Subscribe Us

अधिकमास माहात्म्य अध्याय २ || adhikmaas mahatmya adhyay 2 || Adhikmaas mahatmya Kath chapter 2

 अधिकमास माहात्म्य अध्याय २

 ।। पूजनीय गोमाता ।। 




श्री गणेशाय नमः || श्री सरस्वत्यै नम: || श्री गुरुभ्यो नमः 

           लक्ष्मीनारायण यांच्या संवाद माध्यमातून सूत पुराणिकांनी जी माहिती ऋषीजणांना दिली, त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. 
         “महाराज! नारायणांनी ह्या अधिक मासातील गोमातेचे दर्शन आणि पूजन याचं काय महत्त्व सांगितलं? ते ऐकायला आम्ही फार आतूर आहोत. तेव्हा आपण कृपावंत होऊन ती माहिती आम्हाला सांगावी.” गालब ऋषींनी सूतांना विनंती केली. 
       तेव्हा सूत म्हणाले, “मुनींनो! अधिक मासात स्नान, दान, यात्रा, जप तप उपास अन उपासना करणाऱ्या प्रत्येकालाच आरोग्य, धनसंपदा, सुख आणि समाधान हे मिळतंच. देवी लक्ष्मीने विष्णू भगवंतांना असा प्रश्न विचारला की, “स्वामी, जे लोक दरिद्री आहेत, शारीरिक व मानसिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा लोकांना सहज करता येण्यासारखं एखादं पुण्यकर्म नाही का, की जे केले असता ते ही सुखी व समाधानी होतील?” लक्ष्मी मातेचा तो प्रश्न ऐकून भगवंत अतिप्रसन्न झाले. 

             लक्ष्मीचे कौतुक करीत ते म्हणाले, “देवी, खरच आपण मातृत्व भावाला साजेसा प्रश्न केला. मातेला सर्व लेकर सारखीच असतात. तिच्या मनात सर्वांचेच कल्याण व्हावं हा समत्वभाव असतो. देवी जे दरिद्री, दुर्बल, अशक्त आणि असमर्थ आहेत त्यांनाही अगदी सहज करता येईल असा एक सोपा नियम आहे. अशा स्त्री-पुरुषांनी अधिक महिन्यात पहाटे उठावं, शितल जलाने स्नान करावं, देवपूजन व देवदर्शन आणि भगवंताचे नामस्मरण करावं, याचबरोबर नित्य नियमाने न चुकता गोमातेचे दर्शन घ्यावे, तिला घास घालावा आणि तिची पूजा करावी.” 
            “गो-मातेचे दर्शन, पूजन हे तीर्थयात्रा करणे, पवित्र नद्यांचे स्नान करणे, देवाचे पूजन करणे इत्यादी पेक्षाही श्रेष्ठ व अति फलदायी आहे. गोमाता ही श्रेष्ठ व पूजनीय आहे. तिच्या पोटी तेहतीस कोटी देवांचा निवास आहे. गायीच्या शेनाने घर-अंगणाच्या सारवणाद्वारे स्वच्छता होते. तर गाईच्या पंचगव्याच्या प्राशनाने मानवी तनामनाची खरीखुरी आंतरिक शुद्धता होते. सर्व सामान्य जीवांना सहज करता येण्यासारखी हि गोष्ट आहे. त्यातून जर ती नित्यनियमानं ह्या अधिकमासात केली तर, त्यापासून मिळणारे फल आणि पुण्य हे अधिक आहे. गोमाता ही पवित्र, पूजनीय आणि वंदनीय आहे. तिचं दर्शन, पूजा आणि सेवा ही कल्याणकारी आहे.” 

