Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय १६ ते १८ || shri ganesh puran kathasar adhyay 16 to 18

 ।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- १६ ते १८ 

१०. मधु व कैटभ दैत्यांचा संहार


        ब्रह्मदेवाची कथा ऐकून सोमकांताच्या मनात पुढील वृत्तात ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली. तो भृगू ऋषींना म्हणाला, "हे मुने, ब्रह्मदेवाला श्रीगणपतीकडून सृष्टिनिर्मितीचा वर मिळाला. त्यानंतर त्याने कशा प्रकारे सृष्टीरचना केली ?"

         भृगू म्हणाले, “राजा, विधात्याने प्रथमतः सात मानसपुत्र निर्माण केले. पण या सर्वांनी घोर तपश्चर्या केली आणि ते मुक्त झाले. ब्रह्मदेवाला कार्यसिद्धीसाठी त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणून त्याने संकल्पाने पुन्हा सात मानसपुत्र निर्माण केले. तेही तपोबलाने ज्ञानसंपन्न होऊन मुक्त झाले. तेव्हा ब्रह्मदेवाने स्वतःच प्रजोत्पादन करावयाचे ठरविले. त्याने आपल्या मुखापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्र याप्रमाणे चार वर्णांची प्रजा उत्पन्न केली. त्याने आपल्या मस्तकापासून स्वर्ग, कानांपासून वायू, डोळ्यांपासून सूर्य, हृदयापासून चंद्र, नाभीपासून आकाश व पायांपासून पृथ्वी अशा प्रकारे लोकांची आणि पंचमहाभूतादिकांची निर्मिती केली. त्यानंतर त्याने पर्वत, नद्या, समुद्र आणि वनस्पती यांची उत्पत्ती केली.

                        त्या वेळी योगनिद्राधीन असलेल्या भगवान विष्णूंच्या कानांतून मधु व कैटभ असे दोन महाबलाढ्य दैत्य निर्माण झाले. त्यांच्या रूपाने त्रिखंडावर भीषण संकटच ठाकले. या दोन्ही दैत्यांनी वेदशास्त्रांची निंदा केली, देवादिकांना आणि साधुजनांना अपरिमित छळले. त्यांच्या अत्याचारांनी पृथ्वी भयकंपित झाली. तिच्यावरील पापभाराने शेषही फूत्कार टाकू लागला. सरतेशेवटी ते दैत्य ब्रह्मदेवावरच चाल करून गेले. आता हे दोघेही आपल्याला छळणार आणि सृष्टीचा घात करणार हे लक्षात येताच ब्रह्मदेवाने विष्णूला व्यापून असलेल्या योगनिद्रेची काकुळतीने प्रार्थना केली. तो म्हणाला, "हे निद्रादेवी, तू महासमर्थ आहेस. तुझ्यापुढे कोणाचेही काही चालत नाही. मधु आणि कैटभ या दोन्ही दैत्यांनी पूर्वजन्मी घोर तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले. ते माझे भक्त असल्यामुळे मी त्यांना अनेक वर दिले. त्यामुळे उन्मत्त होऊन ते आत्ता माझ्यावरच उलटले आहेत. तसे झाले तर मोठाच अनर्थ होईल. त्यांना आवरणे हे फक्त विष्णूलाच शक्य आहे. तरी कृपा करून त्याला सोड. ' "

                                विधात्याच्या विनंतीने योगनिद्रा विष्णूपासून दूर झाली. त्याला जागृती आली. हे वृत्त कळताच स्थानभ्रष्ट झालेले सर्व देव त्याला शरण गेले. त्याला मधु-कैटभांच्या अत्याचारांचे वर्तमान सांगितले आणि त्यांचा वध करण्याची विनंती केली. तेव्हा संतापलेल्या विष्णूने मोठ्याने शंखध्वनी केला. त्याच्या निनादाने त्रिभुवन हादरले. मधु-कैटभही आश्चर्यात पडले. कोणीतरी महावीर आपल्याला युद्धाचे आव्हान देत आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते त्वरेने विष्णूपाशी धावले. त्यांनी त्याला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. स्वतःच्या सामर्थ्याच्या घर्मेडीत असलेल्या त्या दोन्ही बलाढ्य दैत्यांनी विष्णूवर चढाई केली. मग सुरू झाले एकच भीषण युद्ध ! आव्हाने, प्रतिआव्हाने, गगनभेदी गर्जना, घणाघाती मुष्टिप्रहार यांच्या आवाजांनी दशदिशा दणाणून गेल्या. दोन्ही प्रतिद्वंद्वी विजयाच्या इर्षेनेच लढत होते. हे युद्ध जवळ-जवळ पाच हजार वर्षे चालले. कोणी कोणास हार जाईना. तेव्हा विष्णूला मोठा प्रश्न पडला.

