Subscribe Us

अधिकमास माहात्म्य अध्याय १ || adhikmaas mahatmya adhyay 1 || Adhikmaas mahatmya Kath chapter 1

    अधिकमास माहात्म्य अध्याय १

 ।। ओळख अधिक मासाची ।। 




       
श्री गणेशाय नमः

          नैमिषारण्य.....!! म्हणजे महान पुण्यपावन, पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक पवित्र अरण्य. या अरण्यामधले ते एक तपोवन. लता, वेली, मोठमोठे वृक्ष यांनी बहरलेला, फळलेला, फुललेला तो एक समृद्ध परिसर. त्या परिसरातल्या नाना विविध पक्षांच्या मधुर आणि मंजूळ स्वरांनी गुंजनारा तो तपोवणाचा भाग. त्या तपोवणाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषिवर्य एकत्र येत, यज्ञयाग आणि तपाचरण करीत, धर्मचर्चा करीत आणि अनेक शंका, समस्या, अडीअडचणी यांच्यावर विचारविनिमय होई. धर्माचरणातुन मानवी जीवनाचे कल्याण, हा एकच उदात्त हेतू या सर्व चर्चमागे असायचा. 
          मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, त्याला सुख, शांती, वैभव, समाधान आणि आनंद प्राप्त व्हावा, नरजन्माचे सार्थक व्हावे, जिवा-शिवाची भेट व्हावी, जन्म-मृत्यूचे बंधन तुटावे अन आत्म्याचे परमात्म्याशी मीलन व्हावे, यासाठी कोणती साधना, कोणते व्रत, कोणता दानधर्म व व्रताचरण करावे, ह्या अन अशा विषयांवर त्या ऋषिगणांच्यात धर्मचर्चा, विचारविनिमय चालू असत.  
          एके दिवशी अचानक ज्याप्रमाणे अज्ञानरात्रीचा नाश करीत प्राचीवर सहस्त्ररश्मी सूर्य नारायणाचे जसे आगमन व्हावे, त्याचप्रमाणे त्या पवित्र अशा तपोवनात सूत नावाच्या एका विद्वान पुराणीकाचे आगमन झाले. सूताच्या आगमनाबरोबरच सर्व ऋषींवर्यानी, जिज्ञासु, मुमुक्षु अन आर्त साधकांनी त्यांचे स्वागत केले, त्यांना उच्च आसनावर बसवून मोठ्या आदराने त्यांचे पूजन केले, आदरसत्कार केला आणि मग अवघा ऋषीवर्ग त्या सूतांच्या चरणाशी नतमस्तक होऊन बसला. 
          सर्वश्रेष्ठ विद्वान अन अनन्य शरणागत अशा त्या भगवत भक्ताला अभिवादन करीत त्यांनी सूत पुराणिकांना एक प्रश्न केला. "महाराज! सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे, त्यांना सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावं, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी यासाठी जर एखादी साधी सोपी पूजा, उपासना किंवा साधना असेल तर ती आपण कृपा करून आम्हाला सांगावी."
          ऋषी वर्गाचा तो लोकहित, लोककल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पुराणिक यांना मोठा आनंद झाला. प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, "हे भगवत भक्तांनो ! आर्त साधकांनो! तुम्ही मला जो प्रश्न केला, तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णू यांना केला होता. तेव्हा भगवान नारायणांनी लक्ष्मीमातेला लोककल्याणार्थ जे व्रत, जी उपासना, साधना, दानधर्म करणे सांगितले आहेत तोच त्या दोघांमधला सुखसंवादाचा भाग मी तुम्हाला यथाक्रम वर्णन करून सांगतो. त्या लक्ष्मीनारायणाच्या सुखसंवादामधूनच तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा आता सावध व्हा, मनाचे कान करा आणि लक्ष्मीनारायणांचा संवाद माध्यमातून पुढे येणारा तो सारा कथाभाग ऐकायला सिद्ध व्हा." 
