।। श्री गणेश पुराण कथासार ।।
( उपासना खंड )
अध्याय:- ७३ ते ७७
इंद्र शूरसेनाला म्हणाला, "राजा, कृतवीर्याने अत्री ऋषींच्या मार्गदर्शनानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत मोठ्या निष्ठेने केले. त्याचे यथाविधि उद्यापनही केले. या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्याची राणी सुगंधा हिने एका पुत्राला जन्म दिला. गणेशकृपेने लाभलेला हा मुलगा मोठा तेजस्वी असेल असे तुला वाटणे साहजिक आहे, पण तसे काहीही घडले नाही. हा मुलगा अतिशय सुंदर होता, पण त्याला हात-पाय नव्हते. त्या अपंग बालकाला पाहून राजा-राणीला शोक अनावर झाला. ते उभयता रडू लागले. काय करावे हेच त्यांना सुचेना. कृतवीर्याच्या प्रधानाने त्या दोघांचे सांत्वन केले. तो राजाला म्हणाला. "महाराज, हा पुत्र आपल्याला मोठ्या तपश्चर्येने लाभलेला आहे. हा गणेशाचा प्रसाद आहे. याला असे जन्माला घालण्यात त्या परमेश्वराचाच काही विशिष्ट हेतू असावा. त्याचे प्रत्यंतर यथावकाश येईलच. तोपर्यंत तुम्हांला धीर धरावा लागेल. काळ हेच सर्व वेदनांवरचे बहुगुणी औषध आहे. श्रीगणपतीच्या कृपेने सर्व काही ठीक होईल.'
कृतवीर्याने कसेबसे आपले मन आवरले. त्याने राणीला परोपरीने समजावले. नगरात साखर वाटली. ब्राह्मणांना बोलावून त्या बाळाचे जातकादी संस्कार करविले. बाराव्या दिवशी त्याचे बारसे केले. त्याचे कार्तवीर्य असे नाव ठेवले. अशी बारा वर्षे लोटली. एके दिवशी भगवान दत्तात्रेय महाप्रभू राजाला भेटण्यासाठी आले होते. कृतवीर्याने त्यांचे उत्तम स्वागत केले. उच्चासनावर बसवून त्यांची पूजा केली. आपल्या अपंग पुत्राला त्यांच्या चरणांवर घातले. दत्तात्रेयांनी कार्तवीर्याचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले. मग ते राजाला म्हणाले, “कृतवीर्या, संकष्टी चतुर्थीचे व्रत करताना तू रात्रीच्या वेळी जागरण करीत होतास. त्या प्रसंगी जांभई आली असता तू आचमन केले नाहीस. त्यामुळे तुला असा पुत्र झाला आहे. पण काळजी करू नकोस. मी याला एकाक्षर मंत्राचा उपदेश देतो. या मंत्राचे त्याने बारा वर्षे भक्तिपूर्वक अनुष्ठान करावे. त्यायोगे गजाननाची प्रसन्नता लाभून हा अव्यंग होईल." दत्तात्रेयांच्या वचनांनी राजाला मोठे समाधान वाटले. कार्तवीर्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश करून श्रीदत्तात्रेय महाप्रभू विश्वसंचारार्थ निघून गेले.
गुरुसंततीचे मूळपीठ, सर्व संप्रदायांचे प्रवर्तक, तपस्व्यांचे तपस्वी, सिद्धांचे सिद्ध अशा दत्तात्रेयांनी अनुग्रह दिल्यामुळे कार्तवीर्य धन्य-धन्य झाला. त्याच्या मनात तपश्चर्येची उत्कट इच्छा निर्माण झाली. तो पित्याला म्हणाला, "तात, अरण्यातील एकांतात एकाग्रतेने तपश्चर्या करावी असे माझ्या मनात आहे. आपण त्या दृष्टीने माझी व्यवस्था करावी." कार्तवीर्याने त्याला अरण्यामध्ये एक पर्णकुटी बांधून दिली. त्या एकांतवासात राजपुत्राने मंत्रानुष्ठानास प्रारंभ केला. त्याने वायू भक्षण करून बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली. या आराधनेने गणपती प्रसन्न झाला. त्याने कार्तवीर्यास दर्शन देऊन त्यास वर मागण्यास सांगितले. कार्तवीर्याने शीर्ष झुकवून त्याला वंदन केले व म्हणाला, “गणाधिपा, तू दर्शन दिलेस यातच सर्वकाही आले. माझी तुझ्याठायी असलेली भक्ती अढळ राहो. मला तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाही. तथापि माझ्या मातापित्याला बरे वाटावे म्हणून तू मला अव्यंग कर."
