।। श्री पांडव प्रताप ग्रंथ ।।
अध्याय पाचवा
कच - देवयानी आख्यान
वैशंपायन म्हणाले की, ' हे जनमेजय राजा ! प्रत्यक्ष परमेश्वरापासून तुझ्या वंशाची वंशावळी आहे. ह्याच तुझ्या वंशांत ब्रह्मदेवापासून दहावा पुरुष ययाति राजा हा झाला. ' हें ऐकून जनमेजय राजा म्हणाला कीं, त्याची सर्व कथा ऐकावी अशी माझी इच्छा आहे. तें ऐकून वैशंपायन म्हणाले की, 'देव आणि दैत्य यांच्यांत आरंभा पासूनच वैरभाव होता, त्यामुळे त्यांच्यांत वारंवार लढाया होत असत. त्या युद्धांत पुष्कळ राक्षस मरण पावत, परंतु त्यांना 'राक्षसांचा गुरु शुक्राचार्य हा संजीवनी मंत्राच्या सामर्थ्यानें जिवंत करीत असे. परंतु देवाकडील जे लोक मरत त्यांना मात्र कोणीच जिवंत करू शकत नसे. कारण तो मंत्र देवांना येत नव्हता. तेव्हां तो मंत्र आपणांस प्राप्त व्हावा म्हणून देवांना एक युक्ति सुचली व त्यांनीं देवांच्या गुरूचा मुलगा कच याने शुक्राचार्याजवळ जाऊन कोणत्या तरी युक्तीनें तो मंत्र शिकावा अशी सूचना केली व त्याला शुक्राचार्याकडे पाठविलें. कचानें शुक्राचार्याकडे येऊन विनंती केली व त्याच्या घरी राहून संजीवनी विद्या शिकण्याची सोय करून घेतली, कच हा देवांकडून आल्याचे राक्षसांस माहीत होते.
त्यामुळे एके दिवशीं तो शुक्राचार्याच्या गाई राखत रानांत हिंडत असतां, योग्य संधि साधून राक्षसांनी त्यास ठार केले. जेव्हां संध्याकाळी गाई परत आल्या तेव्हां त्यांच्याबरोबर कच परत न आल्यामुळे शुक्राचार्यास काळजी वाटू लागली. शुक्राचार्याला देवयानी नांवाची एक अतिशय सुंदर मुलगी होती. तिचें कचावर प्रेम होतें. त्या दिवशीं कच लवकर परत न आल्यानें ती फार काळजीत पडली. नंतर शुक्राचार्याला अंतर्ज्ञानानें असें समजलें कीं, राक्षसांनी कचास ठार केलें आहे. मग त्यानें आपल्या मंत्रसामर्थ्याने कचास जिवंत केलें. राक्षसांस एक गोष्ट समजली कीं, आपण कचास ठार केलें, परंतु त्याचे प्रेत तसेंच टाकून दिल्यामुळे शुक्राचार्य कचास जिवंत करूं शकला, म्हणून राक्षसांनी परत संधि सांपडतांच कचास ठार केलें व त्याचे अत्यंत बारीक बारीक तुकडे केले. नंतर ते तुकडे वाघ, कोल्हे, लांडगे इत्यादि रानांतील प्राण्यांना खावयास दिले.
तरीपण परत देवयानीकरितां शुक्राचार्यानें कचास जिवंत केलें. शेवटीं राक्षसांनी एक निराळीच युक्ति केली. त्यांनी पुन्हां संधि पाहून कचास ठार मारून त्याला जाळलें व त्याची राख दारूंत मिसळून ती शुक्राचार्यास पिण्याकरिता दिली. त्यां दिवशी कचाची येण्याची वेळ निघून गेली, तेव्हा देवयानीस फार वाईट वाटू लागलें. देवयानी शुक्राचार्याची अतिशय लाडकी होती. त्यामुळे त्यानें कचाचा परत शोध केला. तेव्हां तो आपल्या पोटांत आहे, असें त्यास समजलें परंतु आतां कचास परत जिवंत करण्यांत अडचण अशी होती कीं, जर कचास जिवंत केले तर शुक्रचार्यास मरण येणार होते. आणि संजीवनी मंत्र दुसऱ्या कोणास ठाऊक नव्हता. शुक्राचार्यांनें देवयानीला आपली अडचण सांगितली तेव्हां ती म्हणाली की, ' कचाला पोटांत हा मंत्र शिकवा आणि ही अडचण दूर करा. कच जर जिवंत झाला नाहीं तर मी जीव देईन.' तेव्हां नाइलाजानें त्यानें कचास तो मंत्र सांगितला व त्याला जिवंत केलें. त्यावेळी कच शुक्राचार्याचें पोट फाडून बाहेर आला व तोच मंत्र म्हणून त्यानें शुक्रा चार्यास जिवंत केलें.
