Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय १९ ते २१ || shri ganesh puran kathasar adhyay 19 to 21

।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- १९ ते २१ 

११. राजपुत्र दक्षाची कथा



भृगू ऋषी सोमकांतास म्हणाले, "राजा, व्यासांच्या मनात श्रीगणपतीविषयी अधिक जाणून घेण्याची उत्कंठा आहे हे लक्षात घेऊन ब्रह्मदेवाने त्यांना गणेशमाहात्म्यपर दुसरी कथा सांगितली. तो म्हणाला, "हे मुने, प्राचीन काळी विदर्भातील कौंडिण्यपुरात भीम नावाचा राजा राहत असे. तो महापराक्रमी, सद्गुणी, सदाचारी, ऐश्वर्यसंपन्न, दानशूर व ब्राह्मणांचा आश्रयदाता म्हणून प्रसिद्ध होता. अनेक राजे त्याचे मांडलिक होते. ते प्रतिवर्षी त्याला करभार देत असत. चारुहासिनी ही त्याची पत्नी. ती सुशील, सुंदर, गुणवान व पतिव्रता स्त्री होती. ती देवाब्राह्मणांचा आदर करायची, अतिथींची सेवा करायची.

अशा प्रकारे सर्वकाही अनुकूल असूनही ही राजदंपती दुःखी होती. त्यांना मूलबाळ नव्हते. एके दिवशी भीम राजा आपल्या पत्नीला म्हणाला, "प्रिये, संतती नसल्यामुळे मला कधी-कधी फारच उदास वाटते. ज्याला पुत्र नाही त्याला स्वर्गप्राप्ती होत नाही. त्याच्याकडील हव्य देव स्वीकारत नाहीत, त्याच्याकडील कव्य पितरही स्वीकारत नाहीत असे शास्त्र सांगते. निपुत्रिकाचे जिणे व्यर्थच होय. पुत्राविना मला हे जीवनच शून्य वाटते. आत्ता मला या राजऐश्वर्याचाही वीट येऊ लागला आहे. या सर्वांचा त्याग करून अरण्यात, विजनवासात, ऋषिमुनींच्या सहवासात जाऊन राहावे असे सारखे मनात येते." चारुहासिनी म्हणाली, "स्वामी, पुत्राविना घर म्हणजे रिकामा व्यवहार. माझी मनोवस्थाही तुमच्यापेक्षा वेगळी नाही. पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे माझ्याही मनात सारखे येत आहे. तुम्ही अरण्यात जाण्याचा निश्चय केला असेल तर मीही तुमच्याबरोबर येईन."

तिचे मनोगत कळताच राजाने वनगमन करण्याचा निश्चय केला. त्याने सुमंत व मनोरंजन या आपल्या अत्यंत विश्वासातल्या दोन प्रधानांना बोलावून घेतले. तो त्यांना म्हणाला, "तुम्ही माझे हितैषी आहात. संतानसौख्य नसल्यामुळे आम्ही उभयता पतिपत्नी किती व्यथित आहोत हेही तुम्ही जाणता. संततीसाठी आम्ही आजवर अनेक उपाय, उपचार केले पण उपयोग झाला नाही. आता तपश्चर्या करून काही साध्य होते का पाहावे म्हणून आम्ही दोघे अरण्यात जाण्याचा विचार करीत आहोत. आमच्या अनुपस्थितीत राज्याची धुरा तुम्हांलाच सांभाळायची आहे. तुमची माझ्याविषयी असलेली हितबुद्धी, तुमची नीतिमत्ता व चातुर्य याविषयी माझ्या मनात जराही शंका नाही. आम्ही परतून आलो नाही, तर कालांतराने हे राज्य तुम्ही दोघांनी वाटून घ्या.'

