Subscribe Us

श्री देवी महात्म्य मराठी ( कथा-२) / Shri Devi Mahatmya Katha 2

  श्री देवी महात्म्य मराठी

Shri Devi Mahatmya Marathi 

 अध्याय दुसरा 

मेधा ऋषी सुरथला, मार्कंडेय शिष्याला व सूत शौनकादिक ऋषींना देवी महात्म्य सांगतात.

 महिषासुराच्या सेनेचा वध 


      कमलासनावर बसलेल्या प्रसन्नमुखी महिषासुरमर्दिनी भगवती महालक्ष्मीची मी आराधना करतो. तिने आपल्या हातांत अक्षमाला, परशु, गदा, बाण, वज्र, कमळ, धनुष्य, कमंडलू, दंड, शक्ती, खड्ग, ढाल, शंख, घंटा, पानपात्र, शूल, पाश व चक्र धारण केले आहे.

          श्रीगणेशाय नमः । श्री देव्यै नमः ॥

                  मेधा ऋषी सुरथला, मार्कंडेय शिष्याला व सूत शौनका दिक ऋषींना देवी महात्म्य सांगतात. सूत म्हणाले, “आता मी महालक्ष्मीची अवतार कथा सांगतो. ही पवित्र कथा एकग्र चिंतेने श्रवण करा. महालक्ष्मी ही देवीचा दुसरा अवतार. श्री महाविष्णु नारायण हा सर्वांचा मूळ पुरुष. त्यांच्या नाभिकमलातून चतुरानन ब्रह्मदेव जन्मास आले. ब्रह्मदेवाला एकून दहा पुत्र त्यांची नावे अशी मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्ती, पुलह, ऋतू, भृगू, वशिष्ठ, नारद व दक्ष. मरिची पासून कश्यप यांचा जन्म झाला. कश्यपापासून हिरण्याकशिपू याचा जन्म झाला. अनुराध हा प्रल्हादाचा भाऊ. हा अनुराध अत्यंत उन्मत्त होता. हा एका महिषीच्या ठिकाणी रत झाला. तिच्यापासून जो पुत्र जन्मास आला तोच प्रसिद्ध महिषासुर. “तू अजिंक्य होशील” असा त्याला वर मिळाला होता. त्यामुळे उन्मत्त झालेल्या त्या महिषासुराने असूरसेना जमा करून देवांशी युद्ध सुरू केले. ते देवासुर युद्ध शंभर वर्षे चालू होते. 

               महिषासुराने देवांना अगदी त्राहीभगवान करून सोडले. इंद्राने युद्धातून पळ काढला. महिषासुराने इंद्राचा ऐरावत हिरावून घेतला. मग तो स्वतःच स्वर्गाचा राजा इंद्र झाला. अष्टदिक्पाल दशदिशांना पळून गेले. तो महिषासुर नानारूपे धारण करून स्वतःच दिक्पाल झाला. तो चंद्र, सूर्य, अग्नी होऊन पृथ्वीवर प्रकाश पाडू लागला. तो मेघ बनून पाऊस पाडू लागला. सगळे दिक्पाल लपून बसले. महिषासुराला इंद्रपद प्राप्त झाले. देवांचे सगळे ऐश्वर्य लयाला गेले. त्या सगळ्यांना अगदी दैन्यावस्था प्राप्त झाली. पराभूत झालेले सगळे देव ब्रह्मदेवाला शरण गेले. परंतु ब्रह्मदेवाला काहीही उपाय सूचेना. मग सगळे देव ब्रह्मदेवाला पुढे घालून महादेव व विष्णू यांच्याकडे गेले. त्यांनी हरिहरांना वंदन करून त्यांना महिषासुराची सगळी हकिकत सांगितली. महिषासुराने देवांचे सगळे अधिकार हिरावून घेतले आहेत. त्यामुळे अत्यंत दीन दुबळे झालेले सर्व देव मृत्युलोकात भटकत असल्याचे सांगून आता आपणच त्या दैत्याचा वध करावा असे सांगू लागले. 

              सर्व देवांनी आपले दुःख सांगितले असता हरिहर कृतांताप्रमाणे खवळले. क्रुध्द झालेल्या विष्णूच्या मुखातून महातेज बाहेर पडले. ब्रह्मदेव शंकर व इतर सर्व यांच्याही मुखांतून भयंकर तेज बाहेर पडले. ते सर्वांचे तेज एकत्र मिळाले, त्यामुळे ते पेटलेल्या पर्वतासारखे दिसू लागले. त्या तेजाने दशदिशा व्यापून गेल्या. ते तेज कुणाच्याही डोळ्यांना सहन होईना. त्या तेजातून एक स्त्री प्रकट झाली. तीच अवघ्या त्रैलोक्याची जननी जगदंबा अंबा भवानी. तीच हरिहरांची जननी. आपल्या भक्तांच्या कार्यासाठी, त्यांचे संकट नाहीसे करण्यासाठी तिने अवतार घेतला, असे वेदांनीही म्हटले आहे. 

