Subscribe Us

Shri Shivlilamrut Adhyay 13

 ॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥

 अध्याय तेरावा 

 शिव-पार्वतीचा विवाह व कार्तिकस्वामीचा जन्म 


 भाग :-२ 

             दैत्यांच्या स्त्रिया अत्यंत पतिव्रता होत्या. त्यामुळे त्यांच्या पुण्याईने शंकरांना जय मिळत नव्हता. म्हणून श्रीशंकर बौद्धरूपाने दैत्य स्त्रियांत गेले आणि त्यांना अपवित्र असे चार्वाकशास्त्र त्यांनी सांगितले. ते ऐकल्यानंतर पातिव्रत्य सोडून त्या व्यभिचार करून लागल्या. लगेच शंकरांनी आपल्या दिव्य धनुष्यावर अत्यंत प्रभावी असा विष्णुबाण जोडला. त्यावर आणखी पाशुपत अस्त्राची स्थापना केली. मग तो तेजस्वी बाण सणसणत निघाला. प्रलयाग्नीची भयंकर मोठी ज्वाला किंवा कृतान्त काळाची जीभ किंवा प्रलय मेघातील वीजच आहे, असे भासावे; असा तो बाण पाहून देव आणि दैत्य दोघेही घाबरून गेले. सप्त कोटी 'मंत्राचे तेज त्या एका बाणात एकवटले होते. त्या बाणाच्या नुसत्या आवाजाने देवांची विमाने अगदी दूर पळाली. दयाखोऱ्यात राक्षस आपला जीव वाचविण्यासाठी लपून बसले. तो बाण केवळ पाहूनच अनेकांना मूर्च्छा आली. तृतीय नेत्र उघडलेल्या शंकरांनी त्या अमोघ बाणाने तारकासुराच्या तिन्ही पुत्रांना जाळून भस्म करून टाकले. आपल्या पुत्रांचा अशा रीतीने वध झालेला पाहून संतापलेल्या तारकासुराने चंद्र-सूर्यांना धरून नेले. भागीरथी आणि गंगा या नद्यांनाही पकडून नेले. देवांच्या बायकांना पळवून नेऊन त्यांना दासीचे काम करायला लावले.



           स्वर्गात ब्रह्मा, विष्णु आणि इंद्र एकत्र जमून या संकटाचा विचार करू लागले, " हा उन्मत्त असा तारकासुर शंकराच्या होणाऱ्या पुत्राच्या हाताने मारला जाईल; पण तत्पूर्वी शिव-उमेचा विवाह तर करायला हवा.' तिघांच्या मनातील हा विचार पक्का झाल्यवर त्यांनी मदनाला बोलवणे पाठवले, “हिमालय पर्वतावर शंकर उग्र असे तप करीत आहेत. तू त्यांना भुलव' अशी सर्व देवांनी त्याला विनंती केली. मदन आपल्या सर्व आयुधांसह रतीला बरोबर घेऊन हिमालय पर्वतावर आला. तेथे आल्याबरोबर वसंत ऋतूने सर्व वन उत्तम प्रकारे शृंगारले आणि रतीने पार्वतीचे लोभस रूप धारण केले. मग मदन शंकराच्या मनात अगदी गुपचूप शिरला. पाखरे किलबिलाट करून शंकराच्या ध्यानात व्यत्यय आणीत होती. म्हणून नंदिकेश्वर त्यांना दूर हुसकावून देत देत लांब गेला होता. त्यावेळी पार्वती अत्यंत कामातूर होऊन मदनाचे जवळ उभी राहिली.

          ध्यानस्थ शंकरानी आपले डोळे उघडले आणि समोर पाहिले तो मदन उभा असलेला त्यांना दिसला. त्याला बघताच शंकरांना फार राग आला आणि त्यांनी तिसरा डोळा उघडून मदनाला तेथल्या तेथे जाळून टाकले. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. शंकराच्या अवतीभवती शिवगण, शिवदूत होतेच. ते मोठमोठ्याने बोंबा मारीत अत्यंत अश्लील शब्द उच्चारीत मदनाची टिंगल करू लागले. त्या दिवसापासूनच फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून बोंब मारावी, अशी शंकरांनी सर्वांना आज्ञा केली.



