Subscribe Us

पुरुषोतम मास माहात्म्य/अधिक मास माहात्म्य अध्याय –4

पुरुषोत्तम मास माहात्म्य /अधिक मास माहात्म्य अध्याय–4

 ।। ज्याचे त्याचे प्राप्तन ।। 


पुरुषोतम मास माहात्म्य/अधिक मास माहात्म्य अध्याय –4 

श्री गणेशाय नमः || श्री सरस्वत्यै नम: || श्री गुरुभ्यो नमः
 
           “सूतमहाराज! आमच्या मनात एक शंका आहे. दान-धर्म, व्रत-वैकल्य, जप-जाप्य करूनसुद्धा मानवाला जीवनात सुख,दुःख,वियोग,यातना आणि क्लेश हे का भोगावे लागतात?” एक जिज्ञासू प्रश्न विचारला गेला. तेव्हा सूत पुराणिक म्हणाले, “आपण ह्या जन्मी जे काही सुख दुःख भोगत असतो, ते सर्व आपल्या गतजन्मामधल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ असते. पेरावे तसे उगवते हा तर सृष्टीचा नियम आहे. करावं तसं भरावं हा देवा घरचा न्याय आहे. कर्मफळातून कोणत्याही जीवमात्राची सुटका नाही.  मागे जे झालं ते आपण ह्या जन्मी भोगत असतो. आता दुसरा प्रश्न असा की, ह्या जन्मी तरी चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, पुण्यकर्म करायची, असे का? तर गत जन्माचे पाप भोगण्याची शक्ती मिळावी, निदान पुढे किंवा पुढील जन्मी तरी सुख लाभावं आणि ही जन्ममरणाची बेडी तुटावी, यासाठी. नाही तर त्या तिघांसारखी अवस्था होते. सूत पुराणिक कथा सांगू लागले. 
           एक प्रवासी उन्हातान्हातून प्रवास करत असताना एका तळ्याच्या काठी गार अशी सावली पाहून विश्रांतीसाठी म्हणून स्थिरावला. त्याने तळ्यातल्या पाण्याने हात पाय धुतले, जवळची शिदोरी सोडली, थोडासा आहार केला, पाणी पिला आणि विश्रांतीसाठी म्हणून झाडाच्या सावलीत विसावला. भरलेले पोट, सावली आणि सुखावणारा वारा यामुळे त्याला कधी झोप लागली ते त्यालाच कळले नाही. तो प्रवासी ज्या झाडाखाली झोपला, त्या झाडावरच एक माकड काही खायला मिळते का या आशेने झाडावरून खाली आले. त्याने इकडेतिकडे पाहिले, तर त्या माकडाला प्रवाशाच्या जवळ एक थैली दिसली. प्रवासी झोपला आहे, थैली भरलेली आहे, तेव्हा काहीतरी खायला मिळणार या आशेने त्या माकडाने ती थैली पळवली. सरसर झाडावर चढत वरची फांदी गाठली. थोड्याच वेळात तो प्रवासी जागा झाला. त्याने आपले चंबूगबाळ गोळा केले आणि घोड्यावर बसून तो पुढील प्रवासासाठी निघून गेला. 
           तो प्रवासी निघून गेला आणि काही वेळातच दुसरा एक प्रवासी त्याच झाडाखाली विश्रांतीसाठी येऊन थांबला. निवांतपणे डोळे मिटून भगवंताचे चिंतन करत असताना त्या प्रवाशाला आपल्या मांडीवर काहीतरी पडले असे जाणवले. त्याने डोळे उघडून पाहिले तर काय! ती एक थैली होती. छोटी पण काहीशी जड.  कुतूहलापोटी त्याने अचानक मांडीवर येऊन पडलेली ती थैली उघडली आणि आत पाहिले, तर त्या थैलीत बरेच पैसे होते. देवकृपेने अचानक धनलाभ झाला, या आनंदात त्या प्रवाशाने आधी देवाचे आभार मानले. मग त्या धनलक्ष्मीला नमस्कार केला. इकडे तिकडे नजर फिरवली आणि कोणी पाहत नाही याची खात्री होताच ती पैशांची थैली कनवटीला लावून तो दुसरा प्रवासीही पुढील प्रवासात निघून गेला. 
