॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥
अध्याय ३
कल्मषपाद राक्षसाची कथा
भाग :-२
"वेडा वेडा ! तू खरेच वेडा आहेस. अरे, जरा त्या स्त्रीला खांद्यावरून उतरून खाली ठेव आणि तिच्याकडे जरा नीट बघ आणि मला सांग, तू म्हणतोस ते खरे आहे का ते ! हे ऐकून रावणाने आपल्या खांद्यावरून अपर्णेला खाली उतरून ठेवले. देवीने आपले रूप बदलले होते. अत्यंत कुरुप, भुवयाला आठ्या, वृद्ध, गाल पार आत बसलेले, तोंडात दात नाहीत, अशी ती म्हातारी पाहून रावण तर चकितच झाला. आता रावणाकडे पाहून ब्राह्मण खदखदा हसत होता. त्यामुळे रावणाने शंकराकडून आणलेल्या त्या स्त्रीला तेथेच सोडून दिले आणि तो पुन्हा शंकराकडे गेला.
भगवान, तुम्ही मला कुरुप, अमंगळ अशी स्त्री अपर्णा म्हणून दिलीत! शोभलं का तुम्हांला अस करणं ? मला का फसवलेत ? " तेव्हा शंकर म्हणाले, "अरे रावणा, खरं तर मी तुला त्रैलोक्यसुंदरी अपर्णाच दिली होती. अरे वेड्या, ती पार्वती म्हणजेच माया आहे. तू तिला कधीच आपल्याजवळ संभाळू शकला नसतास. मायेचा पसारा अनंत ब्रह्मांडाहूनही फार फार मोठा असा आहे. "
इकडे विष्णूंनी पार्वतीला ज्या ठिकाणी रावणाने खांद्यावरून उतरवून ठेवले होते तेथे भद्रकाली देवी म्हणून तिची स्थापना केली आणि 'माता' म्हणून तिला नम्रपणे वंदन केले.
शंकरांनी रावणाची कशीबशी समजूत घातली. नंतर आपल्या अंगाच्या मळीपासून त्यांनी एक सुंदर पुतळी निर्माण केली आणि रावणाला सांगितले, "हे रावणा, माझा कृपाप्रसाद असलेली ही सुंदरी मंदोदरी ह्या नावाने मायासुराचे पोटी जन्म घेईल. तिच्यासारखी लावण्यवती, सुकुमार, पतिव्रता स्त्री शोधूनही जगतात सापडणार नाही आणि ती उपवर होताच मायासुर मोठ्या आनंदाने तुला मंदोदरी अर्पण करील. तसेच, विवाह करून देऊन विधियुक्त कन्यादान करील आणि या शिवाय एक शक्ती तुला आंदण म्हणून देईल. कोणत्याह अतिबलाढ्य शत्रूवर तू ती शक्ती फेकलीस तर शत्रू जागच्याजाग ठार होईल. तेव्हा तू आता घरी जा. शंकरांनी सांतिल्यामुळे समाधान पावून रावण आत्मलिंग घेऊन पुन्हा आपल्या घरच्या वाटेला चालू लागला.
इकडे सर्व देवांनी आत्मलिंग गेल्याने येणाऱ्या संकटांचा विचार करून श्री गजाननाची मनोभावे आराधना सुरू केली ती होती. ते सर्वजण गजाननाला विनवीत होते, की ते दिव्य आत्मलिंग रावणाच्या हातून बुद्धिचातुर्याने काढून इकडे घेऊन ये. आत्मलिंग देताना भगवान शंकरांनी रावणाला सांगितले होते, 'हे लिंग तुला जेथे स्थापन करायचे आहे तेथेच खाली ठेव. मधे कोठे खाली ठेवू नकोस. जरा कुठे ते खाली ठेवले तर तेथेच कायमचे राहील. हे तू पक्के लक्षात ठेव. '
रावण आपल्या दोन्ही हातात ते शिवलिंग धरून वाट चालत होता; पण आता त्याला थांबावेच लागणार होते. त्याला लघुशंकेला जायचे होते; पण जवळपास तर कुणीही दिसत नव्हते. इकडे तिकडे पहाता पहाता त्याला गाई चारणारा एक गुराखी मुलगा दिसला. खरे तर गुराख्याचा वेष घेतलेला प्रत्यक्ष गजाननच तो होता. त्याच्याजवळ जात रावण त्या गुराख्याला म्हणाला, ए, जरा वेळ लिंग हातात धरून ठेव. खाली ठेवायचे नाही मात्र.