          अशा तऱ्हेने भुलविण्यास आलेल्या मदनाला जाळून शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. तेव्हा रती शोक करू लागली. शंकरांनी तिला सांगितले, "बाई, कृष्णावतारात रुक्मिणीच्या पोटी तुझा पती पुन्हा अवतार घेईल. " ब्रह्मदेवाने आपल्या कन्येचा उपभोग मदनाने घेतला म्हणून त्याला 'तू शंकराच्या दृष्टीने भस्म होशील' असा शाप दिला होता. अशा रीतीने शंकराकडून मदनाचा शेवट झाला. इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकरप्राप्तीसाठी कडक व्रत करीत होती. सप्तऋषींनी 'पार्वतीची इच्छा पुरी करा' अशी शंकरांना विनंती केली. ते म्हणाले, "हे शंकरा, पृथ्वीवर कैलास पर्वतावरील हिमालयकन्या आपल्या प्राप्तीसाठी कडक उपवास करीत आहे. आपण तिचे व्रत आचरणात आणावे.

        'सप्तऋषी, तुमची इच्छा पूर्ण होईल. मी आजच हिमालयात जाऊन तिचे दर्शन घेतो. " खरोखरच पार्वती आपल्याशी विवाह करू इच्छिते का हे जाणण्यासाठी तिची परीक्षा बघण्यासाठी बटूचा वेष घेऊन शंकर तिच्याजवळ आले आणि तिला समजावत म्हणाले, “वेडे, त्या शंकरासाठी तू एवढे तप कशाला करते आहेस ? तू राजकन्या आहेस, तर तो शंकर अगदी भिकारी आहे, महाक्रोधी आहे, हत्तीचे ओले कातडे पांघरतो, वाटेल ती कातडी नेसतो, त्या कातड्याचा वास अंगाला येत असेल. सापांना अलंकार समजून आपल्या गळ्यात बांधून घेतो. स्मशानात राहतो, त्याच्या भोवताली भुते नाचत असतात अशा त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू सुंदर, विलासी अशा विष्णूला मनाने पती म्हणून स्वीकारून का माळ घालीत नाहीस ? तुझ्यासारख्या सुकुमार स्त्रीला तो जोगड्या शंकर मुळीच योग्य नाही.



             बटूचे हे भाषण ऐकून पार्वती अतिशय संतापली व म्हणाली, " अरे बटू, तू ब्राह्मण आहेस म्हणून मी गप्प बसले. नाही तर मी तुला भयंकर शापच दिला असता; पण शिवनामाने पवित्र झालेल्या वाणीने मी ते अभद्र शब्द उच्चारणार नाही. शिवाची निंदा करणाऱ्याचे तोंडही पाहू नये. तू आता येथून निघून जा. नाही तर माझा संताप अनावर झाला तर मी तुला शाप देईन. दुर्गेचा तो निश्चय पाहून बटूने तेथेच आपले खरे स्वरूप प्रगट केले. लगेचच पार्वतीने शंकराचे चरण घट्ट धरून ठेवले आणि आपल्याशी विवाह करावा असे त्याला विनविले. पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शंकर तिच्यावर अत्यंत खुष झाले होते. ते लगेच 'हो' म्हणाले. पार्वतीला आश्वासन देऊन शंकर कैलासाकडे निघून गेले आणि पार्वती वडिलांकडे परतली. मग रीतसर धर्मशास्त्राप्रमाणे सप्तऋषींना शंकरांनी हिमालयाकडे पाठवले. अरुंधतीने पार्वतीला पाहिले आणि शंकरपार्वतीचा जोडा उत्तम आहे असे सांगितले. सप्तऋषींनी मन्मथ संवत्सरातील मदनाचा परिपूर्ण शृंगार सर्व सृष्टीत उत्तम प्रकारे प्रगट करणाऱ्या चैत्रमासातील शुद्ध अष्टमीला हा विवाह व्हावा, असे शंकराचा सासरा हिमालयाला सांगितले आणि ते घरी आले.

           शंकर-पार्वतीचा विवाह होऊन एकदाचा त्यांना पुत्र होतो कधी ? आणि तारकासुर राक्षसाचा वध होऊन सर्व पृथ्वी त्याच्या छळातून भयमुक्त होते कधी? याची सर्व देव अगदी आतुरतेने वाटतच पाहत होते.



                झाले! विवाहाची जोरदार तयारी सुरू झाली. सर्व देवांना अगदी आवर्जून आमंत्रणे गेली. त्रिदशांचे पाळे घेऊन स्वयंपाकासाठी निष्णात असा पाकशासन आला. विष्णु-लक्ष्मी, ब्रह्मा-सावित्री, अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी आपल्या शिष्यांसह विवाहाला उपस्थित राहण्यासाठी निघाले. सिद्ध, चारण, गुह्यक, पितृगण, मरुद्गण, वसुअष्टक, अकरा रुद्र, बारा अर्क, यक्ष, गंधर्व सर्वजण अगदी आवर्जून विवाहाला निघाले. या वऱ्हाडी असलेल्या सर्वांसह शंकर हिमालय पर्वतावर आला. हिमालय पर्वताने लगबगीने सामोरे येऊन सर्वांची अत्यंत आदराने पूजा केली, यथोचित आदरसत्कार केला. 

