Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय ६२ || shri ganesh puran kathasar adhyay 62

 ।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- ६२ 

२४. चंद्राला शाप



        भृगू ऋषी सोमकांताला गणेशपुराण सांगत आहेत. ते म्हणाले, "राजा, मी तुला कृतवीर्याची कथा यापूर्वीच सांगितली आहे. तो आपल्या पत्नीसह पुत्रप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करीत होता. त्यांची मरणासन्न अवस्था पाहून नारदांनी स्वर्गलोकी जाऊन त्याच्या पित्याला सर्व वृत्तान्त सांगितला. त्याने ब्रह्मदेवापाशी जाऊन आपल्या पुत्राची, कृतवीर्याची अवस्था कथन केली. ब्रह्मदेवाने त्याला कृतवीर्याचे पूर्वजन्मवृत्त सांगितले आणि त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे असे सुचविले. 'संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन महत्त्वाचे असते,' असे सांगून त्याने त्या संदर्भातील एक घटना सांगितली. ब्रह्मदेव कृतवीर्याच्या पित्यास म्हणाला, "हे राजा, एके दिवशी मी शंकराच्या दर्शनासाठी कैलासावर गेलो होतो. योगायोगाने नारदांचेही तेथे आगमन झाले. त्यांनी एक अपूर्व फळ आणले होते, ते त्यांनी शंकराला दिले. ते फळ आपल्याला खावयास मिळावे म्हणून षडानन व गजानन शंकराच्या हाताला झोंबू लागले. त्यांचे भांडण पाहून शंकराने मला विचारले, "विधाता, हे फळ मी कोणाला देऊ?" मी षडाननाचे नाव घेतले. हा पक्षपात गणपतीला सहन झाला नाही. तो माझ्यावर रागावला होता, पण त्या वेळी त्याने कोणतीही प्रतिक्रिया दाखविली नाही..

                मी सत्यलोकी परतलो. नेहमीप्रमाणे सृष्टिकार्यात मग्न झालो. एके दिवशी गणपतीने महाभयंकर रूपात प्रकट होऊन मला भयभीत केले. मी प्राणभयाने व्याकूळ होऊन थरथर कापू लागलो. माझी अवस्था पाहून चंद्राला मोठी मौज पाटली. त्याने गणपतीची देहयष्टी आणि त्याच्या तोंडाची चेष्टा केली. मग आपल्याच विनोदावर तो खदखदा हसू लागला. ती कुचेष्टा गणपतीला असह्य झाली. त्याने संतापाने चंद्राला शाप दिला "मूढा ! मला पाहून तू हसलास? माझ्या स्वरूपाची तू निंदा केलीस? या प्रमादाबद्दल त्रिखंडात कोणीही तुझे तोंड बघणार नाही. जो कोणी तुझ्याकडे पाहील त्याला मोठे पातक लागेल." त्या शापवाणीचा तत्काळ प्रत्यय आला. चंद्राचे सुंदर, मनोहर स्वरूप नष्ट होऊन तो हिडीस व कुरूप दिसू लागला. त्याचे सर्व तेजच लोपून गेले. लला आणि नैराश्याने ग्रस्त झालेला चंद्र लपून बसला..

               या घटनेमुळे सृष्टिचक्रात मोठी बाधा उत्पन्न झाली. रात्रसमयी गडद अंधार पडू लागला. तेव्हा सर्व देवांनी गणपतीची भेट घेतली. त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली. चंद्राच्यावतीने त्याची क्षमा मागितली व त्याला उःशाप द्यावा अशी विनंती केली. गणपतीचा राग शांत झाला. तो म्हणाला, "भाद्रपद शुद्ध चतुर्थीला माझा वार्षिकोत्सव साजरा केला जातो. त्या तिथीला जे कोणी चंद्राचे दर्शन घेतील त्यांच्यावर मोठी संकटे येतील. एरव्ही त्याच्या दर्शनाने काहीही त्रास उद्भवणार नाही." गणपतीच्या आश्वासनाने देवांना मोठे समाधान वाटले. त्यांनी चंद्राची भेट घेऊन त्याला सर्व वर्तमान सांगितले. 

                     'तू एकाक्षर मंत्राचे अनुष्ठान करून गणपतीला प्रसन्न करून घे,' असा सल्ला दिला. त्यांच्या सांगण्यावरून चंद्र गंगेच्या दक्षिण तीरावर गेला. तेथे त्याने बारा वर्षे भक्तिभावाने गणपतीची आराधना केली. या सेवाभक्तीने संतुष्ट झालेल्या गणपतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाला, "हे रोहिणीपते! मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला पूर्वस्वरूप प्राप्त होईल. संकष्टी चतुर्थीस तुझ्या दर्शनाशिवाय लोकांच्या व्रताची सांगता होणार नाही. प्रत्येक मासातील शुद्ध द्वितीयेस लोक श्रद्धेने तुझे दर्शन घेतील. तुझी एक कला मी भूषण म्हणून माझ्या मस्तकावर धारण करणार आहे. मात्र भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुझ्या दर्शनाबद्दल मी देवांपाशी जे विधान केले आहे. त्यात काहीही बदल होणार नाही. त्या दिवशी तुझे दर्शन वर्ज्य मानले जाईल. "

               त्या वरदानाने चंद्राला पूर्वीप्रमाणेच तेज प्राप्त झाले. तो आल्हादक आणि मनोहर दिसू लागला. त्याने आपल्या तपश्चर्येच्या स्थानी मस्तकावर चंद्रकोर धारण केलेल्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ते स्थान 'सिद्धिक्षेत्र' म्हणून प्रसिद्ध झाले. दिलेल्या शब्दाप्रमाणे गणपतीने चंद्राची एक कला आपल्या भाळी धारण केली. त्यामुळे त्याला 'भालचंद्र' हे नाव प्राप्त झाले. '

अध्याय समाप्त

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या