"मी नाही हातात धरत, मला वेळ नाही. माझ्या गाई इकडे तिकडे पळतील. मग मला कुठे कुठे शोधत बसावे लागेल, " गुराख्याचा वेष घेतलेला गजानन रावणाला म्हणाला.
'अरे, थोडा वेळ तरी हातात धर. 'किती वेळ लागेल तुम्हांला ? " गुराख्याने सहजतेने विचारले,
अरे मी लघुशंका करून लगेच येतो. रावण म्हणाला. " हे पहा मी जास्त वेळ थांबणार नाही. मी तुम्हांला फक्त तीन वेळा हाका मारीन आणि तेवढ्या वेळात जर तुम्ही आला नाहीत तर हे लिंग मी येथेच खाली ठेवून देईन.
रावणाला आता थोडा वेळसुद्धा अजिबात धीर निघत नव्हता. त्याने न बोलता केवळ मानेनेच होकार दिला व तो थोडासा आडबाजूला जाऊन बसला.
गजानन म्हणजे भगवान शंकराचा लाडका मुलगा होता! गणपती म्हणजे प्रत्यक्ष बुद्धीची देवता ! हातात विनासायास परत आलेले दिव्यलिंग तो रावणाला परत थोडेच देणार होता ? ते रावणाकडून परत मिळविण्यासाठीच तर हा सारा खटाटोप केला होता. गजाननाला लांबून बसलेला रावण चांगला स्पष्ट दिसत होता. एक घटिका पूर्ण झाली आणि गजाननाने हाक मारली, “रावणा, त्या पहा बरं माझ्या गाई रानोमाळ गेल्या रे... आपले हे लिंग तुझे तू परत घे.
रावणाने हात वर करून त्याला 'आणखी थोडे थांब. ' असे म्हटले; पण आता दुसरी घटिका भरली. तेव्हा पुन्हा गजाननाने पुन्हा आरोळी मारली आणि रावणाला लवकर येऊन लिंग घेण्यास सांगितले. पण छे ! आज काय झाले होते कुणास ठाऊक! त्याला लवकरच काय; पण इतका वेळ झाला तरीही उठताच येईना. तीन घटिका भरल्या आणि गजाननाने पुन्हा रावणाला तिसरी आणि शेवटीच हाक मारली आणि रावण तोपर्यंत परत लिंग घेण्यास न आल्यामुळे हातातले आत्मलिंग त्याने जमिनीव ठेवून दिले. ते पाहाताच हातपाय धुऊन शुद्ध न होताच रावण तेथे धावतच आला आणि ते लिंग जमिनीवरून वर उचलण्याचा प्रयत्न करू लागला; परंतु ते सहजतेने उचलता आले नाही म्हणून मग आपली सारी शक्ती त्याने खर्ची घातली पण छे। लिंग आता पृथ्वीचाच एक भाग झाले होते. ते रेसभसुद्धा जागचे हलले नाही. वर आले नाही, की बाजूला सरले नाही. रावण या नादात असताना गुरख्याच्या वेषात तेथे आलेला गजानन गुप्त झाला होता आणि त्याच्या चरत असणाऱ्या गाईही जमिनीत शिरून लपल्या होत्या.
