॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥
अध्याय ३
कल्मषपाद राक्षसाची कथा
हे शिवा, नीळकंठा, महेशा, जयगंगाधारी, पार्वतीपरमेश्वरा, भाललोचना, निरंजना, तुला साष्टांग नमस्कार असो ! आता शौनक व इतर ऋषींना सूताने नैमिषारण्यात घडलेली अशी जी कथा सांगितली आहे, ती आपण मनोमावे ऐका.
इक्ष्वाकु कुळातील मित्रसह नावाचा एका पराक्रमी राजा पृथ्वीवर राज्य करीत होता. तो युद्धशास्त्रात जसा निपुण होता तसाच वेदशास्त्रात पारंगत होता, त्याचप्रमाणे अतिशय शूर होता. त्याच्या अचाट पराक्रमामुळे त्याने सर्व पृथ्वी जिंकली होती. त्याला आता एकही शत्रू राहिला नव्हता. एक दिवस शिकार करण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर आपला लवाजमा घेऊन त्या राजाने दाट अरण्यात प्रवेश केला. हाकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे सर्वत्र हाके घालायला सुरुवात केली. वाघ, कोल्हे, लांडगे, सिंह, हरणे, माकडे, सांबर, वनगाई, ससे अशी जनावरे घाबरून सैरावैरा पळू लागली. राजाने आपल्या अचूक नेमाने बरोबर टिपून असंख्य पशूंना एकामागे एक यमसदनाला पाठवले. अनेक उडणाऱ्या पाखरांना मारले. राजाने जे हे पशू मारले त्यांत एक राक्षससुद्धा मारला गेला. अतिशय शक्तिशाली असलेल्या त्या राक्षसाला राजाने सोडलेला बाण वर्मी लागला आणी तो तत्काळ मरण पावला. राक्षसाचा एक भाऊ दुरूनच त्याच्याकडे बघत होता. “माझ्या भावाला निष्कारण मारणाऱ्या या राजाचा सूड घेईन. अशी त्याने मनोमन प्रतिज्ञा केली. मनाजोगती भरपूर शिकार करून झाल्यावर राजा मित्रसह आपल्या नगराला परत आला. त्या मेलेल्या राक्षसाच्या भावाने रूप बदलण्याच्या विद्येच्या साहाय्याने मानवाचे रूप घेतले आणि एका आचाऱ्याचे सोंग गेऊन तो राजाकडे आला. राजाला अतिशय नम्रपणे नमस्कार करून तो म्हणाला, महाराज, मी पाककलेत खूप म्हणजे खूपच निष्णात आहे. मला आपण आपल्याकडे एक स्वैपाकी म्हणून कामाला ठेवा. आपण स्वतः माझे कौशल्य एकदा पहावे अशी माझी आपल्या चरणाशी विनंती आहे.
राजाने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला पाकशाळेत नेमले. हा आचारी खरोखरच स्वयंपाक अतिशयच चांगला करीत असे. सर्वजण त्याच्या पाककलेवर खूष होते. एकदा काय झाले, वसिष्ठ ऋषी राजाकडे आले. राजाने नेहमीच्या पद्धतीने त्यांचा आदर सत्कार केला. मग एक दिवस पितृतिथी पाहू राजाने गुरु वसिष्ठांना आपल्या येथे भोजनासाठी खास आमंत्रण दिले.