गणपतीने कार्तवीर्यावर कृपादृष्टी टाकून त्यास सहस्र हात व दोन पाय दिले. त्यामुळे त्याला फारच आनंद झाला. गजाननाचा जयजयकार करीत तो नृत्य करू लागला. त्याने दत्तात्रेयांचेही गुणगान केले. त्या प्रसंगी अनेक देवता प्रकट झाल्या. त्यांनी त्याला अनेक वर आणि दिव्य शस्त्रास्त्रे देऊन सामर्थ्यवान केले. त्याला अनेक मौल्यवान भेटवस्तू दिल्या. त्याचे 'सहस्रार्जुन' असे नाव ठेवले. कार्तवीर्याच्या तपश्चर्येची अशी उत्तम सांगता झाली. त्या स्थानी त्याने एक भव्य मंदिर उभारले. त्यात प्रवाळाच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती 'प्रवाळगणेश' म्हणून प्रसिद्ध झाला. प्राचीन काळी याच ठिकाणी शेषाने गणपतीची उत्कट आराधना केली होती. त्यायोगे त्याला पृथ्वीचा भार धारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. म्हणून त्या गणपतीला 'धरणीधर' असेही म्हणतात.
कार्यसिद्धी झाल्यावर कार्तवीर्य म्हणजेच सहस्रार्जुन आपल्या नगरात परतला. त्याचे नूतन स्वरूप पाहून प्रजाजनांना व राजा-राणीला परमानंद झाला. याच सहस्रार्जुनाने पुढे रावणाचा गर्व उतरवला आणि नंतर त्याच्यावर कृपा करून त्यास सामर्थ्यवान केले. "
एवढा कथाभाग सांगून इंद्र शूरसेनाला म्हणाला, "राजा, असे आहे संकष्टी चतुर्थीचे माहात्म्य! म्हणून तुझ्या राज्यातील कोणी उपासकाने या व्रताचे एक वर्षाचे पुण्य अर्पण केले, तर माझे विमान पुन्हा उडू शकेल. "
देवराज इंद्राकडून संकष्टी चतुर्थीचे माहात्म्य ऐकून शूरसेन राजा फारच प्रभावित झाला. त्यानेही त्या व्रताचे आचरण करण्याचे ठरविले. त्याने आपल्या काही दूतांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याच्या शोधार्थ पाठविले. ते राजदूत नगरामध्ये चौकशी करीत हिंडू लागले. एके ठिकाणी त्यांना काही देवदूत एका चंडालिकेस दिव्य विमानात बसवून स्वर्गलोकी नेत आहेत असे दृश्य दिसले. त्यांना मोठे नवल वाटले. त्यांनी पुढे जाऊन देवदूतांना नमस्कार केला व म्हणाले, “या चांडाळ खीकडून असे कोणते श्रेष्ठ पुण्यकर्म घडले म्हणून तुम्ही हिला स्वर्गलोकी नेत आहात ?"
