।। श्री गणेश पुराण कथासार ।।
( उपासना खंड )
अध्याय:- ६१
इंद्र शूरसेनास म्हणाला, "हे राजा, मंगळवारी येणाऱ्या कृष्ण चतुर्थीला अर्थात संकष्टी चतुर्थीला 'अंगारकी चतुर्थी' असे म्हणतात. ही तिथी विशेष पुण्यप्रद मानली जाते. गणपतीने मंगळाला तसे बरदानच दिले आहे. त्या मंगळाची कथा अशी आहे.
क्षिप्रा नदीच्या काठी वसलेल्या अवंती नगरीत भरद्वाज ऋषींचा आश्रम होता. ते महान तपस्वी अग्निहोत्रादी नित्यकर्मांचे निष्ठेने आचरण करीत असत. त्यांच्यापाशी राहून अनेक विद्यार्थी वेदविद्या शिकत असत. एके दिवशी ते ऋषी स्नानासाठी नदीवर गेले होते. तेथे स्वर्गलोकीची एक दिव्य अप्सरा जलक्रीडा करीत होती. भिजलेल्या त्या सुंदर अप्सरेस पाहून भरद्वाज ऋषी कामपीडित झाले. त्यांचे तेज स्खलित झाले. खाली पडलेले ते वीर्य पृथ्वीने धारण केले. त्यापासून तिला लालबुंद, तेजस्वी असा पुत्र झाला. त्याच्या कांतीचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटत असे. सातव्या वर्षी त्याने आपल्या मातेकडे या संदर्भात विचारणा केली. तिने त्याला त्याचे जन्मरहस्य सांगितले. पितृभेटीसाठी आतुर झालेला पृथ्वीचा तो पुत्र भरद्वाजांकडे जाण्यास निघाला. तेव्हा तीही त्याच्यासमवेत गेली. त्या दोघांनी भरद्वाजांची भेट घेतली. पृथ्वीने त्यांना आधीची सर्व घटना सांगून पुत्राचा स्वीकार करण्याची विनंती केली.
भरद्वाजांनी आपल्या तेजस्वी पुत्राला प्रेमाने जवळ घेतले. त्याला आपल्यापाशीच ठेवले, त्याचे पालन-पोषण केले. यथावकाश त्याची मुंज केली. त्याला वेदविद्या शिकवली. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याला गणेशमंत्राचा उपदेश केला. पितृआज्ञेने तो नर्मदातीरी गेला. तेथे अनुष्ठानास उपयुक्त असे एकांत स्थान शोधून तो तपश्चर्येस बसला. सहस्र वर्षे उलटून गेली तरी हे जपानुष्ठान चालूच होते. त्याची तपोनिष्ठा पाहून गणपती परम संतुष्ट झाला. माघ वद्य चतुर्थीच्या दिवशी त्याने • भरद्वाजपुत्रास प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाला, "वत्सा, तुझी तपश्चर्या पाहून मी फारच प्रसन्न झालो आहे, तरी इष्ट बरदान मागून घे." तो म्हणाला, "देवा, तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तुझी माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहो. मला स्वर्गलोकीचे अमृत प्यावयास मिळावे, माझी त्रिखंडात कीर्ती व्हावी आणि तू माझ्यावर प्रसन्न झालास ती ही माघ वद्य चतुर्थी तिथी लोकांना विशेष पुण्यफलदायी ठरावी अशी माझी प्रार्थना आहे."
गणपतीने 'तथाऽस्तु!' म्हणून "हे भरद्वाजपुत्रा ! आशीर्वाद दिला. तो पुढे म्हणाला, मी तुला ग्रहमंडळात स्थान देत आहे. तू 'मंगळ' या नावाने ओळखला जाशील. पृथ्वीचा पुत्र म्हणून तुला 'भौम' म्हणतील. तुझी अंगकांती अंगारासमान लालबुंद असल्याने तू प्रसिद्ध होशील!" 'अंगारक' म्हणनू त्याला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धात पावला. भरद्वाजांच्या त्या तपस्वी पुत्राने आपल्या तपश्चर्येच्या स्थानी एक भव्य मंदिर बांधले. त्यामध्ये दशभुजा गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. त्याचे 'मंगलमूर्ती' असे नामकरण केले.
कालांतराने मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला 'अंगारकी चतुर्थी' म्हणण्याची प्रथा पडली. या दिनी उपोषण, गणेशपूजन व चंद्रोदयानंतर भोजन करावे. त्यायोगे गणपतीची प्रसन्नता लाभून उपासकाचे मंगल होते.
अध्याय समाप्त

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.