          त्यांचे हे बोलणे ऐकून खरे तर सर्वांनाच मोठा आनंद झाला. तेव्हा सूतांना विनम्र भावे हात जोडत शौनक ऋषींनी एक प्रश्न केला, "महाराज, खरोखरच जनकल्याणासाठी लक्ष्मीने तसा प्रश्न प्रभूंना केला काय? नारायणाने त्यावेळी काय सांगितले?" 
          सूत म्हणाले, "ऋषिवर! ब्रह्मदेवाने ही सारी सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केले. ब्रह्मदेव हे जगताचे निर्माणकर्ते तर विष्णु भगवान हे सकल सृष्टीचे, जीवांचे, जगताचे पालनकर्ते. प्रत्येक जीवाच कल्याण व्हावं, सर्वजण सुखी समाधानी असावेत, हे त्या जगत पित्याला न वाटलं तर नवलच! त्या अतीव वात्सल्य भावनेमधूनच लक्ष्मीने एकदा विष्णु भगवंतांना प्रश्न केला की,  "स्वामी, माणसाला सुख, शांती, वैभव , समाधान प्राप्त होण्यासाठी आणि त्याचा उद्धार होण्यासाठी त्यांनी काय करावं? कोणत व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी ? ते आपण मला सांगा." तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, "देवी! खरतर बहू भाग्याने जीवाला हा मनुष्यदेह प्राप्त होतो. त्या नरदेहाच्या सहाय्याने खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो, पण जीव हा भोगलालसा, असूया, अहंकार यांच्यामुळे दुःखी कष्टी व असमाधानी होतो. शाश्वेत ईश्वरप्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो. प्रपंचात अडकतो आणि परमार्थ पासून दुरावतो. मी, माझं आणि मलाच या भावनांनी तो इतका संकुचित होतो की, दान-धर्म , पुण्यसंचय, तीर्थयात्रा, धर्मकृत् धर्माचरण इत्यादी गोष्टी करत नाही. इतकंच काय ,पण साध्या माणुसकीधर्माचा सुद्धा त्याला विसर पडतो. हे असे होऊ नये, सन्मार्गावरून वाईट मार्गाला माणूस जाऊ नये, पापाचरण आणि अधर्माचरण होऊ नये यासाठीच शास्त्रकारांनी काही नियम घालून दिले आहेत. काही व्रतवैकल्य, उपास आणि उपासना, दानधर्म, स्नान व तीर्थयात्रा यांची योजना केलेली आहे. त्या सर्व गोष्टी नीट जाणून घेऊन जर मनुष्यप्राणी त्याचं आचरण करेल, तर तो नक्कीच सुखी होईल. शास्त्रकारांनी जी नित्यनैमित्तिक व्रतवैकल्य, उपास आणि साधना सांगितल्या आहेत त्या सर्वात दर तीन वर्षांनी येणाऱ्या मल-मासातील म्हणजेच अधिक मासातील स्नान, दान, दीपपूजन, गोमाता पूजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठे विशेष महत्त्व आहे. या मल मासातील किंवा अधिक महिन्यातल्या व्रत पूजनाचे फल हे 'अधिकस्य अधिकं फलम' या न्यायानं प्रत्येकाच्या पदरात नक्कीच पडतं. फक्त ते व्रत, ती पूजा उपासना, उपास, स्नानादानादिक कर्म करायला हवेत. म्हणजे त्या मलमासातील आचारधर्माच्या पालनाने मानवाचे कल्याण होईल, तो सुख, शांती , वैभव आणि समाधानाचा ही अधिकारी होईल."
          भगवंताचे ते अभिवचन ऐकून लक्ष्मी त्यांना म्हणाली, "स्वामी, हा मलमास म्हणजे काय? तो कसा, का आणि केव्हा येतो? त्या महिन्यात कोणत्या आचारधर्माचे पालन करायचं? त्याचं फलित काय? हा सर्व भाग मला नीट समजावून सांगाल का?" 
          तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, "ठीक आहे, तुझ्या मनातील जिज्ञासेचे मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो. ऐक."
      