          त्यानंतर आणखी एक तिसरा प्रवासी त्याच झाडाखाली येऊन बसला. त्यानेही तळ्यातल्या पाण्याने हात पाय धुतले आणि भाकरी खायला म्हणून तो बसला. कसेबसे दोनचार घास त्याने खाल्ले असतील तोच तो पहिला प्रवासी तेथे धावत आला. त्याने त्या भाकरी खाणाऱ्या तिसऱ्या प्रवाशाला विचारले, “काय रे बाबा तुला येथे एक थैली सापडली का?” “नाही बाबा, मला तर इथे काहीच मिळाले नाही,” त्या तिसर्या  प्रवाशाने प्रामाणिक कबुली दिली. तेव्हा तो पहिला प्रवासी काहीशा रागावलेल्या स्वरात म्हणाला, “हे पहा, खरं खरं सांग.  तुला येथे एक थैली मिळाली ना? त्यात भरपूर पैसे होते ना? तु ती घेतलीस ना?” “नाही रे बाबा, मी तुझे पैसे का आणि कशासाठी घेऊ? कसली थैली? कसले पैसे? कोणी घेतले? मला तर काहीच ठाऊक नाही.” तो तिसरा प्रवासी गयावया करत म्हणाला. 
            “अरे चोरा, चोर तो चोर आणि वर शिरजोर काय? थांब तू असा कबूल होणार नाहीस.” असे म्हणत त्या पहिल्या प्रवाशाने त्या माणसाला जेवणावरून उठवले आणि तो त्या तिसर्याब प्रवाशास मारू लागला. “अहो असं काय करता? मला तर इथे काहीच मिळाले नाही. तुमची पैशाची थैली काळी का गोरी ते ही मला माहित नाही. मी तुमची थैली घेतलेली नाही आणि त्यातले पैसेही घेतले नाहीत.  मला सोडा, मला मारू नका.” तिसरा प्रवासी हाता-पाया पडू लागला. पण त्या पहिल्या प्रवाशाला त्याची काहीच दया येईना. तो पुढे होऊन त्या तिसऱ्या प्रवाशाचा गळा आवळू लागला. त्यावेळी मात्र “देवा नारायणा, धाव.. मला वाचव!” असे म्हणून तो देवाची करूणा भाकू लागला.
             नेमके त्याच वेळी नारद मुनी त्याच भागातून भ्रमण करत आकाशमार्गाने चालले होते. त्यांनी तो झाडाखालचा प्रकार पाहिला. पहिला प्रवासी मारत होता, गळा आवळत होता, थैली मागत होता आणि तो तिसरा निरपराध प्रवासी गयावया करत होता. तो खरं सांगत होता तरीही तो पहिला प्रवासी मात्र त्याच्यावरच संशय घेऊन आणि त्याला चोर ठरवून त्याला शिक्षा करत होता. तो बिचारा मात्र देवाची करुणा भाकत होता, धावा करत होता. नारायणाच्या नावाने टाहो फोडत होता. तरीही देव मात्र काही धावून येत नव्हते. हा सर्व प्रकार पाहून त्या तिसऱ्या प्रवाशाचा निरापराधीपणा ओळखून नारदमुनींना त्याची दया आली.  
