Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय २३ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 23

 ।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-२३ 

 गोरक्षनाथांनी पर्वत सोन्याचा केला 


॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: || श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

               मच्छिंद्र, गोरक्ष व मीननाथ सौराष्ट्रातून पुढे दक्षिणेकडे निघाले. वाटेत त्यांना घनदाट अरण्य लागले. गोरक्षाला जवळ बोलावून मच्छिंद्रनाथ म्हणाला, “गोरक्षा, अरे फार दाट रान आहे रे पुढे. मला आत शिरण्याची सुद्धा भीती वाटते. गोरक्ष त्याला म्हणाला, “भिण्याचे कारण नाही." पण मनात मात्र विचार करू लागला, “माझ्या गुरूला भय का वाटते? काहीतरी धन त्यांच्याजवळ असणार, दुसरे काय!" पुढे गेल्यावर मच्छिंद्र म्हणाला, "गोरक्षा, माझी झोळी घेऊन पुढे जा. मीननाथाला पण ने. मी दुसऱ्या दिशेस जाऊन येतो." गोरक्षाला झोळी जड लागली. त्याने झोळीत हात घातला. पाहातो तर सोन्याची वीट. त्याने वीट उंच गवतात तत्काळ फेकून दिली आणि तेवढाच एक दगड झोळीत ठेवून दिला. त्याने मीननाथाला घेऊन पुढचा मार्ग धरला. थोड्याच वेळात ते एका सरोवराजवळ पोहोचले व त्याची झोळी दिली. त्याने आपली झोळी चाचपून पाहिली.

                           जड असे काहीतरी लागले. आत हात घालून पाहिले तो काय? एक दगड मात्र हाती आला. “सोन्याची वीट कुठे गेली? तेवढी सुद्धा तुला जड झाली का रे? कुठे टाकलीस?" असे ओरडत त्याने गोरक्षावर नाही नाही ते आळ घेतले. तेव्हा गोरक्षाने त्याला हात धरून डोंगरावर नेले. त्या डोंगरावर बसून त्याने सिद्धीयोंग मंत्र म्हटला, तेव्हा तो सगळा डोंगरच सोन्याचा झाला. मग तो मच्छिंद्राला म्हणाला, "ध्या हवे तेवडे सोने घ्या!

             परिस आहेस रे माझ्या राजा. तू चिंतामणी जवळ असतांना का चिंता करू ?" असे म्हणून मच्छिंद्राने गोरक्षाचा गौरव केला. गोरक्ष म्हणाला, "गुरुमहाराज, मग इतके दिवस तुम्ही तुमच्या झोळीत ती वीट का बाळगून ठेवली होती?" आपल्या देशात जाऊन पुष्कळ साधुना भोजन घालावे. ती वीट त्या कामी आली असती." "एवढेच ना? मग ती व्यवस्था करतो." असे म्हणून मीननाथाला गोरक्षाने जवळ घेतले. मग मंत्रांनी चित्रसेन गंधर्वाला बोलावले. चित्रसेन आकाशातून खाली उतरला. तेव्हा त्याला आज्ञा केली, "तू सर्व गंधर्वांना पाठव. सर्व ऋषींना बोलावून आण. देवतांना सांग, मच्छिंद्रनाथ बोलावीत आहेत. उत्तम भोजनाचा बेत आहे." "होय तुमचे कार्य लगेच करतो." चित्रसेन बोलला. अंतर्मनाने निमंत्रणे मिळून देव, ऋषी, सिद्ध, चारण, गंधर्व, सर्व कर्मदेवता- एकूण एक लोकपाल, दिक्पाल, भैरव, रुद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर सर्वजण त्या कनकपर्वतावर जमले. ऋद्धिसिद्धींनी सर्वांनी भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली.

                         सिद्धींनी अन्न सिद्ध केले, जलदेवतांनी सडे घातले, कुमारी, धनदा, नंदा, विमला, लक्ष्मी इत्यादी देवींनी सर्वांची पात्रे बादली आहवनी प्रत्येक देवतेला व ऋषीला कुशल विचारले. उपरिचर वसूने सर्वांना दक्षिणा दिली. मच्छिंद्र सर्वांना भेटत होता. लक्ष्मी गंगेचे पाणी वाढत होती. चित्रसेन गंधर्व विडे देत होता. एकशे आठ तीर्थे उष्ट्या पात्रांचा निर्गम करीत होती. अप्सरा नंतर गायननर्तन करू लागल्या. शंकर स्वतः पंगतीला होते. त्यावेळी गोरक्षाला गहिनीनाथाची आठवण झाली. "गुरूजी, मधु ब्राह्मणाच्या घरी गहिनीला ठेवले आहे, ते विसरलोच की! त्याला आणू का?" त्याने पटकन विचारले, “अरे हो, त्याला आणू या. मीननाथाला तो भेटेल. त्याला हा सोहळा पाहाता येईल." असे मच्छिंद्राने पत्र म्हणून लिहून सुरोचन गंधर्वाला दिले. सुरोचन गंधर्व ते पत्र घेऊन शीघ्रगतीने कनकगिरीला पोहोचला. मधु विप्र-गहिनीनाथाचा पालक पिता. त्याने पत्र वाचले. ते घेऊन येणारा सुरोचन त्याने निरखून पाहिला. तेव्हा त्याने त्याला आपले खरे स्वरूप दाखवले. 

