Subscribe Us

श्री देवी महात्म्य कथा-१६ / Shri Devi Mahatmya Katha 16

श्री देवी महात्म्य मराठी

Shri Devi Mahatmya Marathi 

 अध्याय सोळावा 

 मूर्तीरहस्य वर्णन 


          श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीला माझा नमस्कार असो. हे विश्वजननी, प्रणवरुपिणी माते, तुझा जयजयकार असो. दैत्य कुळाचा विनाश करणाऱ्या विश्वाची मूळ प्रकृती असलेल्या हे महामाये, तुझा जयजयकार असो. दहा मुखांनी शोभणाऱ्या, अठरा हात असलेल्या, अष्टभुजा, कमलनयने तुझा सदैव विजय असो. हे नारायणी, तू अनेक रूपे, अवतार धारण करून दुष्ट-दुर्जनांना शिक्षा करतेस व आपल्या भक्तांचे रक्षण करतेस. 

|| श्रीगणेशाय नमः || श्री चंडिकायै नमः || 

          मागच्या अध्यायात वैकृतीक रहस्य सांगितले. आता हा कळसाध्याय म्हणजे शेवटचा अध्याय आहे या अध्यायाच्या अखेर देवी महात्म्य समाप्त होईल आता देवी. या अध्यायाच्या अखेर देवी महात्म्य समाप्त होईल. आता देवीभक्तांना मूर्तीरहस्य सांगतो. देवीच्या अंगभूत सहा देवी आहेत. नंदा, रक्तदन्तिका, शाकंभरी, दुर्गा, भीमा व भ्रामरी या त्या सहा देवी आहेत. या देवींच्या प्रत्यक्षमूर्ती आहेत. यांच्या स्वरूपाचे वर्णन म्हणजे मूर्तीरहस्य. 

          मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, "हे राजा, मी तुला पूर्वीच देवीचे आठ अवतार कोणते ते सांगितले. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तीन देवींचे अवतार, ध्यान व कार्य हे ही तुला सांगितले आहे. नंदा, रक्तदन्तिका, शताक्षी, भीमादेवी व भ्रामरी या उरलेल्या पाच अवतारांचे वर्णनही तुला सांगितले. आता त्यांचे स्वरूप ऐक. 

          हे राजा, नंदा नावाची देवी नंदराजाच्या व यशोदेच्या पोटी अवतार घेईल. या देवीचे जो स्तवन व पूजन करील त्याला अवघे त्रैलोक्य वश होईल. अठ्ठाविसाव्या युगात शुंभ आणि निशुंभ पुन्हा उत्पन्न होतील. ही नंदादेवी या दैत्यांचा वध करील. या देवीची शरीरकांती सोन्यासारखी पिवळी आहे. ही पिवळ्या रंगाचे सुंदर वस्त्र परिधान करते. ही आपल्या शरीरावर सुवर्णालंकार धारण करते. हिच्या चारही हातात कमल, अंकुश, पाश व शंख शोभून दिसतात. ही देवी इंदिरा, कमला, लक्ष्मी व श्री या नावाने ओळखली जाते. ही सुवर्णासमान पिवळ्या कमळावर विराजमान झाली आहे. अशा या नंदादेवीचे स्मरण केले असता अवघे त्रैलोक्य हाती येते. 

          हे राजा, पूर्वी मी तुला रक्तदन्तिका नावाच्या देवीचा परिचय करून दिला होता. त्या देवीचे स्वरूप कसे आहे ते सांगतो. ही देवी सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त करणारी आहे. या देवीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. ही रक्तवर्ण असून तिचे अलंकार लाल रंगाचे आहेत. हिची शस्त्रास्त्रे, नेत्र, डोक्यावरील केस, धारदार नखे, दात, सर्व काही लाल रंगाचे आहे. म्हणून हिला रक्तदन्तिका असे म्हणतात. हिचे स्वरूप अत्यंत भयानक आहे. हिला लाल रंगाचे उपचार प्रिय आहेत. 