                 इतके ऐकल्यावर लक्ष्मी म्हणाली, “स्वामी, तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. गाय ही पवित्र खरी पण मग तिचे तोंड मात्र अपवित्र मानलं जातं, हे असं का?” तेव्हा भगवान म्हणाले, “देवी, गाय हि शरीराने पवित्र पण मुखाने मात्र अपवित्र आहे आणि त्याला कारण म्हणजे तिला महादेवांनी दिलेला शाप.” 
                 “काय! गायीला महादेवांनी शाप दिला ! का? असा काय अपराध घडला तिच्याकडून?” लक्ष्मी देवी म्हणाली. “देवी! शंकराच्या रागाला अन शापाला गाय कारणीभूत झाली, ती तिने दिलेल्या खोट्या साक्षीमुळे.” भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितले, ते पुढे याबाबतची कथा सांगू लागले. 
                     “देवी! एकदा ब्रह्मदेव, मी आणि भगवान शंकर हे सहज गप्पा गोष्टी करत असताना आमच्या तिघांच्यात श्रेष्ठ कोण असा विषय निघाला. तेव्हा सृष्टी निर्माणकर्ता ब्रह्मदेवांना अहंकार निर्माण झाला. ते म्हणाले की, “ही सर्व सृष्टी मी निर्माण केली आहे. मी सृष्टी तयार केलीच नसती तर विष्णूने संरक्षण-संवर्धन तरी कशाची केले आणि कोणाच्या केले असते, आणि जर सृष्टीच नसती तर शंकराने विनाश तरी कोणाचा केला असता? म्हणजे काय, तर सृष्टी सांभाळणाऱ्या आणि तिचा संहार करणाऱ्यापेक्षा तिचा निर्माणकर्ता मीच अधिक श्रेष्ठ नाही काय?” ब्रह्मदेवांचे हे असे अहंकारी बोलणे ऐकून शंकरांना हसू आले. ते म्हणाले, “ब्रह्मदेवा, अहो तुम्ही तर श्रेष्ठ आहेतच की. कारण आपल्या तिघांमध्ये तुमचं नाव प्रथम घेतलं जातं. तेव्हा तुम्ही वंदनीय आहातच. विष्णु भगवान हे मुकुट, कुंडल, शंख, चक्र आणि गदाधारी आहेत, तेव्हा तेही वंदनीय आहेतच.पण आमचं काय? आम्ही पडलो हे स्मशानवासी, व्याघ्रांबरधारी, आमच्या डोक्यावर काय तर ही गंगा आणि आमचा शिरोमुकुट म्हणाल तर, तो चंद्र!”

