Subscribe Us

श्री गणेश पुराण कथासार अध्याय ७८ ते ८३ || shri ganesh puran kathasar adhyay 78 to 83

 ।। श्री गणेश पुराण कथासार ।।

( उपासना खंड )

 अध्याय:- ७८ ते ८३ 

२८. परशुरामाची कथा


            भृगू ऋषी सोमकांताला म्हणाले, "राजा, ब्रह्मदेवाने व्यासांना गणपतीच्या संकष्टी चतुर्थी आदी व्रतांबद्दल सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर त्यांना गणेशभक्तिपर अनेक कथा सांगितल्या. सर्वप्रथम त्याने जमदग्नि-रेणुकेचा पुत्र, विष्णूचा अंशावतार, परशुराम याची कथा सांगितली.

           ब्रह्मदेव म्हणाला, “परशुरामाने लहानपणी पित्यापाशी राहूनच विद्याभ्यास केला. वेदाध्ययन झाल्यावर तो तपश्चर्येसाठी अरण्यात निघून गेला. एके दिवशी सहस्रार्जुन आपल्या सैनिकांसमवेत मृगयेसाठी निघाला. तो श्वेतद्वीपातील वनात श्वापदांच्या मागे भटकू लागला. मध्यान्ह समयी तो जमदग्नीच्या आश्रमापाशी आला. त्याने त्यांचे दर्शन घेतले. जमदग्नींनी त्याचे यथोचित स्वागत केले व म्हणाले, "राजा, तू व तुझे सैनिक थकले आहेत. तुम्ही सर्वांनी नदीवर स्नान करून या. तोपर्यंत मी भोजनाची व्यवस्था करतो."

             जमदग्नींच्या सांगण्यावरून सहस्रार्जुन स्नानासाठी गेला. हे ऋषी एवढ्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था कशी करणार, असा त्याला प्रश्न पडला होता. ऋषींना ती चिंता नव्हती. त्यांनी कामधेनूला वंदन केले. तिला सहस्रार्जुन व त्याच्या सैनिकांसाठी भोजन देण्याची विनंती केली. कामधेनूने संकल्पाने एक विस्तीर्ण मंडप तयार केला. सेवेकरी निर्माण केले. उत्तम प्रकारचे भोजन उत्पन्न केले. मग आसने व ताट-वाट्या मांडण्यात आल्या. ती व्यवस्था पाहून सहस्रार्जुनाला मोठे नवल वाटले. त्या सर्वांनी यथेच्छ भोजन केले. जमदग्नींनी त्यांना तांबूल दिले, प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे वस्त्रालंकार देऊन त्यांचा गौरव केला. तेव्हा सहस्रार्जुनाने त्यांना विचारले, "ऋषीजी, तुम्ही आमचे उत्तम आदरतिथ्य केलेत त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. ही सर्व व्यवस्था तुम्ही कशी काय जुळवून आणलीत?" जमदग्नी सहजतेने म्हणाले, "राजा, माझ्या आश्रमात कामधेनू आहे. तिच्या कृपेनेच या सर्व गोष्टी साध्य झाल्या. '

            ते रहस्य कळताच सहस्रार्जुनाच्या मनात कामधेनूची अभिलाषा निर्माण झाली. तो म्हणाला, "जमदग्नी, आपण थोर तपस्वी आहात. अरण्यामध्ये राहता. तुम्हाला कामधेनूचा कितीसा उपयोग होतो ? माझे राज्य मोठे आहे, कार्यकर्तृत्त्वाची व्याप्तीही मोठी आहे. मलाच तिचा जास्त उपयोग होईल. तुम्ही कामधेनूला माझा स्वाधीन करावी अशी माझी आज्ञा आहे. या आज्ञेचे तुम्ही पालन केले नाहीत, तर मला नाइलाजाने बळजबरी करावी लागेल. "