आपल्याला मंत्र येत आहे असें पाहून कच शुक्राचार्यास म्हणाला कीं, ' येथे राक्षसांचा फार त्रास आहे म्हणून आतां मला जाण्याची आज्ञा द्यावी. ' शुक्राचार्यानें मोठ्या दुःखानें त्याचें म्हणणें मान्य केलें. राक्षसांनी दारूत कचाची राख घालून आपल्याला फसविले, याचा शुक्राचार्यास फार राग आला व त्या रागाच्या भरांत ब्राह्मणानें कधीहि दारू पिऊ नये अशी मर्यादा त्यानें घातली व जो कोणी ब्राह्मण दारू पिईल त्यास शंभर ब्रह्महत्येचें पाप लागेल असें सांगितले. कचानें शुक्राचार्याचा निरोप घेतला व तो जाऊं लागला, तेव्हां देवयानीनें चाटेंत त्यास अडवून म्हटलें कीं, ' माझ्या वडिलांनी, केवळ माझ्या आग्रहावरून तीन वेळां तुम्हास जिवंत केले व तुम्ही माझा स्वीकार कराल याच आशेनें त्यांनी तुम्हास जिवंत केलें !' हें ऐकतांच कच म्हणाला कीं, 'एक म्हणजे तू माझी गुरुबहीण आहेस व आतां तर तुझा माझा जन्म एकाच उदरांतून झाला आहे. तेव्हां ही गोष्ट अशक्य आहे.' अशा तन्हेनें अचानक आज्ञेचा भंग केल्यामुळे ती कचास शाप देऊन म्हणाली की, 'ज्या अर्थी तू मला आतां फसवून जात आहेस त्याअर्थी माझ्या पित्यासमान प्राप्त झालेली संजीवनी मंत्रविद्या निष्फळ होईल. ज्यावेळी तूं ती जपशील त्यावेळी ती तुझ्या उपयोगी पडणार नाहीं. ' तेव्हां कच तिला म्हणाला कीं, 'तूं अन्यायानें मला शाप दिला आहेस म्हणून तुलासुद्धा कोणी ब्राह्मणकुमार वरणार नाहीं.' इतके बोलून कच स्वर्गलोकीं निघून गेला.
नंतर त्यानें सर्व देवांस एकत्र बोलाविले व घडलेली गोष्ट त्यांना सांगितली व बृहस्पतीस संजीवनी मंत्राचा उपदेश केला. लगेच त्यानें त्याची प्रचीतीहि पाहिली. त्यामुळे देवांना अतिशय आनंद झाला व राक्षसांशी लढून त्याचा पराभव करण्यांत त्यांना उत्साह वाटू लागला. ते सर्वजण लढाईची तयारी करण्याबद्दल इंद्रास आग्रह करूं लागले. तेव्हां इंद्र म्हणाला कीं, 'मी अगोदर लढाईसाठीं योग्य कारण शोधून काढतों.' नंतर इंद्र वृषपर्वा नांवावा राक्षसांचा राजा होता, त्याच्या नगरीजवळ गेला. तेथें नगरीबाहेरील सरोवरांत शुक्राचार्यांची मुलगी देवयानी आणि वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा आपल्या दासींसह, आपली वस्त्रें कांठावर ठेवून पाण्यांत क्रीडा करीत होत्या.
