श्री देवी महात्म्य मराठी
Shri Devi Mahatmya Marathi
अध्याय पहिला
( मेधा ऋषी सुरथ राजाला व समाधीला देवी महात्म्य सांगतात)
मधु कैटभाचा वध
भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत असताना मधू आणि कैटभ या दैत्यांना मारण्यासाठी स्वतः ब्रह्मदेवाने जीचे स्तवन केले, त्या महाकाली देवीला माझा नमस्कार असो. त्या महाकालीने आपल्या दहा हातात खडग, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परीघ, शूल, भुशुंडी, मस्तक व शंख धारण केले आहेत. तीन नेत्र असलेल्या त्या देवीने शरीरावर दिव्य अलंकार धारण केले आहे. दहा मुखे व दहा पाय असलेल्या त्या देवीच्या शरीराची कांती नील मण्याप्रमाणे आहे, त्या चंडिकादेवीला माझा नमस्कार असो.
ग्रंथारंभी श्रीगणेश, देवी सरस्वती, कुलदेवता व भगवती देवी यांना आम्ही नमस्कार करतो. हे गजानना, तू सर्वांना बुद्धी देणार आहेस, तू सर्व विद्यांचा चौदा विद्या, चौसष्ट कला यांचा नायक आहेस. सर्व लोक कार्यारंभी तुला वंदन करतात. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी तुझे ध्यान केले होते. बळीराजाला पाताळात लोटताना वामनाने तुला ध्यानपूर्वक नमस्कार केला होता. सृष्टीची रचना करताना ब्रह्मदेव प्रथम तुझेच ध्यान करतात. शेषनागानेही पृथ्वीचा भार मस्तकावर धारण करताना तुझेच ध्यान केले होते. महिषासुराचा वध करण्यासाठी पार्वती मातेने तुझेच ध्यान केले होते. मोक्ष, मुक्तीसाठी सिद्धादिक तुझेच ध्यान करतात. विश्वावर विजय मिळवण्यासाठी कामदेव मदनही तुझेच ध्यान करतो. तुला आमचा साष्टांग नमस्कार असो.
हे गणेशा, तू आम्हाला बुद्धी दे व आमच्या कडून देवी महात्म्य वदवून घे. हे ब्रह्मदेव कन्ये, शारदे देवी, तू सर्व विद्यांची स्वामिनी आहेस. तू ब्रह्मादीकांची जननी साक्षात ओमकार स्वरूप आहेस. तुला आमचा नमस्कार असो. हे महाविष्णू, तुझी कृपा झाली असता, मुका मनुष्य ही वक्ता होतो, पंगु(पांगळा) ही पर्वत ओलांडून जातो, तुझ्या कृपेचे सामर्थ्य असे आहे. तुला आमचा नमस्कार असो. तू ब्रह्मदेवाच्या मुखावर सरस्वतीची स्थापना केलीस, त्यामुळे तो चारही वेद बोलू लागला. तु शिवशक्ती, सूर्य, गणपती आहेस. तुला आमचा नमस्कार असो. श्री दत्तगुरु, वशिष्ठ, वाल्मिक, नारद, शुक इत्यादींना माझा नमस्कार असो. आता जिचा हा देवी महात्म्य ग्रंथ आहे, त्या आदिशक्ती देवीला मोठ्या भक्तिभावाने वंदन करून श्रीदेवी महात्म ग्रंथाला प्रारंभ करतो.
कथा आहे प्राचीन काळातील, अगदी द्वापार युगातली. एकदा नैमिषारण्यात अनेक वर्षे चालणाऱ्या यज्ञासाठी शोनकादीक अनेक ऋषी एकत्र जमले होते. ते सर्व जण वेदविद्या जाणणारे होते. आयुर्वेद, धनुर्वेद, ज्योतीर्वेद, गांधर्ववेद या चारही उपवेदाचे चांगले जाणकार होते. त्याचप्रमाणे वेदांत, न्याय, मीमांसा, तर्क,चार्वाक ही सहशास्त्रे, व्याकरण-सांख्य, योग, शिल्प, सूप, काम, कोक,वैद्यक, पातंजलयोग ही उपशास्त्रे यात ते सर्व जण मोठे प्रवीण होते.