          ही देवी आपल्या भक्तांवर मातेसमान प्रेम करते व त्यांची सेवा करते. या देवीचा आकार पन्नास कोटी योजने पृथ्वीसारखा अत्यंत विशाल आहे. तिची दोन्ही स्तन मेरूपर्वतासारखे स्थूल, विशाल व अत्यंत सुंदर आहेत. ते कठोर असले तरी पूर्णानंदाचा सागर आहेत. आपल्या भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करण्यासाठी ती देवी त्यांना स्तनपान देते. या देवीने आपल्या चारही हातात खडग, पानपात्र, मुसळ व नांगर ही आयुधे धारण केली आहेत. हिला रक्तचामुंडा व योगेश्वरी असे म्हणतात. 

          या देवीने सर्व चराचर विश्व व्यापले आहे. जो या रक्तदन्तिका देवीची भक्तिपूर्वक पूजा-अर्चा करतो तोही चराचर विश्वाला व्यापून राहतो. त्याला सर्व उपभोगाची प्राप्ती होते व शेवटी त्याला देवीची सायुज्यता (मोक्ष) प्राप्त होते. जो दररोज या रक्तदन्तिका देवीच्या शरीराचे हे स्तवन, स्मरण करतो त्याची सेवा स्वतः देवी करते व त्याचे रक्षण करते.

          शताक्षी देवी तीच शाकंभरी. तिलाच दुर्गादेवी असेही म्हणतात. आता या तिन्ही नावाची व्याख्या सांगतो. पृथ्वीवर शंभर वर्षे अवर्षण झाले असता सर्व ऋषी-मुनींनी देवीचे स्तवन केले. त्यावेळी देवीने अयोनीस्वरूप धारण करून सर्व ऋषींमुनींकडे शंभर नेत्रांनी पाहिले. म्हणून त्या वेळी देवीला शताक्षी हे नाव प्राप्त झाले. त्यावेळी देवीने आपल्या शरीराच्या ठिकाणी शाकादी सर्व प्रकारचे अन्न निर्माण करून सर्व लोकांचे पोषण केले. म्हणून तिला शाकंभरी असे नाव प्राप्त झाले. दुर्गम नावाच्या दैत्याला ठार मारले म्हणून त्यावेळी तिला दुर्गा असे नाव मिळाले. 

          शाकंभरी देवीच्या शरीराची कांती नील रंगाची आहे. तिचे नेत्र निलकमळासारखे असून नाभी खोल व तीन वळ्यांनी सुशोभित झालेली आहे. तिचे दोन्ही स्तन दीर्घ पुष्ट, उंच व कठोर आहेत. ती परमेश्वरी कमलासना असून तिने आपल्या हातात बाणमुष्टी, कमळ, पानेफुले व शाकादी अन्नपदार्थ व अत्यंत तेजस्वी धनुष्य धारण केले आहे. तिच्या हातातील शाक समूह मनोवांच्छित सर्व रसांनी पूर्ण, फलमुल आदींनी संपन्न असून तहान-भूक व मृत्यूभय नाहीसे करणारा आहे. या देवीलाच शाकंभरी, शताक्षी व दुर्गा असे म्हणतात. 

          ती देवी शोकरहित, दुष्ट दुर्जनांचे दमन करणारी असून पापताप इत्यादींना शांत करणारी, नष्ट करणारी आहे. तीच उमा, गौरी, सती, चंडी, कालिका व पार्वती आहे. जो मनुष्य शाकंभरी देवीचे स्तवन करतो, ध्यान करतो, तिच्या नावाचा जप करतो, तिची पूजा करतो, तिला नमस्कार करतो त्याला अन्नपान व अमृतस्वरूप अक्षयफलाची प्राप्ती होते. 

