अधिकमास माहात्म्य अध्याय ३ || adhikmaas mahatmya adhyay 3 || purushottam maas adhyay 3
गोदानाचे महत्व आणि पौलवऋषींची कथा
श्री गणेशाय नमः || श्री सरस्वत्यै नम: || श्री गुरुभ्यो नमः
“सूतमहाराज! अधिक महिन्यात गोपूजन, गोदर्शन या गोष्टीइतकंच किवा त्याहूनही अधिक अस गोदानाचं महत्त्व आहे, असं म्हणतात. ते खरं ना?” कौंडीण्यऋषींनी आपली शंका विचारली. त्यावर श्रोतृवर्गाला समजावीत सूत पुराणिक म्हणाले, “या अधिक महिन्यात गोदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोन-नाण, जड-जवाहीर, जमीन-जुमला, पैसा-अडका यांना जस आपण धन मानतो, त्याचप्रमाणे ज्याच्याकडे जेवढ्या गाई आहेत, तो तेवढ्या गोधनाचा मालक मानला जातो. आपल्या कृषिप्रधान देशात तर गाईला विशेष महत्त्व आहे. पूर्वी राजे-राजवाडे यांच्याकडे असं गोधन हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे. राजाकडे असलेल्या गोधनावरून त्या राजाची आणि राज्याची प्रतिष्ठा मोजली जात असे.
आपल्या पोथ्यापुराणातून गोमातेच्या श्रेष्ठत्वाचा, तिच्यावरील अधिकारावरून झालेल्या रणधुमाळीच्या कथाही आपल्याला माहीत आहेतच. पूर्वी जसे राजेलोक यज्ञयागादीक कार्यप्रसंगानं ब्राह्मणांना दान देत, तसेच आजही काही सधन लोक हे गोरगरिबांना गोदान करतातच.
गोदान करणाऱ्या व्यक्तीला मोठे पुण्य मिळतं. पण कुणाला? तर जो चांगली, दुभती, सवत्स आणि धष्टपुष्ट गाय सत्पात्री ब्राह्मणाला किंवा याचकाला देतो, त्यालाच. कारण दान हे नेहमी चांगल्या वस्तूच आणि गरजू, योग्य आणि त्या दानाचा आदर करणाऱ्याला द्याव. रोड, रोगी,वांझ, दूध न देणारी अशी गाय दान दिली, तर त्याचं चांगलं पुण्य कसा मिळणार? गाय दान देताना ती दुभती असावी, शांत व गरीब असावी. ती दान देताना तिला शृंगारावं, तिच्या गळ्यात घंटा बांधावी आणि मग ती समारंभपूर्वक गोपाळकृष्णस्वरूप ब्राह्मणाला दान द्यावी. गोधन हे पुण्यकर्म आहे आणि हे पुण्यकर्म जर या अधिक मासात केलं तर त्याचे पुण्यही अर्थातच अधिकच मिळते.”
“प्रभू! गाय ही पूजनीय आणि वंदनीय आहे. तिच्या पोटात तेहतीस कोटी देव निवास करतात, असं म्हणतात. ते खरं ना? मग हे देव गाईच्या पोटात का आणि कशासाठी बर राहिले? ते आपण मला सांगाल काय?” लक्ष्मीमातेचे ह्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान विष्णू म्हणाले, “देवी, थांब, आम्हा सर्व देवांना गोमातेच्या उदरात का लपून बसावे लागले, त्याची गोष्ट मी तुला सांगतो.”