ते सर्व ऋषी पुराणिक सूत यांना म्हणाले, “तुम्ही व्यासांचे शिष्य आहात. व्यासांनी भविष्योत्तर भागवत, मत्स्य, मार्कंडेय इत्यादी अठरा पुराणे त्याचप्रमाणे शिव, नरसिंह, गणेश, देवी इ. तेवीस उपपुराणे तुम्हाला शिकवली आहेत. त्यांच्या कृपेने तुम्ही या सर्व पुराणात मोठे निपुण आहात. त्या व्यासांच्या कृपेने तुम्ही पुराण सांगता. आम्ही यापूर्वी तुमच्या मुखाने अनेक ग्रंथ ऐकले आहेत. आम्ही जे जे प्रश्न विचारले होते त्या सर्वांची उत्तरे तुम्ही दिली आहेत. यापूर्वी तुम्ही जे महात्म्य सांगितली ती ऐकून आम्ही अगदी तृप्त झालो आहोत. आता आम्हाला देवी महात्म्य सांगण्याची कृपा करावी. ओमकार स्वरूप आदिमाया अनंत शक्तीची स्वामिनी आहे. तिने अनंत अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे. आजही करीत आहे.
महाकालीने भगवान विष्णूच्या देहापासून अवतार घेतला व विष्णूच्या हस्ते मधु-कैटभ या दैत्यांचा वध केला. हा देवीचा पहिला अवतार. ती अवतार कथा आम्हाला विस्ताराने सांगा. देवीने आणखी कोणकोणते अवतार घेतले त्या सर्व अवतार कथा आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. श्री व्यासांच्या कृपाप्रसादाने तुम्ही त्रिकालज्ञानी आहात. त्यामुळे तुम्ही हे सर्व सांगू शकाल. त्या नैमिषारण्यात शौनकादि ऋषींनी अशी विनंती केली असता, सूतांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री देवी महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला.
सूत म्हणाले, “आता तुम्ही मला जे विचारले, तेच पूर्वी सर्व ऋषींनी मार्कंडेय ऋषींना विचारले होते. मार्कंडेयांनी सांगितलेली कथा मार्कंडेय पुराणात आली आहे. व्यासांनी ती कथा जशी सांगितली, तशीच मी तुम्हाला सांगतो. ते तुम्ही शांतचित्ताने ऐका. हे देवी महात्म्य अत्यंत पवित्र असून त्याला सप्तशती असे म्हणतात. सातशे महामंत्र असलेले हे महास्तोत्र वेदव्यासांनी सांगितले आहे. या सातशे श्लोकांचे महात्म्य ब्रह्म दिकांनाही कळत नाही. या देवी महात्म्याचे मोठ्या श्रद्धेने जो पठण करील, त्याला चारही पुरुषार्थांची (धर्म-अर्थ-काम-मोक्ष) प्राप्ती होईल. सर्व कामना, इच्छा पूर्ण होतील. जो कोणी निष्काम भावनेने या महात्म्याचे पठण, श्रवण करील त्याला भवानीदेवी मोक्ष देईल. विशेषतः कृष्णचतुर्दशी, कृष्ण अष्टमी किंवा नवरात्रात या देवी महात्म्य ग्रंथपठणाचे फळ फार मोठे आहे. या देवी माहात्म्याचे नित्य पठण केले असता स्वतः देवी ते श्रवण करते. असे वेद एक मुखाने सांगतात, असे पुराणात सांगितले आहे.
ब्रह्मदेवांनी मार्कंडेयाला देवीकवच, अर्गलास्तुती व कीलक सांगितले आहे. त्याचे प्रथम पठण करावे व नंतर देवी महात्म्य सप्तशती वाचावे. हे पठण शक्यतो स्वतः करावे. अशक्य असेल तर ते श्रेष्ठ ब्राह्मणांकरवी पठण करावे. मोठ्या भक्तिभावाने हे महात्म्य पठण करताना जर काही अशुद्ध उच्चार केले तरीसुद्धा देवी संतुष्ट होते हे लक्षात घ्यावे. देवी, भक्तांची भावभक्ती पाहते परंतु अंत:करणात भक्ती,श्रद्धा, प्रेम नसेल तर नुसते शुद्ध पठण व्यर्थ जाते. भक्तीहीन पठण करणार्या वर देवीचा कोप होतो. ब्रम्हा-विष्णू-महेश इत्यादी देवांनी कवचाची रचना केली आहे. त्याच्या केवळ पठणानेही सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होते.
