श्री देवी महात्म्य मराठी
Shri Devi Mahatmya Marathi
अध्याय तिसरा
( मेधा ऋषी सुरथ राजाला देवीच्या अवताराचा इतिहास सांगू लागले )
महिषासुर वध
जिची अंगकांती उदयकालच्या सहस्त्र सूर्यासमान आहे, जिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, जिच्या गळ्यात मुंडमाला शोभून दिसते आहे, जिने दोन्ही स्तनांवर रक्तचंदन लावले आहे, जिने आपल्या हातात जपमाळा, विद्या, अभय व वर नावाच्या मुद्रा धारण केल्या आहेत, तीन नेत्राने सुशोभित असे जिचे मुखकमल शोभून दिसते आहे, जिने आपल्या मस्तकावर चंद्राबरोबरच रत्नमुकुट धारण केला आहे, जी कमलासनावर विराजमान झाली आहे त्या जगदंबा भगवती देवीला आम्ही नमस्कार करतो.
|| श्री गणेशाय नमः || श्री देव्यै नम: ||
मेधा ऋषी सुरथ राजाला देवीच्या अवताराचा इतिहास सांगू लागले. देवीने महिषासुराच्या सैन्याचा नाश केला, हे पाहून अत्यंत झालेला क्रुद्ध झालेला चिक्षुर नावाचा सेनापती देवीशी युद्ध करण्यासाठी धावून आला. चिक्षुर आणि देवी यांचे भयंकर युद्ध सुरू झाले. चिक्षुराने देवीवर बाणांचा वर्षाव सुरू केला. मेरू शिखरावर मेघांनी जलवृष्टी करावी त्याप्रमाणे तो असूर देवीवर बाण वर्षाव करु लागला. परंतु देवीने ते सर्व बाण तोडून टाकले. देवीने बाणांचा वर्षाव करून त्याचे घोडे व सारथी यांना ठार मारले. त्याच्या रथाचे तुकडे-तुकडे केले. त्याचा ध्वज उडवून लावला. त्याचे धनुष्य मोडून टाकले. त्या चिक्षुराच्या शरीरावर बाणांचा वर्षाव करून त्याला अगदी जर्जर केले.
धनुष्य, रथ, घोडे व सारथी नष्ट झाले असता तो चिक्षुर दैत्य ढाल, तलवार घेऊन युध्दासाठी धावून आला. त्याने धारदार तलवारीने सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला व देवीच्या डाव्या हातावर अत्यंत त्वेषाने प्रहार केला. परंतु त्याच क्षणी त्याच्या तलवारीचे तुकडे तुकडे झाले. त्यामुळे अधिकच संतापलेल्या त्या असुराने हातात शूल घेतला व भद्रकाली देवीवर फेकला. आकाशातून देवीवर कोसळणारा तो शूल सूर्यासारखा प्रज्वलित दिसत होता. तो शूल आपल्या रोखाने येत आहे असे दिसताच देवीनेही शूल फेकला व असुराच्या त्या शुलाचे मधल्यामध्ये तुकडे-तुकडे केले. त्याच वेळी त्या चिक्षुर महादैत्याच्या शरीराचे तुकडेतुकडे झाले.
महापराक्रमी चिक्षुराचा वध होताच देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी देवीचा जयजयकार केला. तिच्यावर पुष्पवृष्टी केली. ऋषी, मुनी, देव, गंधर्व, सिद्ध, चारण ‘जय अंबिके! जय देवी!’ असा जयघोष करू लागले. महिषासुराचा सेनापती चिक्षुर ठार होताच देवांना अतिशय पीडा देणारा चामर हत्तीवर आरूढ होऊन युद्धासाठी आला. त्याने देवीवर शक्तीचा प्रहार केला, परंतु देवीने नुसत्या हुंकारानेच ती शक्ती निष्प्रभ करून ती शक्ती जमिनीवर पाडली. शक्ती नष्ट होताच खवळलेल्या चामराने देवीवर शूल फेकला. देवीने आपल्या एकाच बाणाने त्या शुलाचा चुराडा केला.
त्याच वेळी देवीच्या सिंहाने चामराच्या हत्तीच्या मस्तकावर झेप घेतली व त्या दैत्याशी युद्ध सुरू केले. सिंह आणि दैत्य युद्ध करता करता हत्तीवरून खाली आले. दोघांचे प्रचंड युद्ध सुरू झाले. ते एकमेकांवर जोरदार प्रहार करीत होते. मग सिंहाने आकाशात झेप घेतली व खाली येतात त्या दैत्याचे मुंडके धडावेगळे केले. मग देवीने वृक्षपाषाण फेकून उदग्र नावाच्या दैत्याला स्वर्गाची वाट दाखवली. मुष्टी प्रहाराने कराल नावाच्या दैत्याला ठार केले.क्रोधाने बेभान झालेल्या देवीने आपल्या गदाप्रहाराने बाष्कलाचा चेंदामेंदा केला. ताम्र आणि अंधक या दैत्यांना बाण मारून जमिनीवर झोपविले. त्रिनेत्र भगवतीने आपल्या त्रिशुळाने उग्रास्य, उग्रवीर्य व महाहनु या दैत्यांची मस्तके आकाशात उडवली. तिने तलवारीचा प्रहार करून बीडालाचे मुंडके धडावेगळे केले. दुर्धर व दुर्मुख यांना बाण मारून त्यांना यमलोकाची वाट दाखवली.