फार फार वर्षापूर्वी या भूतलावर पौलव्य नावाच्या एका महान ऋषींनी घोर तप केले. त्या खडतर तपोबलाने इंद्राच इंद्रपदही डळमळू लागले. कुणालाही आपल्या पद हे धोक्यात आलं, तर त्याला ते चालत नाही, पटत नाही आणि रुचत नाही. मग इंद्र तरी त्याला अपवाद कसा ठरावा? आपलं पद धोक्यात येते, हे लक्षात येताच इंद्राने एक कपटी डाव खेळला. पौलव्य ऋषींचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने आपल्या काही खास अप्सरांना त्यांच्या आश्रमात पाठवलं. त्यांनी नृत्य-गायनानं पौलव्य ऋषींचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषींचं ध्यान विचलीत झालं. नजरे समोरचं भगवंताच सुंदर रूप दिसेनासं झालं. ओठांवरचं नामही थांबल आणि एका खडतर तपाचा भंग झाला. त्यामुळे ऋषी फार रागावले. त्यांनी त्या अप्सरांना आश्रमात येण्याचं आणि त्यांचा तपोभंग करण्याचं कारण विचारलं. त्यांनी ते का अन कोणाच्या सांगण्यावरून केलं असंही विचारलं. आधी तर त्या अप्सरा काहीच बोलेनात, केवळ अपमानित भावाने त्यांनी खाली माना घातल्या. पण पौलव्य ऋषींना आपल्या तपोभंगामुळे खुप राग आला होता. तेव्हा पौलाव्य ऋषींचे पाय धरत त्या अप्सरांनी आपण ही कृती देवेंद्रांच्या आज्ञेवरून केल्याची प्रामाणिक कबुली दिली, क्षमा मागितली आणि आश्रमातून काढता पाय घेतला.
संतप्त ऋषींनी कमंडलूमधील पाणी हातात घेतलं, दृष्टी ऊर्ध्व केली अन आव्हान केलं, “देवेंद्रा, माझ्या समोर हजर हो. माझा तपोभंग करण्याचा तु घोर अपराध केला आहेस. त्या कृत्याचे शासन म्हणून मी तुला भस्मसात करतो. ये, असा माझ्यासमोर ये.” ऋषींची ती क्रोधवाणी ऐकली आणि देवेंद्र घाबरला. धावत पळत तो ब्रह्मदेवांकडे गेला आणि प्रार्थना करू लागला. “प्रभू! पौलव्य ऋषींच्या शापवाणीपासून माझ संरक्षण करा. मला अभय द्या.” ब्रह्मदेवांनी इंद्राला आपली असमर्थता सांगितली आणि मग ते सर्व मला(विष्णूला) शरण आले. इंद्राचा अपराध खुप मोठा आणि अक्षम्य होता. देवेंद्राची चूक लक्षात आणून देत त्याची कानउघडणी करत मी(विष्णू) म्हणालो, “देवेंद्र! अरे आपले इंद्रपद टिकवण्यासाठी तू असा किती वेळा ऋषीमुनी आणि ब्राह्मणांचा छळ करणार आहेस? किती वेळा त्यांचा तपोभंग आणि व्रतभंग करणार आहेस? अरे हे असं तुझं वागणं योग्य नाही. त्यामुळे तू स्वतः वेळोवेळी अडचणीत येतोसच पण तुझ्याबरोबर तू आम्हा सर्व देवदेवतांना ही अडचणीत आणतो.”
आम्ही एवढ बोलतो, न बोलतो तोच, “देवेंद्रा! ये खाली ये. असा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या मागे लपू नकोस. नाहीतर मी तुझ्यासह त्यानाही शाप देईल.” पौलव्य ऋषींची ती गर्जना ऐकली मी ही घाबरलो.
मग आम्ही इंद्रासह महादेवांकडे धाव घेतली. त्यावेळी भगवान भोलेनाथ हे रामनामाच्या अनुसंधानात निमग्न होते. खरं तर त्यांची ती भावसमाधी मोडन आमच्या अगदी जिवावर आलं होतं, पण अखेर न राहवून आम्ही सर्वांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा घोष सुरू केला. थोड्यावेळातच भोलेनाथ त्यांच्या भावसमाधीतून जागे झाले. त्यांना त्रिवार वंदन करून आम्ही देवेंद्रावरील संकटाची त्यांना कल्पना दिली.