             या विवाहासाठी दहाहजार मैल लांबीचा भव्य आणि दिव्य मंडप घातला होता आणि सुवर्णाची सजविलेली सुंदर घरे सर्वान जानवसा म्हणून उतरायला दिली होती. शंकराचे आताचे स्वरूप पाहून सर्वजण चकित होत होते. हा अनादि वृद्ध पुराणपुरुष आणि नवरी अतिशय सुंदर, सुकुमार अशी पार्वती. म्हण जोडा असा काही आगळा-वेगळाच दिसत होता, की विचारून नका. देवक बसले. हिमालय वराला विवाहस्थळी बोलवायला आला. अष्टमहासिद्धी या मंगलकार्यामध्ये स्वतःच राबत असल्याने विवाह समारंभात काहीही उणे राहिलेले नव्हते. नवऱ्याला मिरवणुकीने मिरवत मिरवत मंडपात नेले. मधुपर्क वगैरे विधी हिमालयाने केले. लग्नाची वेळ जवळ आली. नवरदेव शंकराच्या समोर अंतरपाट धरला आणि त्या लावण्यवती तेजस्वी नवरीला-पार्वतीला पाटावर आणून उभी केली. सूर्य लग्नघटिका अगदी काळजीपूर्वक पाहत होता. बृहस्पती मंगलाष्टके म्हणत होता.



                    संपूर्ण लग्नविधी अगदी व्यवस्थित पार पडला. सप्तपदी झाली. सर्व धार्मिक विधी यथासांग झाले; पण वधूचे अत्यंत सुंदर मुखकमल कुणीच पाहिले नव्हते. पार्वतीने आपले मुखकमल भरजरी वस्त्राने झाकून घेतले होते; पण मंडपातील लज्जा होमाभोवती प्रदक्षिणा घालताना ब्रह्मदेवाने पार्वतीचे नख पाहिले आणि नखाच्या सौंदर्यानेसुद्धा तो कामातूर झाला. त्या अवस्थेत त्याचे वीर्यस्खलन झाले. ते जेथे पडले तेथे हजार वालखिल्यांचा जन्म झाला. हा त्याचा उन्मत्तपणा पाहून शंकर अतिशय कोपले आणि त्यांनी ब्रह्म देवाचे पाचवे शिर खड्गाच्या एका फटक्याने तोडून टाकले. सगळीकडे गोंधळ माजला; पण भगवान विष्णूनी सर्वांना समजूत घालून शांत केले.

         शंकर-पार्वतीचा हा भव्य आणि दिव्य असा लग्नसोहळा चार दिवस चालला. अतिशय चांगली आणि बहुमूल्य वस्त्रभूषणे देऊन हिमालयाने सर्व देवांना संतुष्ट केले. मग नवपरिणित वधूला - पार्वतीला घेऊन शंकर आपल्या कैलासावर निघून गेले. विश्वाची उत्पत्ती थांबली आहे, तेव्हा मदनाला परत जिवंत करा, अशी सर्वांनी विश्वनाथाची प्रार्थना केली. मग मदनाला पुन्हा जिवंत केले गेले. आता सर्वजण अतिशय आतुरतेने शिवभवानीला पुत्र कधी होईल याची वाट पाहत होते. कारण उन्मत्त तारकासुर फारच माजला होता आणि त्याच्या छळाने, क्रौर्याने सारी सृष्टीच त्रासून गेली होती.  शिवभवानी दोघे एकांतात होते. ऋषी आणि देव कोणालाच आत प्रवेश मिळत नव्हता. अशा अवस्थेतच चार युगे संपली; पण शंकराचा वीर्यपात न झाल्याने पार्वतीला पुत्र काही झाला नाही.



