श्री देवी महात्म्य मराठी
Shri Devi Mahatmya Marathi
अध्याय पंधरावा
वैकृतीक रहस्य
मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, “हे राजा, आता तुला देवीच्या ध्यान पूजनआदी संबधी सांगतो. यापूर्वी मी तुला सत्वप्रधान त्रिगुणमयी महालक्ष्मीचे राजसी, तामसी, सात्विकी भेद सांगितले. तीच देवी शर्वा, चंडिका, दुर्गा, भद्रा व भगवती इत्यादी नावांनी ओळखली जाते. तमो गुणात्मक महाकाली भगवान विष्णूंची योगनिद्रा आहे. मधू आणि कैटभ या असुरांचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवांनी जीचे स्तवन केले तिचे नाव महाकाली. तिला दहा मुखे, दहा हात व दहा पाय आहेत. तिचा वर्ण काजळा सारखा काळा आहे. तीस नेत्रांनी ती सुशोभित आहे. चमकणाऱ्या दात, दाढा असलेले तिचे रूप महाभयंकर आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्री देव्यै नमः ॥
तथापि ती रूप, सौभाग्य, कांती व ऐश्वर्याचे अधिष्ठान म्हणजे प्राप्तीस्थान आहे. तिने आपल्या दहा हातात खड्ग, बाण, गदा, शूल, चक्र, शंख, भुशुंडी, परीघ, धनुष्य व रक्त गळत असलेले मुंडके धारण केलेले आहेत. अशी ही महाकाली भगवान विष्णूंची अगाध माया आहे. या देवीची आराधना, उपासना केली असता चराचर विश्व उपासकांच्या हाती येते. सर्व देवतांच्या शरीरापासून जी प्रकट झाली होती ती अनंत कांतीने युक्त असलेली त्रिगुणी देवी साक्षात महालक्ष्मी होय. हिलाच त्रिगुणमयी प्रकृती असे म्हणतात. (प्रकृती सह रूपांतर झालेल्या देवीचे ध्यान, पूजा इत्यादींचे वर्णन याला वैकृतिक रहस्य असे म्हणतात.)
हीच ती महिषासुरमर्दिनी देवी. हिचे मुख गौर, हात शामल रंगाचे, स्तन श्वेत वर्णाचे, कमर आणि पाय लाल रंगाचे, मांड्या व पोटऱ्या निळ्या रंगाच्या आहेत. ही अजिंक्य असल्याने हिला स्वतःच्या शौर्याचा अभिमान आहे. हिच्या कमरेच्या पुढच्या भागावर चित्रविचित्र रंगाचे वस्त्र असल्यामुळे ती अतिशय सुंदर दिसते. हिची माला, वस्त्र व अंगराग सर्व काही चित्रविचित्र आहे. हि कांती, रूप व सौभाग्य यांनी सुशोभित आहे. हिला जरी हजारो हात असले तरी, हिला अष्टभुजा समजून हिची पूजाअर्चा करावयास हवी.
हिच्या उजव्या बाजूच्या खालच्या हातापासून डावीकडच्या खालच्या हातापर्यंत क्रमशः कोणकोणती शस्त्रास्त्रे तिने धारण केली आहे, ते सांगतो. रुद्राक्षमाला, कमळ, बाण, घंटा, खड्ग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशु, शंख, पाश, शक्ती, दंड, चर्म (ढाल), धनुष्य, पानपात्र व कमंडलू या अठरा आयुधांनी तिचे हात सुशोभित झाले आहेत. ही देवी कमलासनावर विराजमान झालेली आहे. ही महालक्ष्मी सर्व देवमयी असून सर्वांची ईश्वरी आहे. हे राजा, अशा या महालक्ष्मीची जो मनोभावे पूजाअर्चा करतो तो सर्व लोकांचा, सर्व देवांचा स्वामी होतो. इंद्रादी सर्व देव त्यांच्या आज्ञेचे पालन करतात.