          आता भीमादेवीचे ध्यान सांगतो. जेव्हा उन्मत्त झालेल्या दैत्यांनी गोब्राह्मणांचा छळ सुरू केला तेव्हा सर्व ऋषींनी अंबिकेचे स्तवन केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अंबिकेने हिमालयावर भीमरूप धारण केले व सर्व दैत्यांचा संहार केला. त्यावेळी सर्व ऋषींनी तिचे भीमादेवी असे नाव ठेवले. त्या भीमादेवीचा रंग निळा आहे. तिने निळे वस्त्र परिधान केले आहे. तिने नील रत्नांचे अलंकार धारण केले आहेत. भयंकर अशा दातांनी व दाढांनी तिचे मुख अत्यंत भेसुर दिसते. अत्यंत विशाल नेत्र असलेल्या या देवीचे स्तन अत्यंत पुष्ट, दीर्घ व उंच आहेत. चतुर्भुजा असलेल्या त्या देवीने आपल्या हातात चंद्रहास नावाचे खडग, डमरू, मुंडके व पानपात्र धारण केले आहे. ती देवी एकवीरा, कालरात्री व कामदा या नावाने प्रसिद्ध आहे. 

          हे राजा, आता तुला भ्रामरीदेवीचे स्वरूप सांगतो. अत्यंत भयंकर अशा अरुणासुराने सर्व लोकांचा छळ सुरू केला. त्या वेळी सर्व देवांनी देवीचे स्तवन केले. प्रसन्न झालेल्या देवीने भ्रामरी स्वरूप धारण करून त्या दैत्यांचा संहार केला. मग सर्व देवऋषींनी भ्रमररूप धारण केलेल्या त्या देवीची प्रार्थना करून तिला भ्रामरीदेवी असे नाव दिले. त्या भ्रामरीदेवीची अंगकांती विचित्र म्हणजे अनेक रंगाची आहे. तिची वस्त्रे व अलंकारही चित्र-विचित्र आहेत. असंख्य भ्रमर तिच्या शरीरावर रुंजी घालीत असतात. चित्रभ्रमरपाणी व महामारी या नावांनी तिचे माहात्म्य सांगितले जाते. हे राजा अशाप्रकारे मी तुला जगनमाता चंडिका देवीच्या मूर्ती सांगितल्या. या सर्व देवी कामधेनु समान आहेत. त्यांचे स्तवन कीर्तन केले असता सर्व कामना पूर्ण होतात. 

          हे राजा, तुला देवीचे मुख्य अष्टअवतार सांगितले. कमला, सावित्री, पार्वती, शची, अनुसया, सरस्वती, आदिती, गायत्री, सीता, अरुंधती, अणिमादीसिद्धी, मातृका, चामुंडा, योगिनी, कृष्णाच्या सोळा सहस्र पत्नी, अष्टनायिका, रुक्मिणी, नवदुर्गा या सर्व देवीच्याच अवतार आहेत. देवीचे असे अनंत अवतार आहेत. ब्रम्हादिकांनाही त्यांचा अंत लागत नाही. हे राजा, देवीच्या मूर्तीचे हे आख्यान(रहस्य) सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे. हे अत्यंत गोपनीय रहस्य आहे.हे तू इतर कुणालाही सांगू नये. 

          तू प्रयत्नपुर्वक देवीची आराधना कर. सप्तशतीच्या म्हणजेच देवी महात्म्याच्या पठणाने, श्रवणाने मनुष्य सप्तजन्मातील ब्रह्महत्यादि महापातका पासून सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होतो. म्हणूनच मी तुला सर्वकाम फलप्रद, अत्यंत गूढ, असे देवी महात्म्य सांगितले आहे. देवीच्या कृपेने तू सर्वमान्य होशील. देवी सर्वस्वरूपमयी आहे. संपूर्ण विश्व हे देवीमय आहे. 