                  पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरून केली जाते. सूर्य गतीवरून केल्या जाणाऱ्या कालगणना सौरवर्ष तर चंद्रांच्या गतीवरून केल्या जाणाऱ्या गणनेला चांद्रवर्ष असे म्हणतात. या दोन्ही कालगणना मध्ये दरवर्षी दहा अकरा दिवसांचा फरक पडतो. आता हा प्रत्येक वर्षी पडणारा दहा अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी एका जास्त मासाची योजना केली आहे, यालाच अधिकमास असं म्हणतात. सूर्य हा प्रत्येक महिन्यात, प्रत्येक राशीत म्हणजे बारा महिन्यात बारा राशीतून संक्रमण करीत असतो. सूर्याप्रमाणे चंद्र सुद्धा प्रत्येक महिन्यात सत्तावीस नक्षत्रे भोगत असतो. मात्र चंद्र-सूर्याच्या कालगणनेतील हा दहा अकरा दिवसांचा दरवर्षी होणारा फरक भरून काढण्यासाठी अधिकमास येतो. त्यात मात्र सूर्य संक्रमण होत नाही. सूर्य संक्रांत नसलेल्या त्या चांद्रमासात म्हणजेच अधिकमासात वातावरण हे गढूळ, मलीन असतं. या त्याच्या मलिनतेवरूनच त्याला मलमास असेही म्हणतात.
          शास्त्रकारांनी हा मलमास सर्व मंगल कार्यासाठी जरी निषिद्ध मानलेला असला, तरी सुद्धा या अधिक मासात स्नान, दान, पूजा, जप इत्यादी जी धर्मकृत्य केली जातात, त्याचं फळ मात्र उपासकाला अधिक प्रमाणात नक्कीच मिळते. अधिक महिन्यात केलेल्या तीर्थयात्रा, पवित्र क्षेत्रातील पुण्यपावन नद्यांची स्नान, केलेली विविध दान, जप आणि पूजन यांचे फल अधिक. कारण ह्या मलमासाचा प्रत्यक्ष श्रीकृष्णाने म्हणजेच मी स्वीकार केलेला आहे आणि त्या मासाला पुरुषोत्तम मास हे नाव ही बहाल केले आहे. तसंच या अधिक महिन्यात अर्थात पुरुषोत्तम मासात केलेल्या धर्माचरणाला अधिक फलप्राप्तीचे वरदानही दिले आहे. त्यामुळेच या अधिकमासाचे महत्त्व आणि महात्म्य हे पण फार थोर आहे." 
"स्वामी, या मलमासाला 'पुरुषोत्तम मास' हे नाव का व कसं पडलं? त्याचा कोणी स्वीकार केला? त्या मासाला महत्त्व कशामुळे प्राप्त झालं ? हे सारं जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे. प्रभू! आपण कृपावंत होऊन मला तो सर्व भाग निवेदन करावा." लक्ष्मी म्हणाली. 
          "देवी! या मलमासात लग्नकार्यादिक मंगल कार्य केली जात नाहीत. सर्व लोकांनी ह्या मलमासाला त्याज आणि निषिद्ध मानलं; त्यामुळे तो मलमास मोठा दुःखी, कष्टी आणि व्यथित झाला, तो मला शरण आला. मी त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे गेलो. मलमासाने आपली जन्मकथा आणि व्यथा श्रीकृष्ण सांगितली. तेव्हा त्या दयावंत भगवान पुरुषोत्तमाने त्या मलमासाला स्वीकार केला आणि त्याला आपलंच म्हणजे 'पुरुषोत्तम मास' असं नाव दिलं. त्याच प्रमाणे जो कोणी मनुष्यप्राणी या अधिक मासात पूजाअर्चा, देवधर्म, दान, स्नान, जप-तप तीर्थाटन इत्यादी कर्म करतील, त्यांना 'अधिकस्य अधिकं फलम्' या न्यायानं जास्तीत जास्त चांगले फल, सुख, सौख्य आणि समाधान व शेवटी भगवत कृपा प्राप्त होईल, असा मंगल आशिर्वाद दिला.
           "या महिन्यात दानाला फार मोठे महत्त्व आहे. मग ते दान हे अन्न ,वस्त्र किंवा धनाच असेल, गोदान , दीपदान असेल किंवा ब्राह्मण व विष्णू स्वरूप जमाताला अर्थात जावयाला दिलेलं अपूप दान असेल. दान हे कोणत ही आणि कुणालाही दिलेलं असलं तरी ते सत्पात्री असणे आवश्यदक आहे. सत्पात्र ब्राह्मणाला दिलेले दान हे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण केल्याच पुण्य लाभत. अशा दानधर्मान भगवंत संतुष्ट होतो हे तर तू जाणतोसच. या अधिक महिन्यात सदाचारी, निष्ठावान, परोपकारी आणि पुण्यवान असे साधू, संत, सत्पुरुष, गुरु ब्राह्मण, पतिव्रता इत्यादींना बोलावून त्यांचं पूजन करावं, त्यांना आवश्यक अशा वस्तू, वस्त्र आणि मिष्टान्न भोजन द्यावे, दान दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावं आणि त्यांचे मंगल आशिर्वाद घ्यावेत. अशाने घरात धनधान्याची समृद्धी होते. सुख, शांती, समाधान आणि आनंद लाभतो. या ब्राह्मण किंवा श्रेष्ठांच्या पूजना इतकेच या महिन्यातील गोपूजेचे आणि गोदानाचेही फार मोठे महत्त्व आहे.”

अध्याय पहिला समाप्त!
।। श्रीकृष्णार्पणवस्तू ।।


Adhikmaas mahatmya kath,
अधिकमास महात्म्य अध्याय १,
अधिकमास माहात्म्य अध्याय पहिला,
Adhikmaas 2023,
Adhik maaz katha,
पुरुषोत्तम मास २०२३,
Adhikmaas mahatmya adhyay 1,
Adhik Maas 2023,
Malmaas 2023,
Purushottam Maas,
Krushnarekha,
Adhimaas pothi,



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या