असुर सैन्यात हाहाकार उडाला. यक्ष, किन्नर, गंधर्व आनंदाने देवीची स्तुती करू लागले. सिंहाने अनेक असुरांना ठार मारले, ही हकिकत ऐकून महिषासुर चिंताक्रांत झाला. आपल्या असुरसेनेचा संहार होत असलेला पाहून क्रुद्ध झालेल्या महिषासुर रेड्याचे (महिषाचे) रूप धारण करून देवीच्या सैनिकांना पीडा देऊ लागला. त्याने आपल्या तोंडाच्या प्रहाराने अनेक गणांना ठार मारले. कित्येकांना पायाखाली तुडवून ठार केले. त्याने आपल्या शेपटीने अनेकांना झोडपून काढले. आपल्या शिंगाच्या प्रहाराने अनेकांना फाडून ठार मारले. त्याच्या नुसत्या गर्जनेने अनेक गण गतप्राण झाले. तो रणांगणावर थैमान घालत होता. त्यामुळे अनेक गण जमिनीवर कोसळून मरण पावले. त्याच्याने नि:श्वासाने अनेकजण आकाशात उडाले व जमिनीवर मरून पडले.
मग त्या महिषाने देवीच्या सिंहासनावर हल्ला केला. त्यामुळे देवी अत्यंत क्रुद्ध झाली. मग तो महिष आपल्या पायांनी पृथ्वी उकरू लागला. त्याने आपल्या शिंगांनी मोठ-मोठी पर्वतशिखरे आकाशात उडवली. तो भयंकर गर्जना करीत होता, त्याच्या वेगाने पृथ्वी फाटू लागली. त्याच्या शेपटीच्या प्रहाराने सप्तसागर क्षुब्ध झाले. त्याच्या शिंगांच्या प्रहाराने आकाशातील मेघांचे तुकडे तुकडे झाले. त्याच्या नि:श्वासाने मोठमोठे पर्वत आकाशात उडाले. अशाप्रकारे त्या महिषाने पृथ्वीवर हल्लकल्लोळ माजवला.
क्रोधाने बेभान झालेला तो महिष देवीला ठार मारण्यासाठी तिच्यावर धावून गेला. ते पाहून कोपलेल्या देवीने महिषासुरावर पाश टाकून त्याला जखडून टाकले. त्या क्षणी त्याने रेड्याचे रूप टाकून सिंहाचे रूप धारण केले. देवीने त्या सिंहाचे मस्तक तोडण्यासाठी हाती खड्ग घेतले, त्याच क्षणी महिषासुराने सिंहाचे रूप टाकून मनुष्यरूप धारण केले. तो खड्ग, चर्म घेऊन युद्ध करू लागला. देवीने त्याला ठार मारण्यासाठी धनुष्याला बाण लावला तेव्हा महिषासुराने हत्तीचे रूप धारण केले. तो आपल्या सोंडेने सिंहाला खेचू लागला. तेव्हा देवीने त्याच्यावर खड्ग फेकून त्याची सोंड तोडून टाकली. मग तो महिषासुर पुन्हा रेड्याचे रूप घेऊन सगळीकडे थैमान घालू लागला.
क्रोधाने बेभान झालेल्या जगनमाता चण्डिकेने भरपूर मधुपान केले. त्यामुळे तिचे डोळे क्रोधाने लालेलाल झाले. ती मोठमोठ्याने हसू लागली. तिकडे बळाने व पराक्रमाने उन्मत्त झालेला महिषासुर गर्जना करू लागला व आपल्या शिंगांनी पर्वत उखडून ते देवीवर फेकू लागला. देवीने आपल्या बाणांनी त्या पर्वतांचे पीठ करून टाकले. मधुपानाने डोळे लाल झालेली देवी मोठमोठ्याने हसत महिषासुराला म्हणाली, “हे मूर्खा, गर्व न करता रणात उभा राहा. मी मधुपान करून आजच तुला ठार मारते. तुला ठार मारल्यावर ऋषी, मुनी, देव आनंदाने गर्जना करतील.”
मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, “राजा, देवीने त्या महिषासुराला असे बोलून पुन्हा भरपूर मधुपान केले. मग ती हाती शूल घेऊन महिषासुरावर धावून गेली. तिने महिषासुराला पकडून त्याला पायाखाली चेपले व त्याच्या मानेवर शूलप्रहार केला. तशाही परिस्थितीत तो महिषासुर आपल्या मुखापासून घाईघाईने बाहेर पडू लागला. देवीला लाथा मारीत मोठ्याने हसू लागला. मग देवीने त्याला मोहित करून आपल्या खड्गाने त्याचे मस्तक तोडले. महिषासुर जमिनीवर मरून पडला. त्याच्या कंठनळातून भळाभळा रक्त वाहू लागले. महिषासुराचा वध होताच असुर सैन्यात हाहाकार झाला. उरलेसुरले असुर जिवाच्या आकांताने वाट फुटेल तिकडे पळत सुटले. कित्येक जण पाताळ लोकात गेले.
देव सैन्यात जयजयकार सुरु झाला. जय वाद्ये वाजू लागली. आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी होऊ लागली. महर्षीसह सर्व देव दुर्गा मातेचे स्तवन करू लागले. गंधर्व, किन्नर गाऊ लागले. अप्सरांनी नृत्य सुरू केले. महिषासुरादी दैत्याचा नाश झाल्याने देव,मुनी,मानव,संतसज्जन यांना अतिशय आनंद झाला. हे महालक्ष्मीचे आख्यान जे श्रवण पठन करतील, त्यांना सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होईल.
श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील महिषासुर वध नावाचा तिसरा अध्याय समाप्त!
➡️ चौथा अध्याय

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.