आचाऱ्याचे काम करणाऱ्या राक्षसाला ही आयती चालून आलेली संधी चांगली सापडली. त्याने एका माणसाला ठार मारले आणि त्याचे रक्त-मांस भाज्यांत मिसळून उत्तम प्रकारचा स्वयंपाक तयार केला. आणि वसिष्ठ मुनींना जेवायला बसले असता त्या भाज्या वाढल्या. वसिष्ठ मुनी त्रिकाल ज्ञानी असे होते. भाज्यांकडे बघताच भाजीचा हा खरा काय प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यात नरमांस आहे हे त्यांनी बरोबर ओळखले. त्याबरोबर ते फार संतापले व रागामध्येच त्यांनी मित्रासह राजाला शाप दिला. ते म्हणाले, "हे राजा, मी राक्षस आहे असे तुला वाटले काय ? मला येथे आदराने बोलावून घेऊन नरमांस खायला घालायला तुला धीर तरी कसा झाला? अरे पाप्या, चांडाळा जा... आता तूच राक्षस हो... आणि ज्या ठिकाणी कधीही काहीही खायला मिळत नाही अशा ठिकाणी तू संचार कर... तूच आता रोजचे रोज नरमांस खा... "
मित्रसह राजा नम्रपणे मुनींना म्हणाला, गुरुमहाराज, मी जाणूनबुजून आपल्याला नरमांस कसे वाढीन ? " मग शिपायाकडे वळून राजा म्हणाला, 'शिपाई... तो नवीन आचारी कुठे आहे? त्याला ताबडतोब पकडून माझ्यासमोर आणा. सेवकांनी लगेचच धावत पाकशाळेत प्रवेश केला; पण तो नवीन नेमलेला आचारी मावरूपातील तो राक्षस... पळून गेला होता. या प्रसंगाने राजाही फार संतापला. आपण याबाबत अज्ञानी व निर्दोष असताना आणि आचाऱ्याचा दोष असताना गुरू वसिष्ठांनी खरेखोटेपणाची खात्री करून न घेताच आपल्याला शाप दिला म्हणून राजाला गुरूचाही राग आला आणि गुरूला उलट शाप देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले, त्यावेळी राजाची पट्टराणी त्याच्या जवळच उभी होती. लगेच गडबडीने राजाची हात धरून राणी म्हणाली, "नाथ, शिष्याला आपल्या गुरूला शाप देण्याचा अधिकार नसतो, शिष्याने उलट गुरूला शाप देण्याचे पाप केले तर त्याला नरकयातना सोसाव्या लागतात. महाराज, माझे ऐका, आपण आपल्या गुरूंना शाप देऊ नका. राणीचे बोलणे एकून राजाचा संताप थोडासा कमी झाला.
तो आपल्या पट्टराणीला म्हणाला, सुंदरी, तू बोललीस ते अगदी खरे आहे! पण आता मी शाप देण्यासाठी हातात घेतलेल्या पाण्याचे काय करू ? हे जर मी जमिनीवर टाकले तर माझ्या शापामुळे अतिशय तप्त झालेले हे पाणी पृथ्वी पार जाळून टाकील. " आणि मग विचार करून राजाने आपल्या पायावरच ते पाणी टाकले. त्यामुळे त्याचे पाय काळे झाले. गुरुच्या शापामुळे राजा राक्षस बनला. त्याच्या काळ्या पायावरून त्याचे नाव 'कल्मषपाद' असे पडले.
आतापर्यंत गुरु वसिष्ठांनाही विश्वासघाताने झालेला खरा प्रकार कळला होता. त्यांचाही राग आता कमी झाला होता. ते म्हणाले, माझे एकदा उच्चारलेले शब्द खोटे होणार राजा, नाहीत; पण बारा वर्षांनी तू राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा स्वतःच्या घरी येशील.
ऋषी राजाच्या घरातून निघून गेले. राजा मित्रसह मुनींच्या शापाप्रमाणे कल्मषपाद राक्षस बनून रानात निघून गेला. त्याला आता अतिशय भूक लागली होती. रानातले दिसतील ते पशुपक्षी मारुन खाण्याचा त्याने नुसता सपाटा लावला. तो राक्षस कल्मषपाद अतिशय अवाढ्य शरीराचा होता. त्याच्या कपाळावर शेंदुर फासलेला, मोठमोठे पांढरे सुळे तोंडाबाहेर आलेले, अतिशय भयानक आणि क्रूर चेहरा असलेला तो राक्षस, मिळेल ते प्राणी आपल्या तोंडात टाकत चालला होता. जाता जाता रस्त्यातच त्याला एक बारा-तेरा वर्षांचा कोवळा
ब्राह्मण आपल्या नऊ-दहा वर्षांच्या नवपरिणीत पत्नीबरोबर खेळण्यात, गप्पा मारण्यात दंग झालेला समोरच दिसला. एकदम राक्षसाने झडप घालून आपल्या अवाढव्य पंजात त्या ब्राह्मण कुमाराला पकडले.
त्याची नवपरिणित पतिव्रता पत्नी हात जोडून कल्मषपाद राक्षसाला म्हणाली, “अरे, तू मित्रसह राजा आहेस. मी ओळखले आहे तुला! राजा, तू खूपखूप पुण्यवान आहेस. गोब्राह्मणांचे पालन करणारा, धर्मशील असा राजा आहेस. कृपा कर, माझ्या पतीला मारु नकोस. मी तुझ्यापुढे पदर पसरते. माझ्या पतीला सोडून दे. ब्रह्महत्येचे पातक तू आपल्या शिरावर घेऊ नकोस. नरकाचे साधन करून ठेवू नकोस. तुझ्या पुढील आयुष्यातील भल्यासाठी तरी सोड माझ्या पतीला. " पण त्या क्रूर अशा राक्षसाला तिची अजिबात दया आली नाही. त्याने त्या ब्राह्मणाला त्याच्या पत्नीदेखतच ठार मारून खाऊन टाकले. आणि त्याची हाडे त्या पतिव्रता पत्नीसमोर टाकून दिली.