ते पाहून इंद्राने वान्याचें रूप घेऊन एकमेकीची वस्त्रे एकमेकांत मिसळून उडविली व त्यांना ऐकू येईल असा मोठा आवाज केला. तो आवाज ऐकून सर्व स्त्रिया घाबरल्या. त्यांतच आपली वस्त्रें वायानें उडून जात आहेत असें पाहून त्या भराभर वर आल्या व हाताला मिळेल तें वस्त्र नेसल्या, शर्मिष्ठा अगोदरच कांठावर आली होती व तिनें गडबडीत देवयानीची वत्रे नेसली होती. तितक्यांत देवयानी तेथें आली. तिनें तें पाहतांच रागावून ती शर्मिष्ठेला म्हणाली की, ' अग अमंगले ! तूं माझें वस्त्र नेसलीस ? तुला तुझ्या बापाच्या मोठेपणाचा गर्व झाला होता. परंतु माझ्याच पित्याच्या कृपेनें तुझ्या पित्याला हैं राज्य मिळाले आहे, एवढे पण तुला कळत नाहीं काय ? '
हे ऐकून शर्मिष्ठेलाहि राग आला. ती संतापाने म्हणाली की, ' हे भिकान्याच्या पोरी ! तुझा बाप माझ्या बापाच्या घरी भिक्षा घेतो. तें भिक्षेचें अन्न खाऊन इतकी माजलीस कशाला ? ' असे बोलून देवयानीला एका विहिरीत फेकून ती आपल्या वाड्यांत परत आली. कांहीं वेळाने त्या ठिकाणीं ययातिराजा शिकार करण्यासाठी आला. त्यानें देवयानीला वर काढलें व आपण स्वतः शिकारीसाठीं पुढें निघून गेला. इकडे देवयानी बराच वेळ झाला तरी घरी आली नाहीं, म्हणून तिला शोधण्याकरितां तिची दासी तेथें आली तिला घरी चल म्हणूं लागली. देवयानीनें तिला सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाली कीं, 'याच्यापुढें मी नगरांत राहणार नाहीं, असा निरोप माझ्या बाबांना सांग.' दासीनें ही गोष्ट शुक्राचार्यास सांगितली व ती त्याला घेऊन तेथें आली. शुक्राचार्याना पाहून देवयानी म्हणाली की, 'बाबा, माझा प्राण जावा या विचारानें शर्मिष्ठेनें मला विहिरीत लोटून दिलें, परंतु याबद्दल मला फारसे दुःख वाटत नाहीं, पण ती जे नानाप्रकारचे वाईट शब्द बोलली ते माझ्या काळजाला घरें पाडीत आहेत. सगळे त्रिभुवन आपले चरण वंद्य मानीत असतां तिनें आपली नानाप्रकारें निंदा केली. याप्रमाणें देवयानीचें भाषण ऐकल्यावर त्यानें तिचें सांत्वन केलें व नंतर शुक्राचार्य राक्षसांच्या सभेत येऊन उभा राहिला.
शुक्राचार्याला पाहतांच वृषपर्वा राजाबरोबर सर्व राक्षस त्याला मान देण्यासाठी उभे राहिले आणि त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून त्यास पूज्यासनावर बसवूं लागले. तेव्हां तो त्यांच्या आदरसत्काराचा त्याग करून रागानें म्हणाला कीं, 'वृषपर्व्या, मी तुझा आश्रित आहे, म्हणून तुझ्याजवळ निरोप मागण्याकरितां येथें आलों आहे. मी राक्षसांचे आचार्यपण आज सोडलें, इतकेंच नव्हे तर त्याची मला यापुढें गरज नाहीं. त्यांनी माझ्याशिवाय खुशाल राज्यकारभार करावा. ' हे ऐकतांच वृषपर्व्यानें धांवत जाऊन त्याचे पाय धरले व म्हटलें कीं, 'गुरुराज ! आमच्या हातून कोणता अपराध घडला तो सांगा व आमचा सर्वांचा शिरच्छेद करून मग वाटेल तिकडे जावें, नाहींतर मी आपले पाय सोडणार नाहीं. ' तेव्हां शुक्राचार्य म्हणाला कीं, शर्मिष्ठेनें आज देवयानीस दुरुत्तरें करून तिला विहिरींत लोटून दिलें. त्यावेळीं ययाती राजा तेथें आला. त्यामुळे देवयानी जिवंत राहिली.
आतां मी जर तुमच्याबरोबर राहिलों तर प्राण देण्याचा देवयानीनें निश्रय केला आहे.' तें ऐकून वृषपर्वा म्हणाला की, 'गुरु-महाराज, आपण आज्ञा करा म्हणजे आपल्या चरणांवरून हा माझा देह व देवयानीवरून शर्मिष्ठा ओवाळून टाकतो. देवयानी ज्याप्रमाणें आपलें बालक आहे, त्याचप्रमाणें आम्ही पण आपली बालकें आहोत. म्हणून सर्व अपराधांची क्षमा करून आम्हाला अभय द्यावें' अशी त्यानें शुक्राचार्याजवळ प्रार्थना केली व कन्येची समजूत घालण्याविषयीं त्यांनें सुचविले. वृषपर्व्याने देवयानीचीसुद्धां प्रार्थना केली. तेव्हां ती म्हणाली की, 'तुझी मुलगी जर एक सहस्र दासींसह माझी दासी होईल व मी लग्न केल्यानंतरहि माझ्या नवऱ्याच्या घरी येण्याचे कबूल करील तरच माझा राग शांत होईल ! ' राजानें ही गोष्ट ताबडतोब शर्मिष्ठेस कळविली. त्यावेळीं तिला अतिशय दुःख झालें; परंतु असें जर केले नाहीं तर बापाचा पूर्णपणे नाश होईल, म्हणून तिने देवयानीचें दास्यत्व स्वीकारलें व याप्रमाणें तें भांडण संपलें.