जो भक्त अर्गला स्तुतीचे पठण करतो त्यावर देवी प्रसन्न होते व ते आपल्याला भक्ताला सातशे वर देते. महादेवांनी केलेल्या कीलकाचे जो पठण करतो त्याला सर्व मंत्र विनासायास प्राप्त होतात. स्वतः मार्कंडेय ऋषींनी कवच अर्गलास्तुती व कीलक यांचा जप करून चौदाकल्प आयुष्य मिळवले. (कल्प= ब्रह्मदेवाचा दिवस. सुमारे 432 कोटी सौरवर्ष) एकूण चौदा स्मार्त म्हणजे स्मृतीधर्मवेत्ते होऊन गेले. त्यांची नावे अशी- दुर्वास, विश्वामित्र, ब्रह्मदेव, मार्कंडेय, इंद्र, बाणासुर, नारायण, कार्तिकेय, दधीची, राम, कण्व, भार्गव, बृहस्पती व गौतम हे सर्व शैव होत. या चौदांचे स्मरण केले असता सर्व आधीव्याधी नाहीशी होतात. पार्वतीपती शंकर त्याच्यावर प्रसन्न होतात.
सूत म्हणाले, “ऋषी हो ! मी आता देवीच्या अवताराचे कारण सांगतो ते एकाग्र चित्ताने श्रवण करा. ब्रह्मा, विष्णू व महेश हे देवीचेच पुत्र. त्यांच्यावर संकट आले असता देवी अवतार घेत असे. दुष्टांचा नाश करून अधर्माचा नाश व धर्माची स्थापना करीत असे व आपल्या भक्तांचे रक्षण करीत असे. याविषयी मी आता प्राचीन इतिहास सांगतो. ब्रम्ह कल्पातील चौदा मन्वन्तरातील सूर्यपुत्र सावर्णीमनु हा आठवा मनू. त्याची जन्मकथा सांगतो. देवीच्या कृपेने हा सावर्णीमनू राजा झाला. त्याला ध्रुवासारखे अढळ राज्य मिळाले होते. त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगतो, ती ऐका.
पूर्वी स्वारोचीष मन्वन्तरामध्ये सुरथ नावाचा राजा होऊन गेला. तो उदार, प्रजापालनदक्ष, सत्यवादी, कर्मनिष्ठ, ब्राह्मणांची पूजा करणारा गुरुभक्त, दानशील होता. तो कुणाशीच शत्रुत्व करीत नसे. तो धनुर्वेदात पारंगत होता. तो आपल्या प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे. असे असतानाही क्षत्रिय, राक्षस, यवन यांनी आपली प्रचंड सेना उभारून राजाशी शत्रुत्व सुरू केले. त्यांनी युद्धनीतीची पर्वा न करता अन्यायाने सुरथाचे राज्य घेण्याची तयारी केली.राजा ही आपले सैन्य घेऊन युद्धाला सामोरे गेला. त्याचे शत्रूशी प्रचंड युद्ध झाले. शत्रूचे सैन्य थोडे होते व सुरथाचे सैन्य मोठे होते, पण युद्धात शत्रूचाच जय झाला.
पराभूत झालेला राजा आपल्या नगरात परत आला व राज्य करू लागला. परंतु तेथेही शत्रुपक्षाचे लोक आले. राज्याचे जे मंत्री प्रधान होते, ते शत्रूपक्षाला मिळाले. शत्रूने राजाचे सर्व काही हिरावून घेतले. राजाला अतिशय दुःख झाले. आता काय करावे? कोठे जावे? बाहेर लोकांना तोंड कसे दाखवायचे? येथेच खंदकात लपून बसावे, की पुन्हा युद्ध करावे? दुष्ट बुद्धींच्या मंत्र्यांनी आपल्याला पकडून शत्रूच्या हवाली केले तर आपले काय होईल? असा विचार करून अतिशय खिन्न झालेला तो सुरथ राजा एकटाच घोड्यावर बसून कोणालाही काही कळू न देता नगरातून बाहेर पडला व एका घनदाट अरण्यात शिरला.