आपल्या नवविवाहित पतीचा डोळ्यादेखत झालेला मृत्यू पाहून त्या चिमण्या पतिव्रतेने अपार शोक केला. ती अतिशय संतापून राक्षस बनलेल्या राजाला म्हणाली, राजा, तू खूप खूप दुष्ट आहेस! माझे सौभाग्य तू माझ्या डोळ्यादेखत लुटले आहेस. तेव्हा आता ऐक ! तू शापमुक्त होऊन घरी जाशील ! पण तुला घरी सुख लाभणार नाही. घरी गेल्यांवर तुझ्या पट्टराणीबरोबर किंवा कोणत्याही स्त्रीबरोबर तू रतिसुखात जेव्हा दंग होशील त्यावेळी तुझा प्राण जाईल. असा शाप त्या कल्मषपाद राक्षसाला देऊन ती ब्राह्मण स्त्री पतीच्या हाडांना मांडीवर घेऊन सती गेली. हळूहळू वर्षे निघून गेली. बारा वर्षांनी वसिष्ठ मुनींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या शापापासून मुक्त होऊन राजा मित्रसह आपल्या नगरात परत गेला.
राजाला परत नगरात आलेला पाहताच पट्टराणी मदयंती व इतर स्त्रिया मोठ्या आनंदाने त्याला सामोऱ्या गेल्या; पण राजा मात्र अतिशय दुःखी दिसत होता. मदयंती राणीने अत्यंत प्रेमाने त्याच्या दुःखाचे कारण विचारले.
तेव्हा त्याने जंगलामध्ये घडलेली सारी हकीकत राणीला सांगितली. हे ऐकल्याबरोबर राणीवशात हाहाकार माजला. आता राजाचा वंशवेल वाढणार नव्हता. सर्व सुखे आता राजाच्या समोर हजर असताना त्यांचा उपभोग त्याला घेता येणार नव्हता. राजाला मऊ परांची शय्यासुद्धा आता अग्नीसारखी अतिशय दाहक बनणार होती; परंतु राणीने आपला शोक आवरून राजाला म्हटले, 'नाथ, आपण आपले ब्रह्मचार्य पाळून आपल्या प्राणांचे रक्षण करा; पण आम्हांला सोडून निघून जाऊ नका.
असेच दुःखात दिवस चालले होते. राजा एखाद्या माश्यासारखा मनातून दिवसरात्र तळमळत होता. एखाद्या पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघाप्रमाणे, किंवा दात पाडलेल्या सापाप्रमाणे किंवा वेसण घातलेल्या एखाद्या दरवेश्याच्या अस्वलाप्रमाणे तो दीन-दुबळा झाला होता. काय करावे हे त्याला अजिबात सुचत नव्हते. शेवटी आपला वंश चालविण्यासाठी त्याने धर्मशास्त्र पाहिले आणि त्यात सांगितलेल्या शास्त्राप्रमाणे गुरु वशिष्ठांपासून राणी मदयंतीला सुंदर पुत्र झाला त्यामुळे मित्रसह राजाचा वंशक्षय झाला नाही.
राजाला मात्र आता आपले घर म्हणजे अरण्यासारखे वाटत होते. सर्व सुखोपभोग त्याने आता सोडून दिले होते. आपली कर्मगती गहन आहे आणि आपले कर्मफळ भोगल्याशिवाय यातून आपली सुटका नाही. तेव्हा आता देवाला तरी दोष देऊन काय उपयोग होणार आहे! असा विचार मनात करीत, उदासपणे तो रानात सतत एकटाच हिंडत होता. आपल्या पाठीमागे आपल्या बापाचे पिशाच्च उभे राहिले आहे आणि ते आपला पिच्छा अजिबात सोडत नाही. आपल्यावर संतापून ते सतत दातओठ खात असते, असे राजाला मनामधून जाणवत होते. शापातून मुक्ती मिळविण्यासठी राजाने अनेक व्रते केली. अपार दान केल.'