पुढें एके दिवशीं शर्मिष्ठेसह देवयानी त्याच ठिकाणी खेळत असतां ययाति राजा योगायोगानें तेथें आला. त्याला पाहताच देवयानीनें त्याच्याशीं विवाह करण्याचा आपला हेतु त्याला कळविला. तेव्हां ययातीनें शुक्राचार्याच्या परवानगीनें तिच्या- बरोबर विवाह केला. नंतर ययाती, देवयानी व शर्मिष्ठेला घेऊन आपल्या गांवी जाण्यास निघाला. तेव्हां शुक्रचार्यानें त्याला असें सांगितलें कीं शर्मिष्ठेविषयीं जपून वाग. त्या राजकन्येला भाळून जर तूं माझ्या कन्येशी अप्रीति संपादन करशील तर मी तुला शाप देईन. ' त्यामुळे ययातीने शर्मिष्ठेला एका लांच ठिकाणी ठेवून दिलें व तो देवयानीसह मोठ्या आनंदांत दिवस घालवू लागला. पुढे देवयानीस यदु व तुवर्स हीं दोन मुले झाली.
शर्मिष्ठेस ज्या ठिकाणी ठेवलें होतें तेयें कांहीं कमी नव्हतें. परंतु तारुण्याचा काळ फार विलक्षण आहे. तो शर्मिष्ठेला सहन करवेना. त्यामुळे ती झुरूं लागली. एके दिवशीं ययातिराजा सहज त्या ठिकाणी गेला असतां तिनें त्याचा उत्तमप्रकारें आदरसत्कार केला व एकांतांत आपला मनोदय त्याला कळविला. त्याला शुक्राचार्याची आज्ञा आठवत होती, परंतु शर्मिष्ठेचें दुःख त्याच्याने बघवेना म्हणून त्यानें तिचें म्हणणे मान्य केलें. त्यानंतर शर्मिष्ठेलाहि द्रुद्यू, अनु व पुरु हे तीन मुलगे व माधवा नांवाची एक मुलगी झाली. तोपर्यंत देवयानीस ही गोष्ट कळली नाहीं. परंतु एक दिवस तिनें शर्मिष्ठेजवळ मुलें बघितली व चौकशी केल्यावर तिला असें कळून आलें कीं, 'हीं मुलें ययातीपासून झालेलीं आहेत. ' हैं समजतांच ती अतिशय संतापली व ही गोष्ट शुक्राचार्याला सांगितली.
तेव्हां शुक्राचार्यानें रागाने असा शाप दिला कीं, 'राजास वृद्धापकाळ येवो. ' त्याबरोबर ययातिरांजा अतिशय म्हातारा दिसू लागला. त्यानें जाऊन शुक्राचार्याची पुष्कळ मनधरणी केली, तेव्हां शुक्राचार्यानें त्याला असा उ:शाप दिला की, ' तूं आपलें म्हातारपण ज्यास देशील त्याचें तरुणपण तुला प्राप्त होईल. ' मग आपलें म्हातारपण जो घेईल त्यास राज्य देण्याचा निश्चय राजाने केला व तो घरीं आला. मग सर्वप्रथम त्यानें देवयानीच्या मुलास विचारलें. परंतु त्याने त्याचें म्हणणें मान्य केलें नाहीं. मग शर्मिष्ठेच्या मुलास विचारलें असतां त्यानेंहि नकार दिला. शेवटीं धाकटा मुलगा पुरु यानें त्याचें म्हणणें मान्य केले. याप्रमाणें पुत्राचे तारुण्य घेऊन ययातीनें आपल्या दोन्ही स्त्रियांसह एक हजार वर्षे अत्यंत आनंदांत व चैनीत घालविली.
नंतर मुलाचें तारुण्य त्यास परत देऊन व त्याला राज्यावर बसवून दोन्हीं स्त्रियांसह ययाति अरण्यांत गेला. तेथें त्यानें घोर तपश्चर्या केली व शेवटीं तो इंद्रलोकीं गेला... तेव्हां हा आपलें पद घेईल, अशी भीति इंद्रास वाटली व त्यानें त्याचें पुण्य त्याच्या मुखानें वदविलें. आपल्या तोंडानें आपलें पुण्य दुसन्यास सांगितलें असतां, पुण्य कमी होते असा नियम आहे, अशा तऱ्हेनें ययातीचे पुण्य कमी होऊन तो स्वर्गातून खाली गेला. परंतु अष्टकादि राजर्षीचा कृपेनें पुन्हा त्यास स्वर्गपद प्राप्त झालें. ययातीच्या मागे त्याच्या मुलानें उत्तम रीतीनें राज्य केलें. त्यामुळे पुरूपासून झालेल्या पुढील वंशास पौरव हें नांव मिळालें इतके सांगून वैशंपायन म्हणाले की, राजा ! त्याच वंशांतला तू आहेस.
अध्याय समाप्त !
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.