                              या दैत्यांच्या नाशासाठी काय करावे हेच त्याला सुचेना. विष्णूने युद्ध थांबविले. वीणाधारी गंधर्वाचे रूप घेऊन तो सुश्राव्य गायन करू लागला. त्या नादब्रह्माने सर्व विश्व व्यापून गेले. देव, यक्ष, राक्षस, पशुपक्षी व समस्त सृष्टी त्या मधुर स्वरांनी मुग्ध झाली. आत्मचिंतनात मग्न असलेला शंकरही जागृत होऊन त्या गायनाचा  आनंद घेऊ लागला. त्याने निकुंभ आणि पुष्पदंत या आपल्या दोन गणांना त्या गायकाला घेऊन येण्याची आज्ञा केली. गंधर्वरूपी विष्णूला घेऊन ते दोघेही कैलासावर आले. विष्णूने शंकराला नमस्कार केला. शंकराने गंधर्वरूपातील विष्णूला तत्काळ ओळखले. त्याला क्षेमालिंगन दिले. त्याचे उत्तम आदरातिथ्य केले. शंकराच्या विनंतीवरून विष्णूने पुन्हा वीणावादन केले. ते शिव, पार्वती, गजानन, षडानन, महानंदी, ऋषिजन व शिवगणांनी मनःपूर्वक ऐकले.

                         प्रसन्न झालेल्या शंकराने विष्णूच्या वीणावादनाचे व गानकौशल्याचे भरभरून कौतुक केले आणि त्याला वर मागण्यास सांगितले. विष्णूने त्याला मधु-कैटभांच्या वधाचा उपाय विचारला. तेव्हा शंकर म्हणाला, "हे लक्ष्मीपते, युद्धारंभी तू विघ्नहारक व कल्याणकारक अशा गणपतीचे स्मरण केले नाहीस. म्हणूनच दैत्यवधाचे तुझे सर्व प्रयत्न फोल ठरले. आता तू गणपतीला शरण जा. त्याची आराधना करून त्याला प्रसन्न करून घे. त्यानंतर तू युद्धास जा म्हणजे तुला जय मिळेल."

        शंकराने विष्णूला आराधनेसाठी षडक्षरी गणेशमंत्राचा उपदेश केला आणि त्याच्या विधियुक्त अनुष्ठानासाठी सिद्धिक्षेत्रास जाण्यास सांगितले. विष्णूने त्या क्षेत्री जाऊन शंभर वर्षे अनुष्ठान केले. त्यामुळे गणपती प्रसन्न झाला. त्याने विष्णूला वर मागण्यास सांगितले. विष्णूने त्याची स्तुती केली व म्हणाला, "हे गणाधीशा, तुझ्या कृपाप्रसादाने मला मधु-कैटभांचा व यापुढे उत्पन्न होणाऱ्या सर्व उन्मत्त व दुष्ट दैत्यांचा संहार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होवो.” तेव्हा 'तथाऽस्तु ।' असे आशीर्वचन बोलून गणपती अंतर्धान पावला. या मंगल प्रसंगाचे स्मरण म्हणून देवांनी सिद्धिक्षेत्रात चार महाद्वारांनी युक्त असे भव्य मंदिर बांधले. श्रीविष्णूने त्यामध्ये गंडकी शिळेपासून तयार केलेल्या अतिशय मनोहर अशा गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. हा गणपती 'सिद्धिविनायक' म्हणून प्रसिद्ध झाला. 

                         दैत्यवधाचे सामर्थ्य प्राप्त झालेल्या विष्णूने पुन्हा एकदा मधु-कैटभ दैत्यांना युद्धाचे आव्हान दिले. हे युद्धही बराच काळ चालले. कोणी कोणास हार जाईना. तेव्हा विष्णूने नवीनच युक्ती केली. त्याने युद्ध थांबविले आणि दैत्यांना उद्देशून म्हणाला, "तुम्हां दोघांचे युद्धकौशल्य पाहून मी अगदी थक्क झालो आहे. तुमचे धैर्यही विलक्षण आहे. मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे. तरी तुम्हांला हवे ते वरदान मागून घ्या." विष्णू या आधी युद्ध सोडून निघून गेला होता. नंतर शंभर वर्षांनी तो पुन्हा युद्धास आला व आत्ताही युद्ध थांबवून आपली स्तुती करतो आहे पाहून मधु आणि कैटभाला अधिकच उन्माद चढला. श्रीहरीकडे तुच्छतेने पाहून ते म्हणाले, “तू आम्हांला काय वर देणार? त्यापेक्षा तूच आमच्याकडून वर मागून घे." विष्णूला हेच हवे होते. क्षणाचाही बिलंब न लावता तो म्हणाला, "तुमचा वध माझ्या हातून व्हावा असा मला वर द्या."

                       आता माघार घेणे शक्यच नव्हते. मधु-कैटभ शब्द देऊन फसले होते. असे काही घडेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यांनी सभोवती दृष्टी फिरविली. तेव्हा सर्व सृष्टीच जलमय झालेली दिसली. ते म्हणाले, "हे विष्णो! तुझ्या हातून मरण येणे हे आमचे सद्भाग्यच! आम्ही मुक्तच होणार. तथापि तू आम्हांला कोरड्या स्थानी मारावेस." त्यांचा युक्तिवाद श्रीविष्णूच्या तत्काळ लक्षात आला. त्याने त्या दोघांना मांडीवर घेतले आणि सुदर्शन चक्राने त्यांचा शिरच्छेद केला.

                  या विजयाने श्रीहरीची मोठी कीर्ती झाली. देवांनी पुष्पवृष्टी करून त्याचा जयजयकार केला. दैत्यरूपी संकट दूर झाल्याने त्रिभुवनाने निःश्वास टाकला. ब्रह्मदेवही आपले कार्य निर्विघ्नपणे करू लागला. "

अध्याय समाप्त

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या