।। श्री नवनाथ भक्तीसार ।।
अध्याय :-४०
सर्व नाथ विमानातून अमरावतीस गेले
।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
"बृहस्पती, तुम्ही आमचे गुरू. आम्हांला तुम्ही सर्व विद्या दिल्या, पण चर्पटीनाथ नावाचा जो अल्पवयाचा यती येथे आला होता, त्याला वाताकर्षण विद्या येते, ती काही आम्हांला येत नाही. त्यामुळेच नंदनवनात सर्व देवांसह त्याने मला निश्चेष्ट केले." देवसभेत इंद्र देवगुरूला सांगत होता. चर्पटीची सर्व कथा त्याने सांगितली. "काहीही करून वाताकर्षण विद्या देवांना आलीच पाहिजे, नाहीतर उद्या इंद्रपदही हातचे जायचे." अशी भीती त्याने व्यक्त केली, "नाथपंथी लोकांचे शिष्य बनून रानोमाळ भटकत राहायचे, त्यांनी कसेही हाल केले तरी ते सोसावे व भीक मागून ती विद्या शिकावी, हे काही देवांना शोभणार नाही. कचाला शुक्राचार्यांकडे पाठविले, तेव्हा किती अडचणी आल्या त्या आठवा. तेव्हा देवांकडे कमीपणा न येता वाताकर्षण विद्या कशी मिळवावी, याचा तुम्ही काही उपाय सांगा!" इंद्र नम्रतेने म्हणाला.
बृहस्पती म्हणाला, "ठिक आहे. एक युक्ती आहे तुम्ही सर्वांनी सोमयाग करण्याचा बेत ठरवा. त्यासाठी सर्व श्रेष्ठ देवांबरोबर नवनाथांना पण बोलवा. त्यांचा मोठा सन्मान करा. त्यांची स्तुती करा. ते प्रसन्न झाले की त्यांच्याजवळून प्रेमाने, गोड बोलून, ही विद्या मिळवा. हा एकच मार्ग आहे." "मच्छिंद्रांना प्रथम बोलवावे." इंद्र म्हणाला सर्व देवांनी होकार दिला. “पण मच्छिंद्राला बोलावण्यासाठी कोणाला पाठवावे? कोणाचे बोलावणे त्यांना मान्य होईल?" इंद्राने पुनः विचारले. "उपरिचरवसू. तो मच्छिंद्रांचा पिता आहे." बृहस्पती म्हणाला. त्याची सूचना सर्वांना पसंत पडली. इंद्राने उपरिचरवसूला बोलावले. मच्छिंद्राला आणि सर्व नाथगुरूंना सोमयागासाठी स्वर्गात बोलावण्यास सांगितले. अमरपुरीत सोमयागाची तयारी जोरात सुरू झाली.
उपरिचरवसूने बद्रिकाश्रमात जाऊन मच्छिंद्राला बोलावणे केले. त्यावेळी तेथे गोरक्ष, कानिफ, गोपीचंद, जालंदर, अडबंग, धर्मनाथ, इत्यादी नाथ होते. सर्वांना बोलावणे केले. त्यांना फार आनंद झाला. इंद्राने तुमचे सहाय्य मागितले आहे, असे सांगून वसूने त्यांचा मान ठेवला. आमंत्रणाप्रमाणे नाथ मंडळी विमानात बसून हेलापट्टणला गेली. मैनावतीला त्यांनी बरोबर घेतले. पुढे वडवाल गावात जाऊन वटसिध्द नागनाथाला घेतले. भर्तरी, रेवण, चर्पटी यांना बरोबर घेतले. चौऱ्याऐंशी सिध्द संगे घेतले आणि विमान अमरपुरीत आले, इंद्राने सर्वांचे स्वागत केले. मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून सिंहलद्वीपात सोमयाग करण्याचे ठरले. तिथे कीलोतला होती, मीननाथ होता. तेही सर्वांना भेटले.
इंद्राचा सोमयाग हा यज्ञ सुरू झाला. नाथ आहुती देत होते. इंद्र यज्ञाला बसला होता. एकीकडे मच्छिंद्राने अपत्यवात्सल्यामुळे वेळात वेळ काढून मीननाथाला अस्त्रविद्या शिकवायला सुरूवात केली. ते पाहून बृहस्पतीने एकान्तात इंद्राला सांगितले, "उपरिचरवसूला यजमान कर. तू मोकळा राहा." इंद्राने तसेच केले. उपरिचरवसू यजमान झाला. फावल्या वेळात मीननाथाला मच्छिंद्र अस्त्रे शिकवीत होता. तेव्हा मोराचे रूप घेऊन इंद्राने वाताकर्षणमंत्राचा प्रयोग तेवढा नीट ऐकून घेतला. बृहस्पतीची युक्ती सफल झाली. इंद्राच्या बोलण्यातून नंतर ही गोष्ट नाथांना समजली, तेव्हा "देवांना हे वाताकर्षण मंत्र उपयोगी होणारच नाहीत." शाप त्यांनी दिला. आता काय करावे! एवढे श्रम करून विद्या मिळविली, ती फुकट! देवांनी उ:शाप मागितला. तेव्हा त्यांनी उ:शाप दिला की, जर नाथपंथी लोकांना कोणीही देवांनी त्रास दिला नाही, तरच ही विद्या सफल होईल.
तेव्हापासून नाथपंथावर देवांची कृपा आहे, त्यांना दैवी त्रास होत नाही. आता सोमयाग झाला होता. मच्छिंद्रनाथासह सर्व यती पृथ्वीवरील तीर्थे पाहात हिंडले. किलोतलेचा निरोप घेताना मच्छिंद्राचे मन भरून आले. इंद्राने पृथ्वीवरील सह्यपर्वत तप करण्यास निवडला. तेथे त्याने बारा वर्षे अनुष्ठान केले. मणिकर्णिकेचे पाणी त्याने कमंडलूत आणले होते. ते तेथे शिखरावरून तो सोडीत होता. त्याची 'इंद्रायणी' नदी झाली. पुढे इंद्र स्वर्गात स्वस्थानी गेला. नाथांनी त्यानंतर भूलोकी अनेक वर्षे तीर्थाटन केले. त्यानंतर शके सतराशे दहापर्यंत त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे गुप्त स्थानी समाधी घेतल्या.
कानिफाने व मच्छिंद्राने गर्भगिरीत निवास केला. जालंदर 'जानपीर' या नावाने राहिला. गहिनीनाथ 'गैबीपीर' म्हणून राहिला. वडवाल येथे नागनाथ, माणदेशात विटेगावी रेवणनाथ असे राहिले. चर्पटी, अडबंगी व चौरंगीनाथ गुप्तपणे संचार करीत राहिले. भर्तरी पाताळात गेला. मीननाथ स्वर्गात गेला. गोरक्ष गिरनार पर्वतावर दत्ताश्रमात राहिला. गोपीचंद, धर्मनाथ, मैनावती वैकुंठात गेले. त्या सर्वांचे शिष्य चौऱ्यांशी सिध्द झाले. अशी ही नवनाथांची व त्यांच्या शिष्यांची अद्भुत कथा पूर्ण झाली.
अध्याय फलश्रुती:- कामधेनुप्रमाणे सर्व ईच्छा पूर्ण होतील, संपूर्ण नवनाथ वाचनाने पुण्य वाढेल.
अध्याय समाप्त
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.