राजाचे ते निर्वाणीचे बोलणे ऐकून त्या स्वामिभक्त प्रधानांना अतिशय दुःख झाले. त्यांनी राजाचे सांत्वन केले. तसेच त्याला त्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. निघण्याच्या दिवशी राजाने याचकांना व विप्रांना अपार दानधर्म केला, प्रजेला समजावले आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन तो आपल्या राणीसह अरण्यात प्रवेशला. काही अंतर चालून गेल्यावर त्याला एक रमणीय सरोवर दिसले. त्याचा परिसर नानाविध वृक्षवेलींनी वेढलेला होता. तेथील निसर्गसौंदर्य पाहून राजाचे मन फारच प्रसन्न झाले. जवळच एक आश्रम दृष्टीस पडला. तेथें पशुपक्षी वैरभाव विसरून एकोप्याने नांदत होते. ते पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. 'येथे कोणीतरी महान तपस्वी राहत असावा,' असा विचार करून तो त्या आश्रमाकडे निघाला.

तो विश्वामित्र ऋषींचा आश्रम होता. आश्रमाच्या अध्ययनकक्षात त्यांचे शिष्य वेदाध्ययन करीत होते. दर्भासनावर बसलेल्या शांत व प्रसन्न अशा विश्वामित्रांना पाहून राजा-राणीला परम संतोष वाटला. त्यांनी पुढे जाऊन त्या महान तपस्व्याला नमस्कार केला. विश्वामित्रांनी त्या दोघांचे यथोचित आदरातिथ्य केले. त्यांचे कुशल-मंगल विचारले, अंतर्ज्ञानी विश्वामित्रांनी त्यांची व्यथा जाणली. राजाला आशीर्वाद देताना ते म्हणाले, “राजन, काळजी करू नकोस. तुला उत्तम गुणांनी युक्त असा पराक्रमी पुत्र होईल. त्याची सर्वदूर कीर्ती होईल. तुझेही कल्याण होईल."

त्या आशीर्वचनांनी राजाला धन्य-धन्य वाटले. त्याने विश्वामित्रांना स्वतःचा व पत्नीचा परिचय दिला. स्वतःचें कुल, गोत्र व राज्याची माहिती सांगितली. तो पुढे म्हणाला, "हे तपोनिधी, पुत्रसौख्य नसल्यामुळे मी निराशेने राज्यत्याग केला. तपश्चर्यादी दैवी उपचारांनी काही साध्य होते का पाहावे म्हणून मी अरण्यात आलो आहे. येथे महद्भाग्याने आपले दर्शन झाले. तुमच्या आशीर्वादाने माझ्या मनाला शांती लाभली, जीवनाविषयी नवीन आशा पल्लवित झाल्या. हा सर्व आपल्या कृपेचा प्रसाद आहे असे मला वाटते. आपण अंतर्ज्ञानी आहात, तरी कृपा करून कोणत्या दूषित पूर्वकर्मामुळे मला निपुत्रिक राहावे लागले ते सांगावे. "

विश्वामित्र म्हणाले, "राजा, मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याने कुलधर्म, कुलाचार सोडू नये. गणपती हे तुझे कुलदैवत आहे. तो आद्य पूजनीय आहे. त्याचे माहात्म्य फार थोर आहे. म्हणून देव, दानव, ऋषी, मुनी, मनुष्य आदी सर्वच त्याची पूजा करतात. पण तुझ्या हातून त्याची जराही सेवा घडली नाही म्हणूनच तुला संतती सुखापासून वंचित राहावे लागले. आता मी तुला तुझ्या पूर्वजांचे चरित्र सांगतो, ऐक. '

