।। श्री नवनाथ भक्तीसार ।।
अध्याय :-३९
चर्पटिनाथ व भगवान विष्णूंचे युद्ध
।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
प्रवासात चर्पटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थ पाहिली. उत्तरेस बद्रिकाश्रमापासून रामेश्वरापर्यंत तो हिंडत होता. मग त्याने स्वर्गातील सर्व स्थानेही पाहायचे ठरविले. तो पुन्हा बद्रिकाश्रमात गेला. शंकराचे दर्शन घेऊन त्याने व्यानास्त्राचा मंत्र म्हटला. त्यामुळे त्याला स्वर्गात जाणे शक्य झाले. मंत्राने भारलेले भस्म त्याने कपाळाला लावले होते. तो प्रथम ब्रह्मलोकात गेला. ब्रह्मदेवाला हा आपलाच पुत्र आहे हे कळताच त्याला त्याने जवळ घेतले आणि "तुझी काय इच्छा आहे?" असे विचारले. चर्पटीनाथ म्हणाला, "आपले दर्शन व्हावे एवढाच हेतू आहे." "मग आता इथेच राहा." ब्रह्मदेव म्हणाला. मग चर्पटीनाथ वर्षभर नारदासह तिथे राहिला.
एकदा नारद इंद्राकडे गेला. इंद्राने त्याची चेष्टा करून म्हटले, "या या, कळीचे नारद. या आता कुठे कळ लावणार?" इंद्राचे ते शब्द नारदाच्या मनाला लागले. नारदाचे कार्य हे माणसाच्या प्रारब्धाप्रमाणे त्याच्याकडून कर्मे घडून घेण्याचे असते. तो काही मुद्दाम भांडणे लावीत नसतो. नारदाला राग आला. त्याने इंद्राला म्हटले, "तसा प्रसंग तुमच्यावर लवकरच आणीन तरच खरा मी नारद!" नारद चर्पटीला घेऊन इंद्राचे नंदनवन दाखविण्यासाठी निघाला. पण चर्पटीला काही त्याच्याइतके वेगाने जाता येईना. मग नारद म्हणाले. "अरे, दत्तांनी तुला व्यानमंत्र दिला, आता त्रिखंडगमनाची कला मी शिकवितो." असे म्हणून नारदाने चर्पटीचा देह मंत्रशकीने असा केला की कोणत्याही क्षणी त्याला स्वर्गलोक, भुलोक, मृत्युलोक, पाताळलोक, तपोलोक, सत्यलोक सर्वत्र जाण्याची शक्ती प्राप्त झाली.
मग ते अलकापुरीत शिरले. नंदनवनातील मधुर फळांनी लगडलेले वृक्ष, सुगंधी पुण्यांचा घमघमाट, रंगीत पक्ष्यांचे कर्णमधुर कूजन, दिव्य गंध वाहून आणणारा वायू, यामुळे चर्पटी फारच उल्हासित झाला. त्याला फळे खावीशी वाटली. भूक तर कडकडून लागली होती. नंदनवनातील उत्तमोत्तम फळे त्या दोघांनी खाल्ली. जाता जाता कितीतरी फुले त्यांनी बरोबर घेतली. ब्रह्मदेवापुढे त्यांनी ती ठेवली व म्हटले, "बाबा, आम्ही रानात गेलो होतो तेव्हा छान छान फुले मिळाली. ती आणली आहेत तुमच्यासाठी." ब्रह्मदेवाने वरवर पाहून, "ठीक, ठीक" असे म्हटले आणि नारद व चर्पटीनाथ यांचे प्रेम पाहून तर त्याला आनंद झाला.
फुले नंदनवनातून आणली आहेत हे काही त्याला ठाऊक झाले नाही. नारद व चर्पटी नंतर रोजच नंदनवनात जाऊन फळांवर ताव मारू लागले. वनरक्षकांनी पाळत ठेवून चर्पटीला पकडले. नारद मागच्या मागे पळून गेला. चर्पटीला वनरक्षकांनी मार दिला. त्याने वाताकर्षण मंत्र टाकून त्यांचे प्राणच कासावीस केले. त्यांच्या मागून आणखी वनरक्षक आले. त्यांनी ही अवस्था पाहिली आणि चर्पटीची भयंकर तप्त मुद्रा पाहिली. तेही मागच्या मागे पळाले. त्यांनी इंद्राकडे जाऊन सांगितले, "कोणीतरी तपस्वी तरूण नंदनवनात शिरला आहे. त्याने वनरक्षकांचे प्राण घेतले आहेत. आमचे त्याच्यापुढे काही चालत नाही." इंद्राने देवगणांना सांगितले, "सर्वांनी जाऊन त्या तपस्व्याला नष्ट करा."