                            "गहिनी-सात वर्षांचा बाळ, त्याला घेऊन जायचे. साक्षात् शंकराचे दर्शन होणार." तो विप्र लगेच मुलाला घेऊन निघाला. गंधर्वाने त्या दोघांना सहपरिवार मच्छिंद्राजवळ आणले. “हा गहिनी बाळ, हे मच्छिंद्रनाथ, हे गोरक्षनाथ यांनीच तुला माझ्याजवळ दिला होता." मधु म्हणाला. "नाथ तुम्हाला मी शरण आहे. वंदन करतो." गहिनीने गोड आवाजात म्हटले व शंकर तेथेच होते. त्यांच्याकडे तर गहिनी टक लावून पाहात होता. शंकरांनी त्याला जवळ घेतले. वत्सलतेने त्याच्या पाठीवर हात फिरविला. "हा करभाजन ऋषी आहे. याचा शिष्य म्हणून मीच पुढे अवतार घेईन. याला आत्ताच माझ्या समोर कानमंत्र द्या. गोरक्षा, ही माझी आज्ञा समज." "होय गहिनी, ये इकडे." असे म्हणून गोरक्षनाथाने गहिनीला अनुग्रह दिला. त्यावेळी सर्व देवही साक्षी होते.

                       भगवान शंकरांच्या समक्षच गहिनीनाथाचा अभ्यास तेथेच मग एक वर्षपर्यंत करून घ्यायचे ठरले. मग विप्राकडे गहिनीनाथ बारा वर्षे रहायचा होता. आता तर तो फक्त सात वर्षांचा होता. मधुविप्राला परत पाठविण्यात आले. गहिनी एक वर्षांने सिद्ध होऊनच घरी येईल असे त्याला सांगितले. ऋषी, मुनी, देवता यांची बोळवण करावयाची होती. गोरक्ष कुबेराला म्हणाला, “आपण हा गर्भाद्रि सोन्याचा झाला आहे तो घेऊन जा व त्याच्या बदल्यात भांडारातून वस्त्रेभूषणे आम्हांला द्या, म्हणजे सर्व देवांचा व ऋषींचा मान करता येईल." कुबेर म्हणाला, "छे छे । हा सोन्याचा पर्वत इथेच असू दे. मी वस्त्रभूषणे आणतो." कुबेराने मच्छिंद्राजवळ प्रत्येक ऋषी व देव यांना योग्य ती वस्त्रे अहेर देण्यासाठी आणून दिली. सर्वांना ती देऊन सन्मानाने परत पाठविण्यात आले.

                      मीननाथाने सोहळा पाहिला. मग उपरिचर वसू सिंहलद्वीपात मैनाकिनीकडे तो मीननाथाला घेऊन गेला. मैनाकिनी बाळाला कुरवाळीत व त्याचे मुके घेत रडू लागली. हे काय? याचे बाबा कुठे आहेत?" तिने अधिऱ्या आवाजात विचारले. उपरिचर वसु म्हणाले, "त्याची व तुझी भेट पुढे नक्की होईल. तू चिंता करू नकोस." त्या गर्भाद्री पर्वताला कुबेराने मग अदृश्य केले. पण श्रीशंकर, मच्छिंद्र, गहिनी, गोरक्ष हे तिथे वर्षभर राहिले. गहिनीचा योगाभ्यास पूर्ण झाल्यावर त्यालाही मधुविप्राकडे पाठविण्यात आले. शंकर गिरीदेवतेच्या रुपात तेथेच राहिले. त्यांना पुढे 'म्हातारदेव' असे नाव पडले. नंतर पुष्कळ वर्षांनी मच्छिंद्रादि नाथांनी त्या गर्भाद्रिस्थानीच समाधी घेतली.

अध्याय फलश्रुती :- घरातील सुवर्ण टिकून राहील.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या