                    मग देवांनी अग्नीला अतिथीचा वेष देऊन आत शंकर-पार्वती जेथे होते तेथे पाठवले. शंकर-पार्वतीच्या नावे हाक मारून अग्नीने त्यांना भिक्षा मागितली. तेव्हा शंकरांनी पार्वतीला 'माझे वीर्य या अतिथीला भिक्षा म्हणून घाल." अशी आज्ञा केली. पार्वतीने शंकराच्या आज्ञेप्रमाणे त्याचे ते अमोघ वीर्य आणून अग्नीला भिक्षा म्हणून घातली. ते जेथे सांडले तेथे एक रेतकूप तयार झाला. त्यातील पाणी म्हणजेच पारा, जो कोणालाही हातात धरता येत नाही. असो. अग्नीने हातातले वीर्य भिक्षा म्हणून स्वीकारून ते प्राशन केले. त्यामुळे त्यापासून अग्नी गरोदर झाला. त्याला या गर्भधारणेची फार लाज वाटू लागली. तो दर अरण्यात जाऊन  लपून बसला. त्या अरण्यातून गंगा नदी वाहत होती. गंगेच्या काठावर स्नान करून ऊन खात बसलेल्या सहा ऋषिपत्नी त्याला त्यावेळी तेथे दिसल्या. अग्नीने आपल्या पोटातला गर्भ त्या सहा सुंदर स्त्रियांच्या उदरात गुपचूपपणे घातला. तत्क्षणी त्या गरोदर झाल्या. पतीसंगाविना त्यांना झालेल्या या गर्भधारणेची मनोमन लाज वाटली. सहाहीजणींनी तो आपल्या पोटातील गर्भ टाकून दिला. ते सहाजणींच्या पोटातील सहा गर्भाचे भाग एकत्र आले व त्यापासून एक सुंदर कुमार जन्माला आला. त्याला सहा तोंडे होती. बारा हात होते. कार्तिकमासात कृत्तिका योगावर हा सुकुमार जन्माला आला. कार्तिक मासात झाला म्हणून त्याचे नाव 'कार्तिकेय' ठेवले. त्रिकालज्ञानी शंकरांनी हा आपला पुत्र आहे, हे ताबडतोब ओळखले आणि त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले. त्याला मांडीवर घेताक्षणीच पार्वतीला पान्हा फुटला.



                सात वर्षे मोठ्या प्रेमाने पार्वतीने त्याचे लालनपालन केले. इकडे अग्नीने शंकराला पुत्र झाल्याची बातमी सर्वांना जाऊन सांगितली. ते सर्व शंकराकडे आले. आपल्या मुलाचे नाव त्यांनी कार्तिकस्वामी ठेवले होते. तो प्रथमपासूनच शिवपूजक होता. त्याचे वाहन मोर होते. पूर्वी शंकरांनी सांगितल्याप्रमाणे देवांनी आपल्या अपार सेनेचे सेनापतिपद छोट्या कार्तिकस्वामीला दिले. मग सर्वजण आपल्या सैन्यासह तारकासुरावर चालून गेले. तारकासुराच्या नगराला देवांच्या सैन्याने वेढा घातला. तरीही देवांचे राक्षसांसमोर काही चालेना. मग सर्वांनी हात जोडून कार्तिकस्वामीची प्रार्थना केली आणि तारकासुराचा वध करून साऱ्यांना अभय देण्यास कळवळून सांगितले. शिवाचा पुत्रच तो! तो लहान असला तरीसुद्धा फार पराक्रमी होता. त्याने फार मोठे अक्राळविक्राळ रूप धारण केले. तारकासुर एकदम अतिशय त्वेषाने त्याच्या अंगावर धावून आला. तेहतीस कोटी देव कुमाराचे मागे उभे होते. तारकासुराने एक भयंकर अस्त्र फेकले. त्याबरोबर रणांगणांवर असलेल्या सर्वांची पाचावर धारण बसली; परंतु वैकुंठाहून आलेल्या योगमायेने मधल्यामध्येच ती शक्ती अगदी सहजतेने एका बाजूला पाडून टाकली व निरुपयोगी ठरविली. मग तारकासुराने एकापाठोपाठ एक असा प्रचंड बाणांचा वर्षाव सुरू केला. आपले अतिशय अक्राळविक्राळ तोंड उघडून कुमाराने तारकासुराने सोडलेले सर्व बाण गिळून टाकले. ज्या ज्या शक्ती आणि जी जी अस्त्रे कुमारावर त्याने फेकली ती ती त्याने आपल्या विक्राळ तोंडाने गिळून टाकली. मयूरावर बसलेला कार्तिकस्वामी आता रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता. 



             तारकासुराने अगदी शेवटी ब्रह्मास्त्र सोडले, तेही कुमारने गिळले. यामुळे शेवटी तारकासुर निःशस्त्र झाला. आणि अतिशय चिडून तो रथाच्या खाली उतरला आणि कुमाराच्या अंगावर अगदी विजेसारखा धावून गेला. ते पाहून मग कुमारानेही आपल्या रथाखाली उडी टाकली आणि दोघांचे मल्लयुद्ध सुरू झाले. सात दिवस ते मल्लयुद्ध चालू होते. खाली आपटून, हवेमध्ये गरागरा फिरवून कुमाराने तारकासुराला अगदी पूर्ण जेरीस आणले. शेवटी आपल्या हातात तारकासुराचे दोन्ही पाय धरुन कुमाराने त्याला खाल आपटले. त्याबरोबर त्याचा प्राण निघून गेला. त्याचे शरीर निष्प्राण होऊन तेथे पडले. 