          संस्कृत सप्तशतीत एकूण सातशे श्लोक आहेत. ते सर्व श्लोक महामंत्रस्वरूप आहेत. ज्यांना संस्कृत भाषा चांगली अवगत असेल त्यांनी सप्तशतीचा पाठ आवर्जून करावा. परंतु ज्यांना संस्कृत भाषा येत नाही त्यांनी या देवी महत्म्याचे पूर्ण श्रद्धेने पठण श्रवण करावे. फलप्राप्ती सगळीकडे सारखीच. मूळ संस्कृत सप्तशती व गद्य मराठी भाषेतील हा देवी महात्म्य ग्रंथ समानच आहे. या देवी महात्म्य ग्रंथाच्या श्रवण पठणाचे फळ स्वतः महादेव सांगतात. हा ग्रंथ म्हणजे साक्षात चिंतामणी आहे, असे म्हणून पार्वतीमाता श्रवण करते.  

          या महात्या्   चे एक आवर्तन केले असता, सर्व सिद्धी प्राप्त होतात. दोन आवर्तने केली असता उत्तम पुत्राची प्राप्ती होते. तीन आवर्तने केल्याने सर्व पीडा नाहीशा होतात. पाच आवर्तनाने ग्रहशांती होते. मोठे भय उद्भवली असता सात आवर्तने करावीत. नऊ आवर्तने केली असता वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी अकरा आवर्तने करावीत. बारा आवर्तने केली असता शत्रूचा नाश होतो. चौदा आवर्तने केल्याने स्त्री किंवा पुरुष वश होतो. पंधरा आवर्तने केली असता संपत्ती सौख्य यांची प्राप्ती होते. सोळा आवर्तने केली असता पुत्रपौत्र धन-धान्य आदी प्राप्त होतात. पंचवीस आवर्तने केल्याने बंधमुक्तता होते.  

          या देवी महात्म्य ग्रंथाची शंभर आवर्तने केली असता क्षयादी रोग नाहीसे होतात. प्रजानाश, कुलनाश, आयुष्यनाश होण्याचा प्रसंग आला किंवा शत्रू वृद्धी झाली असता शंभर पारायणे करावी. शंभर पारायणे केली असता सर्व मनोरथ पूर्ण होतात. एकशे आठ किंवा एक हजार आवर्तन केली असता शंभर अश्वमेध यज्ञांचे फळ प्राप्त होते. शेवटी मोक्षप्राप्ती होते. 

          महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांचे गुणगान करणारे देवी महात्म्याचे हे सोळा अध्याय म्हणजे देवीचे संपूर्ण चरित्र आहे. यांच्या श्रवण पठणाने भवानी माता प्रसन्न होते. मात्र नुसत्या श्रवण पठण याचा उपयोग नाही, त्यात भावभक्ती हवी, पूर्ण श्रद्धा हवी. ती नसेल तर सगळे व्यर्थ आहे. म्हणून भक्तिने श्रवण पठन करावे. भक्तिपूर्वक देवीची पूजा, मंत्र, जप, होमहवन करावे. देवीच्या उपासनेत ज्ञानाची पांडित्याची गरज नाही. गरज आहे ती भावभक्तिची, परम श्रद्धेची.पत्रं, पुष्पं,  फलं तोयं इत्यादी काहीही भक्तीने अर्पण केले असता देवी त्याचा आनंदाने स्वीकार करते. मनात भावभक्ती नसेल तर कितीही राजोपचार अर्पण केले तरी ते सर्व व्यर्थ जातात. म्हणून ईश्वर कृपेसाठी साधीभोळी भावभक्ती आवश्यक आहे. 

          या देवी महात्म्याची किती पारायणे करावी, देवी ला कोण कोणते उपचार अर्पण करावेत, होमात किती आणि कोणत्या द्रव्यांचे हवन करावे यासाठी कोणतेही बंधन नाही. शुद्ध अंतःकरणाने पूर्ण श्रद्धा भक्तीने केलेली अल्पसाधना मोठे फळ देते. आता या देवी महात्म्य ग्रंथाची अवतरणिका सांगतो.