                  जमदग्नींना पुढील अनर्थाची कल्पना आली. ते सहस्रार्जुनास म्हणाले, "तू सज्जन आहेस, निःस्पृह आहेस, म्हणून मी तुझे आदरातिथ्य केले. राजाने व तत्सम अन्य कोणीही ब्राह्मणांच्या संपत्तीचे हरण करू नये, तिचे रक्षण करावे; असे शास्त्र सांगते. तू स्वार्थप्रेरित होऊन कोणतेही नीच कृत्य करायला मागेपुढे पाहणार नाहीस हे माझ्या लक्षात आले आहे. तुझा सन्मान करून मी स्वतःवरच संकट ओढवून घेतले आहे. "

                    जनदग्नींचे बोलणे ऐकून सहस्रार्जुनास राग आला. तो आपल्या सैनिकांना म्हणाला, “बघता काय? जा. या आश्रमाच्या गोठ्यात बांधलेल्या कामधेनूला घेऊन या." सैनिकांनी कामधेनूला धरून आणले. ती मोठ्याने हंबरू लागली. तिची अवस्था पाहून जमदग्नींच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी तिला हात जोडले व म्हणाले, "माते, तुझे रक्षण करण्यास मी असमर्थ आहे. आत्ता तूच या दुष्टाला धडा शिकव." तेव्हा कामधेनूच्या सर्वांगातून सहस्रावधी सैनिक उत्पन्न झाले. त्यांनी सहस्रार्जुनाच्या सर्व सैनिकांना ठार मारले. जे कोणी वाचले, त्यांनी पळ काढला. हे सर्व डोळ्यांदेखत घडलेले पाहून सहस्रार्जुनाला अधिकच चेव . त्याने आश्रमात घुसून जमदग्नींची निंदा केली. मग त्यांचा वध चढला.. केला. पतिनिधनाने आक्रोश करणाऱ्या रेणुकेलाही त्याने एकवीस वाण मारून विद्ध केले. तेव्हा तिने शाप दिला- “अरे नराधमा! ज्या सहस्र बाहूंच्या अभिमानाने उन्मत्त होऊन तू माझे सौभाग्य हरण केलेस, माझ्यासारख्या साध्वीवर शस्त्र चालविलेस, त्या प्रमादाबद्दल माझा पुत्र परशुराम तुला चांगलीच शिक्षा करील. तुझे सामर्थ्य असलेल्या या भुजाच तो तोडून टाकील.”

              कामधेनू अदृश्य झाली होती. तिच्या लोभापायी आपल्या हातून ब्रह्महत्या घडली, त्याच्या साध्वी पत्नीने आपल्याला शाप दिला, म्हणून सहस्रार्जुन व्यथित झाला. स्वतःच्या कृत्याचा धिक्कार करीत तो राजधानीत परतला.

            शोकाकुल रेणुका एकसारखी रडत होती. तिला आपल्या पुत्राची तीव्रतेने आठवण येऊ लागली. त्यामुळे तपोमग्न परशुराम भानावर आला. आश्रमात काहीतरी विपरीत घडले आहे हे त्याच्या लक्षात आले. तो त्वरेने तेथे आला. आपल्या पित्याला मृतावस्थेत व मातेला जखमांनी तळमळताना पाहून त्याचे हृदय विदीर्ण झाले. तो मातेला म्हणाला, "आई, तू महान पतिव्रता व तपस्विनी आहेस. तुला त्रास होऊ नये म्हणून त्रैलोक्यातील कोणीही तुझ्या वाटेला जाण्याचे धाडस करीत नाही. सृष्टीला क्षणार्धात भस्म करील असे तुझे सामर्थ्य ! सहस्रार्जुनाचा उन्मत्तपणा तू कसा सहन केलास ? या बाणांनी तू किती असाहाय्य झाली आहेस! हाय-हाय रे दुर्दैवा ! मी घरात नसताना माझ्या मातापितरांवर तू ही काय वेळ आणलीस? आत्ता मी काय करू?"

               परशुरामाची तगमग पाहून रेणुका धापा टाकत म्हणाली, "बाळा, जे घडायचे ते घडून गेले आहे. आता शोक करून काय उपयोग? त्या दुष्ट सहस्रार्जुनास तू चांगली शिक्षा कर. त्याला जन्माची अद्दल घडव. त्याचे बाहू छेदून टाक. त्याने मला एकवीस बाण मारले याच्या निषेधार्थ तू एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय कर. मी सदैव तुझ्या पाठीशी असेन...' बोलता-बोलता तिने मान टाकली.