                 शंकराच्या तेजापासून त्या देवीचे मुख निर्माण झाले. यमाच्या तेजापासून तिच्या ठिकाणी केस  निर्माण झाले. विष्णूच्या तेजापासून हात निर्माण झाले. चंद्राच्या तेजापासून दोन स्तन, इंद्राच्या तेजापासून कटीप्रदेश निर्माण झाला. वरुणाच्या तेजापासून मांड्या व पोटऱ्या, त्याचप्रमाणे पृथ्वीच्या तेजापासून नितंब निर्माण झाले. ब्रह्मदेवाच्या तेजापासून दोन पाय व सूर्याच्या तेजापासून पायांची बोटे प्रकट झाली. वसूंच्या तेजापासून हातांची बोटे व कुबेराच्या तेजापासून नासिका प्रकट झाली. प्रजापतीच्या तेजापासून त्या देवीचे दात व अग्नीच्या तेजापासून तीन नेत्र प्रकट झाले. संध्येच्या तेजापासून भुवया व वायूच्या तेजापासून कान प्रकट झाले. अशा रीतीने सर्व देव देवतांच्या तेजापासून कल्याणमयी देवी प्रकट झाली. 

                 सर्व देव देवतांच्या तेजापासून प्रकट झालेल्या देवीला पाहून महिषासुराच्या छळाने त्रासलेल्या सर्व देव देवतांना अतिशय आनंद झाला. मग दैत्याच्या वधासाठी भगवान शंकरांनी आपल्या शूळापासून एक शूळ काढून तो देवीला दिला. विष्णुंनी आपल्या सुदर्शन चक्रपासून एक चक्र निर्माण करून ते भगवती देवीला अर्पण केले. वरुणाने तिला शंख दिला, अग्नीने शक्ती दिली, वायूने एक धनुष्य व बाणांनी भरलेले दोन भाते दिले. देवराज इंद्राने आपल्या वज्रापासून निर्माण केलेले वज्र दिले. त्याचप्रमाणे ऎरावताच्या गळ्यातील एक घंटा देवीला दिली. यमाने कालदंड दिला. वरुणाने पाश, प्रजापतीने स्फटिकमाला दिली. ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. सूर्याने देवीच्या रोमारोमात आपले तेज भरले. काळाने तेजस्वी ढाल व तलवार दिली. क्षीरसागराने तेजस्वी रत्नहार व कधीही जीर्ण न होणारी दोन दिव्य वस्त्रे दिली. 

                 त्याचप्रमाणे त्याने देवीला दिव्य चूडामणी, दोन कर्णभूषणे, कडे तेजस्वी अर्धचंद्र, सर्व हातांसाठी बाजूबंद, दोन्ही पायांसाठी पैंजण, कंठभूषण व सर्व बोटात घालण्यासाठी रत्नजडित अंग्ठ्याही दिल्या. विश्वकर्माने तिला एक तेजस्वी परशू दिला. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची अस्त्रे, अभेद्य कवच, मस्तकावर व छातीवर धारण करण्यासाठी कधीही न कोमेजणाऱ्या कमळाचे हार दिले. सागराने तिला सुंदर कमळ दिले. हिमालयाने तिला वाहन म्हणून सिंह व अनेक प्रकारची रत्ने दिली. कुबेराने देवीला पानपत्र दिले. शेषनागाने बहुमोल असा रत्नजडीत नागहार दिला. 

                  अशाप्रकारे सर्व देवतांनी अनेक अलंकार, शस्त्रास्त्रे देऊन देवीचा मोठा सत्कार केला. मग देवीने प्रचंड गर्जना केली. त्या भयंकर आवाजाने आकाश दुमदुमले. सगळे आकाश कोसळते की काय, असे सर्वांना वाटू लागले. त्या आवाजाने त्रैलोक्याचा थरकाप उडाला. समुद्राला उधाण आले. पृथ्वी डळमळू लागली. पर्वत हलू लागले. त्यावेळी सर्व देव देवतांनी मोठ्या आनंदाने सिंहारूढ भगवती देवीचा जयजयकार केला. जयोस्तु अंबे। जयोस्तु अंबे। असे सगळीकडे शब्द उमटले. ऋषीमुनींनी मोठ्या भक्तीभावाने देवीचे स्तवन केले. 

                 अवघे त्रैलोक्य प्रक्षुब्ध झालेले पाहून सर्व असुर कवच, टोप धारण करून एकत्र जमले. हाती शस्त्र घेऊन ते युध्दासाठी सज्ज झाले. अतिशय क्रुद्ध झालेला महीषासुर हे काय चालले आहे? अशी गर्जना करू लागला. कोटी कोटी असूर महिषासुराकडे धावत गेले. अवघे ब्रह्मांड गडबडले. आकाश कडाडले. सगळे असुर धावा धावा असे ओरडू लागले. जिकडून सिंहनाद ऐकू येत होता त्या दिशेने महिषासूर धावत गेला. देवीच्या तेजाने अवघे विश्व व्यापले होते. देवीने पृथ्वीवर पाय ठेवताच ती डळमळू लागली. तिचा मुकुट आकाशाला भिडला होता. तिच्या धनुष्याच्या टणत्काराने सप्तपाताळे क्षुब्ध झाली होती. देवी आपल्या हजारो हातांनी सर्व दिशांना झाकून उभी होती. 