“देवेंद्र! ऋषींचा कोप, त्यांची शापवाणी, छे! अनर्थ... अनर्थ.... ! यातून आता तरी मला सुटकेचा मार्ग दिसत नाही.” भोलेनाथ म्हणाले. आम्हा तिघाही देवांपुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले. शरणागताला अभय ही द्यायला हवं होतं आणि तिकडे थोर तपस्वी ऋषी पौलव्य यांचाही अनादर करता येत नव्हता. मागेही माझ्या भक्तांचे रक्षण करत असताना मी दुर्वास ऋषींचा शाप घेतला होता. रागाने भृगुऋषींनी माझ्या छातीवर मारलेली लाथ ही मोठ्या कौतुकानं आणि विनयान भक्तवत्सलांछन म्हणून मी मानाने मिरवली होती.
तिकडे क्रोधायमान झालेले पौलव्य ऋषी आता देवेंद्र पाठोपाठ आम्हा देव देवतांनाही शाप देण्याची आपल्या मनाची तयारी करू लागले होते. काहीतरी करणं नितांत गरजेचं होतं. आता हे संकट देवेंद्र पुरतच नव्हे तर सर्व देवांचे संकट झालं होतं. काहीतरी मार्ग काढणं फार आवश्यक होतं. आम्ही सर्वजण त्या धर्मसंकटातून कसं वाचायचं याचा विचार करू लागलो. खूप विचार करता मला एक उपाय सुचला. मी त्यावर भगवान भोलेनाथ यांचाही विचार घेतला. त्यांनाही ती कल्पना पटली. मग आम्ही सर्व देवांनी गोमातेला आव्हान केलं. ऋषींच्या शापवाणी पासून आमचा बचाव करण्यासाठी तिने आम्हा देवांना तिच्या पोटात जागा द्यावी आणि आमचे संरक्षण करावे अशी प्रार्थना केली.
गौतमी.... गोमाता तयार झाली. आम्ही सर्व देव तिच्या उदरी शिरलो आणि निर्भय झालो. कारण काही झालं तरी ऋषी-ब्राह्मण हे गोमातेला कधीच शाप देणार नाही. तिच्यावर रागवणार नाही, याची आम्हाला पूर्णपणे खात्री होती. अखेर झालेही तेच. अनेक वेळा आवाहन करूनही देवेंद्र किंवा आम्ही कुणीच देव खाली येत नाही असं पाहताच पौलव्य ऋषींनी डोळे मिटले. त्यांनी त्रिकालज्ञानाने हे जाणलं की शापवाणी च्या भयाने आम्ही सर्व देव गोमातेच्या पोटात लपून बसलो आहोत. कितीही क्रोध आला तरी आमच्यासाठी आमच्याबरोबरच गोमातेलाही शाप देणं हे ऋषींच्या तत्वात बसत नव्हतं. त्यांच्या संयमी, विवेकी आणि विचारी मनाला ते पटलं नव्हतं. अखेर ऋषींनी क्रोध आवरला. शापवाणी मागे घेतली, हातातला पाणी खाली टाकलं आणि “हे गोमाते! माझं मन शांत कर” असं म्हणत त्यांनी हात जोडले. गोमातेला त्रिवार वंदन केलं आणि ते शांत होऊन आश्रमात परतले.”
ही कथा सांगून भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, “देवी, अशी आहे ही कथा. या कारणासाठी आम्ही गोमातेच्या उदरी प्रवेश केला आणि तेहतीस कोटी देवदेवतांना आपल्या पोटी सामावून घेणारी गोमाता आदरणीय-पूजनीय झाली. त्या गोमातेचे अधिक महिन्यात दर्शन,पूजन करणं ही कृती कर्म-नित्यनेमानंपेक्षाही अधिक पुण्यदायी झाली.
अध्याय तिसरा समाप्त!
।। श्रीकृष्णार्पणवस्तू ।।
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.