रावणाने गाई पाहिल्या आणि त्यांना घरण्याच्या प्रयत्न केला. तेव्हा लपता लपता एका शेवटच्या गाईचा एक कान रावणाच्या हातात सापडला. रावणाने त्या गाईचा कान धरून वर ओढण्याचा आपल्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला; पण त्याला काही ते जमले नाही. मग नाईलाज झाल्यामुळे रावणाने तेथेच श्री शंकराची पूजा केली. तेव्हापासून त्या क्षेत्राला महाबळेश्वर असे नाव पडले. नंतर रावणाची आईही रोज तेथे येऊन आत्मलिंगाची पूजा करीत असे. हे भगवान शंकराचे मुख्य आत्मलिंग आहे याची सर्वांना जाणीव होती. त्यामुळे देव, ऋषी, गंधर्व हे सर्वजणसुद्धा तेथे पूजा करण्यासाठी येत असत. रावणानेसुद्धा त्यानंतर आपल्या वधूसह गोकर्ण महाबळेश्वरला अनुष्ठान केले होते. त्यामुळे प्राप्त झालेल्या शक्तीमुळे त्याने देवांना जिंकून बंदिवासात टाकले होते. पुढे भगवान शंकराने रावणाला सांगितल्याप्रमाणे मयासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली. त्याचबरोबर रावणाला अमोघ शक्तीही दिली. या विवाहामुळेच रावणाचा वंश वाढला. त्याला लाख पुत्र आणि सव्वा लाख नातू झाले. इंद्रजितसारखा अतिशय पराक्रमी पुत्र मंदोदरीने त्याला दिला होता. अनुष्ठानामुळे त्याला अपार संपत्ती व अपार सत्ता प्राप्त झाली होती.
राजा, अशा या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे वर्णन सुरसतेने ब्रह्मदेवालाही करणे शक्य झाले नाही तेथे मी आणखी काय करणार? पण आता मिथुरेश्वर येथे एक यज्ञ होणार आहे म्हणून आम्ही तिकडे जाण्यासाठी घाईघाईने गोकर्ण क्षेत्रातून येत असताना एक अतिशय अद्भुत गोष्ट पाहिली आहे. काय पाहिले, ते कृपया मला सविस्तर सांगा तरी... "
मित्रसह राजाने मोठ्या उत्सुकतेने विचारले. राजा ती कथा मी तुला सांगतो ती तू ऐक.
आम्ही सर्वजण एका वृक्षाच्या मोठ्या दाट सावलीत बसलो होतो. तेव्हा तेथे आमच्यापासून जवळच एक शूद्र स्त्री पडलेली आम्हांला दिसली. तिला सर्वांगाला महारोग झाला होता. सर्व अंगभर रोगाचे चट्टे उमटले होते. जखमेतून खूप किडे वळवळत होते. तिच्या अंगाची सर्वत्र भयंकर दुर्गंधी सुटली होती. हातापायांची बोटे पार झडून गेली होती. तोंडातील सर्व दात पडले होते. कान बहिरे झाले होते. जन्मापासूनच ती ठार आंधळी होती. तिच्या अंगावर अजिबात मांस नव्हते. अंगावरील वस्त्रांची तर तिला शुद्धच नव्हती. ती धुळीत अस्ताव्यस्तपणे लोळत होती.
तिच्याकडे बघून आम्हांला खूप वाईट वाटत होते. पूर्वजन्मीची पातके तिला आताच्या या जन्मात छळत होती. तिचा मरणकाळ आता जवळ आला होता. मी सहज वर पाहिले तर भगवान शंकराचे विमान आकाशातून खाली उतरून खाली येत होते. विमानात खूपसे शिवगण बसले होते. त्यांच्या तेजाने भोवतालचा सारा भाग प्रकाशित झाला होता. त्यांच्यासमोर अष्टनायिका नृत्य करीत होत्या. गाण्याचे मधुर स्वर कानावर पडत होते.
विमान खाली आल्यावर मी विमानातून आलेल्या शिवगणांना विचारले, 'आपण कोणाचा उद्धार करण्यासाठी येते आला आहात ?
तेव्हा शिवदूत म्हणाले, त्या चांडाळ स्त्रीचा ! त्या धुळीत लोळत असलेल्या स्त्रीला कैलासावर नेण्यासाठी आम्हांला साक्षात भगवानांनी पाठवले आहे. "
त्यांचे उत्तर ऐकून मला फार आश्चर्य वाटते. मी पुन्हा विचारले, 'या स्त्रीने आपल्या मागच्या जन्मात खूप तप करून पुण्य प्राप्त केले आहे का?