देवांचे सैन्य एकदम नंदनवनाकडे चाल करून गेले. ते येतांना पाहून युध्दाची लांबण न लावता एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा म्हणून चर्पटीने वाताकर्षण मंत्र म्हणून सर्व देवांना मुर्च्छित पाडले. इंद्राला युध्दाचे हेरांनी सांगितले तेव्हा ऐरावतावर बसून केंद्र स्वतःच निघाला. इंद्राने कैलासाला जाऊन शंकराचे साहाय्य घेतले. शंकराने आपल्या गणांना बोलावले. त्यांना आपल्याबरोबर येण्यास सांगितले. "विष्णूला बोलवा, सर्वांनी युध्दाची तयारी करा. शत्रू फार बलाढ्य आहे." असे म्हणत शंकर कैलासावरून नंदनवनाकडे निघाले. विष्णूला शंकराचा निरोपही सांगितला, तेव्हा विशेष विचार न करता तो आपले ५६ कोटी गण घेऊन वैकुंठातून रणवाद्ये वाजवीत निघाला.
नंदनवनाच्या दोन्ही बाजुंनी विष्णूचे व शंकराचे महाबलाढ्य सैन्य येतांना पाहून व प्रचंड रणगर्जना व रणवाद्यांचे आवाज ऐकून चर्पटीने, विष्णूने सुदर्शनाचा प्रयोग केला तर माझे काही चालणार नाही तेव्हा सुदर्शनचक्र जागीच मोहित होऊन निरूपयोगी झाले तर बरे. असा विचार करून मोहनास्त्र सोडले. भस्माची चिमूट फेकली. सुदर्शन जड झाले. सैन्यासह विष्णू नंदनवनात येऊन थडकला. तेव्हा चर्पटीने वाताकर्षण मंत्र टाकून ५६ कोटी विष्णूसेना एकदम निश्चेष्ट केली. पुढे चर्पटीच्या जवळची विष्णूची आयुधे व मणी, माळा पाहून ब्रह्मदेवाने विचारले, "अरे हे तू कोठून आणलेस?"
चर्पटी म्हणाला, "नंदनवनात गेलो होतो. तिथे फळे खाल्ली वनरक्षकांनी मला पकडले. म्हणून वाताकर्षण मंत्राने त्यांना मारले. मग काही वेळाने इंद्र सैन्यासह आला. त्याची पण तीच गती केली. मग विष्णू आला. तो व शंकर तर निश्चेष्ट आहेत म्हणा ना!" ब्रह्मदेव म्हणाला, "अरे मुला, विष्णू, मी व शंकर सर्व जगाचे कार्य करतो. ते दोघे पडून राहिले तर जग कसे चालेल? आता मला पण मंत्र टाकून निपचित कर म्हणजे एकदाचे समाधान होईल तुझे!" चर्पटी मोठ्या आशेने आपला पराक्रम दाखवायला आला होता, पण ब्रह्मदेवाने त्याला हे अगदी वेगळेच सांगितले. ब्रह्मदेव त्याला घेऊन त्वरेने नंदनवनात गेले. "बाळा, चर्पटी, तू या सर्वांना उठव."
हिरमुसलेल्या चर्पटीने संजीवनी मंत्राने शंकर, विष्णू, इंद्र व त्यांचे सैन्य अशा सगळ्यांना उठविले. ब्रह्मदेवाने चर्पटीला हाताने धरून विष्णूच्या व शंकराच्या चरणी घातला. चर्पटीनाथ म्हणजेच पिप्पलायन आहे अशी ओळख सर्व देवांना त्याने करून दिली. इतक्यात नारद वीणाझंकार करीत इंद्राकडे आले. त्याचा सत्कार झाल्यावर नारद साळसूदपणे म्हणाला, "देवराज, आपली फारच वाईट स्थिती झालेली मला कळली. फार दुःख वाटले. कोणी कळीचा नारद आला होता वाटतं!" इंद्र ते वाक्य ऐकताच चमकला. खरोखरच, नारदाचेच हे सगळे काम असावे ही शंका त्याला मनात आली. am ,.
"तुम्ही माझी कळीचा नारद म्हणून चेष्टा केली होती ना? मग मी माझे काम चोख केले, यापुढे तरी सांभाळून बोलावे, हे सर्वांनाच बरे!" त्यांनतर इंद्राने कधी नारदाची चेष्टा केली नाही. एक वर्षपर्यंत चर्पटी व नारद सत्यलोकात राहिले. मणिकर्णिकेत नित्य स्नान करावे व नारदाबरोबर गप्पा गोष्टी कराव्या असे वर्षभर राहिले त्यानंतर नारदासह चर्पटी पाताळातील सर्व स्थाने पहायला गेला. बळीने त्यांचे चांगले स्वागत केले. त्यामुळे चर्पटीने पाहिले नाही असे कोणतेही स्थान राहिले नाही.
अध्याय फलश्रुती:- युद्धात विजय प्राप्त होऊ शकेल.
अध्याय समाप्त
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.