एकदा असा विषण्ण मनाने एकटाच फिरता फिरता राजा मिथुला नगरीजवळ आला. नगरीभोवतालचे रान त्याने पाहिले. ते फारच सुंदर होते. त्या रानात चंपक, जाई, जुई, मालती बहरल्या होत्या. त्यांच्या उमललेल्या फुलांचा सर्वत्र सुवास दरळवत होता. वड, पिंपळ, औदुंबर, बकुळ, देवदार यांचे मोठे मोठे वृक्ष तेथे अतिशय डौलात उभे होते. भरपूर लगडलेल्या फळाफुलांनी झाडे वाकली होती. राजा विश्रांती घेण्यासाठी थोडा वेळ त्या रानात थांबला. एखाद्या कंगाल माणसाला अचानक खूप मोठा धनाचा साठा सापडावा, भुकेलेल्या माणसासमोर एकदम गरमागरम उत्तम असे खिरीचे भोजन यावे, मरणाऱ्याच्या तोंडात अमृत पडावे किंवा आयुष्यभर सतत चिंतेने व्याकुळ झालेल्या माणसाला चिंतामणी सापडावा त्याप्रमाणे राजाच्या समोर ज्येष्ठ तपस्वी, ऋषिश्रेष्ठ गौतममुनी आपल्या शिष्यांसह येऊन उभे राहिले. राजाने त्यांना आतिशय आदराने नम्रपणाने साष्टांग नमस्कार केला.
अशा तऱ्हेने सामोरा आलेल्या राजाला मग गौतम ऋषींनी त्याचे, त्याच्या राज्याचे, प्रजेचे कुशल विचारून घेतले.
राजा नम्रपणे म्हणाला, "मुनिराज, आपल्या कृपेने माझ्या 'राज्यात सर्व काही आबादीआबाद आहे. सर्वजण आपापले काम अगदी निष्ठेने आणि जिवापाड मेहनत घेऊन करीत आहेत; " पण मी मात्र अभागी आहे, करंटा आहे. '
नंतर राजाने वसिष्ठ ऋषींनी दिलेला शाप आणि नवपरिणित ब्राह्मण स्त्रीने दिलेला शाप ही सर्व हकीगत गौतमऋषींना सांगितली.
ती ऐकून गौतमऋषी म्हणाले, राजा, मी आत्ताच गोकर्ण क्षेत्रातून येथे परत येत आहे. तेथे भगवान शंकर देवी पार्वतीसह ॐकार रूपाने वास्तव्य करीत आहेत. भगवान विष्णूसुद्धा आपल्या प्रिय इंदिरेसह त्या ठिकाणी तपश्चर्या करीत आहेत. तेथील अप्रतिम अशी शोभा वर्णन करायचे सामर्थ्य आज तरी माझ्याजवळ नाही; पण सर्व देवदेवता तेथे रहात आहेत. सर्व ऋषी तेथे इष्ट देवता प्रसन्न करण्यासाठी तप करीत आहेत. नारद, तुंबर तेथे शिवलीलांचे अतिशयच आनंदाने सतत गायन करीत आहेत. ऋषींचा सारखा मंत्रघोष सुरू आहे. अप्सरा भान हरपून नृत्य करीत आहेत. इंद्र, सूर्य आणि सर्वच्या सर्व इतर देवदेवता दाही दिशांचे रक्षण करण्यासाठी तेथे दक्ष अशा उभ्या आहेत. अशा अतिशय रम्य ठिकाणी श्रीशंकर भवानीमातेसह तेथे रहात आहेत. अष्टसिद्धी तेथेच अहोरात्र आहेत. राजा, मी सुद्धा पुष्कळ काळ तेथेच राहात असतो. इतर क्षेत्रात लाख वर्षे अतिशय उग्र अशी तपश्चर्या करून जे पुण्य प्राप्त होऊ शकत नाही ते पुण्य गोकर्ण क्षेत्रात केवळ एक दिवस तप केल्याने मिळते. अमावस्या, संक्रांत, सोमवार किंवा पर्वकाळी तेथे स्नान केले तर सर्व तीर्थात स्नान केल्याचे महान असे पुण्य मिळते. लंकेचा महान राजा रावण, त्याचा महान पराक्रमी असा भाऊ कुंभकर्ण आणि अतिशय सात्त्विक गुणांचा दुसरा भाऊ विभीषण यांनीही पूर्वी तेथे अनुष्ठाने केली होती. हे लिंग रावणाने कैलास पर्वतावरून येथे आणले असून स्वतः गणपतीने त्याची स्थापना या ठिकाणी केलेली आहे.