तेव्हा विमानातून उतरून समोर उभे असलेले शिवगण म्हणाले, 'तर मग हिचा पूर्वेतिहास ऐका. कैकय नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला सुमित्रा नावाची एक अतिशय सुंदर मुलगी होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व होता. तिच्या अंगी भलताच ताठा होता. ती कुणालाही विचारीत नसे. सुमित्रा बालविधवा होती. तारुण्यात आल्यावर तिला आपले ब्रह्मचर्य पाळणे जमले नाही आणि तिने तारुण्याच्या नशेत धुंद होऊन अनेक पुरुषांबरोबर रतिक्रीडा केली. त्याबद्दल तिला कसलीच खंत वाटली नाही.. काही दिवस असेच निघून गेले. सुमित्रेला दिवस गेले. हे कळताच तिच्या बापाने तिला आपल्या घराबाहेर घालवून दिले.
वडिलांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर फिरता फिरता तिला एक शूद्र तरुण भेटला. तो तिच्या मोहात पडला आणि त्याने ह्या ब्राह्मण विधवेशी लग्न केले. पुढे सुमित्रेला त्याच्यापासूनही अनेक मुले झाली. ती मद्यसुद्धा पिऊ लागली. तसेच मांस खाऊ लागली. अभक्ष्य भक्षणामुळे ती अंगाने आडवी तिडवी सुटली.
एकदा तिचा नवरा शेतात कामाला गेला असताना मद्याने धुंद झालेल्या सुमित्रेने बकरा समजून एक गायीचे वासरु सुरीने कापले. ते बिचारे आपल्या जिवाच्या आकांताने ओरडत होते. गाई हंबरत होत्या; पण तिचे त्याकडे मुळीच लक्षच नव्हते. त्या मृत वासराला सुमित्रेने आपल्या स्वयंपाकघरात आणले. तोपर्यंत तिच्यावरील मद्याचा अंमल थोडा कमी झाला होता. आपण गाईचे वासरू मारले आहे, हे बघताच तिला फार फार वाईट वाटले. शिव! शिव! नकळत माझ्या हातून किती वाईट गोष्ट घडली देवा! असे तिला वाटले, तरीही तिने वासराचे मांस खाल्ले आणि राहिलेले बाकीचे बाहेर टाकून दिले आणि वाघाने वासरु मारले अशी तिने आवई उठविली.
शेवटी तिचे आयुष्य संपताच सुमित्रा मृत्यू पावली. यमदुतांनी तिला नरकात ढकलले. तिथे तिचा खूप छळ केला. तिला खूप तापलेल्या जमिनीवर झोपवले. तापून लाल लाल झालेल्या लोखंडी खांबाला मिठी मारायला लावली. नंतर
यमराजाने चित्रगुप्ताला विचारले, "हिच्या पदरी काही पुण्या आहे का ? 'शिव शिव असे म्हणून हिने गाईच्या वासराला मारल्याबद्दल त्यानंतर दुःख व्यक्त केले आहे. बस्स ! एवढेच पुण्य तिच्याजवळ आहे. 'नंतर यमराजांनी तिला मृत्युलोकात मानव जन्मात; पण शूद्र जातीत लोटून दिले. जन्मतःच ती आंधळी झाली होती. ती कायम आपल्याच विष्ठेत लोळत पडलेली असे. तिचे आईबापही तिच्या अगदी लहानपणीच वारले होते. मग ती हातात काठी घेऊन गावोगावी उपजीविकेसाठी हिंडू लागली.
