Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय ५९ || shri ganesh puran kathasar adhyay 59

।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- ५९ 

२१. संकष्टी चतुर्थी व्रतमाहात्म्य, कृतवीर्यास पुत्रप्राप्ती



               इंद्र म्हणाला, "शूरसेना, प्राचीन काळी कृतवीर्य नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला. तो सर्वगुणसंपन्न व सुशील होता. सुगंधा ही त्याची पत्नी. ती प्रेमळ स्वभावाची पतिव्रता स्त्री होती. या राजाला यश, कीर्ती, ऐश्वर्य यांपैकी कसलीच कमतरता नव्हती. पण पुत्रसंतान नसल्यामुळे हे राजदांपत्य नेहमी दुःखी असे. संततिप्राप्तीसाठी त्या उभयतानी अनेक उपचार केले, व्रतवैकल्यादी उपाय केले, पण काहीही उपयोग झाला नाही. पुढे कृतवीर्याला सुखोपभोगातही रुची राहिली नाही. कंटाळलेल्या त्या राजाने राज्याची धुरा प्रधानांकडे सोपविली आणि सुगंधा राणीला बरोबर घेऊन तो अरण्यात निघून गेला. ते दोघे तेथे वायू भक्षण करून आणि झाडावरची गळून पडलेली पाने खाऊन दृढतेने तपश्चर्या करू लागले. त्यामुळे त्यांची शरीरे सुकून गेली. ते दोघे मरणासन्न दिसू लागले.

                      कृतवीर्य व सुगंधा यांची अवस्था पाहून नारदांना दया आली. ते त्वरेने स्वर्गलोकी गेले. तेथे त्यांनी कृतवीर्याच्या पित्याची भेट घेतली. त्याला सर्व हकिकत सांगितली. ते पुढे म्हणाले, "राजा, पुत्रसंतान नसल्यामुळे तुझा पुत्र आणि सून व्यथित आहेत. खडतर तपश्चर्येने ते दोघे मरणोन्मुख अवस्थेत आहेत. त्यांना पुत्रलाभ व्हावा म्हणून तूच काहीतरी प्रयत्न कर. त्यायोगे त्यांचाही जीव वाचेल आणि तुलाही गती मिळेल."
त्यानंतर नारद यमलोकी गेले. तेथे भृशुंडी ऋषीचे मातापिता असह्य नरकयातना भोगत असल्याचे दिसले. त्यांची अवस्था पाहून नारदांना अतिशय वाईट वाटले. ते त्वरेने भृशुंडीच्या आश्रमात गेले. त्याला यमलोकीचा सर्वं वृत्तान्त सांगितला. आपले पितर दुःख भोगीत आहेत याचे त्यालाही वाईट वाटले. मग त्याने उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेतले आणि म्हणाला, "हे गजानना, तुझी माझ्यावर नेहमीच कृपादृष्टी राहिली आहे. माझी मातापितरे नरकामध्ये खितपत पडली आहेत. त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना स्वर्गलोकी जाता यावे म्हणून मी संकष्टी चतुर्थी व्रताच्या एका दिवसाच्या व्रताचे पुण्य अर्पण करीत आहे. त्या पुण्यप्रभावाने त्यांना सद्गती लाभो !"
                            भृशुंडीने ते संकल्पयुक्त जल गणेशमूर्तीच्या हातावर सोडले. त्यामुळे त्याच्या मातापितरांची यमयातनांतून सुटका झाली आणि ते स्वर्गलोकी गेले.

हे राजा, आता मी तुला कृतवीर्याच्या पित्याचा वृत्तान्त सांगतो. नारदांकडून आपल्या पुत्राचा व सुनेचा वृत्तान्त ऐकून त्याचे काळीज गलबलले. तो सत्यलोकी गेला व ब्रह्मदेवाला म्हणाला, "हे विधाता, तुला नमस्कार असो. कृतवीर्य हा माझा पुत्र सुशील, सदाचारी आणि ईश्वरभक्त आहे, पण त्याला पुत्रसुख नाही. असे का?" 

ब्रह्मदेव म्हणाले, "हे राजा, तुझा पुत्र पूर्वजन्मी सोम नामक अंत्यज होता. तो वाटमाऱ्या करून, लोकांना लुबाडून व प्रसंगी हत्या करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करीत असे. एके दिवशी त्याने बारा ब्राह्मणांना ठार केले. त्यांची सर्व चीजवस्तू लुबाडून ती प्रेते एका गुहेत लपवून ठेवली. त्या दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती. त्याने दिवसभर काहीही खाल्ले नाही. रात्री चंद्रोदयाच्या सुमारास लुटलेले धन घेऊन तो लपतछपत घरी आला. आपला पुत्र गणेश याला नावाने हाका मारून दरवाजा उघडण्यास सांगितले. चंद्रोदयानंतर स्नान करून त्याने परिवारासह भोजन केले.

                         हे राजा, अशा प्रकारे माघातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्या अंत्यजाकडून नकळत उपोषण, गजाननाचे नामस्मरण व चंद्रोदयानंतर भोजन हे सगळे व्रताचरण घडले. त्या पुण्यप्रभावाने या जन्मी तो राजकुळात जन्माला आला. त्याला राजवैभव प्राप्त झाले. पण हातून घडलेल्या ब्रह्महत्यांमुळे त्याला संततीचे सुख लाभले नाही. म्हणून त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रताचरण करावे. या व्रतरूपी गणेशसेवेने त्याच्या पूर्वपातकांचा नाश होऊन त्याला पुत्रलाभ होईल. "

ते ऐकून कृतवीर्याच्या पित्यास परमानंद झाला. त्याने विधात्याकडून संकष्टी चतुर्थी व्रताचा विधी काय आहे ? गणेशपूजन कसे करावे? दूर्वांचे माहात्म्य काय आहे? अंगारकी चतुर्थीचे महत्त्व व माहात्म्य काय आहे? या सर्व गोष्टी विनयपूर्वक जाणून घेतल्या. मग कृतवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. पित्याच्या आज्ञेनुसार कृतवीर्याने त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या व्रतपुण्याईने गणपतीची कृपा होऊन त्याला एक पराक्रमी पुत्र झाला." 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या