अजिबात चांगला नाही म्हणून ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याला सोडून देतात त्या पुढील जन्मात बालविधवा होतात. एवढेच नाही तर त्या व्यभिचारही करतात आणि आपल्या आयुष्यात शेवटी वेश्या बनतात. 


भाग २ वाचण्यासाठी इथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या