Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय ५८ || shri ganesh puran kathasar adhyay 58

 ।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- ५८ 

२०. भृशुंडी ऋषीची कथा



          शूरसेनाचा मनोभाव जाणून इंद्र म्हणाला, "हे राजा गणेशभक्तीची थोरवी विलक्षण आहे. गणेशभक्तांच्या दर्शनाने इतरेजन पावन होतात, मीही त्याचसाठी भृशुंडीच्या दर्शनास गेलो होतो. आता त्याची कथा ऐक.

           दंडकारण्यानंद नावाचे एक नगर होते. तेथे एक कोळी राहत असे. तो अतिशय दुष्ट होता. तो चोऱ्या करायचा, लोकांना अनेक प्रकारे त्रास द्यायचा. एके दिवशी संतप्त नागरिकांनी त्याला नगरातून हद्दपार केले. मग तो अरण्यात राहून वाटमाऱ्या करू लागला. बरीच संपत्ती मिळवून तो आपल्या परिवारासह चैनीत राहू लागला.

             एके दिवशी तो कोळी शिकारीसाठी अरण्यात गेला होता. वापदांच्या मागे धावून तो पुरता दमला. मग फिरत फिरत एका सरोवरापाशी आला. ते सरोवर 'गणेशतीर्थ' म्हणून प्रसिद्ध होते. त्याने तेथे स्नान केले आणि तो माघारी वळला. समोरून मुद्गल ऋषी गजाननाचे नामस्मरण करीत येत होते. त्यांचा वध करून चीजवस्तू लुबाडावी असा विचार करून त्याने खड्ग उपसले. तर काय आश्चर्य! त्याने उगारलेले खड्ग खाली गळून पडले. त्या वेळी ऋषींची सौम्य, शांत, तेजस्वी मुद्रा पाहून त्याच्या मनाला एक वेगळेच समाधान लाभले. त्याच्या अंतःकरणातील हिंसावृत्ती मावळली. मुद्गलांनी त्याच्याकडे पाहून मंदस्मित केले. ते म्हणाले, "अरे धीवरा, तू मला मारणार होतास ना ? मग तुझे खड्ग खाली कसे पडले ?"

ते ऐकून कोळ्याने मुगलांचे पाय धरले. तो म्हणाला, "हे विप्रा, मला क्षमा कर. मी अत्यंत पापी आहे. मी अनेक दुष्कर्मे केली आहेत. पण आज तुझ्या दर्शनाने माझे मन शांत झाले. माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होणे हा गणेशतीर्थातील स्नानाचा आणि तुझ्या तपश्चर्येचा पुण्यप्रभाव आहे, असे मला वाटते. यापुढे मी शस्त्र धरणार नाही, हिंसा करणार नाही, कोणालाही छळणार नाही. मी तुला शरण आहे. तू माझा उद्धार कर!"

                 धीवराची ती कळवळ्याची वाणी ऐकून मुद्गलांचे मन द्रवले. त्यांनी त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. आपल्या हातातील काठी तेथेच जमिनीत रोवली आणि म्हणाले, "धीवरा, तू 'गणेशाय नमः ।" या षडक्षरी मंत्राचा अहोरात्र जप कर. मी तू परतून येईपर्यंत किंवा या शुष्क काठीला पाने येईपर्यंत तू तुझे जपानुष्ठान चालू ठेव. तुझे कल्याण होईल. "