भीम हा तुझा सातवा पूर्वज. कमला ही त्याची पत्नी. या दंपतीस उशिराने एक मुलगा झाला. तो जन्मतः मूकबधिर होता. त्याच्या पाठीवर कुबड होते. काही दिवसांनी त्या बालकाच्या शरीरावर असंख्य क्षते पडली. ती उपचार करूनही बरी झाली नाहीत. त्यांतून रक्त व पू बाहेर येऊ लागले. ती दुर्गंधी अगदी असह्य होत असे. आपल्या पुत्राची ती भीषण अवस्था पाहून राणीला फारच दुःख होत असे. ती देवाकडे त्याच्यासाठी मरण मागू लागली. एके दिवशी राणी फारच व्यथित झाली, मोठ्याने आक्रोश करीत रडू लागली. तिची अवस्था पाहून राजाही हतबल झाला. तरीही त्याने स्वतःला सावरले. तो तिला म्हणाला, "जन्मलेल्या प्रत्येकालाच आपापल्या पूर्वकर्मानुसार सुखदुःखादी भोग प्राप्त होत असतात. परिस्थिती कधीही एकसारखी असत नाही. दुःखालाही अंत असतोच. पण दुःखभोग भोगत असताना परमेश्वरावर श्रद्धा ठेवली तर जीवन सुलभ होते. हा आपला पुत्र चांगला होणारच नाही असा तू का विचार करतेस? परमेश्वर सर्वांचा हितकर्ता आहे. त्याच्या कृपाप्रसादाने अशक्य गोष्टीही शक्य झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. देवावर श्रद्धा ठेवून आपल्या मुलाच्या हितासाठी सतत प्रयत्न करणे एवढेच आपल्या हाती आहे आणि ते आपण करीतच आहोत. म्हणून तू शोक आवर. ' तेव्हा राणीनेही स्वतःला सावरले आणि आलेल्या प्रसंगाला धीराने तोंड द्यायचे ठरविले.

भीम राजाने आपल्या पुत्राचे दक्ष असे नामकरण केले. त्या प्रसंगी ब्राह्मणांना, गुणिजनांना व याचकांना अपार दानधर्म केला. नंतरच्या काळात आपल्या पुत्राला आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून राजाने अथक प्रयत्न केले. देशोदेशीच्या राजवैद्यांकडून उपचार करविले. त्याने स्वतः ही बारा वर्षे तपश्चर्या केली, पण काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे राजाला वैफल्य आले. तो एकसारखी चिडचिड करू लागला. त्याच उद्विग्न अवस्थेत एके दिवशी त्याने आपल्या राणीला व पुत्राला राजधानीतून हाकलून दिले.

कमला राणी व तिचा व्याधिग्रस्त पुत्र दोघेही अनाथ झाले. राणी गावोगाव हिंडून भिक्षेवर गुजराण करू लागली. पण तिच्या दुर्दैवाचे फेरे अजूनही संपले नव्हते. एका आडवाटेवर चोरांनी तिला गाठले व तिच्याकडील दागिने लंपास केले. निराधार, दुबळी झालेली ती राज्ञी आपल्या दैवाला दोष देत तिथेच बराच वेळ रडत होती. मग तिने स्वतःला सावरले आणि पुढील मार्गक्रमण करू लागली.

फिरत-फिरत ती एका गावी आली. तेथे एका देवळात मुक्काम केला. एके दिवशी दक्षाला मंदिराच्या ओवरीत ठेवून ती एकटीच भिक्षेसाठी गावात गेली होती. त्या वेळी एक पुण्यश्लोक भगवद्भक्त देवदर्शनासाठी तेथे आला. तेव्हा त्याच्या शरीरावरून वाहत आलेल्या वायूच्या झुळकीने दक्षाच्या अंगास स्पर्श केला. तर काय आश्चर्य! तो राजपुत्र क्षणार्धात व्याधिमुक्त झाला. जखमांनी अमंगळ दिसणारे त्याचे शरीर एकदम सुदृढ झाले. तो तेजस्वी व कांतिमान दिसू लागला. त्याचे मूकबधिरत्व गेले. या चमत्काराने तेरा-चौदा वर्षांचा दक्ष संभ्रमात पडला. त्याचे मन आनंदाने मोहरून गेले. त्याने अत्यंत आदराने त्या साधूला नमस्कार केला. देवदर्शन करून तो साधू निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे राजपुत्र दक्ष कृतज्ञतेने पाहतच राहिला.