देवदूत म्हणाले, "या खीने पूर्वजन्मी अनेक दुष्कृत्ये केली होती, त्यामुळे या जन्मी हिला चंडालिकेचा जन्म मिळाला. पती असूनही ही परपुरुषांशी व्यभिचार करीत होती. त्या पापाचरणामुळे हिला कुष्ठरोगासारखी महाव्याधी झाली. ही मद्यपानही करीत होती. संकष्टी चतुर्थीच्या आदल्या रात्री हिने अतिमद्यपान केले. चतुर्थीचा संपूर्ण दिवस ती नशेमध्ये झोपूनच होती. चंद्रोदयानंतरच तिला जाग आली. तिने चंद्राकडे पाहिले. तिला जागेवरून उठवत नव्हते. पोटात भुकेने आग पडली होती. ती कशीबशी उठली. अडखळत, हेलपाटत दारोदार भिक्षा मागू लागली. एका गणेशभक्ताला तिची दया आली. त्याने तिला पुरेसे अन्न दिले. 'आज गणपतीच्या कृपेनेच आपल्याला पोटभर खायला मिळाले' असा विचार करून तिने नमस्कार केला. मग गणपतीचे नाव घेऊन भोजन केले. अशा प्रकारे तिच्याकडून या व्रताचे नकळत आचरण घडले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या आमच्या स्वामीने, गणपतीने निजकृपेने तिचा उद्धार केला आहे."
ते वर्तमान ऐकून शूरसेन राजाच्या दूतांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी गणेशदूतांना इंद्राच्या विमानाची हकिकत सांगितली आणि चंडालिकेला त्यांच्यासमवेत पाठविण्याची विनंती केली. गणेशदूतांनी त्यांची मागणी साफ फेटाळून लावली. त्यांनी चंडालिकेस सन्मानाने विमानात बसविले. तर काय आश्चर्य! तिला दिव्य देह प्राप्त झाला. मग ते विमान त्यांच्यादेखतच आकाशात झेपावले. दूतांनी धावत जाऊन हा सर्व प्रकार शूरसेनाला सांगितला. त्यामुळे त्यालाही मोठे नवल वाटले. तेवढ्यात ते विमान आकाशातून जाताना दिसले. त्या पुण्यवान चंडालिकेने सहजच खाली पाहिले. तिला इंद्राचे विमान दिसले. तिची दृष्टी पडताच ते विमान सुरू झाले आणि बघता बघता आकाशात झेपावले.
त्यानंतर शूरसेनाने कुलगुरू वसिष्ठांची भेट घेतली. त्यांना आधीचा सर्व वृत्तान्त सांगितला. राजाच्या मनात गणेश चतुर्थीचे व्रत करण्याची तीव्र इच्छा आहे हे लक्षात घेऊन वसिष्ठांनी त्याच्याकडून गणेशपूजन आणि व्रतसंकल्प करवून घेतला. त्याला मंत्रोपदेश दिला. राजाने चतुर्थी व्रताचे मनःपूर्वक आचरण केले, मग यथाविधि उद्यापनही केले. त्याच्या व्रतसेवेने गणपती अतिशय प्रसन्न झाला. त्याने राजाला गणेशलोकी आणण्यासाठी दिव्य विमान पाठविले. पण प्रजेला टाकून येण्यास तो तयार होईना. तेव्हा गणेशदूतांनी त्याच्या नागरिकांनाही विमानात घेतले. त्यांमध्ये ज्याच्या दृष्टीच्या प्रभावाने इंद्राचे विमानही खाली उतरले तो वैश्य जातीचा श्वेतकुष्ठ झालेला राजसेवकही होता. त्याच्यामुळे त्या विमानाची गती खुंटली. गणेशदूतांनी त्याला तत्काळ खाली उतरण्यास सांगितले. शूरसेनाने या गोष्टीला तीव्र विरोध केला. तो म्हणाला, "तुम्ही याला खाली का उतरवता ? याचा उद्धार का करीत नाही? हे मला कळलेच पाहिजे."