सत्वगुणमयी अशा गौरीच्या म्हणजे पार्वतीच्या देहापासून जी प्रकट झाली, ती साक्षात महासरस्वती देवी होय. हिनेच शुंभ-निशुंभ दैत्यांचा संहार केला. हे राजा, या देवीला आठ हात आहे. व हिने आपल्या हातात क्रमशः बाण, मुसळ, शूल, चक्र, शंख, घंटा, नांगर व धनुष्य ही आठ शस्त्रे धारण केलेली आहेत. या देवीची भक्तिपूर्वक पूजा करणाऱ्याला सर्वज्ञता प्राप्त होते. हे राजा, मी तुला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तीन देवींच्या मूर्तीचे स्वरूप सांगितले. आता जगनमाता महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या तीन मूर्तींची उपासना कशी करावी ते सांगतो.
जेव्हा महालक्ष्मीची पूजा करावयाची असते, तेव्हा तिच्या उजवीकडे महाकालीची, डावीकडे महासरस्वतीची स्थापना करून पूजा करावी. पाठीमागच्या बाजूस तीन देवता युगुलांची पूजा करावी लागते. महालक्ष्मीच्या पाठीमागे मध्यभागी सरस्वती व ब्रह्मदेव यांची पूजा करावी. तिच्या उजवीकडे गौरीसह रुद्राची पूजा करावी व डावीकडे लक्ष्मीसह विष्णूची पूजा करावी. महालक्ष्मी इत्यादी तीन देवींच्या जवळ पुढील तीन देवीची पूजा करावी. मध्यभागी महालक्ष्मीच्या पुढे अठरा हातांच्या महालक्ष्मीची पूजा करावी. तिच्या डावीकडे दहा मुखाच्या महाकालीचे व उजवीकडे अष्टभुजा महासरस्वतीची पूजा करावी.
हे राजा, जेव्हा अष्टदशभुजा महालक्ष्मीची किंवा दशमुखी कालीची किंवा अष्टभुजा सरस्वतीची पूजा करावयाची असते, तेव्हा सर्व अरिष्ठांच्या, संकटांच्या नाशासाठी तिच्या दक्षिणभागी कालाची व डावीकडे मृत्यूचीही उत्तम प्रकारे पूजा करावी लागते. जेव्हा शुंभासुराच्या संहार करणार्या् अष्टभुजा देवीची पूजा करावयाची असते, तेव्हा तिच्याबरोबर ब्राह्मी, माहेश्वमरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, नारसिंही, ऐंद्री, शिवदूती व चामुंडा या तिच्या नऊ शक्तींची पूजा करावी. त्याचप्रमाणे तिच्या उजवीकडे रुद्राची व डावीकडे गणेशाची पूजा करावी लागते.
“नमो दैव्यै” इत्यादी स्तोत्राने महालक्ष्मीची पूजा करावी. त्याचप्रमाणे तिच्या तीन अवतारांची पूजा करताना तिच्या चरित्रातील स्तोत्र, मंत्राचा उपयोग करावा. हे राजा, अठरा हातांची ही महिषासुरमर्दिनी महालक्ष्मीच विशेष प्रकारे पूजनीय आहे. कारण तिलाच महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली असे म्हणतात. तीच सर्व पुण्यपापांची अधिश्वरी व संपूर्ण विश्वाची महेश्वरी आहे. महिषासुरमर्दिनी महालक्ष्मीची जो भक्तिभावाने आराधना, उपासना करतो तो जगाचा स्वामी होतो. म्हणून या जगाला आधार देणाऱ्या भक्तवत्सल भगवती चंडिका देवीची श्रद्धापूर्वक आवर्जून पूजा करावी.
देवीला पवित्र जलाने स्नान घालावे. तिला अर्घ्य इत्यादी अर्पण करावे. गंध, अक्षदा, पुष्प, धूप, दीप अर्पण करून भक्ष, भोज्य, पेय इत्यादी उत्तमोत्तम पदार्थांचा तिला नैवेद्य अर्पण करावा. नमस्कार करून शुद्ध व पवित्र जल, सुगंधित चंदन, तांबूल इत्यादींनी देवीची भक्तिभावाने पूजा करावी. देवीच्या समोर डावीकडे मस्तक तुटलेल्या महादैत्य महिषासुराची पूजा करावी. कारण महिषासुराला देवीची सायुज्य मुक्ती मिळाली होती. त्याचप्रमाणे देवीच्या समोर उजवीकडे देवीचे वाहन असलेल्या सिंहाची पूजा करावी. कारण तो सिंह संपूर्ण धर्माचे प्रतीक असून, षड्विध ऐश्वर्याने युक्त आहे. तो धर्मच चराचर विश्वाचा आधार आहे. तोच सिंहाचा अवतार धारण करून देवीची सेवा करीत होता.