त्या अरण्यात तपस्वी मेधा ऋषींचा आश्रम आहे, हे जाणून तो राजा त्या आश्रमाकडे गेला. तो आश्रम पाहून राजाला आनंद झाला. नदीच्या काठावर असलेला तो आश्रम अतिशय रमणीय होता. त्या आश्रमात अनेक हिंस्र प्राणी आपापसातील जन्मजात वैर विसरून मोठ्या आनंदाने एकत्र राहत होते. हंस, कारंडव, मोर कोकीळ इत्यादी पक्षी गोड आवाजात गात होते. अनेक प्रकारच्या पवित्र वृक्षवेलींनी तो आश्रम अधिकच रम्य वाटत होता. आश्रमातील ऋषीमुनी वेदमंत्र म्हणत होते. सर्वजण मेधा ऋषींची सेवा करीत होते. तो आश्रम स्वर्गापेक्षाही सुंदर होता. असा तो आश्रम पाहून सुरथ राजाला अतिशय आनंद झाला.
राजाने मेधा ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याचे यथोचित स्वागत करून त्याची सर्व विचारपूस केली. तेव्हा राजा म्हणाला, “मी सुरथ नावाचा राजा आहे. शत्रूंनी माझा पराभव केला. त्यामुळे राज्य, गृह, पत्नी या सर्वांचा त्याग करून मी आपणास शरण आलो आहे. आपल्या आज्ञेनुसार मी वागेन.” मेधा ऋषी म्हणाले, “राजा, तू कसलीही चिंता करू नकोस. येथे तुझे शत्रू येणार नाहीत. राजा, येथे हिंसा मात्र करावयाची नाही.” मेधा ऋषींनी असे सांगितले असता सुरथ राजा निर्भय होऊन त्या आश्रमात राहू लागला.
एकदा तो राजा आश्रमातील वृक्षाच्या सावलीत बसला असता त्याला आपल्या घरादाराची आठवण झाली आणि तो अतिशय चिंतातुर होऊन विचार करू लागला, शत्रूंनी माझे राज्य हरण केले, त्यामुळे माझे सगळे प्रजाजन अगदी त्रासून गेले असतील. माझे प्रधान सेवक शत्रूच्या अधीन झालेले आहेत. त्या शत्रूंनी द्यूत, मद्य, वेश्या इ. व्यसनात माझी सगळी संपत्ती खर्चून टाकली असेल. ते शत्रू व माझे मंत्री हे पापी असल्यामुळे सत्याने वागत नसतील.” अशाप्रकारे तो राजा चिंता करीत बसला होता.
त्यावेळी एक दुःखीकष्टी झालेला वैश्य तेथे आला. त्याचे नाव समाधी. राजाने त्याची सगळी विचारपूस केली व तू असा दुःखीकष्टी का झाला आहेस, असे विचारले. त्यावर तो वैश्य म्हणाला, “मी वैश्य जातीचा असून माझं नाव समाधी आहे. मी खूप श्रीमंत, धर्मशील, सत्यवादी, सरळ स्वभावाचा असतानाही धनलोभी व दृष्ट असलेल्या माझ्या बायका-मुलांनी व नातलगांनी माझा त्याग केल्यामुळे मी वनात आलो आहे. मी येथे आल्यामुळे माझ्या कुटुंबाची काहीच खुशाली मला समजली नाही. माझ्या कुटुंबाला आता कोणाचाही आधार नाही. माझ्या वियोगाने ते अत्यंत दु:खी, चिंताग्रस्त, शोकाकुल झाले असतील. या काळजीने माझ्या मनाला थोडीही शांती मिळत नाही. माझ्या कुटुंबाला मी कधी बरे पाहीन?”