            तारकासुर मरण पावताच सगळीकडे आनंदीआनंद झाला. मंगल वाद्ये वाजू लागली. अतिशय आनंदाने स्वर्गातून देव कुमारावर पुष्पवृष्टी करू लागले. तारकासुराचे इंद्राने नगर लुटले. देवस्त्रियांना त्यांच्या दासीपणातून मुक्त केले. सर्व देवांना सोडवले. सात वर्षांच्या कुमाराला इंद्राने आपल्या अफाट सेनेचे सेनापतिपद दिले. नंतर कार्तिकस्वामी वाराणसीला गेला व तेथे आपल्या मातापित्यांना नम्रपणे वंदन केले. आपल्या मुलाचा पराक्रम पाहून शंकरपार्वतीला फार आनंद झाला. पुढे त्यांनी मुलाची मुंज मोठ्या थाटात केली. षडानन सर्व तीर्थे फिरून आला. अरण्यात राहून अनुष्ठान करणे त्याला फार आवडत असे. एकदा भवानी त्याला म्हणाली, षडानना, आता तू मोठ्या आनंदाने विवाह करावास आणि गृहस्थाश्रम स्वीकारावास असे मला वाटते आहे.



                   आई, जिच्याबरोबर विवाह करावयाचा ती स्त्री कशी असते! मला अद्याप माहीत नाही तरी ते तू मला सांग तरी. मी स्त्रिया कधी पाहिल्या नाहीत म्हणूनच मी म्हणतो त्या कशा दिसतात... कशा असतात हे मला तू सर्व सांग. " षडाननाने आईला उलट प्रश्न केला.

               कार्तिकाचा अजाणतेपणा पाहून अपर्णा त्याला म्हणाली, 'मुला, अरे, सर्व स्त्रिया माझ्याचसारख्या असतात. माझ्यासारख्या दिसतात ! हसून कुमार म्हणाला, 'आई, सर्व स्त्रिया तुझ्याचसारख्या असतात ना ? मग त्या मलाही तुझ्याप्रमाणेच आहेत. म्हणजे मातेसमानच आहेत. तुझे वचन मी कधीही खोटे पडू देणार नाही. एवढे बोलून पार्वतीचे बोलणे पुढे ऐकण्यास न थांबता कुमार घोर अरण्यात निघून गेला. अंबेने त्याला पकडायचा खूप आटोकाट प्रयत्न केला. पण तो तिच्या आवाक्यात काही आला नाही. अशा तऱ्हेने झालेल्या आपल्या पुत्रवियोगाने मूर्च्छित होऊन अंबा धरणीवर पडली. 'कुमारा, मला पान्हा फुटला आहे. आता तो मी कुणाला पाजू ? मला थोडा वेळ तरी येऊन भेट. तुझे दूधलोणी तरी घे.... असे म्हणत ती सारखी रडू लागली.



             तेवढ्यात आकाशवाणीने कुमाराने शब्द ऐकायला आले, 'माझ्या दर्शनाला जर एखादी स्त्री येईल तर ती सात जन्म विधवा होईल; आणि माझ्या दर्शनाला कार्तिकमासातील कृत्तिकायोगावर एखादा पुरुष येईल तर तो सात जन्म भाग्यवंत म्हणून जगेल. श्री आणि सरस्वती त्याच्यावर कृपा करतील. त्याला कशाची कमतरता पडणार नाही. मग तो पुरुष कोणीही असो. माझी ही वाणी कायमची लक्षात ठेवावी.  सर्व ऋषींनी कार्तिकस्वामींना परोपरीने विनवून सांगितले, 'तुझी माता, तुझ्या दर्शनाकरिता अतिशय व्याकुळ झाली आहे. तिला एकदा जाऊन भेट. " मग कार्तिकस्वामी पुन्हा एकदा वाराणसीला गेला. आपली माता शिवभवानीला भेटला. थोडे दिवस त्यांच्याजवळ राहून त्यांना आनंद देऊन पुन्हा घोर अरण्यात तपश्चर्येसाठी कायमचा निघून आला. अशी ही कथा ऐकली. की सर्व संकटे नाहीशी होता.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या