त्याची कथा अशी आहे रावणाची आई अतिशय धर्मपरायण स्त्री होती. शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय आपल्या तोंडात पाणीही घालत नसे. पाच धान्यांचे पीठ करून ती आपल्या घरीच एक शिवलिंग बनवीत असे आणि रावणाचे कल्याण व्हावे म्हणून रोज त्याची प्रार्थना करीत असे; पण एकदा तिने केलेले पाच धान्यांचे शिवलिंग शत्रूंनी समुद्रात नेऊन टाकले. झाले! त्या क्षणापासून रावणाच्या आईने अन्नपाणी वर्ज्य केले.
त्याबरोबर रावण आपल्या आईला म्हणाला, आई, तू ह्या असल्या साध्या लिंगासाठी उपवास कशाला करतेस ? थांब, मी स्वतः कैलास पर्वतावर जातो आणि भगवान शंकराचे खरे आत्मलिंग घेऊन येतो. "
आणि मग रावणाने उग्र तप सुरू केले. सारखा शिवलीलांचे गुणवर्णन आपली दाही तोंडे उघडून तो करू लागला. आपले शिर स्वतः आपल्याच हातांनी तोडून त्यातील शिरांचे तंतू वाद्याला जोडून ते वाजवीत वाजवीत रावण निष्ठेने एकसारखा शिवाचे गुणगान करीत होता. त्याची ती असीम अशी भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणाले, रावणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय हवे ते तू माझ्याकडून आता मागून घे. "
तेव्हा रावण भगवान शंकराला म्हणाला, शंकरा, मला तुमचे आत्मलिंग द्या आणि या जगात सर्वात सुंदर असलेली एक स्त्री द्या.
भोळा शंकर रावणाचे ते मागणे ऐकून लगेच 'तथास्तु' म्हणाला आणि कोटी कोटी चंद्र सूर्य ज्याच्यावरून ओवाळून टाकावेत असे तेजस्वी आत्मलिंग अगदी सहजतेने त्यांनी रावणाच्या हातात दिले. वेद ज्याची स्तुती करतात, योग्यांना ज्याच्या ठायी अतिशय आराम मिळतो, ज्याने ही सर्व चराचर सृष्टी निर्माण केली असे लिंग आता रावणाच्या हाती आले. लिंग आपल्या हातात धरून रावण पुन्हा म्हणाला, "शंकरा,
आता मला सुंदर स्त्री द्या. त्याबरोबर शंकर म्हणाले, अरे, देवी पार्वतीसारखी सुंदर स्त्री या जगात दुसरी कुठेही नाही. तिच्यासारखी एकमेवाद्वितीय अशी तीच आहे! तिची प्रतिमा अगदी हुबेहुब तिच्यासारखीच ब्रह्मदेवालाही पुन्हा करता येणार नाही. तेव्हा तुझ्याबरोबर घेऊन जा. " तू अपर्णेलाच
रावणाने शंकराने केलेली आज्ञा प्रमाण मानली आणि त्याप्रमाणे पार्वतीला आपल्या विशाल खांद्यावर घेऊन रावण परत निघाला. ते तेजस्वी आत्मलिंग रावणाने आपल्या उजव्या हातात घेतले होतेच.
इकडे रावण लंकेकडे निघाला आणि तिकडे कैलासावर गणेश, कार्तिकस्वामी, नंदी सर्वजण शोकसागरात बुडाले. आपल्या प्रिय अशा धर्मपत्नीला देऊन टाकणाऱ्या भोळ्या सांबसदाशिवाला काय म्हणावे, हेच त्यांना काही कळत नव्हते. रावणाबरोबर जाताना भवानी विष्णूचे सारखे स्मरण करीत होती, “हे विष्णो, हे लक्ष्मीपती, आता तूच मला या संकटातून सोडव. ती अतिशय करुण अशी प्रार्थना ऐकून वैकुंठातून विष्णूंचे आसन एकदम हलले आणि लगोलग एका ब्राह्मणाचे रूप घेऊन ते रावणासमोर येऊन प्रकट झाले. रावणाच्या खांद्यावर असलेल्या भवानीकडे पहात पहात हसत हसत विष्णू रावणाला म्हणाले, "हे रावणा, ही असली जगातील सर्वात कुरुप स्त्री तुला कुठे मिळाली? आणि तू तिला आपल्या खांद्यावर बसवून घेऊन एवढा घाईघाईने कुठे निघाला आहेस ?
रावण विष्णूच्या ब्राह्मण रूपाकडे उपेक्षेने पाहत म्हणाला, ही कुरुप स्त्री आहे? अरे, ही खुद्द भगवान शंकराची भवानी आहे, जगत्सुंदरी आहे. भगवान शंकरांनीच ही त्रैलोक्यसुंदरी मला स्वेच्छेने देऊन टाकली आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.