राजा म्हणाला, “अरे ज्या दुराचारी बायका-मुलांनी तुझा त्याग केला, त्यांना पाहून तुला कसले सुख प्राप्त होणार आहे?” समाधी म्हणाला, “तु म्हणतोस ते खरे आहे. परंतु माझे मन मोह माया सोडत नाही. ज्यांनी मला घालून दिले, माझी सगळी संपत्ती हडप केली, त्यांच्या स्नेहात माझे मन अडकते आहे. या मोहाचे, स्नेहाचे कारण काय हे मला समजत नाही.” मग सुरत राजा व समाधी वैश्य मेधा ऋषी कडे गेले. त्यांनी ऋषींना साष्टांग नमस्कार घातला.
राजा हात जोडून मेधा ऋषींना म्हणाला, “मुनिवर्य, माझ्या मनात एक शंका आहे त्याचे उत्तर आपण द्यावे अशी माझी प्रार्थना आहे. मुनिवर्य, माझे मन अतिशय चंचल आहे. ते क्षणाक्षणाला मला मोहात पाडते. राज्यातील सर्व गोष्टी क्षणिक व नाशवंत आहेत हे माहीत असूनही त्याच्याबद्दलचा मोह सुटत नाही. स्नेह कमी होत नाही, याचे कारण काय? हा मोह निर्माण कसा होतो? माझ्यासारखीच या वैश्याची अवस्था आहे. त्याच्या बायका मुलांनी याचे सगळे धन हरण केले व याला घराबाहेर काढले. पण याला त्याचा मोह सुटत नाही. हा वैश्य आपल्या बायका मुलांविषयी शोक करीत आहे व माझी अवस्थाही अगदी तशीच आहे. आम्ही दोघेही ज्ञानी आहोत, पण मोहपाश तुटत नाही. याचे कारण काय?”
सुरथ राजाने असे विचारले असता ऋषी म्हणाले, “याचे उत्तर पूर्वी मार्कंडेयांनी शिष्यांना सांगितले होते. सूतांनी शोनकादी ऋषींना सांगितले होते. तेच उत्तर आता मी देतो. हे राजा, या सर्वांचे कारण ती भुवनेश्वरीच आहे. सर्व प्राणीमात्रात तिच वास्तव्य करते. सर्व प्राणी मायेने व्याप्त आहेत. पशुपक्षी, नर या सर्वांना विषय ज्ञान असते, प्रत्येकाचे विषय मात्र वेगवेगळे असतात. जे दिवांध प्राणी असतात त्यांना दिवसा काही दिसत नाही, घुबड, वटवाघुळे इ.प्राणी दिवांध आहेत.कावळा इ. प्राण्याच्या रात्री काही दिसत नाही. गर्भापासून जन्मास आलेल्या प्राण्यांना दिवस-रात्र सारख्याच असतात. गाय, घोडा, बैल, कुत्रा यांना दिवस-रात्र सारखेच असते. आहार, निद्रा, भय, मैथुन सर्वांना सारखीच असते. जे ज्ञान मनुष्याला असते ते पशू पक्ष्यांनाही असते. पक्षी अन्नकण आणून आपल्या पिलांच्या तोंडात घालतात. प्रेम, ममता, मोह या गोष्टी सर्वांच्या ठिकाणी असतातच.
आता मोह कशापासून निर्माण होतो, असे विचारले आहेस त्याचे उत्तर मी देतो. महामायेपासून मोह निर्माण झाला. ज्ञानीजनांची अंत:करने ही, ही मोहमाया मोहित करते. ब्रह्मा-विष्णू-महेश हे ज्ञानी असूनही मायामोहित होतात व जगात भ्रमण करीत असतात. हे आदिमाया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामीनी असून हिच्या केवळ इच्छेनेच बद्धलोक मुक्त होतात. ब्रह्मा विष्णू व महेश हे तिचे पुत्र असून तिने त्या तिघांना विश्वाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय हि तीन कार्य नेमून दिली आहेत.
सुरथ राजा म्हणाला, “मुनिवर्य, त्या महामायेची उत्पत्ती कशी झाली? कोणापासून झाली? हे सर्व ऐकण्याची इच्छा आहे. हे सर्व सविस्तर सांगण्याची कृपा करावी.” सुरथ राजाने असे विचारले असता ते म्हणाले, “राजा, खरे पाहता ती महामाया देवी नित्यस्वरुप आहे. तिला जन्म, मरण काहीच नाही. तिने संपूर्ण विश्वाेला व्यापले असून, तिच्या इच्छेनेच जगाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय होतो. ती अनेक रूपांनी प्रकट होत असते. ती नित्य आहे. तिला जन्म नाही, पण वेळोवेळी ती देवकार्यासाठी उत्पन्न होते, म्हणून लोक तिला देवी उत्पन्न झाली असे म्हणतात. ती केवळ इच्छेनेच सर्वांचा संहार करते. तिच्या गुणांचे जे श्रवण,पठण करतात त्यांचा उद्धार होतो. ती श्रीहरीची योगनिद्रा आहे.