गणेशदूतांनी उत्तर दिले, "राजा, पूर्वी गौड देशात गौड नामक एक ब्राह्मण गृहस्थ राहत असे. तो वेदज्ञ व मोठा पंडित होता. शाकिनी ही त्याची पत्नी. या दांपत्यास एक पुत्र होता. त्याची पत्नी सावित्री. ती सुशील आणि पतिव्रता स्त्री होती. तिची उपेक्षा करून तो विप्रपुत्र एका वेश्येच्या नादी लागला. तो दिवस दिवस घरी फिरकत नसे, कायम त्या वेश्येकडेच पडलेला असे. या धर्मबाह्य आचरणामुळे त्याच्या मातापित्याला आणि पत्नीला फारच मनस्ताप होत असे. एके दिवशी त्या मुलाने आपल्या घरातील सर्व दागिने त्या वेश्येला देऊन टाकले आणि घरात चोरी झाल्याची बोंबाबोंब केली. आपल्या पतीचे खोटे वागणे पाहून सावित्री अगदी हतबल झाली. तिची अवस्था पाहून गौड ब्राह्मणास इतका राग आला की, वेश्येच्या घरी जाऊन त्याने आपल्या मुलाची तिच्यासमोरच कानउघाडणी केली. तेव्हा त्या दुष्ट पुत्राने पित्याला इतके बदडले की, तो तेथेच गतप्राण झाला. त्याचे निष्प्राण कलेवर दूर टाकून तो विप्रपुत्र पुन्हा वेश्येकडे आला. ती रात्र त्याने मद्याच्या धुंदीत आणि वेश्येशी अंगसंग करण्यात घालविली. दुसऱ्या दिवशी तो घरी परतला. तेव्हा मातेनेही त्याच्यावर तोंडसुख घेतले. त्याने तिलाही दंडुक्याने मारून ठार केले.
अशा प्रकारे जन्मदात्यांना निजधामी पाठवून तो दुष्टात्मा उघड-उघड दुष्कर्मे करू लागला. त्याला जराही जनलज्जा राहिली नव्हती.. आप्तस्वकीयांनी त्याच्याकडे पाठ फिरविली. त्याची पत्नी एकाकी झाली. त्याला सन्मार्गावर आणण्याचा तिने खूप प्रयत्न केला. एके दिवशी त्याने केलेल्या मारहाणीत तिचाही बळी गेला. शेवटी त्या निर्लज्जाने घरदार विकले; शेतीवाडी, गुरेढोरे विकली; आणि तो वेश्येच्या अधीन होऊन राहिला. एके दिवशी त्याने कालभी नामक एका ब्राह्मणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या पतिव्रतेने त्याला झिडकारले. 'तू जन्मोजन्मी कुष्ठी होशील,' असा त्याला शाप दिला. त्या सतीच्या शापाने त्याला महारोग झाला. अनंत यातना सहन करीत तो मरण पावला, तोच गौडपुत्र या जन्मी तुझा सेवक झाला आहे. सतीच्या शापाने त्याला या जन्मातही श्वेतकुष्ठ झाले आहे पाहा. अशा पाप्याला आम्ही गणेशलोकी कसे नेणार? ज्याच्या पापी दृष्टीने प्रत्यक्ष इंद्राच्या विमानाला खाली उतरावे लागले, आमच्याही विमानाची गती खुंटली; त्या या सेवकाची पापाची रास किती मोठी असेल याची कल्पनाच करवत नाही. "
गणेशदूतांकडून त्या सेवकाचे पूर्वजन्मवृत्त ऐकून शूरसेन राजा निरुत्तर झाला. तो विषण्ण होऊन म्हणाला, "या सेवकाने माझी इमानेइतबारे सेवा केली आहे. याच्या उद्धाराचा काहीच मार्ग नाही काय?" दूत म्हणाले, "या सेवकाला कोणी 'गजानन' या चार अक्षरी नाममंत्राचा उपदेश केला, तरच याचा उद्धार होईल" राजाने त्या सेवकाकडे पाहिले. तो मान खाली घालून पश्चात्तापाने रडत होता. राजाला त्याची दया आली. त्याने गणपतीचे स्मरण करून त्या देवाधिदेवाला 'या सेवकाचा उद्धार करावा अशी विनंती केली आणि त्याच्या कानात 'गजानन' मंत्राचा उपदेश केला. तर काय आश्चर्य ! त्याचे कोड नाहीसे होऊन अंगकांतीही उजळली. मग त्याला बरोबर घेऊन तो राजा आपला परिवार, आप्तजन, मित्र व नागरिक यांच्यासह गणेशलोकी गेला. "
अध्याय समाप्त

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.