          पहिल्या अध्यायात मेधा ऋषीने सूरथ राजाला व समाधीला देवी महात्म्य सांगितले. महाकालीची उत्पत्ती व मधुकैटभ यांचा वध यांचे वर्णन केले आहे. दुसऱ्या अध्यायात महालक्ष्मीची उत्पत्ती व महिषासुराच्या सेनेचा वध सांगितला. तिसऱ्या अध्यायात महिषासुर वधाची कथा आली असून, चौथ्या अध्यायात इंद्रादी देवतांनी देवीची स्तुती केली आहे. पाचव्या अध्यायात महासरस्वतीचे अख्यान व देवदूत संवाद हा विषय आलेला आहे. सहाव्या अध्यायात धूम्रलोचन वधाची कथा असून, सातव्या अध्यायात चंड मुंड दैत्यांच्या वधाची कथा सांगितली आहे. 

          आठव्या अध्यायात रक्तबीज वधाची कथा व नवव्या अध्यायात निशुंभ वधाची कथा आली आहे. दहाव्या अध्यायात शुंभ दैत्याच्या वधाची कथा असून, नारायणी स्तुती व देवीचे वरदान हे विषय अकराव्या अध्यायात आले आहेत. बाराव्या अध्यायात देवी चरित्राच्या पठणाने महात्म्य सांगितले असून, तेराव्या अध्यायात सुरथ आणि वैश्य यांना देवीने दिलेल्या वरदानाची कथा सांगितली आहे. चौदाव्या अध्यायात प्राधानिक रहस्य वर्णन आले असून, पंधराव्या अध्यायात वैकृतीक रहस्य सांगितले आहे. शेवटच्या सोळाव्या अध्यायात मूर्ती रहस्य आले असून, देवी महात्म्य ग्रंथ पठणाचे फळ, पाठविधी, देवीची आराधना इत्यादी विषय आले आहेत. 

          अशारितीने श्री जगदंबेच्या कृपेने सोळा अध्यायांचा देवी महात्म्य हा मराठी भाषेतील गद्य ग्रंथ पूर्ण झाला. हे सोळा अध्याय म्हणजे षोडशोपचारांनी देवीची केलेली पूजाच आहे. हा सोळा अध्यायांचा ग्रंथ म्हणजे सोळा कलांचा चंद्र असून, आपल्या भक्तांचे त्रिविध ताप शमवण्यासाठी स्वतः देवीने तो निर्माण केला आहे. हा सोळा अध्यायांचा ग्रंथ म्हणजे सोळा दलांचे कमळ असून जगदंबेला ते अर्पण केले आहे आणि देवीने मोठ्या प्रेमाने ते स्वीकारले आहे. हे सोळा अध्याय म्हणजे देवीच्या कंठातील सोळा मातृका आहेत किंवा अंबिकेने आपल्या कंठात धारण केलेले हे सोळा स्वर आहेत. 

          या देवी महात्म्य ग्रंथाचे श्रवण पठण केले असता, सर्व प्रकारच्या पीडा नाहीशा होतात. सर्व संकटे लयाला जातात. श्री वेदव्यासांनी पुराणात जसे वर्णन केले आहे, तसेच येथे सांगितले आहे. मूळचे गाळलेले नाही व पदरचे सांगितलेले नाही. देवीच्या सज्जन भक्तांनी या ग्रंथाचे परम श्रद्धेने श्रवण पठण करावे. जेथे या ग्रंथाचे पठण चालू असते, तेथे स्वतः देवी येते व ग्रंथ श्रवण करते. त्या जगनमातेला माझे कोटी कोटी नमस्कार. 

          श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील मूर्ती रहस्य वर्णन नावाचा सोळावा अध्याय समाप्त!

पंधरावा अध्याय⬅️

➡️संपूर्ण नवनाथ भक्तीसार 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या