पूर्वी त्रैलोक्याचा लय होऊन सर्व विश्व जलमय झाले. देवाधिदेव नारायण शेषशैयेवर निद्रस्थ झाले होते. तेव्हा त्यांच्या कानातील मळापासून मधु – कैटभ नावाचे दोन दैत्य निर्माण झाले. ते दैत्य महाभयंकर होते. त्यांचे सामर्थ्य अफाट होते. ब्रह्मदेवाला पाहताच ते त्यांना ठार मारण्यासाठी धावून गेले. ब्रम्हदेव विश्वाचा निर्माता! श्रीहरीच्या नाभीकमलावर त्यांचे वास्तव्य! मधु-कैटभ दैत्यांना पाहताच ते भयभीत झाले. आपले रक्षण करावे म्हणून त्यांनी श्रीहरी विष्णूचा धावा केला. पण विष्णू योगनिद्रेत होते. काही केल्या ते जागे होईना. आता काय करावे? कोणाला शरण जावे? आता आपले रक्षण कोण करणार? अशा विचाराने काळजीत पडलेले ब्रम्हदेव विचार करू लागले.
ज्या योगनिद्रेने विष्णूला निद्रस्त केले आहे, ती योगनिद्राच विष्णूची स्वामिनी आहे. म्हणून त्या योगनिद्रेचे, आदिशक्तीचे स्तवन करावे म्हणजे ते विष्णू निद्रामुक्त होऊन या दैत्यांशी युद्ध करतील. असा विचार करून ब्रह्मदेवाने योगनिद्रेचे स्तवन केले. ब्रह्मदेव म्हणाले, “हे देवी, जगदंबे, तुला माझा नमस्कार असो. तूच स्वाहा, स्वधा, वषटकार आहेस. सर्व स्वर तूच आहेस. तूच जीवनदायी सुधा(अमृत) आहेस. हे देवी तू ओमकार स्वरूप आहेस. तूच ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवांना धारण करतेस, म्हणून तुला त्रिधा असे म्हणतात.
हे देवी, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती तूच आहेस. तूच या विश्वाला धारण केले आहेस. हे देवी, तूच या विश्वाला निर्माण करतेस. त्याचे पालन करतेस व शेवटी तूच या विश्वाचा संहार करतेस. हि तिन्ही रुपे तुझीच आहेत. हे देवी, किर्ती, मती, दृति, कांती, श्रद्धा,रती या रूपांनी तूच सर्वांच्या ठिकाणी वास्तव्य करतेस. हे माते, तूच काळरात्री, महारात्री, मोहरात्री आहेस. तूच शोभा, लज्जा,बुद्धी, तुष्टी, पुष्टी, शांती, आहेस. माते तू खडगधारिणी, शूलधारिणी, घोररुपा आहेस. तू गदा, चक्र, शंख व धनुष्य धारण केले आहेस. बाण, भुशुंडी व परीघ ही तुझी अस्त्रे आहेत. तू सोम्य, सौम्यतर, सर्वाधिक सुंदर आहेस. तू परात्पर परमेश्वरी आहेस. सगळे स्थावर-जंगम विश्व तूच आहेस.
पंचमहाभूते, शक्ती, काळ तुझ्या सत्तेने चालतात. सत्-असत् ज्या काही वस्तू आहेत, त्यांची शक्ती तूच आहेस. माते, या विश्वाला निर्माण करणारा जो नारायण, त्यालाही तु निद्राधीन केले आहेस. अशा तुझे स्तवन करण्यास कोण बरे समर्थ आहे? ब्रह्मा विष्णू महेश यांना तु शरीरधारी केलेस, ते सुद्धा तुझे चरित्र जाणण्यास असमर्थ आहेत. कारण तुझे महात्म्य वर्णन करणे खरोखरच दुर्घट आहे. असे असतानाही मी तुझे यथाशक्ती स्तवन केले आहे. हे देवी, मधू आणि कैटभ हे जे दोन भयंकर दैत्य आहेत, त्यांना तू मोहित कर व या दोन दैत्यांच्या वधासाठी श्रीहरीला जागे कर व त्यांच्या ठिकाणी त्या दैत्यांचा वध करण्याची बुद्धी निर्माण कर.”
मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, “हे राजा, मधु आणि कैटभ या दोन दैत्याच्या वधासाठी भगवान विष्णूला जागे करावे यासाठी ब्रह्मदेवाने तमोगुणी देवीचे चौदा श्लोकी रात्रीसूक्ताने स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेली देवी विष्णूच्या देहापासून दूर झाली. तिने ब्रह्मदेवाला दर्शन दिले. भगवान विष्णू जागे होताच ते मधु कैटभ दैत्य ब्रह्मदेवाला ठार मारण्यास धावून गेले. घाबरलेल्या ब्रह्मदेवाने देवीकडे पाहून तिचे ध्यान केले. त्या देवीला दहा हात, दहा पाय व दहा मुखे होती. तिचे डोळे काजळा सारखे काळे होते. त्या महाकालीने कपाळावर कुंकुमतिलक लावलेला होता. तिचे स्वरूप अतिभयंकर होते. तिच्या दाही हातात खड्ग, बाण, गदा, शूळ, चक्र, शंख, भुशुंडी, परीघ, धनुष्य हि शस्त्रे होती. दहाव्या हातात रक्त गळत असलेले मुंडके होते. अशा देवीची जो पूजा करतो त्याला ती अवघे त्रैलोक्य देते.
ते मधु कैटभ दैत्य ब्रह्मदेवावर धावून गेले. तेव्हा भगवान विष्णू त्यांच्याशी युद्ध करू लागले. ते परस्परांवर अनेक शस्त्रप्रहार करीत होते. बाहूप्रहार, मुष्टीप्रहार, लत्ताप्रहार करीत होते. अशा प्रकारे मधु कैटभ आणि विष्णू यांचे पाच हजार वर्षे घनघोर युद्ध चालू होते. मदोन्मत्त असे ते दैत्य काही केल्या हार जात नव्हते. मग महामायेने त्या दैत्यांना मोहित केले. महामायेने मोहित केलेले ते दैत्य विष्णूला म्हणाले, “हे विष्णू, आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहोत. तुला हवा असेल तो वर माग.”
भगवान विष्णू म्हणाले, “हे दैत्यानो, तुम्ही जर माझ्यावर संतुष्ट झाला असाल तर माझ्या हातून तुमचा वध व्हावा. मला आणखी दुसरा वर नको.” दैत्य म्हणाले, “तू निर्जल प्रदेशावर आमचा वध केलास तरच आम्ही मारले जाऊ.” विष्णू म्हणाले, “दैत्यानो, मी विशाल व निर्जल प्रदेशावर तुमचा वध करतो.” असे सांगून विष्णूंनी आपल्या मांड्या विशाल करून जलावर निर्जल प्रदेश निर्माण केला. मग त्या दोघा दैत्यांना आपल्या मांडीवर घेऊन विष्णूने आपल्या चक्राने त्यांची मस्तके तोडली व त्यांना ठार मारले. मधु दैत्याला ठार मारले म्हणून विष्णूला ‘मधुसूदन’ व कैटभाला ठार मारले म्हणून ‘कैटभारी’ असे म्हणतात.
अशाप्रकारे ब्रम्हदेवाच्या स्तवनाने महाकाली प्रकट झाली. हा देवीचा पहिला अवतार. हे महाकालीचे आख्यान जे भक्तिभावाने पठण,श्रवण करतात त्यांची सर्व संकटे नाहीसे होतात. सर्व बांधाचे निरसन होते. यात तिळमात्र शंका नाही.
श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वन्तरातील श्री देवी भगवती महात्म्यतील श्री महाकाली चरित्र वर्णन व मधु कैटभ वध नावाचा पहिला अध्याय समाप्त.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.