          नारद सरळ वैकुंठात गेले. भगवान विष्णूंना प्रार्थना करीत म्हणाले, “प्रभू! एक भक्त तुमच्या नावाने टाहो फोडत आहे, तुमची मदत मागतोय, ‘वाचवा वाचवा’ अशी तुम्हाला विनवणी ही करतोय. तरीही तुम्ही असे शांत कसे? तुम्ही त्याला वाचवायला का धावत नाही?” तेव्हा नारायण म्हणाले, “नारदा, तुला काय वाटलं, मला त्याच्या हाका ऐकू आल्या नाहीत? आता तो खरा अपराधी नाही, हे पण खरं आहे. तरीही त्याच्यावर चोरीचा, खोटं बोलण्याचा आळ येतोय, याला कारण आहे त्याचं पूर्वजन्मीचा कर्म. तो आपल्याच गतजन्मातील कर्माचे फळ भोगतोय. जे होतंय, ते होणारच. त्यात मी काहीच बदल करू शकत नाही. नारदा, हा सारा त्या तीनही प्रवाशांच्या पूर्वकर्माचा खेळ आहे. त्यामुळे एकाला धनाचा वियोग, दुसऱ्याला अचानक धनलाभ तर तिसर्याहला निरपराधी असूनही शिक्षा भोगावी लागत आहे. हे ज्याचं त्याचं पूर्वकर्म आहे, प्रारब्ध आहे. त्याला मी काहीही करू शकत नाही.” 
          पूर्व कर्माच्या फळापासून जीव कसा बाजूला राहू शकत नाही, हे सांगताना नारायण म्हणाले, “नारदा, हे तिघेही प्रवासी पूर्वजन्माचे ऋणको, धनको आणि जामीनदार होत. आता जो निरपराध असूनही मार खातोय, तो मागच्या जन्मीचा कर्जदार आहे. ज्याला अचानक धनलाभ झाला, तो दुसरा प्रवासी मागील जन्मीचा सावकार आहे आणि पहिला प्रवासी हा त्या व्यवहारातला जामीनदार आहे. तिसरा प्रवासी म्हणजे कर्जदार याने घेतलेले कर्ज फेडलं नाही म्हणून त्याला आता मार खावा लागला. दुसरा प्रवासी सावकार, त्याला अचानक धनलाभाच्या रूपाने आपलं धन परत मिळालं. पण कुणाकडून? तर अनेक वर्ष मेहनत करून पैसे जमा केलेल्या त्या पहिल्या प्रवाशाकडून, म्हणजेच कर्जदाराच्या जामीनदाराकडून. अशी आहे ही कर्म फळाची कथा. 
          इथल्या शिक्षा, धनलाभ आणि धनवियोग या प्रत्येक गोष्टीला ज्याचं त्याचं पूर्वकर्मच कारणीभूत आहे. तेव्हा हे सारं असं होणारच. कुणाच्याही कर्मात देव काय किंवा दैव काय, यातील कोणालाच कसलाच बदल करता येत नाही. नारदा! दुसरी गोष्ट अशी आहे की, हे तिघेही गतजन्मी ब्राह्मण होते.” 
          “प्रभू समजलं समजलं, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. ब्राह्मणाने दुसऱ्याला धन देऊन आणि सावकारी करून व्याजाची आशा धरू नये. दुसऱ्या कडून कर्ज घेऊ नये. दोघांच्या व्यवहारात उगाच मोठेपणा मिरवायला जामीनही राहू नये, हेच सुचवायचं आहे ना प्रभू आपल्याला?” नारद म्हणाले. “होय, हेच सांगायचे आहे. ब्राह्मण हा सदाचारी, संतुष्ट आणि समाधानी हवा. तशा ब्राह्मणांना दान दिलं तरचं देणाऱ्याला खरं पुण्य लाभत.” 
          यासाठीच दात्याने दान करण्यापूर्वी ज्याला दान द्यायचे, तो खरेच दान घेण्यास सत्पात्र आहे की नाही, याची खात्री करणेही आवश्यक आहे. दानात अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूदान इत्यादी अनेक गोष्टी जरी येत असल्या, तरी अन्नदानासारखे दुसरे श्रेष्ठदान नाही, हेही विसरून चालणार नाही.

अध्याय चौथा समाप्त!
*।। श्रीकृष्णार्पणवस्तू ।।*

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या