               एकाएकी देवी आणि दैत्य यांचे घनघोर युद्ध सुरू झाले. अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या आघातांनी निर्माण झालेल्या तेजाने सगळे आकाश भरून गेले. महिषासुराचे सेनापती शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन देवीशी युद्ध करण्यासाठी धावले. चिक्षुर नावाचा एक मोठा असुर महिषासुराचा सेनापती होता.तो देवीशी मोठ्या त्वेषाने युद्ध करू लागला. चामर नावाचा आणखी एक सेनापती दैत्यांची चतुरंग सेना घेऊन युद्ध करू लागला. उदग्र नावाचा महादैत्य साठ हजार रथींसह देवीशी निकराचे युद्ध करू लागला. महाहनु नावाचा दैत्य एक कोटी रथींना बरोबर घेऊन युद्धाला प्रवृत्त झाला. असिलोमा नावाचा महादैत्य एक कोटी रथींना बरोबर घेऊन झुंज देऊ लागला. बाष्कल नावाचा दैत्य साठ लाख सेनेसह युद्धाला आला. परिवारित नावाचा दैत्य अगणित हत्तीस्वार, घोडेस्वार व रथी यांना घेऊन युद्ध करू लागला. बिडाल नावाचा दैत्य अगणित सेना घेऊन युद्धाला सरसावला. 

               अशाप्रकारे कोटीकोटी रथ, हत्ती, घोडे, पायदळ घेऊन महिषासुर देवीशी मोठ्या त्वेषाने लढू लागला. दैत्याने देवीवर असंख्य खडगे,परशु,पट्टीश,पाश फेकले. परंतु देवीने आपल्या शस्त्राने दैत्यांचे सर्व शस्त्रे तोडून टाकले. अत्यंत क्रोधाने युद्ध करीत असलेल्या चंडिका देवीच्या मुखावर थकवा किंवा श्रम काहीच दिसत नव्हते. देवता आणि ऋषीमुनी देवीचे स्तवन करीत होते व भगवती देवी दैत्यांवर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करीत होती. देवीचे वाहन असलेला सिंह अत्यंत क्रोधाने असुर सेनेत घुसून त्यांना सपासप ठार मारीत होता. अग्नी जसा गवत जाळून टाकतो, त्याप्रमाणे तो सिंह असुर सेनेचा फडशा पाडत होता. 

                  रणभूमीवर असुरांशी युद्ध करीत असलेल्या देवीच्या प्रत्येक नि:श्वासातून असंख्य सेना गण निर्माण होत होते. ते अनेक शस्त्रास्त्रांनी असुरांशी युद्ध करीत होते. ते नगारे वाजत होते. शंखध्वनी काढीत होते. देवीने त्रिशूळ, गदा, शक्ती, खडग इत्यादींनी हजारो महादैत्यांचा संहार केला. कित्येक असुर घंटेच्या भयंकर आवाजाने बेशुद्ध पडून ठार झाले. देवीने अनेक असुरांना पाशाने बांधून जमिनीवर आपटून ठार मारले. अनेक असुरांचे देवीच्या तलवारीने तुकडे तुकडे झाले. असंख्य असुरांचा देवीच्या गदाघाताने चेंदामेंदा झाला. कित्येक असुर देवीच्या मुसळाच्या तडाख्याने रक्त ओकून मेले. कित्येकांचे पाय तुटले, डोके फुटले, मुंडके तुटले.

                मुंडके तुटून पडलेले दैत्य तशाही स्थितीत हातात शस्त्रे घेऊन युद्ध करीत होते. त्यावेळी रणवाद्य दणाणत होते. “थांब, थांब” अशी गर्जना करीत दैत्य देवीला युद्धाचे आव्हान देत होते. त्या युद्धात असंख्य असुर ठार झाले. हत्ती, घोडे, रथ सगळे काही नष्ट झाले. त्यामुळे पृथ्वीवर पाय ठेवायला जागा नव्हती. जिकडे तिकडे असुरांचे प्रेते पडली होती. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या होत्या. त्यातूनच दैत्याची प्रेते वाहून जात होती. बघता बघता देवीने असुरांचा पूर्ण संहार केला. देवगण देखील स्तवन करू लागले. आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी सुरू झाली. 

                 अशा प्रकारे असुर सेनेच्या वधासाठी महालक्ष्मी प्रकट झाली. आदिशक्तीचा हा दुसरा अवतार समजावा. देवीच्या या चरित्र श्रवणाने सर्व संकटे नाहीशी होतात. सर्व बाधांचे निरसन होते. सर्व मनोरथ सिद्धीस जातात. सप्तशतीत जे सांगितले आहे, तेच येथे वर्णिले आहे. सर्व कर्ती करविती ती आदिमाया शक्ती जगदंबा, तिने जसे बोलविले आहे तसे वर्णन केले. त्या जगदंबेला नमस्कार! 

श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील महिषासुर सेना वध नावाचा दुसरा अध्याय समाप्त!  

अध्याय पहिला⬅️

➡️अध्याय तिसरा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या