देवीची पूजा केल्यानंतर एकाग्रचित्ताने देवीचे स्तवन करावे. देवीच्या स्तोत्राचा पाठ करावा. मग हात जोडून देवीचे चरित्राने तिचे स्तवन करावे. देवी महात्म्याचा संपूर्ण पाठ करावा. पाठ समाप्तीनंतर देवीला व देवीचरित्राला प्रदक्षिणा घालावी. साष्टांग नमस्कार घालावा. देवीपुढे हात जोडून बसावे व देवीच्या उपासनेत, चरित्र पठणात कळत-नकळत अज्ञानाने झालेल्या चुकीबद्दल, अपराधाबद्दल देवीला मनःपूर्वक क्षमा प्रार्थना करावी. सप्तशतीतील प्रत्येक श्लोक मंत्रस्वरूप आहे. त्या मंत्रांनी देवीला घृत(तूप) तीळमिश्रित खिरीच्या आहुती द्याव्यात किंवा सप्तशतीत जी स्तोत्रे आहेत, ती म्हणत म्हणत देवीला उद्देशून पवित्र हविष्यन्नाचे हवन करावे.
होम हवन झाल्यानंतर एकाग्रचित्ताने देवीच्या नाममंत्राचा जप करावा व पुन्हा तिची पूजा करावी. त्यानंतर मन व इंद्रिये यावर ताबा ठेवून, हात जोडून अत्यंत नम्रतेने देवीला नमस्कार करावा. देवीचे आपल्या अंतकरणात स्थापना करून, त्या सर्वेश्वरी चंडिका देवीचे दीर्घकाळ चिंतन करावे. चिंतन करता करता त्यात तन्मय व्हावे. अशा रीतीने जो मनुष्य दररोज मोठ्या भक्तिभावाने परमेश्वरीची पूजाअर्चा, स्तवन चिंतन करतो तो मनोवांचीत सर्व सुखोपभोगांचा उपभोग घेतो. शेवटी त्याला देवीची सायुज्य मुक्ती प्राप्त होते.
भक्तवत्सल अशा चण्डिकेची जो दररोज पूजाअर्चा करीत नाही, त्याची सर्व पुण्ये देवी जाळून भस्म करते. म्हणून हे राजा, तू सुद्धा सर्व लोक महेश्वरी, चण्डिकेची यथाविधी पूजा कर. त्यामुळे तुला सर्व सुखांची प्राप्ती होईल. विशेषतः या कलियुगात इतर देवापेक्षा देवीची आराधना लवकर फळ देणारी आहे. इतर देवांच्या मंत्रापेक्षा देवीचे मंत्र, तिची स्तोत्रे लवकर सिद्ध होतात व तात्काळ फलप्राप्ती होते. म्हणून प्रत्येकाने मनोभावे देवीची पूजा-अर्चा करावी, मंत्रजप करावा, स्तोत्र पाठ करावा. यामुळे इहपर कल्याण होते.
अशा प्रकारे या अध्यायात वैकृतिक रहस्य सांगितले आहे. या अध्यायाचे श्रवण पठन केले असता सर्व बाधांचे निवारण होते. सर्व संकटातून मुक्ती मिळते. या अध्यायाचे जिथे श्रवण पठण चालू असते, तेथे देवी स्वतः उपस्थित राहून श्रवण करते. या अध्यायाच्या श्रवण पठणाने देवी सर्व मनोरथ पूर्ण करते. सर्व पुरुषार्थ सिद्धीला जातात.
श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील वैकृतिक रहस्य नावाचा पंधरावा अध्याय समाप्त!

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.