                     “देवा महादेवा, अहो पण तो चंद्र तरी तुमच्या मस्तकी कुठे आहे?” ब्रह्मदेव म्हणाले. “खरंच कि, तो चंद्रमुकुटही आम्ही आमच्या मस्तकावरून उतरवला आणि हि गंगामाता माथ्यावर धारण केली. गंगावतरणाच्या त्यावेळी आम्ही आमचा मुकुट कोठे काढून ठेवला ते सुद्धा मला आता आठवत नाही. आता असं करा, तुम्ही दोघांनी त्या मुकुटाचा शोध घ्या आणि आमचा मुकुट आम्हाला शोधून द्या.” हसत हसत भगवान शंकर म्हणाले. मग काय शिव आज्ञाच ती ! तिचा अव्हेर तरी कसा करणार? मी आणि ब्रह्मदेव आम्ही दोघेही शिवमुकुटाचा शोध घेण्यासाठी निघालो. ब्रह्मदेवांनी उंच आकाशात जाण्याचा निर्णय घेतला. तर मी मात्र त्याच्या शोधार्थ सप्तपाताळ धुंडले. पण प्रामाणिकपणे सांगतो मला काही त्या मुकुटाचा शोध लागला नाही. मी आपल्या सरळ परत आलो. देवाधिदेव महादेवांच्या चरणांना वंदन केले आणि माझी असमर्थता व्यक्त केली. 
थोड्याच दिवसात माझ्या पाठोपाठ ब्रह्मदेवांची स्वारी ही महादेवाकडे आली. “काय ब्रह्मदेवा ! कुठे सापडला आमचा मुकुट?” शंकरांनी विचारले. तेव्हा आपण                                
              शिवमुकुटाच्या शोधार्थ एकवीस स्वर्ग पालथे घातले व शेवटी मुकुट आपल्याला सापडला, अशी दर्पयुक्त कबुली ब्रह्मदेवांनी दिली. “काय सांगता... खरंच! आमचा मुकुट तुम्हाला सापडला?” शंकरांनी प्रश्न केला. 
              “होय महादेवा, मी खरच सांगतोय. मला तुमचा मुकुट सापडला. तो तिथे उंच उंच स्वर्गात होता. पण थांबा, तसं कशाला? माझ्या बोलण्याला साक्ष म्हणून मी ही गाय आणि केतकी यांना सोबत आणले आहे. हव तर आपण त्यांची साक्ष घ्या.” ब्रह्मदेव म्हणाले. “अरे वा! तुम्ही खरच आमचा मुकुट पाहिलात? काय गोमाते, ब्रम्ह्देवांसह तुम्ही आमचा मुकुट नक्की पाहिलात ना, सांगा, खर सांगा.” ते शब्द ऐकले आणि बिचारी गाय घाबरून गेली. तिने फक्त ‘हम्मा’ असं म्हणत होकारार्थी मान हलवली आणि दुसर्यादच क्षणी महादेव शंकर एकदम रागावून म्हणाले, “खोटं...साफ खोटं. जर आधीपासूनच आमच्या मस्तकावर मुकुट नव्हता, तर तो तुम्हाला दिसला तरी कसा? तुम्ही खोटे बोलताय आणि काय गोमाते! तू सुद्धा खोटी साक्ष द्यावीस! छे छे, काय म्हणाव या असत्य वचनाला? खोटं सारच खोटं! ब्रह्मदेवांनी आमचा मुकुट पाहिलेला नाही. गोमाते ! खोटं बोलण्याइतकंच खोटी साक्ष देणे, हे सुद्धा पापच. तेव्हा मी तुला शाप देतो की,ज्या तोंडातून तु ही खोटी साक्ष दिलीस, ते तुझं तोंड अपवित्र होईल. सर्वांगाने तू पवित्र असशील; पण तोंडाने मात्र तु घाण खाशील.” 


                    त्या दिवसापासून सर्वांगी पवित्र, पूज्य आणि आदरणीय असणारी गाय ही तोंडाने मात्र अपवित्र झाली. विष्णु भगवानाकडून ही सर्व हकीकत कळली आणि लक्ष्मीदेवीच्या मनातील त्या शंकेचे निरसन झाले. 
                   “प्रभू ! मुखाने अपवित्र असणारी ही गाय, दर्शन, पूजन हे मात्र पवित्र आणि पुण्यकारकच आहे. खरं ना?” लक्ष्मीने विचारले. “होय, कारण गोमातेच्या उदरात तेहतीस कोटी देव आहेत. गाय ही श्री गोपाळकृष्णाला अतिप्रिय आहे. त्यामुळेच या पुरुषोत्तम मासात जे लोक गोपूजन, गोमाता दर्शन घेतात, त्यांना सुखशांतीचा लाभ होतो. या भगवंतप्रिय अधिक मासात इतरही छोट्या छोट्या गोष्टी अगदी सहजतेने करता येण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे देव, ब्राह्मण, साधू आणि संत यांचे दर्शन, त्यांचे पूजन, नामस्मरण आणि दारीच्या तुळशीची पूजा. या गोष्टीमुळे उपासकाला सौख्य, शांती प्राप्त होते आणि पुण्य लाभते.”

अध्याय दुसरा समाप्त!
।। श्रीकृष्णार्पणवस्तू ।।

Adhikmaas mahatmya ki kath,
अधिकमास महात्म्य अध्याय २,
अधिकमास माहात्म्य अध्याय पहिला,
Adhikmaas 2023,
Adhik maas katha,
पुरुषोत्तम मास की कथा,
Adhikmaas mahatmya adhyay 2,
Adhik Maas 2023,
Malmaas 2023,
Purushottam Maas Mahatmya,
Krushnarekha,
Adhimaas pothi,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या