भिक्षा मागून राणी देवळात आली. तेथे आपल्या मुलाचे बदललेले स्वरूप पाहून तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. 'आपण स्वप्न तर पाहत नाही?' अशी शंकाही तिच्या मनात येऊन गेली. दक्षाने धावत येऊन तिला गळामिठी घातली आणि घडलेला सर्व वृत्तान्त सांगितला. ते ऐकून ती आनंदाने रडू लागली. एखाद्या तपस्वी साधूची अल्प संगतही दीनदुबळ्यांचे जीवन बदलू शकते याची तिला प्रत्यक्ष अनुभूती आली होती. साधू ज्या मार्गाने गेला त्या दिशेला तिने अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला.

त्यानंतर लोक त्या मायलेकांना अपमानित न करता प्रेमाने भिक्षा घालू लागले. कोणी कोणी त्यांना भोजनासाठीही बोलावीत असत. कधी-कधी त्यांना नव्या-जुन्या वस्त्रांचा व द्रव्याचाही लाभ होत असे. दक्ष बरा झाल्यामुळे कमला राणी निश्चित झाली होती. त्या दोघांच्या मनात भगवंताविषयी श्रद्धा व भक्ती निर्माण झाली. दक्षाला गणपतीविषयी विशेष आकर्षण होते. तो पायाच्या अंगठ्यावर उभे राहून 'ॐ गजाननाय नमः ।' या मंत्राचा नित्यनेमाने जप करीत असे. ही त्याची एकांतिक तपःसाधना पाहून गणपती प्रसन्न झाला. त्याने दक्ष व कमला राणीला सगुण, साकार रूपात दर्शन दिले. चतुर्भुज, पीतांबरधारी, विशालकाय आणि देदीप्यमान अशा त्या गणेशमूर्तीच्या दर्शनाने त्या दोघांना अगदी कृतकृत्य वाटले. तेवढ्यात गणपती एका तेजस्वी ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झाला. तो दक्षाला म्हणाला, "वत्सा, तुझ्या एकनिष्ठ आराधनेने मी अगदी प्रसन्न झालो आहे. तू माझा निस्सीम भक्त आहेस. तरी इष्ट वर मागून घे."

दक्षाने विप्ररूपातील गणपतीला भावभक्तीने नमस्कार केला. त्याची मुक्तकंठाने स्तुती केली. तो म्हणाला, "देवा, तू मला दर्शन दिलेस त्यामुळे मी अगदी कृतार्थ झालो आहे. तुझ्याकडे काही मागावे असे मला वाटतच नाही. तुझी माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहो एवढीच प्रार्थना आहे." तो त्याचा निःस्वार्थ भक्तिभाव पाहून गणपती अधिकच प्रसन्न झाला. तो म्हणाला, “दक्षा, मुद्गल हा माझा श्रेष्ठ भक्त आहे. त्याच्या अंगावरून बाहत आलेल्या वायूनेच तुला आरोग्य लाभले आहे. मी तुला बर देणार होतो, पण आता तोच तुला इष्ट वर प्रदान करील."

बोलणे पूर्ण झाल्यावर गणपती अंतर्धान पावला. तेव्हा दक्षास अतिशय वाईट वाटले. 'कोणीतरी माझे आराध्य दैवत मला दाखवा हो! हे गजानना, तू निष्ठुर का झालास? मला एकट्याला टाकून का गेलास ?' असे म्हणून तो विरहव्यथेने तडफडू लागला. गणपतीच्या पुनश्च दर्शनासाठी तो इतका व्याकूळ झाला की, त्याला आपल्या अंगावरील बनाचीही शुद्ध राहिली नाही. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला तो गणपतीचा ठावठिकाणा विचारू लागला. भटकत भटकत तो नगराबाहेर आला. कमला राणीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. गणेशदर्शनाची इच्छा मनाशी धरून तीही त्याच्या मागोमाग हिंडत होती.