             परशुरामाला शोकावेग आवरेना. तेव्हा दत्तात्रेयांनी तेथे प्रकट होऊन त्याचे सांत्वन केले. त्यांच्याच सूचनेनुसार त्याने आपल्या मातापित्याचे दहनादी उत्तरकार्य केले. या घटनेनंतर पाचव्या दिवशी एक भयंकर वाघ आश्रमात शिरला. त्याला पाहून निःशस्त्र परशुराम भयभीत झाला. त्याने माता रेणुकेचे स्मरण केले. तिची सपिंडी आदी उत्तरक्रिया व्हायची होती. म्हणून ती पूर्णपणे प्रकट झाली नाही. जमिनीतून फक्त तिचे मस्तकच बाहेर आले. तिला पाहून वाघ निघून गेला. शिर तेथेच राहिले. परशुरामाने त्या दोघांची उत्तरक्रिया केली. मग त्याने मातेला विचारले. "सहस्रार्जुन महाबलाढ्य व पराक्रमी आहे. देवही त्याला वचकून असतात. त्याला आव्हान देईल असा एकही वीर त्रैलोक्यात नाही. मी त्याला शिक्षा कशी करणार? मी क्षत्रियांचा संहार करावा असे तुझे म्हणणे आहे. त्या सर्वांचे पारिपत्य करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य मला कसे प्राप्त होणार ? कृपा करून तूच काहीतरी उपाय सांग."

               रेणुकेने त्याला शंकराची आराधना करण्यास सांगितली. परशुरामाने कैलासावर जाऊन शिवस्तुती केली. त्याला वस्तुस्थिती सांगून साह्य करण्याची विनंती केली. शंकर म्हणाला, "परशुरामा, तू गणपतीची आराधना कर, त्याची कृपा झाल्यावर तुझे प्रत्येक कार्य यशस्वी होईल. मी गणपतीच्या षडक्षरी मंत्राचा तुला उपदेश देतो. या मंत्राचे विधियुक्त अनुष्ठान केल्याने गणपती तुझ्यावर लवकर प्रसन्न होईल."

                शंकराने परशुरामाला 'गणेशाय नमः ।' या मंत्राचा उपदेश केला, आराधनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. परशुरामाने कृष्णा नदीच्या उत्तरेकडील अरण्यात निवास केला. तेथील शांत वातावरणात त्याने एकाग्र चित्ताने व अनन्य भावाने शिवोपदिष्ट गणेशमंत्राचा लक्ष संख्येत जप केला. प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला सगुण साकार रूपात दर्शन दिले. कार्यसिद्धीसाठी स्वतःचा परशू दिला. 'यशस्वी भव!' असा आशीर्वाद देऊन तो अदृश्य झाला. परशुरामाने स्वतःच्या तपश्चर्येच्या स्थानी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती 'मयूरेश्वर' म्हणून विख्यात आहे. कालांतराने त्याच स्थानी गजाननाने कमलासुर नामक महादैत्याचा वध केला. परशुरामाचे आधीचे नाव भार्गवराम, गणपतीने परशू दिल्यानंतर तो परशुराम म्हणून मान्यता पावला. गणेशकृपेने त्याला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले. त्याने सहस्रार्जुनाला युद्धाचे आव्हान दिले. त्या युद्धात सहस्रार्जुनाचा पराभव करून परशुरामाने त्याचे दोन हात ठेवून बाकीचे सर्व हात छेदले. पुढील काळात जेव्हा-जेव्हा क्षत्रियांचे प्राबल्य वाढले तेव्हा-तेव्हा त्याने त्यांचा संहार केला व मोठा यज्ञ करून ती पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली. अशा प्रकारे त्याने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून माता रेणुकेला दिलेला शब्द पाळला.

अध्याय समाप्त

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या