एकदा महाशिवरात्रीला लोकांची दिंडी गोकर्ण महाबळेश्वरला निघाली असताना ही चांडाळीण तशा अवस्थेतच त्या यात्रेत सामील झाली होती. सर्वांच्याबरोबर चालत चालत ती गोकर्ण महाबळेश्वरला आली. तेथील भद्रकालीच्या देवळाजवळ रस्त्यात पडून राहिली. पोटात भूक मावत नव्हती. तेथे रस्त्यामध्ये पडल्या पडल्याच 'कुणी तरी अन्न द्या.. असा आपल्या तोंडाने टाहो फोडून ती लोकांना विनवत होती. देवाला प्रदक्षिणा घालणाऱ्या एका भक्ताने तिची ती अवस्था पाहून सहज एक बेलाचे पान तिच्या हातावर टाकले. आंधळ्या चांडाळणीने ते बोटांनी चाचपून पाहिले; पण ती खाण्याची वस्तू नाही हे हाताने चाचपल्यावर लक्षात येताच रागाने तिने ते पान दूर फेकून दिले. फेकलेले ते बिल्वपत्र वाऱ्याने भिरभिरत येऊन शिवलिंगावर पडले. अन्न न मिळाल्याने तिला अनायसे उपवास घडलाच होता. आता बिल्पत्राने शिवलिंगाचे म्हणजेच शंकराचे पूजन झाले. पोटात थोडेही अन्न नसल्याने तिला अजिबात झोप लागली नाही... आपोआपच जागरणही घडले. लोक सांब सदाशिव, नमः शिवाय, हर हर महादेव' असा घोष करीत होते. चांडाळीणही ऐकून ऐकून त्यांच्याबरोबर तेच शब्द म्हणत होती. तीच ही चांडाळीण आहे. " असे सांगून त्या शिवदूतांनी चांडाळणीला हात धरून उठून बसविले. शिवगणांचा तिला स्पर्श झाला. त्याबरोबर तिला दिव्य रूप प्राप्त झाले. आपली पूर्वजन्मीची पातके आता तिला पुनः पुन्हा आठवू लागली आणि त्याबद्दल ती सारखा पश्चात्ताप करू लागली. पश्चात्तापाने ती पावन झाली आणि शंकराचे नामस्मरण करू लागली. अंती पुण्यसंचयाने ती शिवपदाला जाऊन पोहोचली.
ती शूद्र चांडाळीण खूपच भाग्यवंत आहे असे म्हणायला हवे!" राजा मित्रसह गौतमऋषींना म्हणाला.
तेव्हा गौतमऋषी राजा मित्रसहला म्हणाले, "होय राजा, गोकर्ण महाबळेश्वरला गेल्यामुळे आणि भजन पूजन, जागरण आपोआप घडल्यामुळे ती स्त्री उद्धरून गेली, हे खरोखरच खरे आहे. म्हणून तूही आता त्या क्षेत्री जा आणि तेथे राहून पार्वतीपरमेश्वराची मनोभावे पूजा कर. त्यामुळे तुलाही मुक्ती मिळेल हे निश्चित !
एवढे बोलून जनक राजाने आरंभिलेल्या यज्ञासाठी गौतममुनी घाईघाईने पुढे मिथुला नगरीला निघून गेले. गौतमऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजा मित्रसह लगेच गोकर्णक्षेत्री जाण्यासाठी निघाला. शिवरात्रीला उपवास आणि जागरण करून त्याने दिव्य अशा शिवलिंगाची मनोभावे केली. त्यामुळे शंकर राजा मित्रसहा वर प्रसन्न झाले. पूजा शंकरांनी राजाकडे कृपादृष्टीने पहाताच त्याच्या हातून घडलेले ब्रह्महत्येचे पातक नष्ट झाले. त्यामुळे राजा निर्दोष झाला. त्यामुळे मग कैलासपर्वतावरून राजाला नेण्यासाठी आकाशातून अतिशय दिव्य असे विमान आले. विमानात अतिशय तेजस्वी शिवगण बसलेले होते. सर्वत्र सुगंध दरवळत होता. मंगल अशी वाद्ये वाजत होती. स्वर्गीय पुष्पांचा आकाशातून विमानावर व राजावर वर्षाव होत होता.
शिवगण राजाजवळ आले आणि त्यांनी राजाला स्पर्श केल्याबरोबर मित्रसह राजाला दिव्यदेह प्राप्त झाला. मग त्या राजाला सर्व शिवगणांनी विमानात बसवून त्याला मिरवत मिरवत कैलासावर शिवपदापाशी आणले. तेथे श्री शंकराचे त्याला दर्शन होताच मित्रसह राजाला मुक्ती मिळाली. तो शंकरस्वरूपात विलीन झाला.
जेथे मित्रसह राजाला शंकराच्या कृपेनेच मुक्ती मिळाली असे हे गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र आहे. या क्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे. शंकराची कळत नकळत पूजा करणाराला शंकर कधीही विसरत नाही.
श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा समाप्त
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.