याच संभ्रमित अवस्थेत भटकंती करीत ते दोघे मायलेक एका अरण्यात प्रवेशले. तेथे मुद्गल ऋषींचा आश्रम होता. तेथील पवित्र वातावरणात त्या दोघांना मोठे समाधान लाभले. तेथील शांतीने त्यांचेही मन शांत झाले. त्या दोघांनी आश्रमात प्रवेश केला. तेथे एका कुटीमध्ये मुद्गल ऋषी गणेशपूजनात मग्न होते. त्यांना वंदन करून ते दोघे अंगणातील एका झाडाखाली बसले. पूजा झाल्यावर ऋषिवर्य बाहेर आले. त्यांनी या दोघांची आस्थेने विचारपूस केली. दक्षाने त्यांना आपला परिचय दिला. आपली समग्र हकिकत सांगितली. तो पुढे म्हणाला, "हे महानुभाव! आपण फार थोर आहात. आपल्या अंगवायूने माझे क्षतिगस्त शरीर चांगले झाले, मला उत्तम आरोग्य लाभले. आपले माहात्म्य मी काय वर्णन करू? आपल्या दर्शनाची मला फारच तळमळ लागली होती. आज ती इच्छाही सहजगत्या पूर्ण झाली. मी धन्य झालो. माझे मनही शांत-शांत झाले."

त्याचे मृदुमधुर भाषण ऐकून मुद्गलांनाही अत्यानंद झाला. ते म्हणाले, "दक्षा, तुला भेटून मलाही मोठे समाधान वाटत आहे. अरे, तू तर माझ्यापेक्षाही थोर भक्त आहेस. ज्याच्या प्राप्तीसाठी मी आयुष्यभर तपश्चर्या केली त्याच्या दर्शनाचा मला अजूनही लाभ झालेला नाही, तो तुला झाला. बाबारे, वेदांनाही ज्याचा थांग लागत नाही, जो चराचराचा स्वामी आहे, सहस्रमुखाचा शेषही ज्याचे माहात्म्य वर्णन करू शकत नाही, जो या विश्वाचा अदृश्य सूत्रसंचालक आहे; त्या महागणपतीने तुला दृश्य स्वरूपात दर्शन दिले म्हणून तुझ्या भाग्याचा मला हेवा वाटतो. आज तुझ्या दर्शनाने मीच धन्य झालो आहे."

मुद्गलांना राहवले नाही. त्या तपोनिधीने पुढे जाऊन दक्षाला दृढ अलिंगन दिले. त्यांनी त्याला 'ॐ' या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ते म्हणाले, "दक्षा, ॐ हा निर्गुण, निराकार, परमात्मवाचक महामंत्र आहे. तू याचा नित्य जप कर, तसेच भावभक्तीने गजाननाची आराधना कर. त्यामुळे तो तुझ्यावर प्रसन्न राहील. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करील. तुझे नेहमी संरक्षण करील. मग देव आणि दैत्य यांच्यापैकी कोणीही तुला त्रास देणार नाही. पण मंत्रजप आणि गणेशभक्तीपासून तू परावृत्त झालास, तर मात्र तुझे खूपच नुकसान होईल. तुझ्याकडून असे काही होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे." दक्षानेही त्यांच्या बोलण्याला पूर्ण संमती दर्शविली. तो म्हणाला, "गुरुदेव, मी कधीही आपल्या वचनाबाहेर जाणार नाही.” ते ऐकून मुद्गलांना मोठे समाधान वाटले. "

एवढी कथा सांगून भृगू ऋषी थोडा वेळ थांबले. तेव्हा सोमकांत म्हणाला, “ऋषिवर्य ! माझ्या मनात काही शंका आहेत. कृपया त्यांचे निराकरण करा. मुद्गल ऋषी महातपस्वी होते, त्यांनी प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली होती. ज्यांच्या अंगवाताने दक्षाची जन्मजात दुर्धर व्याधी क्षणार्धात बरी झाली त्या मुद्गल ऋषींना गणपतीचे दर्शन झाले नाही, पण दक्षाला मात्र ते अल्पायासे झाले, असे का ? गणपतीने दक्षाला स्वतः वर दिला नाही. त्याने त्याला मुद्गलांकडे पाठविले. यामागे काय रहस्य आहे? दक्षाची संचित पूर्वपुण्याई फार मोठी होती असे म्हटले, तर त्याला जन्मतःच एवढे भयंकर भोग का भोगावे लागले? याविषयी सविस्तर निरूपण करा."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या