धीवराने त्यांचे म्हणणे ऐकले. मुद्गल ऋषी निघून गेल्यावर तो त्या काठीशेजारीच आसन घालून बसला. गुरुवचनांवर पूर्ण श्रद्धा ठेवून तो एकाग्र चित्ताने उपदिष्ट मंत्राचा जप करू लागला. हे अनुष्ठान एक हजार बर्षे चालले होते. त्याच्या तपश्चर्येच्या पुण्यप्रभावाने काठीलाही अंकुर फुटला. त्याच्या स्वतःच्या अंगाभोवती वारूळ वाढले. त्यामधून गणेशमंत्राचा मंद ध्वनी ऐकू येत असे. कालांतराने मुद्गल ऋषी त्याच अरण्यातून अन्यत्र जात होते. त्यांना एकाएकी धीवराची आठवण झाली. शोध घेत ते काठी पुरलेल्या स्थानी आले. तिचे एका विस्तीर्ण वृक्षात रूपांतर झाले होते. त्याच्या मुळाशी एक भलेमोठे वारूळ होते. त्यामधून 'गणेशाय नमः।' असा मंत्रजप ऐकू येत होता. मुगलानी तेथील वेली आणि पालापाचोळा दूर केला. हलक्या हाताने वारूळही दूर केले. आतमध्ये तपोमग्न धीवराची तेजस्वी मूर्ती दृष्टीस पडली. मुद्रलांनी आपल्या कमंडलूतील अभिमंत्रित जल त्याच्यावर शिंपडले. त्यामुळे तो भानावर आला. त्याच्या मुखावर परम शांती विलसत होती. त्याच्या भुवयांमधून गणपतीसारखीच एक सोंड उत्पन्न झाली होती. हे त्याचे बदललेले स्वरूप पाहून मुगलांनाही मोठे आश्चर्य वाटले. धीवराने डोळे उघडले. समोर आपल्या गुरुदेवांना पाहून तो अतिशय आनंदित झाला. त्याने साश्रू नयनांनी त्यांना नमस्कार केला. भ्रूमध्यातून सोंड निघाली म्हणून त्यांनी धीवराचे 'भृशुंडी' असे नाव ठेवले. ते म्हणाले, "बत्सा, तुझ्या तपश्चर्येने मी अगदी संतुष्ट झालो आहे. गणेशाची आराधना करताना तूही गणेशस्वरूपच झाला आहेस. तू सर्व देवांना आणि गंधर्वांना पूजनीय होशील. तुझ्या दर्शनाने जीवमात्रांच्या इच्छा पूर्ण होतील. "

                  भृशुंडीला आशीर्वाद देऊन मृद्गल ऋषी मार्गस्थ झाले. मग तो तेथेच आश्रम बांधून राहू लागला. त्याने पुन्हा तपश्चर्या आरंभिली. अशी शंभर बर्षे लोटली. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले. आपल्या आराध्य दैवताला संमुख पाहून भृशुंडी धन्य-धन्य झाला. गणपतीने त्याला आशीर्वाद दिला. तो म्हणाला, "हे मुने, या ठिकाणी माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तू शंभर वर्षे उत्कट तपश्चर्या केली आहेस. हे स्थान 'नामलक्षेत्र' म्हणून प्रख्यात होईल. येथे जप, तप, अनुष्ठान केल्याने अल्पावधीत कार्यसिद्धी होईल. येथील माझ्या मूर्तीच्या दर्शनाने भाविकांना मोक्ष मिळेल." 

इंद्राने शूरसेन राजाला ही कथा सांगितली. त्यामुळे त्याला मोठे समाधान वाटले. तो विनम्रतेने म्हणाला, "हे देवेंद्रा, तुमचे विमान येथे जमिनीवर उतरले आहे. त्याने पुन्हा आकाशात उड्डाण केले पाहिजे. त्यासाठी मला काय करता येईल?" इंद्र म्हणाला, "हे राजा, तुझ्या राज्यात कोणी ब्राह्मण संकष्टी चतुर्थीचे व्रत करीत असेल तर त्याला येथे बोलावून घे. त्याने चतुर्थीव्रताचे एक वर्षाचे पुण्य अर्पण केले तरच हे विमान पुन्हा उडेल."

               ते ऐकून शूरसेनाला मोठे नवल वाटले. तो म्हणाला, "देवराज, संकष्टी चतुर्थी व्रताचे एवढे माहात्म्य असेल तर त्याविषयी जाणून घेणे मला नक्की आवडेल. आपण माझ्यावर कृपा करा. हे व्रत कसे करावे ? ते पूर्वी कोणी केले होते? त्याला काय लाभ झाला? याविषयी सविस्तर सांगा "

अध्याय समाप्त

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या